पहिल्या दिवसअखेर भारत-चेक प्रजासत्ताक १-१ बरोबरी

दिल्लीच्या आर. के. खन्ना स्टेडियमवर २०१० नंतर अपराजित राहण्याचा विक्रम कायम राखत सोमदेव देववर्मनने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ४०व्या स्थानी असलेल्या जेरी वेस्लेवर दिमाखदार विजय मिळवला. सोमदेवच्या या अनपेक्षित विजयाने पहिल्या दिवसअखेर १-१ अशी बरोबरी केली. पहिल्या लढतीत युकीने सपशेल शरणागती पत्करल्यानंतर तीनदिवसीय लढतीत आव्हान जिवंत राखण्याच्या भारताच्या आशा मावळल्या होत्या. मात्र सोमदेवने बाजी पलटवत भारताला बरोबरी करून दिली. शनिवारी रोहन बोपण्णा आणि लिएण्डर पेस दुहेरीच्या लढतीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
कोर्टवरचा सर्वागीण वावर, भेदक सव्‍‌र्हिस आणि सर्वप्रकारच्या फटक्यांवरचे प्रभुत्व हे सोमदेवच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. सोमदेवने जेरी वेस्लेवर ७-६ (३), ६-४, ६-२ टायब्रेकरमध्ये गेलेल्या पहिल्या सेटमध्ये सोमदेवने जेरी वेस्लेची सव्‍‌र्हिस भेदण्यात यश मिळवले. तब्बल ११ बिनतोड सव्‍‌र्हिसेसच्या बळावर सोमदेवने पहिला सेट ७-५ असा नावावर केला. आद्र्रतापूर्ण वातावरण आणि पायाला झालेली दुखापत यामुळे दुसऱ्या सेटमध्ये जेरीच्या खेळातला सूर हरपला. याचा पुरेपूर फायदा उठवत सोमदेवने ६-४ अशी सरशी साधली. तिसऱ्या सेटमध्ये जेरीने झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुराच ठरला. सोमदेवने ही लढत ६-३ अशी जिंकत भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला.
रोसोलकडून युकीचा धुव्वा
तीन वर्षांपूर्वी विम्बल्डन स्पर्धेत राफेल नदालचा धुव्वा उडवणाऱ्या ल्युकास रोसोलने शुक्रवारी झालेल्या पहिल्या लढतीत दिल्लीकर युकी भांब्रीचा धुव्वा उडवला. उंचपुऱ्या काटक शरीरयष्टीच्या रोसोलने युकीला तीन सेटमध्ये निष्प्रभ केले. जागतिक क्रमवारीत ८५व्या स्थानी असलेल्या रोसोलने ही लढत ६-२, ६-१, ७-५ अशी जिंकली. पहिल्या सेटमध्ये रोसोलची सव्‍‌र्हिस भेदत युकीने २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर रोसोलने खणखणीत बिनतोड सव्‍‌र्हिसच्या आधारे आगेकूच केली. घरच्या मैदानावर खेळत असूनही युकीला चुकांवर नियंत्रण ठेवता न आल्याने रोसोलने ५-२ अशी आघाडी घेतली. तीन बिनतोड सव्‍‌र्हिसच्या बळावर रोसोलने पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये युकीची सव्‍‌र्हिस सातत्याने भेदत रोसोलने ४-० अशी भक्कम आघाडी घेतली. युकीने एक गुण कमावत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रोसोलने सव्‍‌र्हिस राखत ५-१ बढत मिळवली. युकीची सव्‍‌र्हिस भेदत रोसोलने दुसरा सेट जिंकला. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी करो या मरो सेटमध्ये युकीने २-१ अशी आघाडी घेतली. रोसोलच्या सव्‍‌र्हिसमधल्या हरवलेल्या अचूकतेचा फायदा उठवत युकीने ४-४ अशी बरोबरी केली. सामन्यातील सर्वाधिक वेळ चाललेल्या रॅलीमध्ये युकीने क्रॉसकोर्ट फटक्याचा खुबीने वापर केला. ५-५ आणि ४०-० अशा स्थितीत युकीला ब्रेकपॉइंट गमावले. रोसोलने सलग दोन गुणांसह तिसऱ्या सेटसह सामनाही जिंकला.

रोसोलच्या खेळाने चकित केले. अचूक सव्‍‌र्हिस आणि परतीच्या फटक्यांवरच्या नियंत्रणामुळे त्याने मला फारशी संधीच दिली नाही. ज्या वेळेला संधी मिळाली ती मी गमावली. डेव्हिस चषकात दोन देशांच्या मुकाबल्यात पराभूत होणे अधिक निराशाजनक असते.
– युकी भांबरी
मी मेहनती खेळाडू आहे. प्रत्येक सामन्यात मेहनत फळाला येतेच असे नाही. जेरीसारख्या अव्वल खेळाडूंना नमवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागणार होता. तसे खेळता आले याचे समाधान आहे. सव्‍‌र्हिसमधली अचूकता वाढवल्याचे समाधान आहे. जेरी दुखापतग्रस्त आहे याची मला जाणीव झाली. प्रदीर्घ रॅली तो टाळत होतो.
– सोमदेव देवबर्मन
या कोर्टवर चेंडू संथपणे येतो. हे ओळखून चेंडू सपाट आणि जोरात मारण्याचे तंत्र अवलंबले. हे डावपेच यशस्वी ठरले. युकीविरुद्ध आधी खेळलो नव्हतो. यू-टय़ूबच्या माध्यमातून त्याचे काही सामने पाहिले. वातावरणात उष्णतेपेक्षा आद्र्रता जास्त होती. त्यामुळे तीन सेटमध्येच सामना जिंकू शकलो हे उत्तम झाले.
– ल्युकास रोसोल