उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीदरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटला दुखापतीतून सावरण्यासाठी एक आठवडय़ाचा कालावधी लागणार आह़े, असे भारतीय पथकाचे प्रमुख राकेश गुप्ता यांनी सांगितले.

‘‘सुदैवाने तिच्या हाडाला दुखापत झालेली नाही. उजव्या गुडघ्याच्या स्नायूला दुखापत झाली आहे. तूर्तास तिला आधार घेऊन चालावे लागत आहे. मात्र गुडघा निखळलेला नाही. ती आठवडाभरात या दुखापतीतून सावरेल.  स्वबळावर चालण्यासाठी तिला दोन ते तीन दिवस लागतील. तोपर्यंत आधाराने ती चालू शकते,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.

पदकाच्या शर्यतीत असणाऱ्या विनेशला ४८ किलो वजनी गटाच्या चीनच्या सन युनानविरुद्धच्या लढतीत ही गंभीर दुखापत झाली होती. मॅटवरच तिच्यावर उपचारांसाठी प्रयत्न झाले. मात्र दुखापत गंभीर असल्याने स्ट्रेचरवरून तिला बाहेर नेण्यात आले.