माँ अन्नपूर्णादेवी, संगीताला अर्पण केलेलं एक व्रतस्थ जीवन.. उद्या, २३ एप्रिलला वयाची नव्वदी पूर्ण करीत आहेत. लाखो रुपयांचे मानधनाचे कार्यक्रम सभेत, संगीत महोत्सवात वादन करायचं नाही, या आपल्या व्रतासाठी नाकारणाऱ्या, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासाठीही आपली शिस्त न मोडणाऱ्या अन्नपूर्णादेवी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारायला गेल्या नाहीत की संगीत नाटक अकादमीची फेलोशिप. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक रविशंकर यांच्याशी वैवाहिक फारकत घेतल्यानंतरही आपल्या चरितार्थासाठी त्यांनी कधीही शिष्यांकडून त्याचं शुल्क घेतलं नाही. त्यांच्याकडून सतार, सरोद आणि बासरी शिकणाऱ्या त्यांच्या शिष्यांमध्ये हरिप्रसाद चौरसिया, नित्यानंद हळदीपूर, राजीव तारानाथ, प्रदीप बारोट, वसंत काब्रा, पं. निखिल बॅनर्जी, शुभेंद्र शंकर, डॅनियल बॅडले, सुधीर फडके, ऋषीकुमार पंडय़ा आदी नामवंताचा समावेश आहे. या व्रतस्थ माँमध्ये चिरस्थायी असलेलं संगीत त्यांच्या सुखदु:खाचं, एकाकीपणाचं साक्षीदार आहे..

बाजारात जाताना वाटेत लक्षात आलं, खिशात पसे नाहीत म्हणून बाबा घरी आले. आणि दारातच थबकले. भरव रागातला कोमल ऋषभ आणि कोमल धवत हा भरवमधला कठीण भाग त्यांची सात वर्षांची मुलगी गात होती आणि मोठय़ा भावाला सरोदवर वाजवता यावं म्हणून शिकवत होती. काही वेळापूर्वी तिच्या भावाला त्यांनी भरव शिकवायला घेतला पण त्याला जमत नव्हतं म्हणून ते चिडून बाहेर पडले होते. त्यांना आपल्या छोटय़ा मुलीला इतकं कठीण संगीत अवगत आहे, याची जराही कल्पना नव्हती. त्यांच्या मोठय़ा मुलीला संगीतापायी सासरी छळ सहन करावा लागला आणि त्यातच तिचा अंत झाला म्हणून ते या छोटीला शिकवणारच नव्हते. पण या सात वर्षांच्या मुलीच्या गळ्यातला हा चमत्कार पाहून त्यांनी तिला शिकवायचं ठरवलं. त्यांनी तिला सरस्वतीच्या मूर्तीपुढे उभं केलं आणि आपल्या गुरूला उद्देशून नमस्कार करून म्हणाले, ‘‘ऐक माँ, आजपासून मी तुला शिकवणार.’’ तिच्या हाती त्यांनी सतार दिली आणि म्हणाले, ‘‘तुला मी आजपासून सरस्वतीच्या हाती देतोय. आजपासून तुझं लग्न सतारीशी झालं, हे लक्षात ठेव. बाळ, संगीत शिकणं ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. माझे गुरू वजीर खाँ. त्यानंतर मी अनेक गुरूंकडे शिकलो. ती कला मी तुला देत आहे. ज्ञानपरंपरेत निर्माण झालेली ही संपत्ती आहे.’’

prarthana behere tie knot of pooja sawant and siddhesh chavan
प्रार्थना बेहेरेने पतीसह बांधली पूजा-सिद्धेशची लग्नगाठ! लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री झालेली भावुक, म्हणाली…
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
Loksatta anvyarth Shiv Sena Manohar Joshi politics working style
अन्वयार्थ: ते जोशी मनोहर..
pooja sawant and siddhesh chavan wedding rituals vhyahi bhojan
आली समीप लग्नघटिका! ‘असं’ पार पडलं पूजा सावंतचं व्याही भोजन, अभिनेत्रीच्या सासरी कोण-कोण असतं?

ती मुलगी आपल्या बाबांकडे, अल्लाउद्दीन खाँसाहेबाकडे पाहत राहिली. त्या सात वर्षांच्या मुलीला बाबांनी जे सांगितलं ते शब्दश: समजलं होतं. ती मुलगी म्हणजे बाबांचं शेंडेफळ, अन्नपूर्णादेवी.

पुढे बाबांच्या शिष्याशी सुप्रसिद्ध सतारवादक रविशंकरांशी तिचं लग्न झालं. महर हे मध्य प्रदेशातल्या सतना जिह्य़ातलं एक गाव. या गावाला िवध्य पर्वतश्रेणीचा सहवास आहे. इथल्या त्रिकुट पर्वतावर शारदादेवीचं भारतातलं एकमेव मंदिर आहे. महरचे राजे बिजेंद्रनाथसिंग या देवीला मानत, म्हणजे सगळा गावच मानत असे. या मंदिराने महर घराणं देशाला दिलं. त्यांनी देशाचं व घराण्याचं नाव दुमदुमत ठेवलं. या घराण्याचे मूळपुरुष म्हणजे बाबा अल्लाउद्दीन खाँ. अनेक वाद्यं वाजवणारे बाबा महरच्या राजाचे गुरू. पण बाबा राजांना म्हणाले, ‘‘मी पसे घेऊन शिकवत नाही.’’ तेव्हा त्यांचे शिष्य राजे बिजेंद्रनाथ म्हणाले, ‘‘हरकत नाही. इथे शारदामाँचं मंदिर आहे तिकडून आपल्याला महिना १५० रुपये दिले जातील. माँचं दान म्हणून ते दिले जातील. राहायला जागाही दिली जाईल.’’

बाबा गायन आणि वादन यात परिपूर्ण. सतार, सूरबहार, सूरशृंगार, सरोद अशी वाद्यं आणि कंठात अलौकिक सूर असे हे अवलिये बाबा. मग कुटुंबही मुलांसह आलं. पत्नी मदिना, मुलगी जहाँआरा आणि मुलगा अलिअकबर स्थिर झाल्यावर उदयशंकर यांच्या नृत्य समूहाबरोबर बाबा राजाच्या परवानगीने परदेशी गेले. २३ एप्रिल १९२७, चत्रपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या या मुलीचा जन्म झाला. महरची राणी सुलतिकादेवी मुलीला पाहून गेल्या. राजाने तिच्यासाठी भेटी पाठवल्या. बाबा महरला परतल्यावर महरचे राजे त्यांना म्हणाले, ‘चत्रात अष्टमीला अन्नपूर्णादेवीची पूजा असते. अन्नपूर्णा हे पूर्णतेचं प्रतीक आहे. ही कन्या तुमचं संगीत भांडार पूर्ण करणार, तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येईल. मी तिचं नाव अन्नपूर्णा ठरवलंय.’ बाबांनी ते नाव मान्य केलं. अन्नपूर्णा हे िहदू नाव गाण्यात आणि सुरात खुलेल तेव्हा मुस्लीम धर्माप्रमाणे रोशनआरा ठेवलं. मोठीचं जहाँआरा होतं. पण छोटीचं प्रचलित नाव अन्नपूर्णाच राहिलं. या पूर्णा शब्दातलं पूर्णत्व जन्मत:च त्या मुलीकडे होतं, त्या अन्नपूर्णादेवी!

एक दिवस बाबांच्या दारात मुंडन केलेला जाडे भरडे कपडे घातलेला तरुण उभा राहिला. बाबा पाहत राहिले. जरा वेळाने त्यांनी ओळखलं, म्हणाले, ‘रबू तू इकडे कसा?’ स्वत:च्या भावाच्या उदयशंकरांच्या नृत्यपथकात रविशंकर होते. तेव्हा बाबांनी त्यांना पाहिलं होतं परंतु आता रविशंकर शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी त्यांच्याकडे आले होते. ते दारात उभे असतानाच त्यांना सतारीचा झंकार ऐकू आला. बाबा म्हणाले, ‘‘बस. ऐक, माझी मुलगी अन्नपूर्णा सतार वाजवतेय. तिचं वादन ऐक. खूप काही समजेल.’’ वादन ऐकून ते मंत्रमुग्ध झाले. ती राग वाजवत नव्हती. केवळ स्वरांचे आरोह अवरोह तीन सप्तकात वाजवत होती. त्यांना जाणवत होतं मुलीच्या हाताला जसं वजन आहे तशी स्पष्टता आहे. गमकेबरोबरच्या मूच्र्छनेच्या वेळी प्रत्येक स्वर जणू मोत्याच्या दाण्यासारखा बाहेर पडतोय. संगीतात गुंग असलेल्या  ११ वर्षांच्या अन्नपूर्णाने दारात कुणी तरी उभा आहे म्हणून वर पाहिलं. एक तरुण नम्रतेने उभा होता. दोघांची नजरानजर झाली. इतक्यात बाबा म्हणाले, ‘‘ऐकतोस ना तिचं वादन. मन लावून ऐक. ती आधार म्हणून खूप चांगली आहे. सारं काही धरून ठेवू शकते, राखू शकते.’’ अन्नपूर्णा लाजली पण तिचं वादन चालू होतं. आताही त्या प्रसंगात बाबांनी जणू भविष्यवाणी उच्चारली होती.

त्या काळातले उस्ताद, संगीताचं आपल्या घराण्याचं शिक्षण फक्त मुलांना देत. मुलींना देत नसत. बाबांनी प्रथम ही प्रथा मोडली. त्यांची मोठी मुलगी जहाँआरा त्यांच्याकडे शिकली. पण त्या संगीतापायी तिचा सासरी छळ आणि मृत्यू झाला. म्हणून ते धाकटय़ा अन्नपूर्णेला शिकवणार नव्हते. त्यांनी अलिअकबरवरच लक्ष केंद्रित केलं होतं; परंतु मुलगा अजिबात लक्ष देत नव्हता. त्यात अन्नपूर्णेची प्रतिभा पाहून तिला बाबांनी शिकवायला सुरुवात केली. तिची संगीताची अफाट जाण पाहून ते तिला सरस्वती माँ म्हणू लागले. शिवाय तिचं शिक्षण राजवाडय़ात चालू होतं. तिथून रोज तिला आणायला, न्यायला गाडी येत असे. सतार, सूरबहार ही वाद्यं तिने आपलीशी केली. तिचा आवाज अत्यंत गोड, त्यामुळे शिकवताना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला तिने शिकवलेलं चटकन समजत असे. अशी गुणी वडिलांच्या संस्कारात कठोर तालमीत तयार झालेली, गुणी अन्नपूर्णा. तिला नियतीने किती त्रास द्यावा याला काही मर्यादा आहे?

ती चौदा वर्षांची असताना तिचा विवाह रविशंकरांबरोबर अलमोडाला झाला.पुढे हे रविशंकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक झाले. या विवाहाचा पुढाकार रविशंकरांचे बंधू उदयशंकर यांनी घेतला. बाबांचा होकार त्यांनी मिळवला. १५ मे १९४१ मध्ये ते दोघं पती-पत्नी झाले आणि ३० मार्च १९४२ रोजी त्यांचा मुलगा महर इथे जन्माला आला. त्याचं नाव शुभेंद्र शंकर.आई मदिना आणि बाबा तिच्या पाठीशी होते. तिचा भाऊ अलिअकबर तिच्याप्रमाणेच बाबांकडे संगीताचे सरोदचे धडे घेत होता. मुलाच्या आजारपणात बदल म्हणून बाबांनी त्यांना मुंबईला मालाडला पाठवलं. तिथे रविशंकरांचे मोठे बंधू राजेंद्रशंकर आणि त्यांची पत्नी लक्ष्मीशंकर राहत होते. तिथे जवळच हे तिघं राहू लागले. लक्ष्मीशंकरची बहीण कमलाही त्यांच्या घरी आली तिचं मूळ नाव सरस्वती. तीही उदयशंकरांच्या ताफ्यात नृत्य करीत असे. त्यामुळे रवींची ती आवडती होती. तिला तिथे पाहिल्यावर रवी अन्नपूर्णेच्या प्रेमात तृप्त असूनही त्यांना कमलाचं परत आकर्षण वाटू लागलं. त्यांनी अन्नपूर्णेला सांगितलं,

‘‘सरस्वती मला आवडते.’’

‘‘तर मग माझ्याशी लग्न का केलंत? ती तर तुमची बालपणीची मत्रीण. माझ्याशी लग्न केलंत ते बाबांकडून विद्या हस्तगत करण्यासाठी का?’’

पण रवींनी उत्तर दिलं नाही. त्यांना वाटे, अन्नपूर्णा स्वत: कलाकार आहे. तिचं हृदय विशाल आहे. मग माझ्या मनाचा दुबळेपणा ती समजून का घेत नाही? अन्नपूर्णा स्वत:च्या कोषात गुरफटून गेली. कोणती स्त्री मानखंडना सहन करील? मग ती कलावंत असो वा नसो. त्यामुळे ती शुभला घेऊन महरला परतली. नंतर रविशंकर दिल्लीत आले. त्यांनी घर घेऊन शुभ व अन्नपूर्णाला आणलं. वाद्यवृंदाची जबाबदारी, आकाशवाणीवर नोकरी, चित्रपटांना संगीत अशी रविबाबूंची घोडदौड सुरू होती. अन्नपूर्णादेवी स्वत:चा रियाज करीत होत्याच. त्यांचा भाऊ अलिअकबर आणि रविशंकर सरोद-सतार जुगलबंदीचे कार्यक्रम करीत होते. शुभ आजोबांकडे सतार शिकत होताच. लग्नानंतर रविशंकर आणि अन्नपूर्णा दोघांनी अनेक वेळा एकत्रित वादन केलं होतं, मात्र ३० मार्च १९५५ मध्ये कॉन्स्टिटय़ूशन क्लबच्या संगीत संमेलनात शेवटच्या दिवशी रविशंकर आणि अन्नपूर्णादेवींची जुगलबंदी होती. आधीच्या कार्यक्रमात बिस्मिल्ला खाँ, सनईवादन करुन आणि इतर सहा दिग्गज वादन, गायन करून गेले होते.

३० मार्च १९५५ रोजी या कार्यक्रमात अन्नपूर्णा सूरबहार आणि रविशंकर सतार अशी जुगलबंदी होती. त्यांनी ‘श्री’ राग वाजवला. यापूर्वीही दोघांनी वादन केलं होतं. पण या कार्यक्रमात अन्नपूर्णादेवींच्या वादनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रम संपवून घरी आल्यावर रविशंकरांची नाराजी स्पष्ट दिसली. रवी म्हणाले, ‘‘दोघं वाजवतो तेव्हा ते थोडं अडचणीत टाकणारं आहे?’’

अन्नपूर्णा – ‘‘काय झालं?’’

रवी – ‘‘मी तुला समजावतोय. जग पुढे चाललंय. जुनंपुराणं कवटाळून बसून चालणार नाही.’’

अन्नपूर्णा – ‘‘म्हणजे?’’

रवी – ‘‘आपल्या वादनात आधुनिकता असायला हवी.’’

अन्नपूर्णा – ‘‘काय बोलताय ते मला कळत नाही.’’

रवी – ‘‘कळत नाही नव्हे कळून घ्यायचं नाही. लग्नापासून पाहतोय.  तुझे विचार, मनोधारणा, कल्पना काहीही बदलायची तुझी इच्छा नाही.’’

अन्नपूर्णा – ‘‘उदाहरणार्थ? काय म्हणणं आहे?’’

रवी – ‘‘मी घेतलेल्या उंची साडय़ा, दागिने तू वापरत नाहीस.’’

अन्नपूर्णा – ‘‘हो. खरं आहे. माझ्याशी तुम्ही एकनिष्ठ राहायला हवं. ते तुम्हाला जमलं नाही. तुम्ही वारंवार माझ्यावर तेच तेच आरोप करता याचा अर्थ काय?’’

आणि मग रविशंकरांच्या मनात काय होतं ते पुढं आलं. त्या फक्त इतकंच म्हणाल्या, ‘‘मी बाबांनी शिकवलं तेच वाजवणार. नाव, कीर्ती, यश, संपत्ती यातलं मला काही नको.’’ रविशंकरांच्या मनातलं अन्नपूर्णेला समजलं. पत्नीचं कर्तृत्व त्यांना झाकोळून टाकत होतं. हे लक्षात घेऊन अन्नपूर्णादेवींनी प्रतिज्ञा केली, ‘सभेत, संगीत महोत्सवात वादन करायचं नाही.

बाबांनी जे दिलं ते स्वत:च्या आविष्कारात शिष्यांकरिता जपून ठेवणार. शुभलाही तालीम देणार.’ नवराबायकोमधे या पद्धतीची कुरबुर होती, पण संसार सुरळीत होता. रविशंकर दिल्लीवरून मुंबईत आले. अन्नपूर्णा आणि शुभ बरोबर होते. रवींनी शुभेंद्र शंकरला  जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला घातलं. तो चित्रकला आणि संगीत दोन्ही शिकणार होता. १९६१मध्ये मलबार हिल इथे राहत होत्या. नंतर १९६८ पासून वॉर्डन रोडवर आकाशगंगा इमारतीत अन्नपूर्णादेवी राहायला आल्या. त्या आजही तिथेच असतात.

तत्पूर्वीच फेब्रुवारी १९६७ मध्ये रविशंकर आणि अन्नपूर्णादेवींची फारकत झाली. रविशंकर कमलाला घेऊन अमेरिकेत लॉस एंजलिस इथे राहू लागले. नंतर तीन वर्षांनी शुभही आईला सोडून अमेरिकेला गेला. त्याला वडिलांची कीर्ती आकर्षित करीत होती. एकाकी अन्नपूर्णादेवींकडे वाद्य शिकण्यासाठी मात्र शिष्यांची रांग लागली. खालच्या मजल्यावर असलेल्या एनसीपीएच्या क्लाससाठी त्या संगीत शिकवीत. त्या मानधनात त्या अर्धपोटी राहत. पण शिष्यांकडून त्याचं शुल्क घेत नसत. नंतरही कधी घेतलं नाही. वडिलांनी दिलेला जमिनीचा तुकडा विकून त्या पशावर त्यांची गुजराण चालत होती. कारण रविशंकरांनी त्यांना पसे देणं बंद केलं होतं.

त्यांच्याकडे सतार, सरोद, बासरी ही वाद्यं शिकायला शिष्य येत. बासरी – हरिप्रसाद चौरसिया, नित्यानंद हळदीपूर, मििलद शेवडे, सरोद शिकायला दहा विद्यार्थी, त्यात राजीव तारानाथ, प्रदीप बारोट, वसंत काब्रा इत्यादी.

सतारीसाठी पं. निखिल बॅनर्जी, शुभेंद्र शंकर, डॅनियल बॅडले, संध्या आपटे, लीनता वझे, सुधीर फडके, ऋषीकुमार पंडय़ा, ऊर्मिला आपटे इत्यादी ११/१२ विद्यार्थी, पण त्या पसे कुणाकडमूनच घेत नसत. इतकंच नव्हे तर आहे त्यात जेवायचं व कुणी आलं तर त्याला जेवायलाही वाढायचं. कुणी काही भेट दिली तर त्याचेही पसे द्यायचे असा त्यांचा बाणा होता. एकदा कोलकाताहून बाबांचा भक्त भेटायला आला. म्हणाला, ‘‘कोलकात्यात सुभाषचंद्र बोस स्टेडिअमवर, तुम्ही घालाल त्या अटींवर कार्यक्रम करायचा आहे. तीन ते तेरा लाखांपर्यंत मानधन देऊ. म्हणाल ते देऊ, पण तुम्ही सूरबहारवादन करा.’’ अगदी हट्ट धरून बसले.

देवी म्हणाल्या, ‘‘तुम्ही मला पसे देऊन काय करणार? आज लोकांची अभिरुची बदलली आहे. या गुणात्मक संगीताला ऐकण्यासाठी गुणीजन आहेत कुठे? हे संगीत अनमोल आहे.’’अर्थात त्या अभ्यागताला नकार मिळाला.

दुसरा प्रसंग – इंदिरा गांधींनी देवींचं सूरबहार आणि सतारवादन दिल्लीत ऐकलं होतं. त्यांना पद्मभूषण किताब जाहीर झाला. इंदिरा गांधींनी विचारलं, ‘‘आपण दिल्लीला सन्मान घ्यायला याल का?’’

माँ म्हणाल्या, ‘‘आपल्याला माहीतच आहे, मी कुठे जात नाही. तेव्हा मला क्षमा करा.’’ हा सन्मान त्यांना पोस्टाने पाठवण्यात आला.

इंदिरा गांधींच्या काळात एकदा प्रसिद्ध व्हायोलिनवादक यहुदी मेनुहीन भारतात आले होते. ते इंदिराजींना म्हणाले, ‘‘अन्नपूर्णादेवींचं संगीत ऐकायचं आहे.’’

इंदिराजींनी अन्नपूर्णामाँना विचारलं, ‘‘जॉर्ज हॅरीसन आणि यहुदी यांना तुमचं सूरबहारवादन ऐकायचं आहे.’’

व्रतस्थ माँ म्हणाल्या, ‘‘मी घरी रियाज करीत असताना ते आले तर ऐकू शकतात.’’

जॉर्ज हॅरीसन आले, पण यहुदींची आई आजारी पडल्याने ते निघून गेले. त्यांना ऐकता आलं नाही. पुन्हा एकदा यहुदी पुरस्कार घेण्यासाठी भारतात आले तेव्हा इंदिराजींनी अन्नपूर्णादेवींना विचारलं, ‘‘या विख्यात संगीतकाराला भारताच्या वतीनं काय भेट द्यावी?’’

माँनी सुचवलं की, ‘‘वाद्यांमध्ये भारताची ओळख निर्माण करणारं वाद्य म्हणजे ‘रुद्र वीणा’ तेव्हा या महान तंतुवादकाला रुद्रवीणाची भेट देणं योग्य.’’ हा सल्ला इंदिराजींनी मानला.

२००५ मध्ये डॉ. अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. त्या काळात संगीत नाटक अकादमीच्या फेलोशिपसाठी अन्नपूर्णादेवींची निवड झाली. अकादमीच्या अध्यक्ष सोनल मानसिंग यांचं पत्र देवींना आलं. ‘आपल्याला हे अवॉर्ड देण्यासाठी राष्ट्रपती येणार आहेत. त्या वेळी आपलं दैवी संगीत ऐकण्याची इच्छा त्यांनी प्रदíशत केली आहे. हा असा सन्मान की फक्त हयात व्यक्तींनाच दिला जातो. तेव्हा आपली अनुमती कळवावी.’

परंतु अन्नपूर्णादेवी बाबा अल्लाउद्दीन खाँ यांचीच मुलगी. निरीच्छ, निरासक्त, व्रतस्थ आणि संगीताला पूर्ण शरण गेलेली विभूती. त्यांनी पत्राचं उत्तर पाठवलं. ‘मी अनेक वर्षांपासून माझे गुरू बाबा आणि सरस्वतीच्या मूर्तीसमोरच वादन करते. माझ्या शिष्यांना मी गाऊनच शिकवते. कारणास्तव मी पुरस्कार आदरपूर्वक स्वीकारते, पण तिथे न येण्याबद्दल क्षमा मागते आणि राष्ट्रपतींचे आभार मानते.’

पन्नास वर्षांहून अधिक काळ हे सांभाळलेलं व्रत. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासाठीही न मोडण्याची शिस्त माँमध्ये आहे. नुसती शिस्त नव्हे तर संगीत हेच जीवीचे जीवन हे कठोर व्रत आचरल्याने पसा, यश, प्रतिष्ठा वगरे यात माँना रस नाही.

शिकवताना जितक्या कठोर, तितक्याच शिष्यांबद्दल त्या हळव्या आहेत. म्हैसूरचे राजीव तारानाथ त्यांच्याकडे शिकत असताना आजारी पडले. औषधासाठी जवळ पसे नव्हते. ते सामान आवरून घरी परत निघाले. माँ म्हणाल्या, ‘तुम्ही कुठेही जाणार नाही. हे पसे घ्या. औषध सुरू करा. दही खा, रियाज करा. परत जायची गोष्ट विसरून जा.’ राजीव तारानाथ म्हणतात, ‘मी शिष्य त्यांच्या भावाचा, अलिअकबर खाँसाहेबांचा. पण जेव्हा माँकडे शिकलो तेव्हा रागांच्या स्वरांना कसं आत्मसात करायचं ते शिकवून आलापी शिकवली आणि ‘हे धृपद अंग आहे. त्याची शुद्धता सांभाळा,’ असं म्हणाल्या. म्हणून आम्ही अनेक शिष्य अन्नपूर्णादेवींना माँ म्हणतो.’

अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेले ऋषीकुमार पंडय़ा कार्पोरेट कंपन्यांसाठी व्याख्यानं देत. अमेरिकेत ते अलिअकबर खाँकडे सतार शिकत होते. काही कामासाठी त्यांना चार महिने मुंबईत यायचं होतं. आता शिकवणी थांबणार असं त्यांना वाटलं. पण अलिअकबर खाँ म्हणाले, ‘अरे, मुंबईत माझी बहीण आहे. तिच्याकडे जा. तिला माझं नाव सांग. शिकवेल तुला ती.’

मुंबईत आकाशगंगा इमारतीत ऋषीकुमार गेले. दारावरची घंटा वाजल्यावर (दारावर सूचनेची पाटी होती केवळ तीन वेळा घंटा वाजवा, दार उघडलं नाही तर आपलं व्हिजिटिंग कार्ड आत टाका.) खुद्द अन्नपूर्णादेवींनीच दार उघडलं. भावाचं नाव घेताच ‘आत या’ म्हणाल्या. ऋषीकुमार काय शिकले हे देवींनी ऐकलं आणि म्हणाल्या, ‘ठीक है. यमन की गत उठाईये.’ पंडय़ांना ती गत उचलायला अडीच तास लागले. खरं तर पंडय़ा १४ व्या वर्षांपासून सतार शिकत होते.. तेवढे अडीच तास माँ तिथे बसून राहिल्या. आणि ऋषीकुमार नंतर येतच राहिले. ११ वर्षांनी मोठय़ा असलेल्या अन्नपूर्णादेवींशी पुढे ऋषीकुमारांनी विवाह केला. ९ डिसेंबर १९८२ रोजी या विवाहामुळे अन्नपूर्णामाँच्या एकाकी जीवनाला आधार मिळाला. आíथक स्थिती सुधारली. पंडय़ांनी त्यांची पुढच्या आयुष्याची तरतूद करून ठेवली.

मुलगा शुभेंद्र अमेरिकेत गेला. त्याने तिथे अमेरिकी मुलीशी लग्न केलं. त्याला दोन मुलं झाली. सोमशंकर आणि कावेरी. १५ सप्टेंबर १९९२ रोजी शुभ अमेरिकेत वारला. माँवर आकाश कोसळलं.

१९७२ ला बाबा गेले. तेव्हापासून त्या एकाकीच होत्या. नंतर नात कावेरी २००३ मध्ये आजीला भेटून गेली. तर डिसेंबर २०१२ ला रविशंकरांचं अमेरिकेत निधन झालं. आणि एप्रिल २०१३ मध्ये ऋषीकुमार पंडय़ा घरातच वारले. माँचा हा साथीदार अचानकच कायमचा निघून गेला.

आता माँ एकटय़ाच असतात. बासरीवादक नित्यानंद हळदीपूर हे त्यांचे शिष्य त्यांच्याकडे राहून त्यांचं पथ्यपाणी पाहतात. माँ आता बिछान्यावरच असतात. कोणाला भेटत नाहीत. बाहेरच्या माणसांना त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतो. मी तो तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभवला आहे.

२३ एप्रिल १९२७ चा त्यांचा जन्म. या वर्षी नव्वदी पार करून ९१ व्या वर्षांत अन्नपूर्णादेवी पदार्पण करीत आहेत. संगीताला पूर्ण जीवन वाहून घेतलेली व्रतस्थ कलावती. त्यांचं नाव उच्चारलं तरी मनात अनेक तरंग उमटतात. ‘उपासनेला दृढ चालवावे’ हे रामदासांचे शब्द आचरणात आणणारी विलक्षण स्त्री. त्यांचं नाव उच्चारताच मनात हुरहुर दाटून येते. त्यांच्या घरातून दिसणाऱ्या समुद्राचं ऐकू येणारं संगीत आणि माँमध्ये चिरस्थायी असलेलं संगीत त्यांच्या सुखदु:खाचं, एकाकीपणाचं साक्षीदार आहे.

त्यांच्या अफाट प्रतिभेने अक्षरश: दिपून जायला होतं. त्या माँना आदरपूर्वक नमस्कार.

मधुवंती सप्रे

madhuvanti.sapre@yahoo.com

(यू टय़ूबवर माँचं सूरबहार वादन उपलब्ध आहे.) संदर्भ – अन्नपूर्णा – सपनकुमार बंदोपाध्याय, अनुवाद – डॉ. अपर्णा झा, सूरयोगिनीचे सूरोपनिषद् डॉ. सुनील शास्त्री, अनुवाद – उर्मिला आपटे, माँचे शिष्य प्रसिद्ध बासरीवादक नित्यानंद हळदीपूर यांच्याशी साधलेला संवाद