दुबेंनी मला माझे संवाद देऊन म्हटलं, ‘‘तू राजकन्या आहेस एवढंच लक्षात ठेव. स्टार्ट..’’ मी वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता आवाजातली थरथर नाहीशी झाली, आत्मविश्वास वाढला. पहिला प्रवेश जोशात संपवून शाबासकीची अपेक्षा करत मी दुबेंकडे पाहिलं. चेहऱ्यावरची सुरकुतीही न हलवता ते म्हणाले, ‘‘आता पुन्हा वाच.’’ तो प्रवेश मी पुन:पुन्हा वाचला. मी तोवर ज्या थोडय़ाफार नाटकांत कामं केली, त्यात माझ्या अकृत्रिम अभिनयाचं भारी कौतुक झालं होतं. त्यामुळे माझ्यात जन्मत:च उत्तम अभिनयगुण असल्याचं मी गृहीत धरलं होतं; पण दुबेंबरोबरच्या पहिल्याच तालमीत माझी ही भ्रामक कल्पना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

(पूर्वार्धात – गिरीश कर्नाड यांच्या ‘ययाती’ नामक नाटकात दिग्दर्शक सत्यदेव दुबेंनी मला चित्रलेखेची भूमिका दिली. त्या संदर्भात जेव्हा झेवियर्सच्या कँटीनमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो, तेव्हा दुबेंच्या शब्दांनी माझ्यावर जादू केली; पण चुरगळलेले कपडे, अस्ताव्यस्त केस, चेहऱ्यावर दाढीचे खुंट, असं त्यांचं स्वरूप माझ्यासाठी धक्कादायक होतं. दुसऱ्या दिवशी मला तालमीला नेण्यासाठी ते घरी आले, तेही याच अवतारात! पुढे काय झालं? .. त्याचा हा उत्तरार्ध..)

‘ययाती’ नाटकाची निर्मिती ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (‘आयएनटी’) या संस्थेची होती, त्यामुळे तालीम बाबुलनाथ मंदिराच्या आवारात असलेल्या संस्थेच्या जागेतच होती. गावदेवीतल्या माझ्या घरापासून बाबुलनाथजवळ असल्याने दुबेंनी पायी जायचं ठरवलं आणि माझी गोची झाली. आमच्या सारस्वत कॉलनीतल्या मध्यमवर्गीय सभ्य माणसांनी, त्याहीपेक्षा तिथल्या माझ्या मैत्रिणींनी, मला अशा भणंग वाटणाऱ्या माणसाबरोबर  जाताना पाहिलं तर त्यांना माझ्याबद्दल काय वाटेल, या विचाराने मी फार अस्वस्थ झाले. मी या माणसाबरोबर नाहीच, असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत मी दुबेंबरोबर चालत होते.

‘ययाती’च्या टीममध्ये मी एकटीच नवी असल्याने, तालीम फक्त माझीच होती. चालता चालता, इतर भूमिका कोण कोण करतंय हे दुबे सांगायला लागले. बोलताना ते चिकार हातवारे करत होते. हात वर गेला की त्यांचा तोकडा, जाळीजाळीचा टी-शर्टही वर जाई आणि पोटाचा भाग दिसे. मला इतका संकोच वाटायला लागला की, माझ्या सह-कलाकारांविषयी खूप उत्सुकता असूनही दुबेंच्या बोलण्याकडे माझं मुळीच लक्ष लागेना. टॅक्सीचा आग्रह न धरल्याबद्दल मी मनात स्वत:ला चिकार शिव्या घातल्या. सर्वाविषयी सांगून झाल्यावर ते निदान काही काळ न बोलता चालतील, ही आशादेखील फोल ठरली. पुढच्याच क्षणी ‘‘अशी पोक काढून का चालतेस?’’ असा प्रश्न त्यांनी विचारला आणि मग ते एकामागोमाग एक हुकूम द्यायला लागले. ‘‘पाठीचा कणा सरळ ठेवून चाल, खांदे वाकवू नकोस, हनुवटी वर कर..’’ ह्य़ुजेस रोडसारख्या हमरस्त्यावरल्या प्रचंड रहदारीच्या कोलाहलात माझं नाटय़ प्रशिक्षण सुरू झालं होतं.. ‘‘तू राजकन्या आहेस, ययाती महाराजांची स्नुषा आहेस, हे विसरू नकोस.’’ केम्प्स कॉर्नवरच्या फ्लायओव्हरवरून भरधाव येणाऱ्या गाडय़ा चुकवत, राजघराण्याला शोभेल अशा रीतीने रस्ता ओलांडायच्या धडपडीत माझा दुबेंबद्दलचा संकोच कधी विरून गेला, हे मला कळलंही नाही.

बाबुलनाथ मंदिराच्या अगणित पायऱ्या चढून आम्ही वर पोहोचल्यावर तालमीचा हॉल कुठे दिसतो का, हे मी पाहात असतानाच दुबेंनी आपला मोर्चा आवारातल्या एका पत्र्याच्या शेडकडे वळवला. दरवाजावरचं भलंमोठं कुलूप उघडून आम्ही आत गेलो. त्या अंधाऱ्या, कुबट वास पसरलेल्या जागेत खच्चून सामान भरलं होतं. मोठमोठय़ा ट्रंका, तऱ्हेतऱ्हेचं फर्निचर, पडद्यांचे ढीग.. हे ‘आयएनटी’चं गोदाम होतं तर! या गोदामात तालीम करायची? मी गोंधळून जागच्या जागी उभी होते. तेवढय़ात दुबेंनी आढय़ाला लोंबकळणारे दोन बारीक दिवे लावले. खोलीच्या मधोमध काही खुच्र्या, बाकं पडली होती, ती दर्शवून म्हणाले, ‘‘त्या खुच्र्या हलवून तालीम सुरू करू या.’’ मी लहानपणी दिवाणखान्यातला सोफा हलवून किंवा वर्गातली बाकं बाजूला सारून नाटय़-दिग्दर्शनाचे प्रयोग करत असे, त्याची आठवण आली.

दुबेंनी मला माझे संवाद देऊन म्हटलं, ‘‘त्या बाकाला पलंग समज. त्यावर बसून किंवा त्याभोवती फिरून संवाद मोठय़ाने वाच. अ‍ॅक्टिंग  नको. तू राजकन्या आहेस एवढंच लक्षात ठेव. स्टार्ट..’’ मी वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता आवाजातली थरथर नाहीशी झाली. आत्मविश्वास वाढला. पहिला प्रवेश जोशात संपवून शाबासकीची अपेक्षा करत मी दुबेंकडे पाहिलं. चेहऱ्यावरची सुरकुतीही न हलवता ते म्हणाले, ‘‘आता पुन्हा वाच. या वेळेला व्यवस्थित तोंड उघड आणि श्वास घे.’’ तो प्रवेश मी पुन:पुन्हा वाचला. त्यांनी ते संवाद स्वत: वाचून दाखवले नाहीत. ते कशा पद्धतीत म्हणावेत याबद्दल एक अक्षरही सांगितलं नाही. फक्त दर दोन वाक्यांनंतर मला थांबवून ते सूचना देत, ‘‘मुँह खोलो, और सांस लो.’’ मी तोवर ज्या थोडय़ाफार नाटकांत कामं केली, त्यात माझ्या अकृत्रिम अभिनयाचं भारी कौतुक झालं होतं. दरखेपेला पारितोषिकही पदरी पडलं होतं. त्यामुळे माझ्यात जन्मत:च उत्तम अभिनयगुण असल्याचं मी गृहीत धरलं होतं. दुबेंबरोबरच्या पहिल्याच तालमीत माझी ही भ्रामक कल्पना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

दुसऱ्या तालमीपासून सूचनांची संख्या वाढत गेली. ‘‘नुसत्या कपाळाला आठय़ा घातल्याने राग व्यक्त होत नाही. समोरच्या माणसाच्या डोळ्यांत बघून बोल. खांदे, हात ताठरलेले नकोत, सैल सोड. वाक्यांच्या मध्ये तोंडाने श्वास घे, नाकाने नाही..’’ आणि गंमत म्हणजे, मला कंटाळा येण्याऐवजी माझा उत्साह अधिकाधिक वाढत गेला. त्या काही दिवसांत दुबेंनी दिलेल्या त्या अतिशय साध्या वाटणाऱ्या सूचना, पुढे केवळ नाटकात कामं करताना नाही, तर आयुष्यात चालताबोलतानाही माझ्या उपयोगी पडत गेल्या.

सूचना पाळण्याची तालीम करता करता आम्ही संहितेची तालीमही बहुधा केली असावी, कारण आठवडाभराने दुबेंनी ‘ययाती’ची भूमिका करणाऱ्या पुरी नामक गृहस्थाबरोबर माझी तालीम निश्चित केली. पुरी त्यांच्या ऑफिसच्या लंच टाइममध्ये येणार होते. मी तालमीला पोचल्यावर, ‘‘पुरी येईपर्यंत एकटीनेच सराव कर,’’ असं मला सांगून दुबे सिगरेट ओढायला बाहेर गेले. माझा सीन संपतो न संपतो तोच  टाळ्यांचा आवाज ऐकू आल्याने मी वर पाहिलं. मी कल्पनाही केली नव्हती असा उंच, पीळदार बांध्याचा एक माणूस गोदामाचा दरवाजा व्यापून उभा होता. मी आ वासून त्याच्याकडे पहात असतानाच, पुढे येऊन अत्यंत खर्जात तो म्हणाला, ‘‘हॅलो चित्रा, मैं अमरिश.’’ फैयाज खानांचं संगीत सोडल्यास असा आवाज मी आयुष्यात कधी ऐकला नव्हता. त्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर असा काही परिणाम झाला की, माझ्या तोंडून साधा हॅलो निघेना. त्यांच्याबरोबर काम करणं शक्यच नव्हतं! माझ्या गांगरलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत पुरीसाब आर्जवी सुरात म्हणाले, ‘‘तू सीन छान केलास. मी पाहात होतो.’’ मी हसून थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही जमलं नाही. तेवढय़ात दुबे आत आले. म्हणाले, ‘‘तूदेखील राजकन्या आहेस. कुठल्याही राजापुढे तुझी हिंमत खचत नाही, समजलं? एक दीर्घ श्वास घे आणि सीन सुरू कर.’’

पुरींना तालमीत मध्येच थांबवून दुबे एखादी चूक दाखवून देत व पुरीसाब कुरकुर न करता, वाद न घालता दिग्दर्शक जे सांगेल, ते करत. हे सर्व मी पाहात होते. त्यातनं अनेक गोष्टी शिकत होते. संपूर्ण नाटकाची तालीम सिडनहॅम महाविद्यालयामध्ये होती. देवयानीची भूमिका करणारी सुनीला प्रधान आमच्या बिल्डिंगमधल्या हॉलमध्ये राज्य नाटय़ स्पर्धेच्या तालमी करायला येत असल्याने, तिला मी आधीपासूनच ओळखत होते. शर्मिष्ठेच्या भूमिकेत गुजराती रंगभूमीवरच्या तरला मेहता, तर दासीच्या भूमिकेत मराठी प्रायोगिक रंगभूमीवर नाव झालेल्या सुलभा देशपांडे होत्या. त्या दोघींची कामं मी पाहिली नव्हती, पण सुलभाच्या अभिनयाची ख्याती मी आशाकडून ऐकली होती. या सर्व अनुभवी अभिनेत्रींबरोबर काम करायच्या कल्पनेने एक्साईट होऊन मी ‘सिडनहॅम’ला पोचले. माझे प्रवेश नाटकाच्या उत्तरार्धात असल्याने मला उशिरा बोलावलं होतं. कॉलेजच्या पायऱ्या चढत असताना मला दुबेंचा, कुणावर तरी जोरजोराने ओरडत असल्यासारखा आवाज लांबून ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जात मी तालीम चालू असलेल्या वर्गापर्यंत पोचले. टेबलं-खुच्र्या बाजूला सारून वर्गाच्या मधोमध तयार केलेल्या मोकळ्या जागेत पुरींची तरलाबेनबरोबर तालीम चालली होती, ती थांबवून दुबे त्यांना जोरात रागावत होते. दुबेंच्या हातात फूटपट्टी होती, जी ते बी-ग्रेड चित्रपटातल्या मारक्या शिक्षकाप्रमाणे टेबलावर अधूनमधून जोराने आपटत. पलीकडे सुनीला व सुलभा चुपचाप बसून हा सारा प्रसंग पाहात होत्या. त्याही दुबेंच्या ओरडय़ातून वाचल्या नाहीत. गेल्या आठ-दहा दिवसांत दुबेंचं हे रूप मी कधीच पाहिलं नव्हतं. मला इतका धक्का बसला की, मी दरवाजातच गोठल्यागत उभी राहिले. काही वेळाने दुबेंचा राग शांत होऊन त्यांनी पाच मिनिटांची विश्रांती दिली, तेव्हा कुठे इतरांचं माझ्याकडे लक्ष गेलं. आश्चर्याची गोष्ट अशी की, एका झटक्यात खोलीतलं वादळी वातावरण पूर्णपणे निवळलं. काही क्षणांपूर्वीचे तणाव नाहीसे होऊन सर्व जण हसत गप्पागोष्टी करायला लागले. दुबेंनी ओळख करून देण्याआधीच सर्व आपलेपणानं माझ्याशी बोलायला लागले. दुबेंचं तें रुद्ररूप मी जणू कल्पनेत पाहिलं होतं!

‘ययाती’पासून दुबेंच्या थिएटर युनिट कुटुंबाचा मी भाग झाले आणि माझ्या प्रायोगिक नाटकांतल्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर दुबेंची अनेक रूपं मी पाहिली. त्यांच्याबरोबर काम करताना तऱ्हेतऱ्हेचे अनुभव मिळाले; पण पन्नास वर्षांपूर्वी ‘ययाती’च्या वेळी आलेल्या, त्या पहिल्यावहिल्या, अत्यंत खास अनुभवांना तोड नाही.

चित्रा पालेकर

chaturang@expressindia.com