असं म्हटलं जातं, प्रत्येक जण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात अडखळतो, पडतो, आपटतो, तो किती लवकर त्यातून सावरतो ते महत्त्वाचं असतं. अपयशाचा सामना करताना झाल्या गोष्टीतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणे आणि नव्याने सुरुवात करणे आवश्यक असते. त्याकरता कुठल्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे, हे जाणून घेऊयात..
अपयशाला स्वीकारा..
’जे झाले ते स्वीकारा. निराशेचा पहिला धक्का बसल्यानंतर जे झालं ते स्वीकारण्यासाठी प्रयत्न करा. जर तुम्ही झाल्या गोष्टीबद्दल स्वत:ला अथवा इतरांना दोषी मानले किंवा झालेल्या गोष्टीला आपण महत्त्व देत नाही, किंवा ती घडलीच नाही, असा दृष्टिकोन बाळगला तर पुढे वाटचाल करणे कठीण होऊन बसते.
’दोष न देता, न्यायनिवाडा न करता किंवा स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत न पडता केवळ तथ्य गोष्टींना सामोरे जा. ती गोष्ट लिहून काढा किंवा विश्वासू व्यक्तीशी ही गोष्ट बोला. त्या प्रसंगात भावनिकरीत्या न गुंतलेल्या व्यक्तीचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जाणून घ्या. उदा. एखादं अपयशी ठरू शकणाऱ्या नात्याची चिन्हं जवळच्या मित्राला लवकर कळू शकतात.
’जी गोष्ट झाली त्याला ओलांडून जर तुम्ही पुढे वाटचाल करू शकत नसाल- त्यावर चर्चा करणं, परिणाम समजून न घेणं इत्यादी. तर कुठल्या गोष्टी तुम्हाला मागे खेचत आहेत, ते ध्यानात घ्या. अपयशाबाबत जाणून घेण्यात तुम्ही कुठली भीती बाळगत आहात त्याकडे लक्ष पुरवा. ती भीती विनाकारण आहे किंवा अतिजास्त आहे ते जाणून घ्या. या अपयशामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि क्षमता यांवर आघात होईल याची काळजी करू नका.

कारणे शोधा व कृती करा.
’कृती केल्याने अथवा न केल्याने काय घडेल याचा अंदाज बाळगा. कृती केल्याने तुम्ही काय साध्य कराल आणि न केल्याने वाईटात वाईट काय घडेल याचा विचार करा आणि कृती केल्याने निर्माण होणाऱ्या सुप्त संधींबाबत आशादायी राहा.
’सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. अपयशाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. ‘काम मिळण्यात मी अपयशी ठरलो’ असं कुणी म्हणतं तर ‘मला अद्याप काम मिळालेलं नाही,’ असं कुणी म्हणतं. ‘मला वाटलं होतं त्याहून अधिक काळ मी नोकरी मिळण्याची वाट बघत आहे,’ असाही काहींचा दृष्टिकोन असतो.
’स्वत:च्या चुकांवर पांघरूण घालू नका. त्याचा निवाडा
करू नका. फक्त त्यातून काय शिकता येईल ते पाहा.
’तुमचा प्रयत्न का यशस्वी झाला नाही या संबंधित माहितीचा वापर करण्यासाठी नवा दृष्टिकोन जोपासा. जोपर्यंत तुमची कृती अचूक होत नाही तोवर तुम्हाला अपयशातून शिकण्याची नवी संधी मिळते.
’देदीप्यमान यश मिळण्याआधी वैज्ञानिकांनी, खेळाडूंनी पचवलेल्या अपयशाच्या उदाहरणांबद्दल जाणून घ्या. ध्येयपूर्ती होईपर्यंत त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती घ्या.
’अपयशानंतर मनाला उभारी येण्याकरता झालेल्या चुकांकडे बघताना विनोदाचा आसरा घ्या. स्वत:कडे हसून पाहणं ही जगातील सर्वात मोठी परीक्षा आहे.
’ध्येयाची गाडी रुळावरून घसरण्याचं कारण कोणतं, ते दूर होऊ शकतं का, त्यासाठीचे सकारात्मक उपाय कोणते, आपल्या अपेक्षा वास्तवाला धरून नव्हत्या का.. या मुद्दय़ांचा खोलवर विचार करा.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
man attacked wife Bhiwandi
ठाणे : जेवण गरम करून दिले नाही म्हणून एका व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात पाट मारला, महिलेची प्रकृती गंभीर

दृष्टिकोन बदला.
’ वेगवेगळ्या कल्पना करा. परस्परविरोधी विचार करून वेगवेगळे पर्याय आणि उपाय यांची शक्यता अजमावा. त्यातील साध्य होऊ शकतील अशा कल्पनांचा विकास करा. नव्या योजनेनुसार काम करण्यासाठी तुमच्यापाशी संसाधनांचे कुठले स्रोत आहेत, ते पडताळून बघा. त्यातील संभाव्य समस्या जाणून घ्या. त्या कशा सोडवता येतील हेही बघा.
’ चुका वारंवार होणार नाहीत, याची काळजी घ्या. तुमच्या नव्या आडाख्यात गतवेळेस अपयशास कारणीभूत ठरलेल्या गोष्टींचा समावेश करू नका.
’पर्यायी योजना आखा. उत्तमरीत्या आखलेल्या योजनाही अनाकलनीय गुंतागुंतीमुळे बासनात बांधाव्या लागतात. अशा वेळी तुमचा बॅक-अप प्लॅन तयार असलेला केव्हाही चांगला!
’पुन्हा प्रयत्न करा. कधी नवे ध्येय निश्चित करावे लागते, नवी योजना बनवावी लागते. वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्ही उचललेली पावले योग्य आहेत ना, हे तपासून बघा.
’दृष्टिकोनाबाबत लवचिक राहा. प्रक्रियेशी जुळवून घेणे आणि दृष्टिकोनातून फेरफार करणे हे नैसर्गिक आहे.
’तुमची ध्येयपूर्ती झाली अथवा तुम्हाला पुन्हा नव्याने प्रयत्न करायला लागले तरी या सर्व प्रक्रियेत तुम्ही नक्कीच नवी कौशल्ये प्राप्त केलेली असतात.

अपयशातून बाहेर कसं पडाल?
’अपयशातून बाहेर पडणं म्हणजे नव्याने प्रयत्नांना सुरुवात करणं. सगळ्यात आधी अपयश मिळाल्याच्या भावनेतून तुम्ही बाहेर येणं महत्त्वाचं ठरतं. तो एखादा प्रकल्प असू शकतो, एखादं नातं असू शकतं, एखादं ध्येय असू शकतं- ज्यामुळे तुम्ही प्रेरित झाला होतात, पण नंतर पदरी निराशा पडली.. अशा वेळेस आपल्या चुका स्वीकारून पुन्हा वाटचाल करणं महत्त्वाचं ठरतं.
’सकारात्मकता बाळगल्यास तुम्हाला नवी योजना आखणं सोपं जातं. हे लक्षात ठेवा, दीर्घकालीन ध्येय पूर्ण करण्यासाठी लवचीकपणा आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता बाळगणं महत्त्वाचं. खरं पाहता प्रत्येक अपयश ही ताकद कमावण्याची आणि क्षमता वाढवण्याची मिळालेली संधी असते.
’ तुमच्या भावना समजून घ्या. तुम्हाला निराश झाल्यासारखं वाटलं तर आत्मक्लेश होतात, हतबल झाल्यासारखं वाटतं. वेदना खूप काळ जवळ वागवल्या तर तुमच्या आरोग्यावर, नात्यावर आणि तुमच्या भविष्यकालीन यशावर त्याचे दुष्परिणाम होतात. तुमच्या भावनांचे निरीक्षण करा. ती भावना, मग तो राग, दु:ख, भीती अथवा लाज असेल त्या भावनेला नाव द्या. हे केल्याने तुम्हाला त्या भावनेवर काम करणं शक्य होईल.
’तुमच्या भावनांवर प्रक्रिया करण्यासाठी वेळ काढा. निराश झाल्याने तुम्हाला कसं वाटलं हे जाणून घेण्याच्या आधीच जर तुम्ही कृती केली तर ती घाई ठरेल. वेदनादायी भावना दाबून ठेवल्यानेही आरोग्याच्या समस्या उद्भवतात- उदा. तीव्र वेदना, झोप न येणं, हृदयविकार.

नवे ध्येय ठरवा.
’ अपयशामुळे पदरी पडलेली निराशा पुन्हा वाटय़ाला येऊ नये, म्हणून निश्चित केलेले नवे ध्येय वास्तववादी असायला हवे.
’तुम्हाला भविष्यात काय घडावे असे वाटते, कुठल्या कृतीमुळे यश दृष्टिपथात येईल, या साऱ्या बाबींविषयी विश्वासू व्यक्तींशी चर्चा करा. तुमची नवी उद्दिष्टे त्यांना सांगून ती त्यांना कितपत वास्तववादी वाटतात,
ते तपासा.
’आधीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ठरवलेले नवे उद्दिष्ट काहीसे सौम्य असू द्या. उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर त्याचा मसुदा बनवा.
’तौलनिक विचार करा- सकारात्मक विचार आणि वास्तवदर्शी योजना यांचा सातत्याने तौलनिक विचार करा. हे विचार परस्परविरोधी असू द्यावे. उदा. तुम्ही निश्चित केलेल्या ध्येयाप्रती तुमची उत्तम वाटचाल होत आहे. ते उद्दिष्ट पूर्ण करण्यात तुम्हाला घवघवीत यश मिळाले आहे, अशी कल्पना तुम्ही काही मिनिटे करू शकता. त्यानंतर तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यात कुठले अडथळे येऊ शकतात याचा विचार करणे तुमची ताकद वाढवणारेच असू शकते. त्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी तुमच्या क्षमता वाढतील. जर तुमचे उद्दिष्ट वास्तवाला धरून नसेल तर अशा प्रकारच्या विचारांचा सराव केल्याने तुम्ही ते उद्दिष्ट रद्दबातल कराल आणि नव्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल.
’तुम्ही आणि तुमच्या उद्दिष्टांच्या मध्ये जे अडथळे आहेत, ते ओळखणे म्हणजे नकारात्मक विचार करणे वा आजारी विचारांचे लक्षण आहे, असे मानण्याचे कारण नाही. मानसिकदृष्टय़ा परस्परविरोधी विचार करण्याच्या व्यायामातून असाध्य उद्दिष्टांकडे पाठ फिरवण्याचा निर्णय तुम्हाला घेता येतो.

नकारात्मक विचारांचे पॅटर्न जाणून घ्या.
’अपयश आल्यानंतर आपली मानसिकता काहीशी नकारात्मक बनते. आपण जर नकारात्मक विचारांचे पॅटर्न जाणून घेतले तर त्यांना निकामी करणं सोपं जातं. नकारात्मक विचारांचे पॅटर्न जेव्हा फेर धरू लागतील तर त्यांना हे खरंय का, हा प्रश्न विचारा. त्यानुरूप पुरावे शोधा, मग तुमच्या लक्षात येईल या नकारात्मक विचारात काहीच तथ्य नाही.
’त्याउलट, सकारात्मक विचार लिहून काढा. माझ्यात अमुक क्षमता आहेत, हे लिहून काढा. आपल्यातील क्षमतांचा स्वत:शीच उच्चार केल्याने तुमचे नकारात्मक विचार पळून जातात आणि आत्मविश्वास वाढतो.
’अपयशाकडे घोटाळणं थांबवा. अपयशाचीच चर्चा करण्यापेक्षा नवा दृष्टिकोन विकसित
करा.
’ध्यानधारणा केल्यानेही मन शांत होतं. भीती, तणाव दूर होतो. मन ताजंतवानं होऊन नव्याने काम करायला स्फूर्ती मिळते.

– अपर्णा राणे