मुलांमध्ये दारूचे प्रमाण वाढते आहेच, परंतु आता ते  १२ वर्षांपर्यंत खाली आले आहे. ‘बीअर म्हणजे दारू नाही, तू घेऊ शकतोस,’ असं सांगत आग्रह करणारे या मुलांचे मित्र जसे आहेत तसे अगदी पालकही आहेत. मात्र बीअरपासून सुरू झालेला प्रवास रम, व्होडका, व्हिस्की किंवा कधी कधी देशी दारूपर्यंत कधी पोहोचतो हे त्या मुलांनाही कळत नाही. मानसशास्त्रीय अभ्यासानुसार अल्पवयात दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता १५ टक्के असते. त्यामुळे किशोरवयीन मुलांमधील मद्यपानाचे वाढते प्रमाण हे भावी तरुण पिढीसाठी धोक्याची घंटा आहे.

सानिका आठवीत असताना तिला वर्गातलाच एक मुलगा आवडायला लागला. वयच तसं होतं. सुंदर दिसावं, आपल्याला कोणीतरी पसंत करावं, असं सानिकाला वाटणं साहजिकच होतं. ‘त्या’च्याशी बोलण्याची संधी मिळावी यासाठी सानिकाने त्याच्या मित्रांशी ओळख करून घेतली. वाढदिवस सेलिब्रेशनच्या पाटर्य़ा, वीकएण्ड मजा अशा अनेक कारणांनी हळूहळू तिचं त्यांच्या ग्रुपमध्ये जाणं-येणं वाढलं. सानिकाची घरची परिस्थिती तशी बेताचीच. तिचे वडील दारू प्यायचे. आई-वडिलांच्या सततच्या वादविवादामुळे घरामध्ये नेहमीच तणाव असायचा. ग्रुपमध्ये असताना सानिकाला खूप छान वाटायचं. त्यामुळे तिला सतत घराबाहेर राहायला आवडू लागलं. सेलिब्रेशनच्या निमित्ताने होणाऱ्या बीअर पाटर्य़ानाही ती हजेरी लावू लागली. सुरुवातीला सानिकाने नकार दिला, मग मात्र ‘त्याला’ आवडेल या कल्पनेने तिने बीअर घ्यायला सुरुवात केली. महिन्यातून एकदा, दोनदा मग आठवडय़ातून एकदा असं करत सानिकाला बीअर पिण्याची सवय लागली. काळाबरोबर पिण्याचं प्रमाणही वाढलं. १४ वर्षांच्या सानिकाला तिचे आई-वडील जेव्हा रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा ती अशा अवस्थेत होती की तिला रात्री शांत झोप लागणंच बंद झालं होतं. ती यावी यासाठी बीअरचाच आधार घ्यावा लागायचा. दोन वर्षांपूर्वी एका घोटापासून सुरू झालेला सानिकाचा  प्रवास आता ‘बीअर जिंदगी’ झाला आहे.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Narendra Modi ANI
“…तर देशभरात मोठा गदारोळ माजेल”, स्वतःच्या डीपफेक व्हिडीओचं उदाहरण देत पंतप्रधान मोदींचं AI बद्दल वक्तव्य
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

आपल्याकडे मद्यपानाचं कायदेशीर वय २१ असावे की २५ याबाबत अजूनही वादविवाद सुरू आहेत. काही जणं म्हणतात, मतदानाचा अधिकार १८व्या वर्षी मग मद्यपानाचा का नाही, तर काही जणांचं मत आहे मुलगा २१ वर्षांत लग्नाला योग्य आहे तर त्याला मद्यपान करण्याचेही भान आहे. मात्र सानिकाच्या वयाच्या अनेक किशोरवयीन मुलांमधली वाढती व्यसनाधीनता पाहता मद्यपानाचं वय अवघ्या १२वर येऊन ठेपल्याचे संकेत मिळत आहेत. साधारण पंधरा वर्षांपूर्वी मद्यपानाची सुरुवात ही कॉलेजवयीन मुलांमध्ये होत असे. काळानुसार आनंद व्यक्त करण्याची, साजरा करण्याची रीत बदलत चालली आहे. आनंदाची परिभाषा ‘खुशिया हो तो कुछ मीठा हो जाए’ यापासून आता ‘खूब जमेगा रंग..’ अशी झाली आहे. यामुळे सद्य:परिस्थितीत तरुण पिढीसोबतच १२ ते १८ वयोगटांतील किशोरवयीन मुलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाने मांडले आहे. या विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर सांगतात, ‘‘झोप येत नाही, हात-पाय थरथरतात, भीती वाटते या कारणांमुळे पालक मुलांना आमच्या विभागात घेऊन येतात. कालांतराने मुलांशी चर्चा केल्यावर लक्षात येते की बऱ्याच मुलांमध्ये दारूच्या व्यसनामुळे हा मानसिक आणि शारीरिक त्रास होत असतो. अलीकडे अशा केसेसचे प्रमाण खूप वाढलं आहे. कधी कधी तर पालकांना माहीतही नसते की, आपला मुलगा किंवा मुलगी दारू पिते. या वयोगटातील मुलं सहसा बीअरपासूनच सुरुवात करतात. हळूहळू यांची पावलं रम, व्होडका, व्हिस्की किंवा कधी कधी देशी दारू याकडे कशी वळायला लागतात हे त्यांचं त्यांनाच सांगता येत नाही.’’

किशोरवयीन मुलांमध्ये उत्सुकता, नावीन्य शोधण्याची ऊर्मी आणि कुतूहल यामुळे ती बऱ्याचदा मद्यपानाकडे आकर्षित होतात असे सर्वसाधारण अनुमान असते. परंतु प्रवीण भेटल्यावर या मुलांमधील वाढत्या मद्यपानाचे हे एकमेव कारण नसल्याचे लक्षात आले. डब्लूडब्लूएफ या मालिकेतील नायक कसा शरीरसौष्ठव दाखवत बीअरचा टीन उघडून पितो, याचं अंगाने बारीक असलेल्या प्रवीणला फार आकर्षण असायचं. कुतूहल म्हणून जरी वयाच्या १५व्या वर्षी बीअर प्यायली असली तरी त्याच्यातली वाईट प्रवृत्ती त्याला हे करायला भाग पाडत असल्याचं प्रवीण अगदी ठामपणे सांगतो. ‘‘मी अभ्यासात हुशार असल्यामुळे आजूबाजूचे लोक त्यांच्या मुलांना माझं उदाहरण द्यायचे. वरवर मी आज्ञाधारी मुलगा असलो तरी माझ्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असायचं. नगरातल्या भाईसारखं आपण पण दिमाखात चालायचं, सर्वसामान्य माणसांप्रमाणे जगायचं नाही असं वाटायचं. नंतर कॉलेजला गेलो. तोपर्यंत मी दोन-तीन वेळाच बीअर घेतली असेन. कॉलेजमध्ये युनिफॉर्म घालायला आवडत नव्हता. नवनवीन फॅशनचे कपडे घालून स्टाईलमध्ये राहावं असं माझं स्वप्न होतं. म्हणून मग मी अकरावीतच कॉलेज सोडलं. इव्हेंट मॅनेजमेंटची छोटी मोठी कामं करायला लागलो. पैसा हातात यायला लागला तसं पिणं वाढलं. मग दारू पिऊन घरात भांडण करणं, पैसे असतील तेव्हा डान्सबारमध्ये जाणं आणि नसतील तेव्हा देशी दारूच्या गुत्त्यावर पिऊन पडणं असले प्रकार सुरू झाले.’’ आपल्या या वागण्याची प्रवीणला खूप लाज वाटायची. परंतु हा पश्चात्ताप काही काळच टिकायचा. पण पुढे ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ या संस्थेच्या मदतीने तो गेली तीन वर्षे दारूपासून स्वत:ला दूर ठेवू शकला आहे. आता मागे वळून पाहताना आयमुष्यातून खूप काही गमवल्याची खंत मात्र प्रवीणला मनात डाचत आहे.

दारूचे वाढते आकर्षण

किशोरवयीन मुले दारूकडे आकर्षित होण्याची कारणमीमांसा उलगडण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांच्याशी संवाद साधला असता, ते सांगतात, ‘‘आजच्या काळात लग्नसमारंभ, घरगुती पार्टी यांमध्ये मद्यपान करणं हे जीवनशैलीचा भाग झालेलं आहे. अशा कार्यक्रमांमधून आपले आई-वडील आणि इतर जवळचे नातेवाईक यांना मद्यपान करताना ही मुलं बघत असतात. काही कुटुंबांमध्ये तर पालकच आपल्या घरातील मोठय़ा मुलांना दारू घेण्याचा आग्रह करतात. मग आपली मोठी भावंडे पितात म्हणजे आपणही दारू प्यायला हरकत नाही, असा चुकीचा संदेश त्यांच्यापर्यंत आपल्या वागण्यातून जात असतो आणि याचे कधी कधी पालकांनाही भान नसते. घरात वडील दारू पितात त्यामुळे मुलाला दारूचे व्यसन लागल्याच्या कितीतरी केसेस आमच्याकडे येत असतात. मित्रपरिवाराचा सहवास आणि दडपण हे एक दारूचं व्यसन लागण्याचं मोठं कारण आहे. अबोल स्वभाव, आत्मविश्वासाची कमतरता, शैक्षणिक अपयश, कौटुंबिक ताणतणाव, प्रेमभंग यामुळे या वयोगटातील मुलं बऱ्याचदा मानसिक नैराश्याची भावना अनुभवतात. मग यातून बाहेर पडण्यासाठी मित्रपरिवाराचा आधार घेतात. सुरक्षित वाटणाऱ्या या मित्रांमध्ये मिसळण्यासाठी म्हणून मुलं दारू पिण्यास सुरुवात करतात. दारूची उपलब्धता हे ही या वयोगटातील मुलांचे व्यसनाधीन होण्याचं एक कारण आहे.’’

महाराष्ट्रात २००० मध्ये फक्त नऊ दारूचे कारखाने होते. आजच्या घडीला याची संख्या ६५च्या घरात पोहोचली आहे. किशोरवयीन गटाची मद्यपानाची सुरुवात ज्या बीअरपासून होते तिचे २००४-०५ काळात भारतात उत्पादन २ लाख ७० हजार ४४६ लिटर इतके होते. आता ते ४ लाख ५१ हजार म्हणजे जवळपास दुप्पट झाले आहे. ही आकडेवारी दारूची सहजरीत्या होणारी उपलब्धता स्पष्ट करत आहे.

बीअर ही दारू नसून ती प्यायली की वजन वाढते, भीती वाटत नाही, ताण कमी होतो यांसारख्या दंतकथा पौगंडावस्थेतील मुलांमध्ये दारूबाबत गैरसमज पसरविण्यास कारणीभूत आहेत. १६ वर्षांचा राजस सांगतो, ‘‘मी कधीतरी बीअर घेतो म्हणजे मी काय दारुडय़ासारखा लोळत पडणार नाही.’’ राजसचे हे वाक्य काही प्रमाणात खरं असेलही, परंतु मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार अल्पवयातच दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता ही १५ टक्के असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. धरव शहा सांगतात. डॉ. धरव हे गेली काही वर्षे किशोरवयीन आणि तरुण मुलांमध्ये दारू, तंबाखू यांसारख्या व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहेत. ‘‘दारूच्या अतिसेवनामुळे माणसाचे आतडे निकामी होते एवढीच दारूची परिणामकता या मुलांना ज्ञात आहे. अशा वेळी दारूच्या गांभीर्यतेकडे लक्ष वेधण्यासाठी मी त्यांना दारू शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही कशी सखोल परिणाम करते हे सांगतो. स्वत:ला ‘सोशल ड्रिंकर’ म्हणवणारा राकेश हा मेडिकलचा विद्यार्थी. एका पार्टीनंतर मोटारसायकलवरून हॉस्टेलवर येत होता. नशेत असल्यामुळे त्याला समोरच्या गाडीचा अंदाज घेणं जमलं नाही आणि एका लोखंडी खांबावर धडकला. हा अपघात इतका भयानक होता की, त्याचं डोकं एका बाजूला तर शरीर दुसऱ्या बाजूला पडलं होतं. दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होणारे असे अपघात तरुणांचं जीवन एका क्षणात बदलवू शकतात. कधी कधी अशा अपघातामंध्ये मुलांना अपंगत्वही येतं. शहरात शिक्षणासाठी आलेल्या, हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण अधिक आहे. मेडिकलच्या कितीतरी विद्यार्थ्यांना मी दिवसदिवसभर दारू पिऊन हॉस्टेलवर लोळत पडलेलं पाहिलं आहे. या मुलांवर कोणतीही बंधनं नसतात तसेच भावनिक अडचणींमध्ये आधार देण्यासाठी पालक जवळ नसतात. त्यामुळे ही मुले वाहतच जातात. म्हणूनच किशोरवयीन मुलांमधील वाढते मद्यपानाचे प्रमाण हे भावी तरुण पिढीसाठी धोक्याची घंटा आहे, कारण पुढच्या पिढीत मानसिक ताण, नैराश्य याचे प्रमाणही वाढते असल्याचे  सांगताना डॉ. धरव यांनी दारूच्या परिणामकतेचे विविध आयाम मांडले.

मद्यपानाचा वाढता आलेख

दारूची झिंग आपल्या तरुण पिढीला किती प्रमाणात चढली आहे हे पुढील आकडेवारीतून सिद्ध होत आहे. नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हेच्या २००९ च्या आकडेवारीनुसार, १५ ते १९ वयोगटामधील मद्याचे प्रमाण हे मुलांमध्ये ११ टक्के आहे, तर मुलींमध्ये १ टक्का आहे. २० ते २४ वयोगटातील युवकांमध्ये हे प्रमाण २८.८ टक्के आणि युवतींमध्ये १.४ टक्के आहे. ही माहिती देणाऱ्या मानसशास्त्रज्ञ कीर्तीसुधा राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, किशोरवयीन मुली आणि युवतींमध्ये मद्यपानाचे प्रमाण वास्तवात अधिक आहे; परंतु सामाजिक दडपणामुळे मुली याबाबत खुलेपणाने बोलत नसल्याने ही आकडेवारी अर्धवट सत्य मांडत आहे.

मद्यपान हे आता लिंगभेद, आर्थिक स्तर या भिंतीच्या पलीकडे गेले असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा मांडतात. ते सांगतात, ‘‘किशोरवयीन गटाच्या मित्रपरिवारांमध्ये मुले-मुली असा भेदभाव आता उरला नाही. मुलीही मुलांच्या बरोबरीने बीअरची चव चाखायला शिकत आहेत. त्यामुळे नशेच्या धुंदीत होणारे शरीरसंबंध किंवा केले जाणारे लैंगिक शोषण यांसारख्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. शहरात एकटय़ा राहत असणाऱ्या मुली भावनिक अडचणींमध्ये दारूच्या नशेत गुंतून जात असल्याचेही दिसून येत आहे. या वयातील मद्यपानाचे प्रमाण झोपडपट्टी भागांमध्ये अधिक असले तरी उच्चभ्रू घरांमध्येही दखल घेण्याइतपत आढळत आहे.’’ दारू हा एका विशिष्ट वर्गाला जडलेला आजार नसून समाजरूपी वृक्षाला पोखरत चाललेली कीड आहे हेच यावरून स्पष्ट होत आहे.

किशोरवयातील मुलांमध्ये वाढत चाललेली ही व्यसन व्याधी थांबविणे गरजेचे आहे. त्याचबरोबरीने या व्याधीचे बळी पडलेल्या कोवळ्या जीवांना पुन्हा नव्याने जगण्याची ऊर्मी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी संवाद साधला. त्या सांगतात, ‘‘मुलाला कोणतं तरी व्यसन लागलं आहे, हे जेव्हा पालकांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांच्यासाठीही ती धक्कादायक बाब असते. अशा परिस्थितीत पालक मुलाला रागावतात किंवा मारतात, तर कधी आपण मुलांना वाढवण्यात कमी पडलो, असे समजून ते स्वत:ला दोष देत राहतात. व्यसनाधीन मुलांसोबतच पालकांचेही समुपदेशन होणं गरजेचं आहे. व्यसनामुळे या मुलांमध्ये मानसिक अस्थैर्य आलेलं असतं. आक्रमकता वाढलेली असते. त्यामुळे या मुलांना घरामध्ये कशा रीतीने समजून घेतलं पाहिजे, याबाबत पालकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. व्यसनाधीन मुलं जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रात येतात तेव्हा त्यांना एक वेळापत्रक दिलं जातं. व्यायाम, आहार यावर भर दिला जातो. दिवसभराचा वेळ घालवण्यासाठी विविध कृतिशील कार्यक्रम घेतले जातात. अशा सकारात्मक जीवनशैलीमुळे काही दिवसांतच त्यांचं वजन वाढतं, चेहरा टवटवीत दिसायला लागतो, आत्मविश्वास वाढतो.’’

आपला मुलगा किंवा मुलगी वाईट मार्गाला जाणार नाहीत, असा ठाम विश्वास जरी पालकांना असला तरी कुठे तरी मनात या समाजातील वाईट प्रवृत्तींचे सावट त्यांच्यावर पडू नये याची चिंताही त्यांना लागलेली आहे. अशा पालकांना मुक्ता सांगतात, ‘‘कुटुंबामध्ये मुलांशी मोकळा संवाद झाला पाहिजे. मुलाने सिगरेट ओढून बघू का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांच्यावर रागावण्यापेक्षा सिगारेट पिण्याच्या परिणामाबाबत छोटी फिल्म दाखवा. त्यातून त्यांच्याशी संवाद साधा. मुलांसोबत व्यसनमुक्ती केंद्राला भेट देऊन त्यांच्या शंकेचं निरसन करा. मुलांना चांगला छंद जोपासण्याची सवय लावा.’’

सुनीलकाका सांगतात, ‘‘माझा २४ वर्षांचा मुलगा माझ्याप्रमाणे मजा म्हणून कधी तरी दोन पेग घेतो याला माझा विरोध नाही, कारण मुलांनाही त्यांच्या मित्रांप्रमाणे मजा कराविशी वाटणार. आपल्या अपरोक्ष त्यांना दारूचे व्यसन लागण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन किती प्रमाणात घ्यायची, कोणत्या व्यक्तींसोबत घ्यायची आणि घरी सुरक्षित कसं पोहोचायचं याबाबत चर्चा केली, तर आपल्यातला संवाद थांबत नाही आणि मुलंही आखून दिलेल्या चाकोरी पलीकडे जात नाहीत. आमच्या घरात मुलाला हवं असलेलं स्वातंत्र्य मिळालं असलं तरी त्यासोबत काही कर्तव्यांची जाणीवही त्याला करून दिलेली आहे.’’ हे स्पष्टपणे सांगणाऱ्या पालकांची ही बदलती मानसिकता योग्य की अयोग्य हे काळावर सोपवावं का? 

ही सर्व चर्चा घडत असताना तज्ज्ञांकडून किशोर वयोगटातील मुले ही चित्रपट किंवा चित्रपटातले नायक पाहूनही दारू पिण्यासाठी उत्तेजित होत असल्याचे समजले. अ‍ॅड गुरू आणि अभिनेता अशी दुहेरी ओळख असलेले भरत दाभोळकर यांचे याविषयीचे मत जाणून घेतले. नायक-खलनायक हे या किशोरवयीन मुलांचे ‘आयडॉल्स’ आहेत. त्यामुळे हातात दारूचा ग्लास आणि ओठावर सिगरेट अशा त्यांच्या ‘मॉर्डन लाइफस्टाइल’चं ही मुलं अनुकरण करायचा प्रयत्न करणार, असे ते स्पष्टपणे सांगतात. ते म्हणतात, ‘‘आपल्याकडे दारूच्या बाबतीत अनेक भ्रामक समजुती पसरलेल्या आहेत. आमच्या जाहिरात क्षेत्रात तर लोकांना सिगरेटचे झुरके मारल्याशिवाय नवीन, कलात्मक असं काही सुचतच नाही, असा समज आहे. मी गेली अनेक वर्षे जाहिरात, चित्रपट या क्षेत्रांत काम करत आहे; परंतु नवीन संकल्पना सुचण्यासाठी, मानसिक ताण घालवण्यासाठी मला कधीही सिगरेट किंवा दारूची गरज भासली नाही. कॉलेजमध्ये असताना मी आठवडय़ातले सहा दिवस मित्रांसोबत दारूच्या गुत्त्यावर बसायचो; परंतु मला कधीच मित्रपरिवारमध्ये मिसळण्यासाठी दारू प्यावी, असं वाटलं नाही. बऱ्याच पाटर्य़ामध्ये लोक मला तुम्ही दारू का पीत नाही, असा प्रश्न विचारतात. वास्तविक मीच त्यांना तुम्ही दारू का पिता, असं विचारायला हवं. आपल्या वागण्याबोलण्यातून होणारा दारूचा प्रचार आणि प्रसार मुलांच्या मनावर खूप परिणाम करत असतो. तेव्हा दारू, सिगरेट अशा वाईट सवयींना प्रोत्साहन मिळेल, अशी कोणतीही कृती न करण्याची जबाबदारी ही त्यांच्या आयडॉल्सचीच आहे.’’ याची दुसरी बाजू मांडताना दिग्दर्शक रवी जाधव सांगतात, ‘‘किशोरवयीन मुले  नायकाचं अनुकरण करत असतात हे अगदी खरं आहे. चित्रपट हा समाजातूनच घडत असतो. त्यामुळे जे आजूबाजूला दिसतं तेच चित्रपटांमधून मांडलेलं असतं. तीन तासांच्या चित्रपटांपेक्षा या वयोगटातील मुलांच्या दैनंदिन जीवनावर शाळा, कॉलेज, मित्रपरिवार आणि कुटुंब यांचा जास्त प्रभाव असतो. माझ्या लहानपणी फॅमिली रेस्टॉरंट आणि बार हे वेगवेगळे असायचे. आता फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार अशीच रचना झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणांचाही त्यांच्यावर परिणाम होत असतो. चित्रपटांमध्येही आता दारू पिण्याचा किंवा सिगरेट ओढण्याचा प्रसंग करायचा असेल तर खरंच त्याची कितपत आवश्यकता आहे, हे नायकांकडून विचारले जाते. मात्र मुले मद्यपानाकडे झुकण्याच्या कारणांमध्ये चित्रपट हे कारण अगदी शेवटचे असते.’’ जर हे खरं असेल तर आजकाल चित्रपट सुरू व्हायच्या आधी या चित्रपटातील व्यक्ती दारू वा सिगरेट पिण्याचे समर्थन करत नाही ही पाटी किंवा प्रत्यक्ष कृती घडताना टीव्हीच्या स्क्रीनवर दारू, सिगरेट पिणे हानिकारक आहे, अशी पाटी का दाखवली जात असावी?

समाजमान्यता

हल्लीच्या काळात दारूला ‘ड्रिंक्स’ या सामाजिक परिभाषेत बसविले गेले आहे. त्यामुळे ‘दारू पितेस’ हे विचारणे अपमानास्पद वाटते; परंतु ‘ड्रिंक्स घेतेस’ असे विचारले तर मात्र प्रतिष्ठेचे वाटते. मुलं दारू पिणारच, त्यांनी बाहेरच्या वाईट संगतीत दारूचा प्रयोग करू नये, हे गृहीत धरून काही पालक स्वत:च मुलांना दारूची ओळख करून देत असल्याचेही वास्तवही आहे. मुलांना जितकं दाबून ठेवणार तितकी ती पळवाटा शोधणार, असं म्हणत सुनीलकाका सांगतात, ‘‘माझा २४ वर्षांचा मुलगा माझ्याप्रमाणे मजा म्हणून कधी तरी दोन पेग घेतो याला माझा विरोध नाही, कारण मुलांनाही त्यांच्या मित्रांप्रमाणे मजा कराविशी वाटणार. आपल्या अपरोक्ष त्यांना दारूचे व्यसन लागण्यापेक्षा

त्यांना विश्वासात घेऊन किती प्रमाणात घ्यायची, कोणत्या व्यक्तींसोबत घ्यायची आणि घरी सुरक्षित कसं पोहोचायचं याबाबत चर्चा केली, तर आपल्यातला संवाद थांबत नाही आणि मुलंही आखून दिलेल्या चाकोरीपलीकडे जात नाहीत. आमच्या घरात मुलाला हवं असलेलं स्वातंत्र्य मिळालं असलं तरी त्यासोबत काही कर्तव्यांची जाणीवही त्याला करून दिलेली आहे.’’ हे स्पष्टपणे सांगणाऱ्या पालकांची ही बदलती मानसिकता योग्य की अयोग्य हे काळावर सोपवावं का?

समाजाची भूमिका

या सर्व अभ्यासात समाजाची भूमिका कोणती, याचे विश्लेषण समुपदेशक प्रतिमा हवालदार यांच्याकडून समजते. ‘‘किशोरवयीन गटाच्या मुलांमध्ये मद्याची सुरुवात होण्यापासून ते व्यसन लागण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये समाज किंवा समाजातल्या घटकांचे स्थान महत्त्वाचे ठरते. समाज म्हणजे या मुलांच्या अवतीभवती असलेले शिक्षक, माध्यम, त्यांचे आईवडील, मित्रांचे आईवडील, नातेवाईक इत्यादी पौगंडावस्थेतील या वयात मित्रमैत्रिणींचा सहवास हवाहवासा वाटतो. नवीन अनुभव घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे ही पिढी त्यांच्यासमोर उपलब्ध असलेले नवीन मार्ग चोखंदाळायचा प्रयत्न करणार, हे आपण स्वीकारायला हवं. जसं दारूबद्दल त्यांना कुतूहल आहे तसं याही गोष्टींची उत्सुकता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे या वयातील मुलांना योग्य आणि अयोग्य यांची माहिती देणारी इंटरनेटसारखी साधनं त्यांच्या खिशात आहेत. त्यामुळे त्यांना उपदेशाचे डोस नको आहेत. त्यांना हव्या आहेत मोकळ्या गप्पा. घरामध्ये संध्याकाळी किमान जेवणाच्या वेळी निवांत गप्पा होणं गरजेचं आहे,’’ असं प्रतिमा हवालदार सांगतात.

कोवळ्या वयात दारूसारख्या विषाची परीक्षा घ्यायला निघालेल्या या मुलांच्या हातांना समजून घेणारा स्पर्श हवा आहे. त्यांच्या प्रश्नांना ऐकून घेणारे कान हवे आहेत. त्यांच्यातल्या नावीन्याला प्रयोगाची दिशा हवी आहे आणि याची जबाबदारी व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपण कधी घेणार, हाच प्रश्न आहे.

शैलजा तिवले shailaja486@gmail.com