मुलं वाढत असताना काही क्षण फार विचित्र येतात. मुलांना पालकांचं पटत नसतं, त्यामुळे बऱ्याचदा ती आपल्याला हवं ते करून मोकळी होतात. आणि पालक मुलांच्या वागण्याने दुखावलेले असतात. खास करून टीनएजर मुलांच्या बाबतीत असं अनेकदा होतं. अशा वेळी समजावून सांगणं, रागावणं, धाक दाखवणं, कळत-नकळत इमोशनल ब्लॅकमेल- अशा बहुतेक पायऱ्या अजमावून झालेल्या असतात. मग एकमेकांशी बोलणं टाळणं या पायरीचा दोन्ही पक्ष आश्रय घेतात. त्यातून आणखीनच कोंडी होत जाते. परिस्थिती आणखी आणखी चिघळत जाते.अशा वेळी वरकरणी साधासुधा वाटणारा एक उपाय कोंडी फोडायला खूप मदत करतो. दुसऱ्याला काय वाटत असेल हे ओळखून ते व्यक्त करणं, आणि स्वत:च्या अपेक्षा काय आहेत हेही स्वच्छपणे सांगणं. कसं ते पाहू.. उदाहरणार्थ नववी किंवा दहावीतली मुलगी रात्री उशिरापर्यंत मित्र-मत्रिणींशी मोबाइलवर गप्पा मारत राहते. समजावून सांगणं इत्यादी सगळ्या पायऱ्या झाल्या तरी परिस्थितीत काही फरक पडत नाहीय. अशा वेळी आई-बाबा मोबाइल काढून घेण्याचा निर्णय घेतात, आणि परिस्थिती एकदम गंभीर बनून जाते.शीतयुद्ध टाळायला इथे काय करता येईल? मुळात मुलीला रात्री मित्र-मत्रिणींशी बोलणं टाळता नाही येत आहे, हे वास्तव आहे. कारणं काहीही असू शकतील- अगदी क्लासेसहून सगळे उशिरा येतात, मग प्रोजेक्टबद्दल बोलायला कॉमन वेळ कोणती इथपासून ते आपल्याच घरी सगळे दहा वाजता झोपतात, बाकी ठिकाणी तर लोक जेवतातच दहा वाजता.. इथपर्यंत काहीही युक्तिवाद मुलांकडे तयार असू शकतात. त्यात तथ्यही असू शकतं. पण याचं खरे-खोटेपण पडताळून पाहायला सुरुवात केली, मुलांना ‘तू अमुक कर, तमुक कर’ असे सटासट सल्ले द्यायला सुरुवात केली की सगळ्यांचा फक्त त्रागा होतो, हे आपण पालक म्हणून अनेक वेळेला अनुभवलं आहे. अशा वेळी फक्त मुलीला एवढंच म्हटलं तर..‘कठीण जातं आहे ना, दहा वाजताची मर्यादा पाळणं? काय करता येईल? आपल्या घरी तर दहा वाजता सामसूम होते ना.’ यातून मुलीच्या भावना आपल्याला समजताहेत हे तिच्यापर्यंत पोहोचतंच, पण त्यातूनही आपल्या घराचे नियम, मर्यादाही (लिमिट्स) अगदी शांतपणे तिच्यापर्यंत पोहोचतात. त्यातून तिने विचार करून काहीतरी पर्याय शोधून काढायची आणि मुलांकडून एकंदर सहकार्य मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.अनेकदा पालकांसोबत आणि शिक्षकांसोबत काम करताना त्यांचा विश्वासच बसत नाही की असं काही बोललं तर मुलं नीट वागतील, सहकार्य करतील. मुळात मुलांच्या भावनांचा आदर करणं आणि वागण्यावर मर्यादा आखून देणं हे अतिशय खणखणीत कॉम्बिनिशन आहे. डॉ. हाएम गिनॉट या शिक्षक आणि मानसतज्ज्ञाने अतिशय नेमकेपणाने या दोन गोष्टींचा मिलाफ करून मुलांबरोबरच्या संवादाचं अतिशय प्रभावी तंत्र आपल्याला दिलं.मुळात डॉ. गिनॉट हे इस्रायली प्राथमिक शिक्षक. काही र्वष शाळेत शिकवल्यावर त्यांच्या लक्षात आलं, त्यांना शिकवायचे विषय येताहेत, पण मुलांशी कसं वागायचं या आघाडीवर त्यांची कौशल्यं तोकडी पडताहेत. म्हणून त्यांनी सरळ अमेरिका गाठली आणि क्लिनिकल सायकॉलॉजी विषयात डॉक्टरेट मिळवली.त्रासदायक पाश्र्वभूमी असणाऱ्या मुलांशी ते बोलायचे. अशी अनेक मुलं त्यांच्याशी बोलून जास्त मोकळी झाली, त्यांचं त्रस्त करणारं वागणं बदललं. गिनॉट म्हणायचे, मी मुलांशी बोलतो, सहृदयतेने (कम्पॅशन) वागतो, आणि त्यांचा आत्मविश्वास बळकट करण्याची प्रत्येक संधी साधतो. बास, एवढंच करतो.ही संवादकौशल्यं पालकांना आणि शिक्षकांना शिकवली, तर मुलं निश्चितच मानसिकदृष्टय़ा सुदृढ होतील या भावनेतून त्यांनी पालकांसाठी, शिक्षकांसाठी पुस्तकं लिहिली, कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या ‘बिट्वीन पॅरेण्ट अ‍ॅण्ड चाइल्ड’ तर अक्षरश: लक्षावधी प्रती खपल्या. त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. पाठोपाठ आलेली ‘बिट्वीन पॅरेण्ट अ‍ॅण्ड टीनएजर’ आणि ‘टीचर अ‍ॅण्ड चाइल्ड’ या पुस्तकांचंही तसंच स्वागत झालं.मुलं, पालक आणि शिक्षकांमधल्या नात्याला अतिशय आधारभूत अशा अनेक पलूंची गिनॉट सरांनी सहज, सुलभ आणि अगदी सुटसुटीत मांडणी करून ठेवली आहे. मुलांच्या वाढीच्या प्रत्येक वाटेवर आणि वळणावर ही मांडणी मदतीला येते, खाचखळग्यांमधून पार व्हायला मदत करते.गिनॉट सर १९७३ मध्ये वयाच्या अवघ्या एकावन्नाव्या वर्षी गेले. भावनिक बुद्धिमत्तेचं (इमोशनल इंटेलिजन्स) शास्त्र रूढ अर्थाने आकाराला यायच्या आधी त्याला सुसंगत असं प्रचंड काम त्यांनी करून ठेवलं आहे. ‘पालकांचे म्हणून अधिकार’ आणि ‘सहृदयता’ याचा अफलातून कल्पक असा मेळ घालणं पुढच्या अनेक पिढय़ांना त्यांनी शिकवलं आहे. खरं तर मुलं, पालक आणि शिक्षक – सगळ्यांचेच ते शिक्षक होते.  येत्या शिक्षक दिनासाठी म्हणून त्यांचं हे खास स्मरण.
mithila.dalvi@gmail.com