वेगळी लैंगिकता असलेल्या माणसांचे हे सर्व गट आता ‘एलजीबीटीक्यू’ या छत्राखाली एकत्र आले असून, इंद्रधनुष्याचे सप्तरंग असलेला ध्वज जगभरच्या सर्व देशांत या लैंगिक विविधतेचं प्रतिनिधित्व करतो. माझ्या मुलीचं जीवन पूर्णपणे समजून घेण्याच्या उद्देशाने मी समलैंगिकतेविषयीची माहिती मिळवायला लागले हे खरं, पण ‘लेस्बियन’ असणं म्हणजे काय, हे बरंचसं कळल्यावरही मी थांबले नाही. भूतलावरच्या इंद्रधनुष्याचे सर्व रंग जवळून निरखण्याचा प्रयास करत राहिले त्याविषयीचा ‘एलजीबीटीक्यू’ विषयावरील हा भाग दुसरा..

वर्ष १९९३ उगवेपर्यंत समलैंगिक माणसांचं विश्व माझ्यासाठी जवळजवळ अनोळखीच होतं. त्या वर्षी मुलीने माझ्यापाशी ती लेस्बियन असल्याचं उघड केलं. आणि तिच्या जीवनाचा हा महत्त्वाचा भाग जास्तीत जास्त समजून घेण्याचे मी प्रयत्न सुरू केले.

Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा
falgun purnima 2024
फाल्गुन पोर्णिमेला निर्माण होतेय दुर्मिळ युती! या ३ राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल! प्रगतीसह मिळेल बक्कळ पैसा

भारतात माहितीचा स्फोट होण्याआधीचा हा काळ! सुरुवातीला आम्हा दोघींच्या संवादातून मुलीने माहिती पुरवली. नंतर काही महिन्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्यावर तिथून पुस्तकं, लेख, पत्रकं इत्यादी पोस्टाने पाठवून ती माझ्या माहितीत भर घालत गेली. त्या पुस्तकांत निरनिराळ्या देशांतल्या, संस्कृतीतल्या, समलैंगिक मुलांच्या आईवडिलांची मनोगतं वाचल्यावर, ‘लेस्बियन’ मुलीची आई या नात्याने (विषमलिंगी) समाजात मला वाटणारा एकटेपणा बऱ्याच अंशी कमी झाला. या आईवडिलांनी स्वत:च्या पूर्वग्रहावर मात करत, सामाजिक व धार्मिक विरोधकांचा सामना करत, आपल्या ‘वेगळ्या’ मुलामुलींचा कसा स्वीकार केला; आपल्या मुलांना नागरिकत्वाचे समान हक्क मिळावेत, यासाठी कशा चळवळी केल्या, हे सर्व माझ्यासाठी अतिशय स्फूर्तिदायक होतं.

तरीही कित्येक र्वष अनेक बाबतीत हे जग माझ्यासाठी धूसरच राहिलं. पुढे नव्या सहस्रकाच्या सुरुवातीला मी शाल्मलीच्या काही समलैंगिक मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष भेटले; त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या, तेव्हा कुठे हे विश्व माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अस्तित्वात आलं. त्यांच्या बोलण्यातून, या माणसांवर किती अन्याय केला जातो; त्यांना सामाजिक कलंकाचा, तऱ्हेतऱ्हेच्या गैरसमजुतींचा कसा सामना करावा लागतो; किती प्रकारची दडपणं त्यांच्यावर लादली जातात, हे उलगडत गेलं. त्यानंतर केवळ ‘माझ्या मुलीचा मी व जवळच्या सर्वानी ती आहे तशी स्वीकार केलाय’, या गोष्टीचं केवळ समाधान मानत राहणं मला शक्य नव्हतं.

आपल्या देशात या समाजाचा सर्व स्तरांवर स्वीकार व्हावा, यासाठी मी माझ्या परीने काय करावं, असा विचार करताना माझ्या लक्षात आलं की मी स्वत:च काही प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळते. उदाहरणार्थ, ‘‘मग.. शाल्मली कधी लग्न करायचं म्हणते?’’ या टिपिकल प्रश्नाला, ‘‘ती समलिंगी असल्यामुळे लग्न करण्याची तिला कायद्याने बंदी आहे’’, असं खरं उत्तर देण्याऐवजी, ‘‘एवढय़ात तरी नाही..’’ असं गुळमुळीत उत्तर देते. जवळची काही माणसं सोडल्यास इतरांशी बोलताना, शाल्मलीने जिच्याबरोबर संसार थाटलाय, त्या ख्रिस्तीनचा ‘पार्टनर’ असा उल्लेख करण्याऐवजी ‘मैत्रीण’ असा उल्लेख करते. माझ्या नकळत मनात ठाण मांडून बसलेला (एकापरीने इतरांच्या पूर्वग्रहांना मान्यता देणारा) संकोच जाणवल्यावर मला धक्काच बसला. समलैंगिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंगीएवढा जरी हातभार लावायचा म्हटलं तरी प्रथम हा संकोच स्वत:च्या मनातून पूर्णपणे घालवणं आवश्यक होतं. त्यानंतर मात्र शाल्मलीच्या लग्नाबद्दल कुणी चौकशी केल्यास ती ‘लेस्बियन’ असल्याचं (ती परदेशी किंवा प्राध्यापक असल्याचं सांगावं तितक्याच) सहजपणे मी सांगू लागले. आमच्या इमारतीत कॅथलिक, मुस्लीम, हिंदू, पारसी अशा सर्व धर्माचे लोक राहतात. शाल्मली-ख्रिस्तीन सुट्टीत घरी आल्यावर शेजाऱ्यांपैकी कुणी त्यांच्याबद्दल विचारल्यास न घाबरता, चिंता न करता, खरं उत्तर द्यायला सुरुवात केली. आणि होता होता मुलीच्या ‘वेगळे’पणाचा बागुलबुवा स्वत:च्या मनातून हद्दपार केला.

‘एलजीबीटीक्यू’ छत्राखालील माणसांबरोबर इथवर प्रवास करता करता ‘लिंग’ (जेंडर) व ‘लैंगिकता’ (सेक्शुएलिटी) या विषयींची खरी माहिती मला कळत गेली. या दोन्हींमध्ये माझा गोंधळ उडत असे, तोही नाहीसा होत गेला. लैंगिकतेच्या बाबतीत म्हणायचं तर, माणसांची नैसर्गिक लैंगिकता केवळ स्त्रीपुरुष संबंधांपुरती मर्यादित नसते; ‘गे’ (पुरुष-पुरुष) किंवा ‘लेस्बियन’ (स्त्री-स्त्री) संबंध हेदेखील नैसर्गिकच असतात, हे मला सुरुवातीलाच पटलं होतं. पण ‘बाय-सेक्शुअल’ हा शब्द ऐकिवात असला तरी त्याचा नेमका अर्थ कळत नसे. बऱ्याच उभयलिंगी माणसांना भेटल्यावर मला उलगडा झाला की या माणसांना नैसर्गिकत:च स्त्री वा पुरुष अशा दोघांहीबद्दल आकर्षण वाटू शकतं. दोघांपैकी कुणालाही जीवनसाथी निवडून ही माणसं विषमलिंगी वा समलिंगी जीवन आनंदाने, एकनिष्ठपणे जगू शकतात. (पण समाजाच्या भीतीने विषमलिंगी व्यक्तीशी लग्न-संसार करणाऱ्या समलिंगी व्यक्तीला ‘बायसेक्शुअल’ म्हणता येणार नाही.)

याचप्रमाणे ‘ट्रान्सजेंडर’ (तृतीयपंथी) यांच्याविषयी अधिक माहिती मिळवताना, त्यांचा संबंध प्रामुख्याने लिंग व लिंग-भाव (जेंडर आयडेंटिटी) यांच्याशी असतो, हे मला कळलं. जन्मत: बालिंगावरून मुलगा की मुलगी हे ठरवलं जातं. पण पुढे काही मुलांना आपलं लिंग खरंतर वेगळं असायला हवं; आपण चुकीच्या शरीरात अडकलो आहोत, असं वाटतं. काही स्त्रिया (ट्रान्स-मेन) स्वत:ला पुरुष मानून पुरुषांप्रमाणे वागतात, तर काही पुरुष (ट्रान्स-विमेन) आपण स्त्री आहोत असं मानून स्त्रीप्रमाणे कपडे घालतात व वागतात. आपल्या देशात ‘ट्रान्स-विमेन’पैकीच बहुतेकजण घरीदारी नाकारलं गेल्यामुळे, मानसिक आधारासाठी हिजडापंथांमध्ये सामील होतात. वर नमूद केलेल्या या वेगवेगळ्या गटांच्या पलीकडे निरनिराळ्या लैंगिकता असलेल्या माणसांचा ‘क्वीअर’ असा उल्लेख केला जातो.

वेगळी लैंगिकता असलेल्या माणसांचे हे सर्व गट आता ‘एलजीबीटीक्यू’ या छत्राखाली एकत्र आले असून, इंद्रधनुष्याचे सप्तरंग असलेला ध्वज जगभरच्या सर्व देशांत या लैंगिक विविधतेचं प्रतिनिधित्व करतो. माझ्या मुलीचं जीवन पूर्णपणे समजून घेण्याच्या उद्देशाने मी समलैंगिकतेविषयीची माहिती मिळवायला लागले हे खरं, पण ‘लेस्बियन’ असणं म्हणजे काय, हे बरंचसं कळल्यावरही मी थांबले नाही. भूतलावरच्या इंद्रधनुष्याचे सर्व रंग जवळून निरखण्याचा प्रयास करत राहिले. यामागे काही कारणं होती.

१९९५मध्ये ‘दायरा’ हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी अमोलला विचारण्यात आलं. या चित्रपटाची मूळ पटकथा समाधानकारक नसल्याने त्यात बदल करण्याचं काम माझ्यावर सोपवलं गेलं. स्वत:ला स्त्री मानून स्त्रीच्या वेषात वावरणारा पुरुष व गुंडांपासून बचाव करण्यासाठी पुरुषाच्या वेषात दडलेली स्त्री यांच्या बदलत्या नात्यांमधली ही गोष्ट. यावर चर्चा होत असताना ‘ट्रान्स्वेस्टाइट’ हा शब्द कानावर पडत असे. आपल्या सर्वाप्रमाणे मला बालपणापासूनच हिजडा-व्यक्ती ठाऊक होते, पण चित्रपटातलं पुरुषपात्र हिजडा-व्यक्ती नव्हतं. मी ‘टाटा इन्स्टिटय़ूट’मधून पुस्तकं मागवून पालथी घातली व अशा माणसांच्या मानसिकतेविषयी काही तपशील शोधून नवे प्रसंग लिहिले. चित्रपटाचं तसंच मी लिहिलेल्या दृश्यांचं जरी कौतुक झालं, तरी त्या व्यक्तींविषयी माझ्या मनात उगवलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं मी वेळेच्या अभावी मिळवू शकले नाही, हे मला खूपत राहिलं. (‘ट्रान्सवेस्टाइट’ हा शब्द जाऊन त्या जागी ‘ट्रान्सजेंडर’ वापरात आल्याचंही मला खूप नंतर कळलं.)

‘दायरा’च्या निमित्ताने विचारचक्र सुरू झाल्यावर स्त्रीवेषातील पुरुषांच्या अनेक प्रतिमा नजरेसमोर आल्या. त्याचबरोबर, या सर्व एका साच्यातून निघत नाहीत; त्यांची लैंगिकता व मानसिकता वेगवेगळ्या प्रकारची असू शकते; त्यांना सरसकट लेबलं चिकटवणं चुकीचं आहे, याचीही जाणीव व्हायला लागली. उदाहरणार्थ, रंगमंचावर स्त्रीवेष धारण करून स्त्रीभूमिका करणारा नट रंगमंचाबाहेरच्या आयुष्यात पुरुष म्हणूनच वावरत असेल तर त्याला तृतीयपंथी मानता येणार नाही.

स्त्रीवेषातल्या पुरुषांची अशीच एक अनोखी आठवण.. १९७८ मध्ये न्यूयॉर्कला धाकटी बहीण अरुंधती हिच्याकडे गेले होते त्यावेळची. ती राहात असलेल्या ‘ग्रेनिच व्हिलेज’मध्ये भटकताना आलेल्या थ्रिलिंग अनुभवांची! स्त्रियांचे भडक, सेक्सी गाऊन्स, मोठमोठे रंगिबेरंगी टोप व अति उंच टाचांचे सँडल घातलेले; अवास्तव मेक-अप केलेले हे पुरुष, अश्लीलतेकडे किंचित झुकणारे विनोदी हावभाव करत गाणी म्हणून मनोरंजन करताना पाहिल्यावर प्रथमत: मी पार चक्रावले. भांबावून बघतच राहिले. अरुंधतीने समजावलं, ‘‘हे मनोरंजनाचे कार्यक्रम करणारे व्यावसायिक आहेत. त्यांना ‘ड्रॅगक्वीन’ म्हणून ओळखलं जातं.’’ पुढे १९९५मध्ये ऑस्ट्रेलियाला गेल्यावर शाल्मलीने ‘प्रिसिल्ला, क्वीन ऑफ द डेझर्ट’ हा त्या सुमाराला आलेला व अतिशय नावाजलेला चित्रपट दाखवला. त्यातली मुख्य पात्रं ‘ड्रॅगक्वीन्स’ होती. त्यांच्या चित्रणातून, स्त्रीवेष धारण करून कार्यक्रम करणाऱ्या पुरुषांच्या लैंगिकता व लिंग-भाव किती निरनिराळ्या तऱ्हेचे असू शकतात, हे दर्शवलं होतं. (अर्थात, त्यावेळी या गुंतागुंतीचं मला पूर्णपणे आकलन झालं नाही)

स्त्रीवेष घालणारे सर्व पुरुष हे निव्वळ कलाकार असतात, असं नाही. त्यातले अनेकजण केवळ बाईच्या वस्त्रांत नटण्याची स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी तसा वेष घालतात, हे ‘क्रॉसड्रेसर्स’! काहींना मात्र आपण स्त्रीच आहोत, असं आतून प्रखरपणे वाटत राहिल्याने पुरुष म्हणून जगणं अस होतं. ही ‘ट्रान्सजेंडर’ माणसं. अशांपैकी काहींना लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेऊन स्त्री होणं शक्य होतं, तर काहींना पैशांच्या अभावी किंवा शरीराने साथ न दिल्याने ते शक्य होत नाही.

या गोष्टी आत्मसात करता करता पूर्वी धूसर असलेलं विश्व माझ्यापुढे साकार होत गेलं, माझ्या गैरसमजुती पुसट होत गेल्या. त्याचबरोबर, ‘बहुसंख्य माणसांना सर्वसामान्यपणे माहीत असलेल्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचं असणं’ ही ज्यांची एकमेव चूक, त्या अल्पसंख्य ‘एलजीबीटीक्यू’ व्यक्तींबद्दल किती चुकीच्या कल्पना, गैरसमजुती, अफवा, अवतीभवती पसरल्या आहेत हेही मला स्पष्टपणे दिसायला लागलं.. त्याविषयी २२ जुलैच्या अंकात.

चित्रा पालेकर

chaturang@expressindia.com