– बाबा गुरमितसिंह रामरहीम ‘इन्सान’ यांना अटकेनंतर रोहतकला घेऊन जाण्यासाठी वापरलेले हेलिकॉप्टर अदानींचेच होते, जे नरेंद्र मोदींनी लोकसभा प्रचारादरम्यान वापरले होते..

– तीन लाख कोटींचा काळा पसा परत आलेला नसल्याचे १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून धडधडीतपणे सांगणाऱ्या मोदींचा खोटारडेपणा पंधरा दिवसांतच उघडा पडला..

राहुल गांधी जर घराणेशाहीचा फायदा मिळूनही अपयशी ठरलेले राजकारणी (फेल्ड डायनास्ट) असतील तर त्यांच्या अमेरिकेतील भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने १७ प्रवक्ते आणि १०-१२ मंत्र्यांची फौज उतरवली कशाला?

– फडणवीस सरकारने ‘गुजरातच्या बुलेट ट्रेन’ला ३० हजार कोटी रुपये दिले. त्याच पशातून मुंबई रेल्वेचा स्वर्ग झाला असता, पण काय करणार? आता मराठी माणूस गुजरातचा नोकर झालाय..

गेल्या महिन्या-दीड महिन्यात वरील पोस्ट आपल्यापैकी बहुतेकांनी नक्कीच वाचल्या असतील. त्या केवळ प्रातिनिधिक. त्या कुणाला पटल्या असतील, कुणाला नाही. कुणाला खऱ्या वाटल्या असतील, कुणाला नाही. ज्यांना खऱ्या वाटल्या, त्यांना ‘खरे’ सांगावे लागेल. बाबा गुरमितसिंह, मोदी व अदानींची संगत जोडली गेली ती ‘एडब्ल्यू १३९’ हेलिकॉप्टरमुळे. मोदींनी फक्त अदानींचीच हेलिकॉप्टर वापरल्याचे सर्वानी गृहीत धरलेय. पण वस्तुस्थिती अशी आहे, की अदानींकडे एकही हेलिकॉप्टर नाही. आहेत ती तीन ‘एक्झिक्युटिव्ह जेटस्’. ज्या दोन छायाचित्रांचा संदर्भ देऊन बाबा, मोदी, अदानींना जोडण्याचा प्रयत्न झाला, ती हेलिकॉप्टर होती ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’ (एडब्ल्यू) कंपनीची. ‘एडब्ल्यू १३९’ हा काही त्या हेलिकॉप्टरचा नोंदणी क्रमांक नाही. ते आहे मॉडेलचे नाव. ते कोणाच्याही मालकीचे असू शकते. अधिक तपशील मिळविल्यानंतर ते ‘डीएलएफ’ या प्रख्यात बांधकाम कंपनीच्या मालकीचे असल्याचे आणि ते भाडय़ाने देण्याचा त्यांचा रीतसर व्यवसाय असल्याचे स्पष्ट झाले.

हरियाणा सरकारने त्या दिवशी ते भाडय़ाने घेतले होते आणि बाबांच्या ‘डेरा सच्चा सौदा’कडून त्याचे भाडे वसूलही केले. पण तरीही अदानींचे नाव जोडले गेले आणि बहुतेकांना ते खरेच वाटले.

असेच मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणाचे. ‘एका खासगी संस्थेच्या अंदाजानुसार, आजपर्यंत बँकिंग व्यवस्थेत नसलेले सुमारे तीन लाख कोटी रुपये नोटाबंदीनंतर बँकिंग व्यवस्थेत आले. (त्यांपैकी) एकूण पावणेदोन लाख कोटी रुपये संशयास्पद असून त्यांची चौकशी चालू आहे,’ असे मोदी प्रत्यक्षात म्हणाले होते. पण अनेकांनी पसरवले की, ‘‘तीन लाख कोटींचा काळा पसा जप्त झाल्याचे मोदींनी सांगितले आणि त्यांचा खोटारडेपणा रिझव्‍‌र्ह बँकेने लगेच पंधरा दिवसांत उघडा पाडला!’’ ते बोलले काय, पसरविले गेले काय. वस्तुत: नंतर रिझव्‍‌र्ह बँकेने जे सांगितले, तेच मोदींनी अप्रत्यक्षपणे सूचित केले होते. बुलेट ट्रेनचे तसेच. एक लाख आठ हजार कोटींच्या खर्चापैकी ८८ हजार कोटी कर्ज आहे. मग उरतात फक्त सुमारे वीस हजार कोटी रुपये. त्यात केंद्राचा हिस्सा दहा हजार कोटींचा आणि गुजरात व महाराष्ट्राचा हिस्सा प्रत्येकी पाच हजार कोटींचा. म्हणजे महाराष्ट्राला प्रत्यक्षात पाच हजार कोटी रुपये द्यावे लागणार.

 मग तीस हजार कोटींचा आकडा आणला कुठून?

८८ हजार कोटींच्या कर्जामध्ये महाराष्ट्राच्या हिश्शाला २५ टक्के बोजा येणार असल्याचे मान्य केल्यास मुद्दल, कर्जाचा हिस्सा व त्यावरील व्याज मिळून सुमारे २५ ते २८ हजार कोटींपर्यंत रक्कम जाऊ शकते.  पण हे सांगताना मुद्दाम विसरले जाते की, २० ते २२ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड पन्नास वर्षांच्या कालावधीत करायचीय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा, की बुलेट ट्रेनच्या महसुलात, नफ्यातही महाराष्ट्राचा हिस्सा २५ टक्के राहणारच आहे. पण जणू काही असे चित्र निर्माण केले गेले की, महाराष्ट्राच्या खिशातील तीस हजार कोटी लगेचच गुजरातच्या घशात घातले गेले.

राहुल गांधींच्या बर्कलेतील भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने १७ प्रवक्ते व १०-१२ मंत्री उतरविण्याइतका दुसरा हास्यास्पद दावा असू शकत नाही. मुळात भाजपमध्ये अधिकृतपणे १७ प्रवक्ते नाहीत. पण सरकार कोणाचेही असो, मंत्री दिसला की पत्रकारांची झुंड त्यांच्यामागे धावत असते. दोन-तीन डझन वृत्तवाहिन्यांना त्यांचा स्वतंत्र बाइट हवा असतो आणि हे दररोज कोणत्याही मुद्दय़ावर घडत असते. भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया दिली ती फक्त केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी. एक-दोन डझन वृत्तवाहिन्यांवर दररोज चर्चाचे कार्यक्रम असतात. त्यात सर्वच पक्षांचे प्रवक्ते, नेते असतात. अगदी फुटकळ विषयांवरही ही मंडळी तावातावाने बाजू मांडत असतात. त्यामुळे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘नेत्यांची फळी’ उतरविल्याचा दावा नुसताच पोकळ नाही, तर मनोरंजन करणारा आहे.

दिल्लीतील पत्रकार स्वाती चतुर्वेदींनी ‘आय एम अ ट्रोल’ हे भाजपच्या ‘डिजिटल आर्मी’च्या कारवायांचे पितळ उघडे पाडणारे पुस्तक लिहिले. त्यात मोदींना २०१४ साली जिंकून देणाऱ्या आणि त्यानंतर अश्वमेधाची घोडदौड चालूच ठेवण्यासाठी मदतगार ठरलेल्या भाजपच्या भाडोत्री सायबर सनिकांची तपशीलवार माहिती आहे. त्याचबरोबर सामाजिक माध्यमांवर विष पेरणाऱ्या, विद्वेष माजविणाऱ्या आणि अफवा पसरविणाऱ्या काही जल्पकांना (ट्रोल्स) दस्तुरखुद्द मोदी फॉलो करीत असल्याचेही त्यांनी दाखवून दिलेय. पण असे भाडोत्री ट्रोल्स आता सर्वच पक्षांनी पाळलेत. पण मोदींवरील ‘भक्ती’पोटी स्वयंस्फूर्तीने वाह्य़ातगिरी करणाऱ्या ‘अनपेड ट्रोल्स’शी मोदींचा सदोदित द्वेष करणारे ‘अनपेड ट्रोल्स’देखील तितक्याच स्वयंस्फूर्तीने दोन हात करू लागलेत. या अगोदर उल्लेखलेली चार प्रातिनिधिक उदाहरणे नव्याने ऊर्जा गवसलेल्या मोदीविरोधकांच्या ‘ट्रोलगिरी’शिवाय दुसरे काय असू शकते?

हे ‘ट्रोल’ काय करतात? खऱ्याचे खोटे, आकडय़ांची मोडतोड, विधानांचे बदलायचे संदर्भ, लिहायच्या धडधडीत खोटय़ानाटय़ा गोष्टी. दीड-दोन महिन्यांपासून सायबरविश्वात विरोधकांनी चालविलेल्या आक्रमक मोहिमेने भाजप गोंधळलाय. सामाजिक माध्यमांवरील भाजपविरोधी प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन अमित शहांना जाहीरपणे करायला लागते, यातच सर्व काही येते. आज सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर विरोधकांचे आक्रमक ‘ट्रोलिंग’ भाजपला काटय़ासारखे बोचत असेल; पण मोदी आणि भाजपच या भस्मासुराचा जनक आहेत. सामाजिक माध्यमांची ताकत ओळखणारा मोदी पहिला नेता. या विश्वावर त्याचे साम्राज्य आजही अबाधित. सामाजिक माध्यमांवर झंझावात करून निर्माण झालेल्या लाटेवर ते स्वार झाले. मोदीप्रतिमासंवर्धन अन् विरोधकांचे प्रतिमाभंजन करून जनमताला हवा तसा आकार देणे ही भाजपच्या ‘ट्रोल’ची उद्दिष्टे. त्यात त्यांना अभूतपूर्व यश मिळाले. तोपर्यंत विरोधक गाफीलच होते. प्रचाराची त्यांची तंत्रे अजूनही जुनी होती. मोदींनी या ‘नव्या भारता’चा फायदा उचलला आणि सर्वाना मागे टाकले. मात्र उशिरा का होईना, विरोधक सामाजिक माध्यमांवरील लढाईमध्ये शड्ड ठोकून उभे राहिले आणि बघता बघता काही महिन्यांपासून ते भाजपला पुरून उरल्याचे दिसतेय.

जिथे भाजपच्या ‘सायबरसन्या’ची हुकमत, त्याच सामाजिक माध्यमांकडे ‘दुर्लक्ष करा’ असे सांगण्याची वेळ शहांवर आली म्हणजे काळाने उगविलेला सूडच म्हणायला हरकत नाही. जिथे फुले वेचली, तिथे काटे टोचण्याची वेळ आल्याचा हा काव्यगत न्याय. सामाजिक माध्यमांच्या धास्तीची शहांना जाणीव होण्याचे कारण म्हणजे गुजरातमध्ये भलतीच लोकप्रिय झालेली ‘विकास पागल हो गया’ ही सायबर मोहीम. ती काँग्रेसची मोहीम. विकासाचे मॉडेल म्हणून दाखविले जात असलेल्या मोदींच्या गुजरातमधील विकासाचे पोकळ दावे दाखविणारी ती तिरकस, टोकदार मोहीम. ‘पागलविकास’ या एका हॅशटॅगने काँग्रेसच्या जिवात जीव आला, तर भाजप धास्तावलाय. आरक्षणासाठी पटेलांचे आंदोलन, गोरक्षकांच्या धुडगुसाने दुखावलेला दलित आणि सरकारविरोधी जनमताच्या (अँटी इन्कम्बन्सी) शक्यतेची चिंता सतावत असतानाच ‘पागलविकास’ भाजपच्या मागे हात धुऊन लागलाय. त्यामुळेच शहांना आपल्याच नेत्याने निर्माण केलेला भस्मासुर पक्षावर उलटण्याची भीती वाटत असावी. भस्मासुर का? भाजपचे काही ‘स्वयंस्फूर्त ट्रोल’ आता हाताबाहेर गेलेत. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे निर्लज्ज समर्थन करण्यापासून ते विरोधी विचार मांडणाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमकीपर्यंत त्यांची मजल गेलीय. त्यांना रोखणे आता भाजपच्या हातातही राहिलेले नाही. बाटलीतून बाहेर काढलेल्या ‘भुतां’ना पुन्हा बाटलीबंद करणे अवघड बनलेय. मध्यंतरी एका विरोधी नेत्याने म्हटले होते, मोदींपेक्षा त्यांचे ‘भक्त’च अधिक डोक्यात जातात. खरेच आहे ते. राजापेक्षा आंधळे भाट अतिधोकादायक. याची जाणीव भाजपला झालीय. नाही तर सायबरविश्वासारख्या घरच्या मदानावरून पळ काढण्याचा विचार भाजपच्या मनाला शिवला तरी असता का?

पेरले तेच उगवल्याची शिक्षा भाजपला मिळू लागलीय. तोडीस तोड बनलेल्या विरोधकांच्या ‘ट्रोल्स’नी त्यांना सळो की पळो करून सोडलेय. पण भाजपचा भस्मासुर भाजपवरच उलटू लागल्याने विरोधकांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. भाजपला हा धडाच आहे; पण विरोधकांनाही दोन शहाणपणाचे शब्द सांगायला हरकत नाही. कारण भाजपच्या खोटेपणाला ते आणखी खोटेपणाने प्रत्युत्तर देऊ पाहत आहेत. अफवांचे, वस्तुस्थितीच्या विपर्यासाचे आणि खोटय़ा प्रचाराचे जीवन क्षणभंगुर असते. याउलट, विश्वासार्हता दीर्घकालीन असते. एकदा का विरोधकांच्या ‘ट्रोलिंग’ची विश्वासार्हता कमी झाली, की त्यांची गत भाजपसारखी होऊ शकते. त्यापेक्षा वस्तुस्थिती, अभ्यासपूर्ण विवेचन आणि वैचारिक आधारांवरील विरोध अधिक विश्वासार्ह ठरेल. भाजपला तर ठेच लागलीच आहे; पण विरोधकांनीही त्यापासून शहाणपणा घ्यायला हरकत नाही.

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com