नरसिंगप्रकरणी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांचा खळबळजनक आरोप

राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेचे (नाडा)काही कनिष्ठ अधिकारी नरसिंग यादवविरोधातील कारस्थानामध्ये सहभागी आहेत, असा खळबळजनक आरोप भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी केला आहे.

याबाबत सिंग म्हणाले की, ‘ क्रीडा लवादाची सुनावणी सुरु असताना आम्हाला काही गोष्टींचा उलगडा झाला. या सुनावणीच्या वेळी जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) ऑलिम्पिकला फार कमी वेळ असताना नरसिंगची उत्तेजक चाचणी का घेतली, असा सवाल ‘नाडा’ला विचारला. यावर ‘नाडा’ने सांगितले की, सोनीपथ येथील ‘साई’मधील कनिष्ठ अधिकारी रमेश यांनी ४ जुलैला उत्तेजकाचा दुरुपयोग झाल्याची लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार ऑलिम्पिकला काही दिवस जरी शिल्लक असले तरी चाचणी घेण्यात आली होती.’

ते पुढे म्हणाले की, ‘ज्या व्यक्तीने २५ जूनला झालेल्या पहिल्या चाचणीपूर्वी नरसिंगच्या आहारामध्ये उत्तेजक मिसळले होते, त्याला आपल्या कामाची शाश्वती नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा नरसिंगच्या आहारामध्ये उत्तेजक मिसळले गेले. या लेखी तक्रारीबाबत महासंघाला कोणतीच माहिती देण्यात आली नाही. जर आम्हाला त्या लेखी तक्रारीती प्रत मिळाली असती तर रिओमध्ये क्रीडा लवादापुढे आमची बाजू भक्कम झाली असती. ‘नाडा’नेही याबाबत आम्हाला काही सांगितले नाही. मला वाटते की, याप्रकरणात ‘नाडा’च्या कनिष्ठ अधिकाऱ्यांचा नक्कीच सहभाग असावा.’

क्रीडा लवादाला मी भारतातील फौजदारी कारवाईला लागणाऱ्या दिरंगाईबाबतची  माहिती दिली. पण क्रीडा लवादाने ते अमान्य करत दोषींवर कारवाई का करण्यात आली नाही, असे विचारले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितावर कोणतीही कारवाई पोलीसांनी केलेली नाही. जर त्याच्यावर कारवाई केली असती तर नरसिंगची बाजू भक्कम झाली असती. त्यामुळे या प्रकरणात पोलीसही तेवढेच दोषी आहेत.

पंतप्रधानांची भेट

भारतामध्ये आल्यावर मी लगेचच पंतप्रधान आणि गृह मंत्रालयाची भेट घेतली. यावेळी मी याप्रकरणी सीबीआयने लक्ष घालण्याची मागणी केली. जर या प्रकरणाचा कसून तपास झाला तर यामधील सत्य बाहेर येईल, असा मला विश्वास आहे.

.. तर नरसिंगलाही शिक्षा 

या प्रकरणात जो दोषी आढळेल त्याला कडक शासन व्हायला हवे. जर या प्रकरणातील तपासाअंती नरसिंग दोषी आढळला तर त्यालाही शिक्षा करा. पण हे नरसिंगविरोधातील कारस्थानच आहे, यावर मला विश्वास आहे.

लवादाकडेही पुरावे नाहीत

क्रीडा लवादाच्या सुनावणीच्यावेळी मी पूर्णवेळ उपस्थित होतो. यावेळी उपस्थित असलेल्या तज्ञांनी नरसिंगने गोळ्यांद्वारे उत्तेजक द्रव्य घेतल्याचे म्हटले. पण ते फक्त त्यांचे म्हणणे होते, क्रीडा लवादाकडे या गोष्टीचे कोणतेही पुरावे नाहीत.