अहमद पटेल यांना आता सारे जग ‘ओळखायला’ लागले असेल. तीनदा लोकसभेत, चारदा राज्यसभा इतका प्रदीर्घ काळ संसदेत वावरणाऱ्या आणि सोनिया गांधींचा १५ वर्षांहून अधिक काळ शक्तिशाली राजकीय सल्लागार असणाऱ्या या नेत्याची प्रकाशाशी कदाचित दुश्मनी असावी. पडद्यावर तर सोडाच; पण अहमदभाई ऊर्फ ‘एपी’ साधे कधी उजेडातही येत नाहीत. काँग्रेसजन त्यांना गमतीने ‘रात का राजा’ म्हणतात. त्यांचा ‘खरा दिवस’ चालू होतो रात्री दहानंतर. मोदी-शहांच्या उदयानंतर तीन वर्षांपासून गुजरात दिल्लीला चालवत असल्याची प्रतिमा आहे; पण खरे तर गेल्या १३ वर्षांपासून गुजरातच दिल्लीला चालवतेय. मोदी-शहांच्या अगोदर दहा वर्षे दिल्ली अहमदभाईंच्या इशाऱ्याने चालायची. ‘‘बघते, असे मॅडम म्हणाल्या की समजून घ्यायचे, आता अहमदभाईंच्या दरबारात जावे लागणार,’’ असा एक काँग्रेस नेता सांगत होता. दरबार तर कसला? काँग्रेस मुख्यालयातील एखादी खोली किंवा एखादा क्लब आणि मध्यरात्रीनंतर त्याला राजकीय ‘बहर’ यायचा. सध्या भाजपमध्ये खासदार असलेला पूर्वाश्रमीचा काँग्रेसी नेता स्वअनुभव सांगत होता, तत्कालीन दोन केंद्रीय मंत्र्यांच्या ‘विनवणी’नंतर त्याला अहमदभाईंनी भेटीची वेळ दिली होती, तीही पहाटे पावणेतीन वाजता! त्या बोचणाऱ्या भयाण अंधाऱ्या रात्री अहमदभाईंच्या दरबारात भेटीसाठी रांगेत असलेले राजकीय व कॉर्पोरेट वर्तुळातील चमचमते हिरे पाहून कुणीही दिङ्मूढ झाले असते. सारे जग गाढ झोपलेले असताना ‘एपी’ गूढपणे दिल्ली ‘ऑपरेट’ करायचे. बहुधा दर वेळी काम फत्तेच व्हायचे. मग मनमोहन सिंग सरकारवरचा अविश्वास ठराव असो वा कोणत्याही राज्यामध्ये कोणालाही शिलेदार नेमायचे असो किंवा एखादे ‘बिग डील’ असो.. एपी वॉज लास्ट वर्ड!

अंधाराशी आणि मध्यरात्रीशी असलेल्या त्यांच्या ‘दोस्ताना’ची खरी परीक्षा होती सरलेल्या मंगळवारच्या मध्यरात्री. मात्र या ‘रात का (हुकमी) राजा’ला मध्यरात्रीने दगा दिला नाही. त्यांना ‘उघड’पणे झुंजावे लागले; पण तरीही अखेरीस हेही काम त्यांनी फत्ते केलेच, तेही सत्तेची तेजप्रभा अजिबात नसताना आणि टोळधाडीसारखे त्यांच्यावर तुटून पडणाऱ्या अमित शहांच्या नाकावर टिच्चून.

खरे तर राज्यसभा निवडणुका रंगहीन. क्वचितच रंग भरले जातात. गुजरातमध्ये तर एकदम निरस मामला. २० वर्षांपासून गुजरात विधानसभेतील संख्याबळ जवळपास एकसारखेच राहिल्याने भाजपचे दोघे व काँग्रेसचा एक बिनविरोध यायचा. यंदा मात्र तब्बल २४ वर्षांनी निवडणूक झाली आणि तीही अशी, की सर्वाधिक लक्षणीय, विलक्षण अटीतटीची, उत्कंठावर्धक आणि श्वास रोखून धरायला लावणारी नाटय़मय. मोदी-शहा नसते तर भाजप कदाचित तिसऱ्या जागेसाठी लढलाच नसता. अगदी प्रारंभी शहादेखील फार आक्रमक नव्हते. शंकरसिंह वाघेलांच्या अस्वस्थतेची कल्पना होती; पण काँग्रेस आमदारांना खिंडार पाडण्याची खात्री नव्हती. त्यात वाघेलांचा ‘धरसोडपणा’. त्यातून काँग्रेसच्या सहा आमदारांनी थेट आमदारकीचा राजीनामा दिला; पण त्यानंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी तशीच इच्छा दाखविल्याने शहांच्या तोंडाला पाणी सुटले. आणखी २० आमदार फुटण्याचा दावा वाघेला करू लागले. स्वत: शहांनाही तसे ‘फीलर’ येतच होते. मग शहांनी ही संधी साधायची ठरविली आणि आपल्याला खुपत असलेल्या पटेलांना अस्मान दाखविण्याचे ठरविले, किंबहुना शहा या संधीची वाटच पाहत होते. त्यांना जुना हिशेब चुकता करायचा होता.

सोहराबुद्दीन चकमकप्रकरणी शहांना तुरुंगात जावे लागले, तडीपारीचा कलंक लागला. ते सगळे पटेलांचे कारस्थान असल्याची त्यांची ठाम समजूत आहे. तेच डोक्यात ठेवून शहा सूडाग्नीने पेटले होते. या व्यक्तिगत संघर्षांला धोरणीपणाचीही किनार होतीच. पटेल हे सोनियांचे मर्मस्थान. त्यांना जेरबंद केल्यास सोनियांना आणखी घायाळ करता येईल. मुळावर घाव घालण्याचे गणित. म्हणजे शहांनी व्यक्तिगत सुडाला धोरणीपणाचा मुलामा अलगदरीत्या दिला आणि मग तसे केल्यानंतर सर्व ‘आयुधां’निशी ते चालून गेले.

भाजप एकदम आश्वस्त होता. बेंगळूरुमध्ये दडविलेल्या काँग्रेसच्या ४४ आमदारांपैकी वीस आमदार फुटल्याच्या गोष्टी गुजरातचे खासदार रंगवून रंगवून सांगत होते. पटेलांचे हरणे भाजपवाले धरूनच चालले होते; पण पटेलही तितकेच धूर्त आणि चालबाज. त्या अर्थाने हा सामना दोन पट्टीच्या धूर्तामधील होता. त्यात पटेल निसटले; पण हा विजय कसला? जिवावरचे बोटावर निभावले. एकुणात काँग्रेसचे तब्बल १४ आमदार (राजीनामा दिलेले सहा धरून) फुटले. संयुक्त जनता दलाच्या एका आमदाराने ऐन वेळी साथ दिली नसती आणि निवडणूक आयोगाने (भाजप आणि काँग्रेसलाही) अनपेक्षितरीत्या ‘दे धक्का’ दिला नसता, तर मात्र पटेल पडल्यातच जमा होते. मागे वळून पाहताना शहांकडून तीन व्यूहतंत्रात्मक चुका झाल्याचे दिसते. निवडणूक लढविण्याचा विचार होता तर मग काँग्रेसच्या सहा आमदारांना कसा काय राजीनामा देऊ  दिला? ते सहा आमदार ‘मतदार’ असते तर पटेल नक्कीच पडले असते. दुसरी चूक झाली ती वाघेलांवर अतिविश्वास ठेवण्याची. २० आमदार फोडण्याच्या त्यांच्या बढायांवर विश्वास ठेवून शहा तोंडावर आपटले. तिसरी चूक झाली ती त्या काँग्रेसच्या ‘त्या’ दोन आमदारांकडून. त्यांनी आपली मतपत्रिका शहांना दाखविली आणि शहांच्या पायावर कुऱ्हाड मारली. आता ही कृती त्या दोघांनी उतावळ्या अतिउत्साहात केली, की शहांच्या ‘डबल गेम’वर अहमद पटेलांनी केलेला ‘ट्रिपल गेम’ होता, हे काही कळायला मार्ग नाही. इतके शह, काटशह, प्रतिशह या निवडणुकीत पाहायला मिळाले.

आता राष्ट्रवादीचेच पाहा ना. खेळ अवघ्या एकेक मतासाठी चालला असताना राष्ट्रवादीच्या दोन मतांना ‘हिऱ्यांचा भाव’ आला होता; पण राष्ट्रवादी होती दोन डगरींवर पाय ठेवून. प्रफुल्ल पटेलांनी भाजपला मतदान करण्याचा आदेश दिल्याचा त्यांचा आमदार उघडपणे सांगत होता. दुसरा बोलायला तयार नव्हता. भाजपबरोबरील हातमिळवणीने कार्यकर्त्यांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रियेने शेवटी राष्ट्रवादीने त्या दोघांना पटेलांना मतदान करण्याचा पक्षादेश ऐन वेळी काढला; पण राज्यसभा निवडणुकीत त्याला काही अर्थ नसतो. प्रत्यक्षात त्या दोन्ही आमदारांनी भाजपलाच मतदान केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीने असे का केले, याची खमंग चर्चा चालू आहे. मोदी-शरद पवारांमधील कथित मैत्री हे त्याचे नेहमीचे कारण आणि दुसरे म्हणजे प्रफुल्ल पटेल. एका भाजप खासदाराच्या म्हणण्यानुसार, ‘प्रफुल्ल पटेल सध्या कठपुतळी बनले आहेत. कारवाईची भीती दाखवून मोदी-शहा त्यांना हवे तसे नाचवीत आहेत..’ त्या खासदाराचा कटाक्ष प्रफुल्ल पटेलांविरुद्ध विमान खरेदीप्रकरणी चालू असलेल्या चौकशीकडे होता.

गंमत म्हणजे, या निवडणुकीनंतर दोन कंडय़ा राजधानीत जोरदार पिकल्या. म्हणे, सोनिया गांधींबरोबरच मोदींनाही पटेल जिंकावेसे वाटत होते आणि दुसरीकडे शहांबरोबरच राहुल गांधींना पटेल हरावेसे वाटत होते! या कंडय़ांचे उगमस्थान माहीत नाही, पण त्यांचा उगम झाला तो दोन अनपेक्षित घटनांनी. निवडणूक आयोगाचा पटेलांच्या बाजूचा निकाल अन् राहुल गांधींचे मौन. पंतप्रधान कार्यालयाच्या इशाऱ्यानंतर आयोगाने निकाल दिल्याची चर्चा आहे. त्यातले तथ्य सांगता नाही येणार. दुसरीकडे मध्यरात्रीपर्यंतच्या नाटय़ामध्ये राहुल कोठेही नव्हते. ते आजारी असल्याचे सांगितले गेले; पण विजयानंतर काँग्रेसजन ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षांव करीत असताना राहुलचे ट्विटर हँडल मात्र मौनात होते. एरवी भाजपवर तुटून पडणाऱ्या राहुल यांनी भाजपच्या साम, दाम, दंड या नीतीला पुरून मिळविलेल्या विजयाबद्दल पटेलांचे अभिनंदनसुद्धा केले नाही. पटेलांना राहुल यांनी जवळपास बाजूला ठेवल्याचे सांगितले जाते. त्यातूनच ‘मोदी-सोनिया’ विरुद्ध ‘शहा-राहुल’ छुप्या संघर्षांच्या कंडय़ा पिकल्या.

गेल्या तीन वर्षांतील शहांना हा तिसरा धक्का. दिल्ली आणि बिहारमध्ये त्यांचे अक्षरश: पानिपत झाले होते; पण यंदा त्यांनी पटेलांचा ‘गेम’ केल्यातच जमा होता. नशिबाने म्हणा किंवा पडद्यामागच्या जबरदस्त चालींनी बोटावर निभावले. शहांनी ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची करणे भाजपमधील अनेकांना आवडले नाही; पण कुणी उघडपणे बोलले नाही. शिवाय गुजरातमधील पराभव एकतर्फी किंवा लाजिरवाणा नव्हता आणि जिंकले असते तर मिळणारा लाभांश लाखमोलाचा असता.

जिंकलोपेक्षा सुटलोचा भाव अधिक असला तरी पटेलांच्या विजयाने काँग्रेसला ‘बूस्टर डोस’ मिळाल्याचे म्हणता येईल. सोनियांच्या हस्तक्षेपानंतर काँग्रेसने प्रयत्नांची शर्थ सुरू केली आणि पाहता पाहता सरसेनापतीबरोबर सोनियांचीही प्रतिष्ठा राखली गेली. एवढी धडपड का? तर ‘मॅडमचा माणूस’ म्हणून. पण पटेलांच्या जागेवर अर्जुन मोडवाढिया, शक्तिसिंह गोविल किंवा अगदी वाघेला असते तर काँग्रेसने अशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असती का? जिवाच्या एवढय़ाच आकांताने प्रयत्न केले असते तर गोवा, मणिपूर, अरुणाचल आणि अगदी आसामसारखे राज्य गमावण्याची वेळ काँग्रेसवर आली नसती. या विजयानंतर गुजरात जिंकण्याची भाषा पटेलांनी केली; पण ती तकलादू असल्याचे सर्वानाच माहीत आहे. काही का असेना, पराभवाच्या दाढेतून खेचलेल्या      या विजयाने काँग्रेसजनांमध्ये किंचितसा हुरूप आलाय. अमित शहांना पुरून उरण्याचा हा आत्मविश्वास त्यांना गुजरात विधानसभेला उपयोगी पडतो की नाही, ते पाहू या.

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com