गोवा मुक्ती संग्रामात शेकडो स्त्रिया सहभागी झाल्या. सत्याग्रहाच्या देखरेखीपासून, प्रत्यक्ष सत्याग्रही तुकडीत सामील होऊन निर्भयपणे गोळ्या झेलण्यापर्यंत स्त्रियांचा सहभाग र्सवकष होता. या सत्याग्रहींना अमानुष मारहाण झाली, गोळीबार झाला. त्यात मंदा याळगी, कमला उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांसह अनेक महिला धारातीर्थी पडल्या.

भारत स्वतंत्र झाला १९४७ साली, पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते. पण गोवा आणि महाराष्ट्राच्या तब्बल ३० वर्षांच्या अथक चळवळीमुळे १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवामुक्तीचे स्वप्न अखेर साकार झाले आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा पूर्णत्वास गेला. अर्थात त्यासाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्यागहींना आपले प्राण गमवावे लागले. हा लढा खरोखरच अभूतपूर्व असाच होता. लालजी पेंडसे यांनी ‘महाराष्ट्राचे महामंथन’ या ग्रंथात या लढय़ाविषयी लिहिले आहे.
सुमारे ४५० वर्षांपूर्वी पोर्तुगालचा अल्फान्सो आल्बुकर्क गोव्यात घुसला, तेव्हा तिथे आदिलशहाची हुकूमत होती. ६००० मुसलमानांच्या रक्ताचे पाट वाहवून त्याने गोवा जिंकला होता. त्यांना गोव्यात त्यांचे राज्य, धर्म आणि व्यापारउदीम वाढवायचा होता. धर्मातराची जबरदस्ती, जुलमी अत्याचार यातून पोर्तुगीजांनी आपले बस्तान बसविले होते. खरे तर, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लष्करी कारवाई करून गोवामुक्ती शक्य होती, परंतु पं. नेहरू यांनी लष्करी वापर न करण्याची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली होती. गोवा व भारतीय जनतेच्या आंदोलनाने जनमताचा रेटा यावा असे त्यांना वाटत होते.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच भारतीय स्वातंत्र्याचे वारे गोव्यात पोहोचले होते. त्यातून गोवामुक्तीचे स्वप्न आकार घेऊ लागले. महाराष्ट्र आणि गोवा यांतील बंध आधीपासूनच घटत होता. गोव्यातून महाराष्ट्र आणि बंगालमधील स्वातंत्र्यसैनिकांना मदत मिळत होती. १९२८च्या सुमारास मुंबईत गोवा काँग्रेस समितीची स्थापना झाली. डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भूमिगत चळवळ सुरू झाली. १९२९ मध्ये भारतीय काँग्रेसमध्ये गोवा काँग्रेसला सामावून घेतले गेले.
१९४५ नंतर दुसऱ्या महायुद्धात जगभर साम्राज्यवादी शक्ती निष्प्रभ होऊन स्वातंत्र्यवादी चळवळींना बळ मिळाले. याचा फायदा गोवामुक्ती संग्रामालाही निश्चितपणे झाला. गोव्यात सुरू झालेली सत्याग्रही चळवळ पोर्तुगीजांनी निर्घृणपणे दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात येऊन ठेपल्यामुळे १९४६ मध्ये काँग्रेसने गोवामुक्तीची लढाई जाहीरपणे लढायचे ठरवले.
डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यात मडगाव इथे सभाबंदीचा हुकूम मोडून जाहीर भाषण केले आणि या चळवळीला प्रारंभ झाला. त्यात त्यांना आणि इतर अनेकांना हद्दपार केले गेले. १९४८ मध्ये डॉ. कुन्हा यांना आठ वर्षांची शिक्षा होऊन ते पोर्तुगालच्या तुरुंगात डांबले गेले. नंतर १९५३ मध्ये सुटल्यावर त्यांनी ‘आझाद गोवा’, ‘स्वतंत्र गोवा’ नावाची वृत्तपत्रे सुरू केली. १९५८ मध्ये त्यांचे निधन झाले.
दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संघटना पुढे सरसावल्या. त्यांचे मुख्य केंद्र मुंबईत होते. सांगलीचे मोहन रानडे यांनी ‘आझाद गोमंतक दल’च्या माध्यमातून गोव्यात सशस्त्र लढा उभारला. या लढय़ात ते जखमी झाले आणि १९६० पर्यंत तुरुंगात डांबले गेले. १९५३ मध्ये मुंबईत पीटर अल्वारीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोवा नॅशनल काँग्रेस’ स्थापन झाले, परंतु तिचे स्वरूप मर्यादित होते. या चळवळीच्या साहाय्यासाठी पुण्यात ‘केसरी’ ऑफिसमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात गोवा विमोचन सहायक समिती स्थापन झाली. एस. एम. जोशी., ना. ग. गोरे, शिरुभाऊ लिमये, सेनापती बापट, पीटर अल्वारीस,
पं. महादेवशास्त्री जोशी, केशवराव जेधे, मधु दंडवते, जयंतराव टिळक, वसंतराव तुळपुळे, चिटणीस यांच्याबरोबरीने सुधा जोशी, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत आदी अनेक स्त्रिया या सत्याग्रही लढय़ात उतरल्या.
१८ मे १९५५ रोजी ना. ग. गोरे आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी गोव्यात गेली. त्यांना अटक झाली. त्या पाठोपाठ आत्माराम पाटील, कॉ. नांदेडकर, कॉ. राजाराम पाटील अशा तुकडय़ा जातच राहिल्या. कॉ. राजाराम पाटील यांच्या तुकडीत मालिनीबाई अग्रभागी होत्या. पोर्तुगीज सरकारने या तुकडय़ांवर अमानुष मारहाण, छळ, गोळीबार केला. त्यात अमिरचंद गुप्ता, बाबुराव थोरात, नित्यानंद साहा हे सत्याग्रही मारले गेले. परंतु त्यामुळे लढय़ाला अधिक तीव्र धार चढली. ९ ऑगस्ट १९५५ रोजी गोवा विमोचन समितीने काश्मीर ते कन्याकुमारी येथील ५००० कार्यकर्ते गोव्यात प्रवेश करतील असे घोषित केले.
पहिली तुकडी कॉ. विष्णुपंत चितळे यांच्या नेतृत्वाखाली निघणार होती. पार्टीच्या आवाहनानुसार विविध प्रांतांमधून मरण्यास तयार असलेल्या नि:शस्त्र सत्याग्रहींच्या याद्या येऊ लागल्या. कॉ. कमल भागवत यांनी आपल्या ‘न संपलेली वाट’ या आत्मकथनात या लढय़ाचे चित्र रेखाटले आहे. त्यांच्याकडे सत्याग्रहींची व्यवस्था बघण्याचे काम आले होते.
पंजाब, उत्तर प्रदेश, बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक, आसाम, ओरिसा इत्यादी सर्व ठिकाणांहून सत्याग्रहींचे जथेच्या जथे येत होते. त्यामुळे सत्याग्रह अखिल भारतीय झाला. या सर्वाचे चेहरे उत्साहाने आणि निर्धाराने उत्फुल्ल झाले होते. सामुदायिक सत्याग्रहासाठी सर्वजण उत्सुक झाले होते. यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या अनेक स्त्रिया मोठय़ा संख्येने आल्या होत्या.
१३ ऑगस्ट १९५५ रोजी पुण्याला केसरीवाडा सत्याग्रहींनी भरून गेला होता. कमलताई लिहितात, ‘सर्व तुकडय़ा बेळगाव, सावंतवाडीहून बांदा आणि तेरेखोलला जात. वाटेत प्रत्येक स्टेशनवर स्थानिक लोक त्यांचा सत्कार करीत, त्यांना चटणी-पोळी देत. गोवामुक्तीच्या घोषणांनी सारे गाव दुमदुमून जाई. ते दृश्य फार विलक्षण होते. बांदा हे छोटेसे गाव सत्याग्रहींमुळे गजबजून गेले होते. दोन मोठय़ा खोल्यांमधून भाताची रास रचलेली होती, तर मोठमोठय़ा पातेल्यात बटाटय़ाची भाजी रटरटत होती.’
१५ ऑगस्टला पहाटे पावसातच सत्याग्रही सरहद्दीकडे निघाले. आकाशवाणीवर नेहरूंचे भाषण सुरू होते. ते म्हणाले, ‘‘मलासुद्धा हातात तिरंगा घेऊन गोव्यात प्रवेश करावासा वाटतोय.’’ मग काय, लोकांच्या मनात उत्साह संचारला. देशी-परदेशी पत्रकार, कॅमेरे यांची हजेरी होतीच. केशवराव जेधे, कॉ. डांगे, चितळे, मिरजकर, र. के. खाडिलकर, रणदिवे, सरदेसाई, डॉ. गायतोंडे इत्यादी अनेक जण होते. सुमारे तीन ते चार हजार सत्याग्रही आणि नागरिक उपस्थित होते.
इतक्यात तुफान गोळीबार सुरू झाला. कर्नालसिंग, महांकाळ, चौधरी गोळ्या लागून कोसळले. मागून धावत आलेल्या सहोदराबाईंच्या दंडात गोळी घुसली. कॉ. चितळ्यांच्या डोळ्याला गोळी चाटून गेली. ओक जखमी झाले. तरीही सत्याग्रही पुढेच सरकत होते. शेवटी समितीने थांबण्याचा आदेश दिला. परदेशी बातमीदारांनी मृतदेह आणि जखमींना उचलून भारताच्या सरहद्दीत आणले. अनेकांचे बलिदान देऊन सत्याग्रह थांबला. या सत्याग्रहात एकूण २८ जण ठार तर २५० जण जखमी झाले. वाईट गोष्ट म्हणजे, त्यांचे मृतदेह मुंबईत जाऊ दिले नाहीत. पुण्यात त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्या दिवशी मुंबई-पुण्यात सरकारी कार्यालयांवरील झेंडे निम्मे खाली उतरवण्यात आले. मुंबईत लोकांनी निषेध दिन पाळला. हजारो लोक रस्त्यावर आले.
सरकारने गाडय़ा अडविल्याने मधु दंडवतेंसह शेकडो स्त्री-पुरुष सत्याग्रही पायी पुढे गेले आणि त्यांनी सत्याग्रह केला. या सत्याग्रहात शेकडो स्त्रिया सहभागी झाल्या. सत्याग्रहाच्या देखरेखीपासून, प्रत्यक्ष सत्याग्रही तुकडीत सामील होऊन निर्भयपणे गोळ्या झेलण्यापर्यंत स्त्रियांचा सहभाग र्सवकष होता. या सत्याग्रहींना अमानुष मारहाण झाली, गोळीबार झाला. त्यात केशव गोरे, हिरवे गुरुजी, रामान त्यागीबाबा, कर्नालसिंग, यांच्याबरोबर मंदा याळगी, कमला उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांसह अनेक महिला धारातीर्थी पडल्या. शेकडोजणी जखमी झाल्या. तरीही न डगमगता स्त्रियांनी लढा सुरूच ठेवला.
या घटनांमुळे महाराष्ट्रात मोठा उद्रेक झाला. सगळीकडे हरताळ, मोर्चे यांनी वातावरण तापले. त्यात ना. ग. गोरे आणि राजाराम पाटील यांना झालेल्या १० वर्षांच्या शिक्षेमुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला.
पोर्तुगीज सरकारची ही जुलूमशाही आणि आंदोलनाला मिळणारा जनतेचा तीव्र प्रतिसाद या पाश्र्वभूमीवर नेहरूंनी १७ डिसेंबर १९६१ रोजी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारतीय सैन्य गोव्यात घुसवण्याचा निर्णय घेतला. गोव्यातील जनतेने सैन्याचे स्वागत आणि सहकार्य केले. अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले.
या संपूर्ण लढय़ामध्ये स्त्रिया आघाडीवर होत्या. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यलढय़ाने त्यांना दिलेला जोश, उत्साह, स्वातंत्र्याचे प्रेम आणि स्वार्थत्याग करण्याची लढाऊ तयारी त्यांच्यात पुरेपूर होती. त्यांच्यातील हेच स्फुल्लिंग त्यांना गोवामुक्ती संग्रामात खेचून घेऊन गेले.
anjalikulkarni1810@gmail.com

Devendra Fadnavis
सागरी सुरक्षेच्या कामासाठीही ९५ पदांची कंत्राटी भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाचा शासन आदेश
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित