कधी कधी करिअरसंबंधात योजलेले साधेसोपे टप्पे पार करणे कठीण होते. यामागचे कारण असे की, त्यासाठी काही पूर्वविचार आणि काही प्रयत्न आवश्यक असतात. हा विचार आणि त्यासाठीचे प्रयत्न हे तुमच्या भविष्यासाठी आणि भविष्यातील सुखासमाधानासाठी आवश्यक असतात.
कुठे पोहोचायचं आहे?
करिअरविषयीचे अल्पावधीचे अथवा दीर्घ उद्दिष्ट निश्चित करा. वर्षभरात तुम्हाला किती प्रगती करायची आहे आणि पाच ते दहा वर्षांत तुम्हाला कुठवर पोहोचणे अपेक्षित आहे, याचा विचार तुम्ही करायला हवा.

उद्दिष्ट प्रेरणादायी हवे.
केवळ काहीतरी ध्येय ठरवायचंय, म्हणून ध्येय ठरवू नका किंवा इतरांना तसं वाटतं म्हणून ते स्वीकारू नका. त्या उद्दिष्टाप्रती पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेसे वाटायला हवे. कुठल्या दिशेने जायचे आहे, याबाबत स्पष्टता असली की प्रवास सोपा होतो.

तफावतीसंबंधात विश्लेषण
तुम्ही आता जे काम करत आहात आणि दोन वर्षांनी तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे, त्यात तुमच्या क्षमतेविषयीची जी दरी आहे, ती भरून काढण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार तुम्ही करायला हवा, टप्प्याटप्प्याने प्रयत्नही करायला हवे.

स्वविकासाची योजना
* एकदा का उद्दिष्ट ठरवलं आणि कुठल्या क्षमतांचा विकास करायचा आहे, हे लक्षात घेतलं की कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, याचा प्राधान्यक्रमाने विचार करा.
* ती कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करा. त्या कौशल्यांविषयी सखोल माहिती मिळवा.
* त्याकरता तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढा. हे सारे करण्यासाठी लवकरात लवकर तारीख निश्चित करा.

योजनेचा पाठपुरावा
* योजनेत ठरवलेल्या गोष्टी नीट होत आहेत ना, याचा मागोवा वर्षांतून दोनदा तरी घ्यायला हवा. यामुळे आपल्या योजनांवर लक्ष केंद्रित करणे सुलभ बनते.
* करिअर विकास योजना ही अशी गोष्ट आहे की एके दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण कुठेच पोहोचलेलो नाही असे लक्षात येणे आपल्यासाठी निश्चितच आनंददायक गोष्ट नाही. तुमच्या करिअरसाठी तुम्ही जबाबदार असता. थोडय़ाशा योजनेच्या बळावर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप काही साध्य करू शकता.

– अपर्णा राणे