भारतामध्ये अजूनही निरुपयोगी रूढी-परंपरांचे काटेकोर पालन केले जाते. एखाद्याच्या स्वप्नापेक्षा, आयुष्यापेक्षा या रूढी-परंपरा लोकांना फार मोठय़ा वाटतात. मुलींनी-महिलांनी काय करायचे आणि काय नाही, याची खूणगाठ समाजरक्षक म्हणवणाऱ्यांनी बांधलेलीच असते. त्याविरोधात जाऊन कुणी काही केले तर त्याला तर ते समाजविघातक कृत्य ठरते. एक साधी गोष्ट. एका कुस्तीपटूला आपल्या मुलींनीही हा खेळ खेळावा, असे वाटले. त्यामध्ये गैर काहीच नव्हते. पण या समाजरक्षकांना यामध्ये परंपरांचा अपमान वाटला. आतापर्यंत कोणत्याही मुलीने कुस्ती खेळली नाही, त्यामुळे तुमच्या मुलीही कुस्ती खेळू शकत नाही, असे त्यांना दरडावून सांगण्यात आले. पण ज्यांची इच्छा प्रामाणिक  असते, ते जगाच्या विरोधात जातात आणि फक्त कामगिरीच्या जोरावर आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवतात. भारतीय महिला कुस्तीपटू बबिता कुमारीची गोष्टही याचीच प्रचीती देऊन जाते.

महावीरसिंग फोगट, हे कुस्तीपटू होते. त्यांनी आपल्या मुलींनाही कुस्तीपटू बनवण्याचे स्वप्न पाहिले. त्यांची ही इच्छा एवढी प्रबळ होती की, त्यांनी विरोधकांना जुमानले नाही. आणि प्रवास सुरू केला तो प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा. बबिता, विनेश या आपल्या मुलींना त्यांनी कुस्तीचे बाळकडू पाजले. बबितानेही त्यांचा विश्वास सार्थकी लावला. वडिलांची धडपड ती सुरुवातीपासून पाहत होती.

हरयाणातील भिवानी हे बॉक्सिंगसाठी प्रसिद्ध. प्रत्येक घरात तुम्हाला एक बॉक्सर नक्कीच सापडणार याची हमी. त्या मातीत आपल्या मुलीला कुस्तीचे धडे द्यायला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला विनेश आणि त्यानंतर बबिता त्यांच्याबरोबर आखाडय़ात उतरली. या परिवारामुळे गावाची इभ्रत वेशीला टांगली, असे जे गावकरी म्हणत होते, आज तेच गावकरी बबिताच्या कामगिरीवर स्तुतिसुमने उधळताना थकत

नाहीत. आता त्यामध्ये अजूनच बर पडणार आहे. कारण बबिता कुमारी आणि तिच्या कुटुंबियांवर बॉलीवूड अभिनेता आमीर खानचा ‘दंगल’ हा सिनेमा येत आहे. त्यामुळे आता रुपेरी पडद्यावरही बबिता आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास साऱ्यांना पाहता येणार आहे.

शालेय जीवनाबरोबरच बबिता कुस्तीचे धडे घेत होती. तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय असे एकामागून एक स्तर ओलांडत ती १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर उतरली. २००९ साली पंजाबमध्ये कुस्तीची राष्ट्रकुल स्पर्धा होती. या स्पर्धेत बबिताने सुवर्णपदक पटकावले आणि ती चर्चेचा विषय झाली. त्यावेळीही भिवानीमधल्या लोकांना बबिता कुस्तीमध्ये देशाचे नाव उंचावू शकते, हे समजून चुकले. त्यानंतर २०१० साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बबिताने रौप्यपदक पटकावले. २०११ साली मेलबर्नमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा बबिताने सुवर्णपदकाला गवसणी घातली तेव्हा जागतिक स्तरावर तिची दखल घ्यायला सुरुवात झाली. २०१२ साली जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले. त्यानंतर ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाने बबिता सुखावली. आशियाई स्पर्धेत बबिताची कामगिरी चांगली झाली नाही. पण या स्पर्धेतून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली मंगोलियाची सुमिया उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आणि बबिताला ऑलिम्पिकची लॉटरी लागली. बबिताची ही पहिलीच ऑलिम्पिक वारी. प्रत्येक खेळाडूचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न असते, तसे बबिताचेही होतेच आणि आता ते पूर्ण होताना दिसते आहे. पण ही ऑलिम्पिकवारी पहिली असली तरी अखेरची नाही, हे तिला पक्के माहिती आहे. रिओ ऑलिम्पिकमधला अनुभव बबिताला महत्त्वाचा वाटतो. प्रत्येक खेळाडूप्रमाणे तिनेही पदकाचे स्वप्न पाहिले असले तरी या स्तरावर कशी कुस्ती खेळली जाते, याचा अभ्यास बबिताला करायचा आहे. ऑलिम्पिक पदक फक्त शुभेच्छांच्या जोरावर मिळत नसते, तर त्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच बबिता दिवसाला सहा तास सराव करते. प्रयत्न केल्यावर परमेश्वरही मिळतो, तर पदक का मिळणार नाही, अशी बबिताची धारणा आहे. देशाला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारी बबिता पहिली महिला ठरते का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

बबिताची पदके

  • विश्व अजिंक्यपद स्पर्धा – कांस्यपदक -२०१२
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – रौप्यपदक – २०१०, सुवर्णपदक – २०१४
  • आशियाई अजिंक्यपद स्पर्धा – कांस्यपदक – २०१३
  • राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा – सुवर्णपदक – २००९, सुवर्णपदक-२०११

 

प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com