मूल्यांकनाच्या विविध कसोटय़ांमध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरते ती तुमची लेखी परीक्षा. तुमची उत्तरपत्रिका ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा, तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा असते, असं म्हणतात. म्हणूनच ही उत्तरपत्रिका देखणी, वाचनीय असणे होण्याकरता काही गोष्टींचे भान राखणे आवश्यक आहे. त्याकरता विद्यार्थ्यांनी नित्यनेमाने लेखनाचा सराव करायला हवा.
त्याविषयी..
वर्षभर आपण अभ्यास करत असतो. मात्र त्यातलं कितपत उमजलंय या गोष्टींचा कस लागतो तो परीक्षेत. हल्ली परीक्षा वेगवेगळ्या स्वरूपात घेतल्या जातात. लेखी चाचण्या, तोंडी परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षांतील कामगिरी, वर्षभराच्या कामगिरीचं मूल्यमापन, स्वतंत्र आणि गटनिहाय प्रकल्प कामातील कामगिरी, अभ्यासाला पूरक ठरणाऱ्या उपक्रमांमधील तुमचा सहभाग, ऑनलाइन चाचण्या अशा अनेक प्रकारे आज विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाते.
मूल्यांकनाच्या कसोटय़ा जरी वेगवेगळ्या असल्या तरी या सगळ्यात महत्त्वाची ठरते ती तुमची लेखी परीक्षा. तुमची उत्तरपत्रिका ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा, तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा आहे असं म्हणतात. म्हणूनच ही उत्तरपत्रिका देखणी, वाचनीय असणे आवश्यक असते. यासाठी उत्तराचा लेआऊट उत्तम असणे, अचूक शीर्षक देणे, महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करणे अशा वेगवेगळ्या बाबींचा
समावेश होतो.
उत्तरपत्रिका लिहिताना काही विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका वेळेच्या खूप आधी पूर्ण होते तर कुणाला वेळ पुरत नाही. काहींचा उत्तरपत्रिका सोडविताना प्रारंभ नीट होतो, पण नंतर मात्र गाडी रुळावरून घसरते. अनेक विद्यार्थ्यांची उत्तरे बरोबर असतात, पण त्यांनी नेमकं काय लिहिलं आहे आणि त्यांना काय म्हणायचंय हे उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांना उमजत नाही.
काहीजण उत्तरपत्रिका लिहिताना हात, मान, पाठ दुखते अशी तक्रार करतात. काहींना येतं, पण आठवत नाही किंवा जे आठवलं ते कागदावर उतरण्यापूर्वीच विसरतो, असं म्हणतात. या सर्वाचं कारण असतं ते म्हणजे मेंदू- हात- डोळे यांचा मेळ न जमणं आणि सरावाचा अभाव.
डोक्यात ज्या वेगानं विचार येतात त्या वेगानं आपले हात चालत नाहीत या तक्रारीवर उपाय म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहून त्यानुसार रोज किमान अर्धा तास लिखाणाचा सराव करा.
उत्तरपत्रिका वाचनीय होण्यात महत्त्वाची भूमिका बजावते ते तुमचे हस्ताक्षर. आज अनेक विद्यार्थी आपल्या हस्ताक्षराच्या बाबतीत गाफील राहतात. हस्ताक्षर घोटण्याचं अथवा घडवण्याचं काम खरं तर शिक्षणाच्या सुरुवातीच्या वयात व्हावं लागतं. हस्ताक्षर नीट नसण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हातांनी काम करण्याचा आपल्याला पडलेला विसर. त्यामुळे मग लिहिताना आपली बोटं, मनगट वळतच नाही, हात आणि डोळे असहकार पुकारतात. याचं कारण नजरेनं अंदाज घेण्याचा प्रयत्न यांत्रिक युगात सोडून दिला आहे. अनेक छंद, कला, ज्या पूर्वी सहज केल्या जायच्या त्यांना आपण विसरलो, जुनाट मानू लागलो. उदा. विणकाम, भरतकाम, रांगोळी इत्यादी.
लहानपणी खेळल्या जाणाऱ्या अनेक खेळांमध्ये हात, नजर यांचा उत्तम समन्वय साधावा लागतो आणि त्याद्वारे एकाग्रतेचा सरावही होतो. पण आज गोटय़ा, काचापाणी, सागरगोटे, अक्कट- दुक्कट इत्यादी खेळच नव्हे तर त्यांची नावंही मुलं विसरली आहेत.
कारणं काहीही असोत, आता आहे त्यापेक्षा थोडं किमान थोडं चांगलं हस्ताक्षर आपण नक्कीच काढू शकतो हे प्रथम ध्यानी घ्यायला हवं. यासाठी प्रथम कोणत्या प्रकारच्या पेनानं आपलं अक्षर चांगलं आणि भराभर येतं याचा शोध घ्या.

लेखनावर पकड यावी म्हणून..
मराठी इंग्रजी लिखाणातील दोन नियमांचा विसर पडू देऊ नका. कोणतेही अक्षर लिहिताना सुरुवात वरून खाली व डावीकडून उजवीकडे लिहा.
नेमकी कोणती अक्षरं खूपच खराब येतात ती शोधा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा.
भाषा कोणतीही असो काही मूलभूत- बेसिक स्ट्रोक्स् असतात. त्यांचा सराव करा.
सराव करताना तो रंजक व्हावा, म्हणून आपल्या नेहमीच्याच वहीचा वापर करा. कधी वही आडवी धरा वा कधी उभी.
त्यावर स्ट्रोकच्या सहाय्यानं असंख्य पॅटर्नस् बनवता येतात. अक्षरांचे त्यांच्या एक सारखेपणानुसार गट करा. जसं की- व, ब, क किंवा न, म, भ इ. आणि त्यांच्या प्रमाणे स्ट्रोकस् विकसित करा. हवं तर त्याकरता तज्ज्ञांची मदत घ्या.
स्ट्रोक याचा अर्थ उभी रेषा, आडवी, तिरकी रेषा, गोल, अर्धगोल इत्यादी. यासाठी ठळक पेन्सिल वापरा. पट्टीचा वापर अजिबात नको.
याशिवाय घरात आईला कामात मदत करा. भाजी निवडणं, पीठ मळणं, घडय़ा घालणं, वाढणं, खवण इत्यादी कामांमुळे हाताला व्यायाम होईल. या मदतीने आई खूश होईलच, पण तुमचे हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल.
सर्वात महत्त्वाचं आपण रोज सातत्यानं लिहिणार, चांगल्या अक्षरात लिहिणार असा निश्चय हवा. आणि तो एखाद्या व्रताप्रमाणे निभावायला हवा. मग अक्षरात पडलेला फरक तुम्हालाच जाणवेल आणि तुमच्या उत्तरपत्रिका इतरांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उठून दिसतील.

goreanuradha49@yahoo.in