आपले खेळाडू इतर जागतिक स्पर्धा, आशयाई स्पर्धामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत असतात, पण ऑलिम्पिकमध्ये मात्र त्यांची कामगिरी निराशाजनक असते. यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्येही सायना, सिंधू, दीपा, ललिता यांचा अपवाद वगळला तर हेच दिसून आले.

पदकांचा खजिना लुटण्याचे स्वप्न पाहायला जावे आणि हाती दोन नाणी पडावीत अशीच काहीशी अवस्था भारतीय खेळाडूंना रिओ येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अनुभवास आली. आजपर्यंत सर्वात मोठे पथक पाठविणाऱ्या भारताला जेमतेम दोनच पदकांवर समाधान मानावे लागणे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. अनेक दिग्गज खेळाडू असूनही भारतीय पथकास लाजिरवाणी कामगिरी पाहावी लागली. साक्षी मलिक हिचे कुस्तीमधील कांस्यपदक तर पी. व्ही. सिंधू हिचे बॅडमिंटनमधील रौप्यपदक याचा अपवाद वगळता भारतास मोठे शून्यच पाहावे लागले.

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यापेक्षाही त्यामध्ये प्रतिनिधिक करणे हे ऑलिम्पिकचे जनक बॅरन डी क्युबर्टिन यांनी सांगितलेले तत्त्व भारतीय खेळाडू नेहमीच पाळत आले आहेत. भारतीय खेळाडूंना पूर्वीच्या काळी फारशा सवलती व सुविधा नव्हत्या. तरीही आपल्या हॉकीपटूंनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णयुग निर्माण केले होते. तर खाशाबा जाधव यांच्यासारख्या मल्लाने अनेक अडचणींवर मात करीत कांस्यपदक मिळविले होते. त्यांच्या तुलनेत गेल्या दहा बारा वर्षांमध्ये सुविधा व सवलती खेळाडूंच्या पायाशी लोळण घेत असल्या तरी अन्य मागासलेल्या देशांच्या तुलनेत आपल्या खेळाडूंची कामगिरी अगदीच नगण्य आहे. पदक मिळविण्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती व जिद्दीच्या अभावामुळेच भारतीय खेळाडू ऑलिम्पिक पदकापासून दूर असल्याचे दिसून येत असते. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धाही त्यास अपवाद नाही. यंदा पंधरा क्रीडा प्रकारांत भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले होते. डोंगर पोखरून उंदीर बाहेर निघाला असाच अनुभव भारतीय खेळाडूंबाबत दिसून आला. साक्षी व सिंधू यांनी भारताची लाज राखली अन्यथा भारताची पाटी कोरीच राहिली असती.

हॉकीत धिंडवडे

हॉकी हा आपला राष्ट्रीय क्रीडा प्रकार असला तरी १९८० च्या ऑलिम्पिकनंतर भारतास पदक मिळविता आलेले नाही. परदेशी प्रशिक्षक, परदेशातील स्पर्धा व सराव शिबिरांमधील सहभाग, फिजिओ, मसाजिस्ट, विशेष तांत्रिक सल्लागार आदी सर्व काही असताना भारतीय हॉकीपटूंची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही. शेवटच्या पाच-सात मिनिटांमध्ये आपल्या खेळाडूंना खेळावर नियंत्रण ठेवता येत नाही ही नेहमीचीच रडकथा यंदाही दिसून आली. गतविजेत्या जर्मनीविरुद्ध शेवटचे तीन सेकंद बाकी असताना आपण गोल स्वीकारला व बरोबरीत राहणारा सामना गमावून बसलो. परदेशी खेळाडू आपल्या खेळाडूंच्या पायावर चेंडू मारून फ्रीहिट किंवा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळवितात ही साधी गोष्टही त्यांना जमली नाही. रोलँन्ट ओल्टमन्स येवो किंवा अन्य कोणी जागतिक अव्वल दर्जाचा प्रशिक्षक आला तरी भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये फरक पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पेनल्टी कॉर्नरवर गोल मारण्याबाबत असलेला कमकुवतपणा, केवळ एकच गोलरक्षक नेण्यामुळे कर्णधार श्रीजेश याच्यावर आलेले शारीरिक व मानसिक दडपण, सांघिक समन्वयाचा अभाव, ऐन मोक्याच्या क्षणी सरदारासिंग याच्यासारख्या महत्त्वाच्या खेळाडूला मैदानाबाहेर ठेवणे आदी कारणास्तव भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाला.

महिला हॉकी संघाबाबत फारशी आशा नव्हती. तब्बल ३६ वर्षांनी भारतीय संघाने ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केली होती. खेळाडूंना परदेशातील मालिकांमध्ये संधी देण्यात आली होती. त्यांच्यासाठीही परदेशी प्रशिक्षक गेली अनेक वर्षे आहे. मात्र भारतीय खेळाडूंना संधीचा लाभ घेता आला नाही. साखळी गटात जपानविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत ठेवला हीच एकमेव जमेची कामगिरी भारतीय खेळाडूंना करता आली. अन्य सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी सपशेल हाराकिरी केली.

अ‍ॅथलेटिक्स- सुमार कामगिरी

अ‍ॅथलेटिक्स हा क्रीडाप्रकार पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडाप्रकार मानला जातो. मात्र ही गोष्ट अद्यापही भारतीय खेळाडूंना उमगलेली नाही. गेली बारा-पंधरा वर्षे भारतीय अ‍ॅथलिट्सना परदेशी प्रशिक्षक, परदेशातील स्पर्धा व सराव शिबिरांमध्ये भाग घेण्याची संधी, चांगल्या पगाराची नोकरी आदी सर्व सुविधा मिळत असतानाही एक-दोन खेळाडूंचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंची लाजिरवाणी कामगिरी होत असते. यंदा ललिता बाबर हिने तीन हजार मीटर स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवत अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र तिला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आमचे खेळाडू केवळ गल्लीतच शूर असतात. गल्लीबाहेर गेले की त्यांच्या मर्यादा स्पष्ट दिसून येतात हेच यंदाही पाहावयास मिळाले. विकास गौडा, खुशबीर कौर, कविता राऊत, सुधासिंग, टिंटू लुका आदी खेळाडूंनी आशियाई स्तरावर खूप चांगले यश मिळविले असले तरी ऑलिम्पिकच्या महासागरात त्यांना सपशेल मार खावा लागला. भारतीय धावपटूंची कामगिरी लक्षात घेतली की त्यांची ऑलिम्पिक पात्रता खोटी आहे की काय अशी शंका येते. स्वत:च्या वैयक्तिक कामगिरीपेक्षाही खराब कामगिरी भारतीय खेळाडूंनी रिओ येथे केली. सरडय़ाची धाव कुंपणापर्यंतच असते हे दिसून आले.

अ‍ॅथलेटिक्सप्रमाणे नेमबाजी हादेखील पदकांसाठी सोनेरी संधी असणारा क्रीडाप्रकार मानला जातो. जितू राय व अभिनव बिंद्रा यांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंनी सपशेल निराशाजनक कामगिरी केली. जितू याला दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये आठवे स्थान मिळाले. अभिनव याला दुर्दैवास सामोरे जावे लागले. प्राथमिक फेरीनंतर विश्रांतीच्या वेळी त्याने रायफल खुर्चीवर ठेवली होती. मात्र तोल जाऊन ही खुर्ची पडली व त्याच्या रायफलीचे खूप नुकसान झाले. त्याला जुन्याच रायफलीवर अंतिम फेरी करावी लागली. तरीही त्याने जिद्दीने अंतिम फेरीत नेमबाजी केली. त्याचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. अभिनव याने लगेचच स्पर्धात्मक नेमबाजीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेत उदयोन्मुख खेळाडूंसाठी मार्ग मोकळा केला. भारताच्या गगन नारंग, अपूर्वी चंडेला, मानवजितसिंग संधू, हीना सिधू, प्रकाश नंजप्पा आदी खेळाडूंना प्राथमिक फेरीतच बाद व्हावे लागले. खरे तर हे खेळाडू जागतिक स्पर्धाची मालिका, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करीत असतात. मात्र ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मानसिकतेअभावी त्यांची पीछेहाटच होत आहे हा अनुभव यंदाही पाहावयास मिळाला.

कुस्तीमध्ये नरसिंग यादव याच्याबाबत आपल्या संघटकांनीच पायावर धोंडा घालून घेतला. त्याला ज्या प्रकारे उत्तेजक प्रकरणात अडकविण्यात आले, त्याच्यासारखे दुर्दैवच नाही. या प्रकरणाची केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाद्वारे चौकशी करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणी पडद्यामागचा कलाकार शोधून काढून त्याच्यावर गंभीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. नरसिंग हा उत्तेजक प्रकरणात अडकला नसता तर निश्चितपणे आपल्याला किमान कांस्यपदक मिळाले असते. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदकानंतर गेल्या चार वर्षांमध्ये फारशा स्पर्धामध्ये भाग न घेण्याची वृत्ती योगेश्वर दत्त याच्या अंगाशी आली. अन्य मल्लांनी सपशेल निराशा केली.

साक्षीचे ऐतिहासिक पदक

भारतीय पुरुष मल्लांना जे शौर्य दाखविता आले नाही, ते शौर्य साक्षी मलिक हिने दाखविले. तिने या स्पर्धेत केलेल्या कुस्त्या पाहता तिच्या जिगरबाज व आत्मविश्वासाची प्रचीती दिसून येते. प्रत्येक लढतीत तिने दोन-तीन गुणांच्या पिछाडीवरून विजय मिळविला. प्रतिस्पर्धी खेळाडू कितीही वजनदार किंवा अनुभवी असली तरी त्याचे दडपण न घेता तिने बिनधास्त वृत्तीने कुस्त्या केल्या आणि ऐतिहासिक कांस्यपदक मिळविले. महिलांच्या कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे.

बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल हिने सपशेल निराशा केली. ऑलिम्पिकसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धासाठी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत योग्य रीतीने तिने नियोजन करणे आवश्यक होते. आपल्या देशात एखाद्या खेळाडूवरच लक्ष केंद्रित केले जाते व त्या खेळाडूच्या वलयामध्ये दुसरा गुणी खेळाडू झाकोळला जातो. सिंधूबाबत असेच घडत होते. सायनासारखेच यश मिळविण्याची क्षमता तिच्याकडे आहे हे आपल्या संघटकांना कधीच कळले नाही. तरीही सिंधू हिने त्याकडे दुर्लक्ष करीत केवळ आपल्या सरावावरच लक्ष केंद्रित केले होते. तिने अंतिम फेरीत धडक मारली तेव्हां कुठे ती पदक जिंकू शकते असा आत्मविश्वास संघटकांमध्ये निर्माण झाला. कॅरोलिना मरीन हिच्याविरुद्ध अंतिम लढतीत तिने पहिली गेम घेत अपेक्षा उंचावल्या. मात्र तिसऱ्या गेममध्ये तिची दमछाक झाली. थोडेसे तिने रेटून नेले असते तर ती सुवर्णपदकाचे स्वप्न साकार करू शकली असती. अर्थात तिचे रौप्यपदक हीदेखील सोनेरीच कामगिरी आहे.

दीपा कर्माकर हिला पदक मिळविता आले नाही तरी तिने मिळविलेला चौथा क्रमांक हा पदकाइतकाच अनमोल आहे. कारण जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. त्यातच तिने निवडलेला प्रोडुनोव्हा हा अतिशय अवघड क्रीडाप्रकार आहे. तिचे पदक थोडक्यात हुकले. जगातील सर्वोत्तम जिम्नॅस्टशी झुंज देत तिने हे यश मिळविले ही खूपच अतुलनीय कामगिरी आहे. आतातरी भारतीय ऑलिम्पिक संघटक जिम्नॅस्टिक्सला प्राधान्य देतील अशी अपेक्षा आहे.

भारतीय खेळाडूंबाबत नाचता येईना अंगण वाकडे ही कारणमीमांसा खरोखरीच हास्यास्पद असते. खूप वारा होता त्यामुळे आपली कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही ही तिरंदाजांनी दिलेली कारणे अयोग्यच आहेत. अन्य परदेशी खेळाडूंच्या वेळीही वारा असतोच. एकाग्रता व इच्छाशक्तीमध्ये कमी पडलो हीच महत्त्वाची कारणे आहेत. टेनिसमध्ये सानिया मिर्झा हिला दुहेरीत तुल्यबळ साथ देणारी खेळाडू आपण गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये तयार करू शकलो नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते. सानिया हिच्याबरोबर मिश्र दुहेरीत खेळताना कांस्यपदकाच्या लढतीत खेळताना रोहन बोपण्णा याने केलेला दुय्यम दर्जाचा खेळ पाहता त्याच्या खेळात परिपक्वता नाही हेच दिसून आले.

ज्युदो, रोईंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जलतरण आदी खेळांमध्ये केवळ आपले खेळाडू प्रतिनिधित्व करण्यातच समाधान मानत आले आहेत. जमेका, इथिओपिया, केनिया आदी अनेक देशांचे खेळाडूं ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करीत असतात. खरे तर त्यांना फारशा सुविधा व सवलती मिळत नसतात. मात्र आपण ऑलिम्पिक पदक मिळविल्यास आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवीतच ते ऑलिम्पिकसाठी अफाट मेहनत घेत असतात. त्यांच्यापासून आपल्या खेळाडूंनी प्रेरणा घेतली पाहिजे अन्यथा येरे माझ्या मागल्या असेच आपल्या खेळाडूंबाबत दर चार वर्षांनी घडत असते. घोडय़ाला पाण्यापाशी आणले तरी पाणी प्यायचे की नाही याचा निर्णय त्याने घ्यावयाचा असतो. हेच भारतीय खेळाडूंबाबत दिसून येत असते. कितीही सुविधा, सवलती दिल्या तरी जोपर्यंत पदक मिळविण्याची इच्छाशक्ती ते दाखवत नाहीत तोपर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंबाबत पदकांचे मृगजळच पाहावे लागणार आहे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com