मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मागील आठवडय़ात सुरू असलेल्या कोलाहलामध्येसुद्धा दोन ठळक व्यक्तिमत्त्वे चर्चेत राहिली. त्या दोघांमध्ये तसा कोणताच संबंध नाही. एक उत्तरेतील, दुसरा दक्षिणेतील. एक लोकप्रिय मुख्यमंत्री, तर दुसरा जबरदस्त लोकप्रिय अभिनेता. आपल्याला पडलेली पंतप्रधानपदाची स्वप्ने प्रत्यक्षात उतरणे अवघड असल्याची एकाला होत असलेली जाणीव आणि दुसऱ्याला कदाचित लागलेले मुख्यमंत्रिपदाचे वेध.. पण या दोघांमधील एक समान धागा म्हणजे दोघांचीही भाजपशी वाढती जवळीक.

एव्हाना या दोघांची नावे लक्षात आलीच असतील.  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तामिळ सुपरस्टार रजनीकांत ही ती नावे. २०१९ मधील लोकसभेचे पडघम वाजत असताना राजकीय क्षितिजावर ही दोन नावे वेगाने घोंघावू लागलीत.  या दोघांमध्ये दोन टोकांवरील दोन राज्यांची सगळीच गणिते बदलवण्याची क्षमता आहे. म्हणून तर त्यांच्या हालचालींनी सर्वाची उत्सुकता ताणलीय.

नितीशकुमार भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा राजधानीत पूर्वीपासूनच आहे. तिला खतपाणी मिळाले ते नितीश आणि अमित शहांमध्ये दिल्लीजवळील फार्महाऊसमध्ये झालेल्या कथित भेटीने. भेटीची कहाणी खरीखोटी माहीत नाही, पण एक गोष्ट खरी की तेव्हापासून नितीश यांच्या भूमिका बदलल्या. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नोटाबंदीचे समर्थन. सारे विरोधक त्याविरुद्ध मैदानात उतरले असताना नितीश ठाम राहिले. पुढे उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयानंतर विरोधकांनी ‘ईव्हीएम’वर शंका घेतल्या, तेव्हाही नितीश ‘ईव्हीएम’च्या बाजूने उतरले. लालूंच्या कुटुंबीयांवरील लागोपाठच्या आरोपांनंतर नितीश यांचे वक्तव्य धक्कादायक होते. कारवाई करण्याचे ते सरळसरळ केंद्रालाच सुचवीत होते आणि नेमके त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्राप्तिकर खात्याने एक हजार कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तांप्रकरणी छापेही घातले. लालूंना हा धक्काच होता. त्यांचा इतका जळफळाट होता, की ‘नवा मित्र भाजपला लखलाभ असो’ ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती! पण नंतर महाआघाडी खंबीर असल्याची सारवासारव त्यांना करावी लागली. पण तोपर्यंत जायचा तो संदेश गेला होता. नितीश यांनी महाआघाडीला खरे तोंडघशी पाडले ते सोनियांनी बोलाविलेल्या १७ विरोधी पक्षांच्या बैठकीला दांडी मारून. त्यांची अनुपस्थिती एक वेळ ठीक होती; पण त्यांचं अगदी दुसऱ्याच दिवशी मोदींना भेटणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं. आणि वर म्हणाले, बिहारसाठी भेटलो! नितीश यांच्या चालींनी काँग्रेस आणि लालूंची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी पंचाईत केलीय. दिवसेंदिवस भाजपकडे झुकणारा नितीश यांचा ‘बोल्ड’पणा तर खुपतोय; पण त्यांना डिवचण्याची हिंमत नाही. कारण त्यांनी रामराम केल्यास महाआघाडीला नमनाअगोदरच अपशकुनाची भीती. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय.

मोदी, शहा यांना धूळ चारण्याच्या पराक्रमानंतरच्या दोन वर्षांतच नितीश यांना लालू व काँग्रेस का नको वाटायला लागलीय? नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाचा एक दिल्लीनिवासी ज्येष्ठ नेता अनौपचारिक गप्पांमध्ये सांगत होता.. ‘‘आम्ही लालू आणि काँग्रेससोबत खूश नाही. केवळ नाइलाजाने आम्हाला त्यांच्यासोबत जावे लागले होते. दोन वर्षांनंतर आम्हाला जाणवतंय की काँग्रेसपेक्षा भाजप कधीही बरा. कारण तो अजूनही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पण इतकी वाईट स्थिती ओढवूनही काँग्रेसमधील सरंजामशाही नाही संपलेली.’’ त्याचे नैराश्य आणखी व्यक्त होत होते.

दोन दशके भाजपशी घट्ट मैत्री असणारे नितीश लोकसभेतील मोदी लाटेच्या धसक्यानंतर लालू आणि काँग्रेससोबत गेले; पण ते मनाविरुद्ध, नाइलाजाने. कारण नितीश आणि लालूंच्या राजकारणाचा पोतच परस्परविरोधी. नितीश हे स्वच्छ प्रतिमेचे, पण लालू बेबंद. नितीश मध्यमवर्गीयांना- मध्यमजातींना साद घालणारे, पण लालूंचा धुडगूस यादवांच्या ताकदीवर. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा फारसा हस्तक्षेप नसायचा, पण लालू थोडेच गप्प बसणारे? त्यातच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लालूपुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वीची वाढती लोकप्रियता. अगदी नितीश यांच्या उपस्थितीमध्येही या तरुण नेत्याभोवती पडणारा गराडा पाहून नितीश यांसारख्या राजकारण्याला आतून अस्वस्थ वाटल्यास नवल नाही. खरे तर लालू राजकीयदृष्टय़ा जवळपास संपले होते; पण नितीश यांच्या प्रतिमेचे शेपूट पकडून ते सत्तेच्या तंबूत शिरले आणि बघता बघता डोईजड झाले. म्हणून तर तंबूत उंट घेतल्याचा पश्चात्ताप नितीश यांना आता होतोय आणि त्यातूनच लालूंपेक्षा भाजप बरा असल्याच्या निष्कर्षांपर्यंत ते पोचलेत. उत्तर प्रदेशाच्या निकालानंतर पंतप्रधानपदाचे स्वप्न तूर्त तरी अवास्तव असल्याची जाणीव त्यांना झाली असावी. त्यांनी तसे बोलूनही दाखविले. जर २०१९ नंतर पंतप्रधानपद ‘रिक्त’ होण्याची शक्यता कमी असताना मग आहे ते मुख्यमंत्रिपद टिकविण्यातच अधिक शहाणपणा आहे आणि मग त्यासाठी लालूंपेक्षा भाजप कधीही परवडला, असे त्यांना वाटल्यास आश्चर्य नाही. दुसरीकडे नितीश परतल्यास मोदींच्या पंतप्रधानपदासमोरील एक मोठे ‘आव्हान’ आपोआपच संपुष्टात येईल. खरे तर नितीशबद्दल भाजपमध्ये ‘सॉफ्ट कॉर्नर’ पहिल्यापासूनच आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची स्थिती असतानाही नोटाबंदीला दिलेल्या पाठिंब्याने तर ते भाजपाईमध्ये एकदम हिरो झाले. त्यामुळे झाली तर त्यांची ‘घरवापसी’ भाजपला हवीच आहे. अजून एक.. नितीशना लालूंची गरज नाही. ते भाजपच्या मदतीने केव्हाही सरकार स्थापू शकतात. सारांश ‘विन विन सिच्युएशन’ आहे ही नितीश आणि भाजपसाठी. देश तुमचा, बिहार माझे!

तिकडे तामिळनाडूही ‘सर रजनीं’च्या आगमनाच्या चर्चेने पुरतं ढवळून निघालंय. एकीकडे ‘रासिकर मंत्रम’ची (फॅन क्लब्ज) मोठी लगबग आणि दुसरीकडे रजनीकांत यांच्या घरासमोर कट्टर तामिळवाद्यांची निदर्शने. त्यांचे मूळचे तामिळ नसणे आताच डाचायला लागलंय काही जणांना. गेल्या काही दिवसांतील त्यांची वक्तव्येही (‘‘मी कधी येईन, कसा येईन हे कोणालाच सांगता येणार नाही. पण गरज निर्माण झाल्यास मी नक्की येईन.. अंतिम युद्ध छेडल्यास आपण ते पाहालच.’’) प्रस्थापितांच्या तंबूत साप सोडणारी. तामिळनाडूचे राजकारण आजपर्यंत कायम द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोघांभोवती फिरतंय. पण रजनीकांतच्या आगमनाने तिसरा कोन तयार होऊ  शकेल? जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकची झालेली शकले, द्रमुकचे भीष्माचार्य करुणानिधींचे राजकीय पडद्यावरून जवळपास दूर होणे, अशा संधीकाळच्या परिस्थितीमध्ये रजनीकांत राजकीय पोकळी भरून काढतील? मोदी आणि भाजपकडील ओढा त्यांनी कधीच लपविला नाही. पण एकंदरीत ते भाजपच्या कळपात जाण्याऐवजी नवा पक्ष काढण्याची शक्यता अधिक. कारण भाजपची विचारधारा तामिळनाडूसाठी एकदम ‘परग्रहा’एवढीच दूरची! कन्याकुमारीजवळचे ‘बेट’ वगळता भाजपला तामिळनाडूमध्ये कधीच रुजता आलं नाही. रजनीकांतच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन तिथं घुसण्याचे भाजपचे मनसुबे आहेत; पण ते व्यवहार्य नसल्याची जाणीव स्वत: भाजपलाही आहे. म्हणून भाजपच्याच काही नेत्यांनी नव्या पक्षाचा किंवा थेट अण्णाद्रमुकला गिळंकृत करण्याचा सल्ला रजनीकांत यांना दिलाय.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. रजनीकांत यांना एवढय़ा गांभीर्याने घेण्याचे कारण म्हणजे त्यांची पडद्यावरील अभूतपूर्व लोकप्रियता. ती पाहून कुणालाही धडकी भरेल. त्यातच तामिळ राजकारण आणि चित्रपटसृष्टीची नाळ कमालीची घनिष्ठ. तामिळ राजकारणावर वर्चस्व गाजविणारे सगळे चित्रपटसृष्टीशी संबंधित. मग ते सी. के. अण्णादुराई असो, एम. जी. रामचंद्रन ऊर्फ एमजीआर असो, एम. करुणानिधी असो किंवा जयललिता.. पण पडद्यावरील सगळीच मंडळी राजकारणात यशस्वी झाली नाहीत. शिवाजी गणेशन हे त्याचे उत्तम उदाहरण. ‘नाडिगर तिलमक’ (अभिनेत्यांमधील रत्न) गणेशन पडद्यावर एमजीआर इतकेच लोकप्रिय, पण त्यांचा राजकारणात कधीच जम बसला नाही. के. भाग्यराज, शरथ कुमार, ‘डीएमडीके’चे विजयकांत ही आणखी अपयशी उदाहरणे. थोडक्यात काय तर पडद्यावरील लोकप्रियता ही काही राजकीय यशाची आपोआप हमी देणारा ‘पासवर्ड’ नाही. त्यातच तामिळ अस्मितेभोवती सदोदित फिरणारा तामिळनाडू बिगरतामिळ (म्हणजे कन्नड आणि मराठी) पाश्र्वभूमीच्या रजनीकांत यांना राजकीयदृष्टय़ा कितपत स्वीकारेल, हे प्रश्न रास्त असले तरी रजनीकांत ही भाजपसाठी आतापर्यंतची सर्वोत्तम शिडी असू शकते. त्यातच माजी मुख्यमंत्री ओपीएस पन्नीरसेल्वम यांच्या गटाबरोबरील भाजपची जवळीक रजनीकांत यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते. ‘पोरका’ झालेल्या अण्णाद्रमुकमधील मोठा घटक सोबत आल्यास रजनीकांत भरभक्कम होऊ  शकतील. शिवाय दिल्लीची रसद मिळाल्यास साधनसामग्रीची कमतरता भासणार नाही. म्हणजे रजनीकांत आणि भाजपसाठीही ‘विन विन सिच्युएशन’ असू शकते. देश तुमचा, तामिळनाडू माझे..

आता उत्सुकता फक्त फेरमांडणीच्या उंबरठय़ावर असलेल्या बिहार आणि तामिळनाडूमध्ये प्रत्यक्ष उलथापालथीची. तोपर्यंत वाट पाहणेच इष्ट..

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com