महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सहकारी तत्त्वांचा पाया घातला गेला होता. सहकारी तत्त्वावर अनेक उद्योग निर्माण झाले. सहकारी बँकिंग या क्षेत्रातदेखील स्त्रियांचा दबदबा आहे. सहकारी तत्त्वांवर चालणाऱ्या अनेक बँकांमध्ये स्त्रिया लहान-मोठय़ा पदांवर सक्षमपणे काम करून सहकारी चळवळ बळकट करत आहेत.

भारतात सहकार ही लोकशिक्षणाची एक महत्त्वाची चळवळ ठरली. भारतात सहकारी चळवळ सुरू होऊन शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सहकारी चळवळीने सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या कामामध्ये मोलाची बजावली. जगातली सर्वात मोठी सहकारी चळवळ भारतात झाली असे मानले जाते. अर्थात तिच्या यशापयशाचा वेगळा आढावा घेता येईल.
भारतात महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये सहकारी चळवळीत नेहमीच अग्रेसर राहिली. यात स्त्रियांचे योगदान भरीव स्वरूपाचे आहे. यापैकी राष्ट्रीय (खरे तर आंतरराष्ट्रीय) पातळीवर चटकन आठवणारे नाव म्हणजे ‘मॅगसेसे’ पुरस्कारविजेत्या इला भट्ट. इला भट्ट या गांधीवादी कार्यकर्त्यां आणि भारतीय सहकारी चळवळीतील महत्त्वाच्या संघटक. त्यांनी १९७२ मध्ये ‘सेवा’ ही संघटना बांधली. या संघटनेचा जन्म टी.एल.ए. (टेक्सटाईल लेबर असोसिएशन) या जुन्या आणि मोठय़ा संघटनेच्या माध्यमातून झाला होता. १९२० मध्ये महात्मा गांधींकडून प्रेरित झालेल्या
अनसुया साराभाई यांनी कापड उद्योग कामगारांची संघटना बांधली होती. स्त्रीवादी विचारांची जोड देऊन अनसूया साराभाई यांनी १९५४ मध्ये टी. एल.ए.ची महिला शाखा सुरू केली. नंतर १९६८ मध्ये गिरणी कामगारांच्या पत्नी व मुलींसाठी स्वयंरोजगाराची अनेक केंद्रं सुरू झाली.
१९७०च्या दशकात ठेकेदारांकडून होणाऱ्या शोषणाच्या संदर्भात झालेल्या सर्वेक्षणामधून अनेक मुद्दे पुढे आले. या सुमारास इला भट्ट टी.एल.ए.च्या महिला शाखेच्या प्रमुख होत्या. त्यांच्या लक्षात आले की, हजारो स्त्रिया कापड उद्योगात काम करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवीत आहेत, पण कायदे फक्त औद्योगिक कामगारांसाठी होते. स्वयंरोजगार करणाऱ्या स्त्रियांना ते लागू नव्हते. तेव्हा इला भट्ट यांनी अध्यक्ष अरविंद बूच यांच्याबरोबर या स्त्रियांना संघटित केले. १९७२ मध्ये त्यांनी ‘सेवा’ या संघटनेची स्थापना केली आणि सहकाराच्या माध्यमातून दुर्बल गटातील महिलांचे विविध आर्थिक प्रश्न सोडविण्यास सुरुवात केली. या चळवळीची व्याप्ती फार मोठी होती. इला भट्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कामगार, सहकार, स्त्री आणि मायक्रो फायनान्स चळवळीचा एक मोठा भाग बनल्या. आंध्र प्रदेशमध्येही
डॉ. शशिरेखा राजगोपालन यांनी मोठय़ा प्रमाणावर महिलांना संघटित केले.
महाराष्ट्र हे सहकारी चळवळीचे मोठे क्षेत्र. महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सहकारी तत्त्वांचा पाया घातला गेला होता. विविध कार्यकारी सोसायटय़ा, शेती, शेतीसाठी पाणीपुरवठा, भांडवल, गृहनिर्माण, कमी नफा घेऊन वस्तू विनिमय, कर्जपुरवठा, शिक्षण, गरजेच्या वस्तू इत्यादी अनेक क्षेत्रांत सहकाराचे महत्त्व लक्षात घेऊन ग्रामीण तसेच शहरी भागात सहकार चळवळ जोमाने पसरली. सहकारी तत्त्वावर अनेक उद्योग निर्माण झाले. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, नागनाथअण्णा नायकवाडी, लक्ष्मीबाई नायकवाडी, वैकुंठभाई मेहता इत्यादींनी सहकारी साखर कारखान्यांचे यशस्वी मॉडेल सिद्ध केले. साखर कारखाने, सूतगिरण्या, भातगिरण्या, दूध व्यवसाय, मासेमारी, बँका, प्रक्रिया उद्योग इत्यादींमुळे राष्ट्रीय उत्पादनात प्रचंड वाढ झाली. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार झाला. कृषी उत्पादनात मोठी वाढ झाली. तसेच पूरक व्यवसायही वाढीस लागले. समतेवर आधारित लोकशाही अर्थरचना निर्माण करणे, जात, धर्म, पंथ, वर्ग लिंग यांच्यापलीकडे जाऊन कार्य करण्यास लोकांनी एकत्र येणे, फसवणूक, शोषण, भ्रष्टाचारमुक्त अर्थव्यवहारास चालना देणे ही या चळवळीची उद्दिष्टे होती, ती पूर्ण करण्यात महिलांनी मोठा हातभार लावला.
महाराष्ट्रात या संदर्भातील काही उदाहरणे पाहण्यासारखी आहेत. यातील एक ठळक नाव म्हणजे प्रेमाताई पुरव. १९७५ पासून प्रेमाताई ‘अन्नपूर्णा’ ही संस्था चालवीत आहेत. सत्तरच्या दशकात गिरण्यांमधून बेकार झालेल्या गिरणी कामगार महिला खाणावळी चालवू लागल्या होत्या. त्या महिलांची संघटना त्यांनी बांधली होती. आणीबाणीत वीस कलमी कार्यक्रमातील एक कलम ‘दुर्बल घटकांना अर्थसाहाय्य देणे’चा आधार आणि १९७५च्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षांतील वातावरणाचा फायदा घेऊन प्रेमाताईंनी ‘अन्नपूर्णा’ची स्थापना केली. अनेक स्त्रियांना त्यांनी बँकेपर्यंत नेले. खासगी सावकाराच्या आर्थिक शोषणापासून स्त्रियांना सुटकेचा मार्ग दाखविला. खाद्यपदार्थाची विक्री, प्रशिक्षण, कर्जसाहाय्य या मार्गानी महिलांना सहकारी तत्त्वांचा अवलंब करण्यास उद्युक्त केले.
त्यांची कन्या मेधा पुरव-सामंत यांनीही प्रेमाताईंचा वारसा वेगळ्या स्वरूपात पुढे नेला. त्यांच्या कामाला आणखी एक परिमाण होते, ते बँकिंगच्या ज्ञानाचे. बँकेतून परत जाताना त्या बघायच्या, वाटेतल्या भाजीवाल्या बायकांकडे रोज एक अण्णा येतो, त्यांचे पैशांचे व्यवहार सुरू असतात. चौकशी केली तेव्हा कळले की, तो बायकांना कर्ज देतो. एक हजार रुपये दिले की रोज २५ रुपये याप्रमाणे परतफेड करताना ५० दिवसांत ३०० रुपये व्याजापोटी जात. हे चक्र सतत सुरू असे. मेधाताई म्हणाल्या, ‘‘हे पाहिल्यावर मी हादरले. तिथून एक कि.मी.वर बँक होती. बँकांमध्ये त्या वेळी सिपॅप, डीआरआय या अल्प दराच्या योजना भरात होत्या. मग मी त्यांच्याशी सतत बोलून त्यांचा एक गट तयार केला. त्या तयार होईनात, तेव्हा स्वत:च सुरुवातीला नऊ जणींना कर्ज दिले. या नऊ जणींत शेवंताबाई खुडे, लीलाबाई ढोक, जाहिदाबी जलालुद्दीन, रजनी पाटील, आशा चव्हाण, सुशीला कोंडिबा सावंत इत्यादींचा समावेश होता. ज्या आजही मेधाताईंच्या बरोबर कृतिशील आहेत.
मेधाताईंनी अत्यंत जाणीवपूर्वक सहकाराचा पर्याय निवडला. ‘सहकाराशी मायक्रो फायनान्स जोडणारी आमची पहिली संस्था आहे.’ मेधाताई सांगत होत्या. आम्ही मोठी कर्जे देतच नाही. तारण, जमीन नसलेल्या महिलांनाच इथे कर्ज मिळते. अन्नपूर्णाचा मुख्य हेतू तळागाळातल्या महिला आणि पुरुष यांचे अर्थसाहाय्य, शिक्षण, आरोग्यविमा इत्यादी अनेक मार्गानी सबलीकरण करणे हा आहे. त्यासाठी त्यांनी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, अन्नपूर्णा परिवार विकास संवर्धन अशा अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. तसेच अन्नपूर्णाचे मुख्य काम पुणे-मुंबईतून असले तरी फ्रँचायझी पार्टनरच्या माध्यमातून त्या बीड, इचलकरंजी अशा ग्रामीण भागातही पोहोचलेल्या आहेत. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर सुरू असलेले हे काम सर्वानुमतीने चालते. विशेष म्हणजे त्यांचा ‘एनपीए’ शून्य टक्के आहे. महिलांच्या सचोटीवर हा टप्पा त्यांनी गाठला आहे. मेधाताई याचे श्रेय सहकाराच्या तत्त्वांना आणि ती राबविणाऱ्या १९९३ पासूनच्या सहकाऱ्यांना देतात. ‘‘शैला दीक्षित सुरुवातीला अकाऊंट्स लिहून देत असे. चित्रा खिंवसरा, अंजली पाटील या विश्वस्त, उज्ज्वला वाघोले, आरती शिंदे, श्यामला पवार, मधुरा दिवाण, शुभांगी राऊत, सुनीता कुंभार, मनीषा सोनावणे अशा असंख्य जणींच्या साथीनेच हा व्याप सांभाळला जातोय.’’ मेधाताई सांगतात.
डॉ. सुधा कोठारी या खेड राजगुरूनगर हे आपले कार्यक्षेत्र मानून १९९३ पासून ‘चैतन्य’ या संस्थेद्वारे ग्रामीण भागात छोटय़ा उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे मोलाचे काम करीत आहेत. तर वसुधा सरदार यांनी दौंडजवळ पारनेर येथे आसपासच्या शेतकऱ्यांना सहकारी पद्धतीने शेती उत्पादन, थेट विक्रीसाठी ग्राहक सेतू, शेतीसाठी पूरक व्यवसाय इत्यादी साठी संघटित केले आहे. यापैकी अनेक संघटनांचे काम सहकार आणि बचतगट यांच्या सीमारेषेवर आहे.
सहकारी बँकिंग या क्षेत्रातदेखील महिलांचा दबदबा आहे. सहकारी तत्त्वांवर चालणाऱ्या अनेक बँकांमध्ये महिला लहान-मोठय़ा पदांवर सक्षमपणे काम करून सहकारी चळवळ बळकट करत आहेत. माणदेशसारख्या भागात देशातील पहिली महिला ग्रामीण बँक चेतना सिन्हा यांनी काढली. आत्महत्यांच्या प्रश्नाने पीडित छोटय़ा शेतकऱ्यांच्या बायकांच्या डोळ्यामधील वेदनेने ही ठिणगी पेटली. भगिनी निवेदिता सहकारी बँक हेही एक उत्तम उदाहरण. बँकेच्या संस्थापक मीनाक्षीताई दाढे, विद्यमान अध्यक्ष जयश्री कुरुंदवाडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांच्याशी बोलताना योगदानासंदर्भात माहिती मिळाली.
समाजासाठी काही तरी करावे या भावनेतून मीनाक्षीताई यांनी पती (कै.) विवेक दाढे यांच्या प्रेरणेने सहकाराची बीजे रोवली. बिडी कामगार, भिशी, भजनी मंडळे, पालकगट, झाडूवाल्या, मोलकरणी, महिला मंडळे इत्यादी ठिकाणी सतत महिलांशी संपर्क करत त्यांनी स्वत:च्या स्वयंपाकघरातच या कार्याचा श्रीगणेशा केला. ‘समाजातला एक मोठा वर्ग बँकिंग सुविधांपासून वंचित होता. तो कष्ट करतो, त्याला सन्मानाने बोलवा, सावकार आणि सहकार यांतील फरक त्याला समजवा, विश्वास निर्माण करा म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.’ हे दाढेसाहेबांचे शब्द मी मनात कोरून ठेवले’’, त्या म्हणाल्या. ‘एज्युकेट वुमन अ‍ॅड नॉनबँकिंग पीपल इन द फिल्ड ऑफ फायनान्स अ‍ॅण्ड बँकिंग’ हे उद्दिष्ट त्यांनी ठरवले आणि समविचारी मैत्रिणींचा गट निर्माण केला.’’ भगिनी निवेदिता बँकेच्या रूपाने गेल्या ४३ वर्षांत या रोपटय़ाचा कल्पवृक्ष झालाय.
या दीर्घ प्रवासात शीला काळे, सुमित्रा गोवईकर, सरला रेगे, प्रमिला गरुड, मीरा देशपांडे,
जयश्री काळे, रेवती पैठणकर अशा असंख्य कर्तबगार महिलांनी मोलाचे योगदान दिले. राष्ट्रीयीकृत बँकांमधील काही अधिकारी महिलादेखील आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी येऊन मिळाल्या. ‘‘अडचणीतला माणूस’ हाच कार्यबिंदू समजून सहकारी तत्त्वे आणि जीवनमूल्ये यांची जपणूक करीत या ‘भगिनीं’नी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. ’’ मीनाक्षीताई सांगतात, ‘‘अनेक कुटुंबांना आम्ही दारिद्रय़ाच्या गांजलेपणातून बाहेर काढू शकलो, खासगी सावकाराच्या पिळवणुकीतून सोडवू शकलो हेच समाधान आहे.’’ त्यासाठी त्या काळात अगदी रात्रीसुद्धा सावकारांना भेटायला जाणे, त्यांना समजावून सांगणे, त्यांच्यातील ‘माणूस’ जागा करणे असा धाडसीपणा त्यांनी दाखविला.
खरे तर यापलीकडेही सहकाराचे विश्व त्यातील महिलांच्या योगदानामुळे विस्तारले आहे, ज्या एका सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आपले आयुष्य वेचले त्या भावनेला सलाम करायला हवा.
anjalikulkarni1810@gmail.com

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये