आपण आपल्या विचारांचे ओझे मुलांवर लादतो का? न चुकता हसत-खेळत त्यांनी शाळेत जायला हवे.. ‘‘बाय बापू’’ म्हणत टाटा करीत सुहानी बसमध्ये चढली की, एक समाधान अंगभर खेळते. आपल्याला फक्त तेच मिरवायचे असते का? फुटपट्टय़ा आपल्या आणि आयुष्य तिचे हे बरोबर आहे का? ठरावीक चाकोरीशिवाय अन्य पर्याय नसतातच का? इतक्या छोटय़ा मुलीच्या मर्यादांचा विचार आपण का नाही करीत? अजूनही काही प्रश्न मनात येत राहिले, पण उत्तरे सापडत नव्हती..

नेहमीचाच परतीचा प्रवास. मात्र गाडीला आज फारशी गर्दी नव्हती. सीट नंबर पाहिले, सामान ठेवले आणि बसलो एकदाचा. सगळे खरे तर नेहमीचेच. आता टीसी येईल, मग कॉफी येईल.. सगळे अगदी त्याच क्रमाने होत जाते आणि हे धावते जग चार तासांसाठी आपले जग होऊन जाते. प्रवासाचा मी फार चाहता आहे असे नाही, पण हे चार तास मला आवडतात. मुलांकडे राहणे, त्या आठवणी, प्रसंग, नातीचे, सुहानीचे किस्से, सुनांनी सांभाळलेली सणा-वारांची परंपरा.. हे सगळे मनात घोळवत परत जाणे..! मग एखाद्या घटनेचा आपल्याला न कळलेला अर्थ बायको सांगते. ‘‘तुझे आपले काही वेगळेच तर्कट असते हं!’’ असा शेरा आपण मारतो, पण ती घटना पुन:पुन्हा मनात येतेच! हे बहुधा असेच घडते. मात्र या खेपेचे परत जाणे वेगळे होते.. कारण होते सुहानी!

त्याला काही महत्त्व द्यायचे का, किती द्यायचे हे तुम्हीच ठरवा. गेले काही दिवस सुहानी शाळेत जायचेच नाही म्हणते. एक-दोन दिवस लहर वाटली, पण ती लहर नव्हती. बाकी सगळे अगदी नॉर्मल. मैत्रिणींकडून गृहपाठ घेऊन येते, अभ्यास करते, वागणूक नेहमीसारखी. फक्त शाळेची वेळ झाली सगळी नाटकं सुरू. शाळेत काही घडले आहे का, बसमध्ये कुणी त्रास देते आहे का, सगळं बघून झाले. हाती मात्र काहीच लागले नाही. थोडी काळजी आणि थोडे खजीलपणदेखील अनुभवले. ती आम्हाला फसवत होती हे कळत होते, पण काय करावे समजत नव्हते. ८-९ वर्षांच्या मुलीचे ते वागणे थक्क करणारे होते. ती वापरत असलेले शब्द, करीत असलेले आरोप पचवणे जड जात होते. अशा या हताश आणि अनिर्णीत अवस्थेत आम्ही या खेपेस पुणे सोडले..

कॉफी आली. बाहेर ढगाळ पावसाळी वातावरण होते.. आणि आतल्या गारव्यात कॉफी छानच लागली. आम्हा दोघांनाही खरे तर बरेच बोलायचे होते, पण बोलण्यात काही नेमके नाही हे आम्हालाही समजत होते. काही वेळा आपण किती कानकोंडे होतो नाही? आणि तेही आपल्याच विचाराने! तशीच काहीशी अवस्था झाली होती..आणि ‘त्या’ दिवशी आपण खूपच वाईट वागलो याचा एक सलदेखील मनात होता.. आठ-नऊ  वर्षांच्या मुलीच्या मनातील काहूर आपण का नाकारले हे कळले नाही.. देव जाणे काय होते पोरीच्या मनात..! पुन्हा तेच विचार. माझ्या मनातले काहूर मात्र नभाने ओळखले असावे..

‘‘खरेच मला आश्चर्य वाटतं.. आपण खूप सक्ती केली तिच्यावर..’’

‘‘सक्ती नाही नभा.. आपण दांडगाई केली.’’

‘‘अहो, पण तिच्याकडे एकही कारण नव्हते जे पटेल.. उगीच नाही जायचे म्हणजे काय?’’

‘‘पण म्हणून..’’

‘‘जाऊ  दे ना.. झाले ते झाले..’’

‘‘खरंय.. म्हणून आपण आपली चूक कबूलदेखील केली की..’’

‘‘आणि इतकं सगळं होऊनदेखील प्रश्न सुटला तर नाहीच.. पण कळलादेखील नाही.’’

या वाक्यावर मी चर्चा थांबवली. माझ्या मनातले क्लेश हे वेगळ्या प्रकारचे होते. ते मी सांगूपण शकणार नाही आणि सांगून कुणाला समजणारसुद्धा नाही. हे असे काही वाटते त्या वेळी मी गप्प बसतो. सुहानीच्या या शाळासंदर्भातील क्षण नुसते तणावाचे नव्हते तर माझा मलाच एक नवा चेहरा दाखवणारे होते. कशी वाटली असेल आजोबांची ही प्रतिमा तिला?

गाडीने आता चांगलाच वेग पकडला होता. नभासोबतदेखील अपेक्षित संवाद होत नव्हता. एकच पर्याय शिल्लक होता, झोपण्याचा; पण झोपदेखील बाहेरून डोळ्यात शिरत नाही. ती आतूनच यावी लागते. आपण आपल्या विचारांचे ओझे मुलांवर लादतो का? न चुकता हसत-खेळत त्यांनी शाळेत जायला हवे.. ‘‘बाय बापू’’ म्हणत टाटा करीत ती बसमध्ये चढली की एक समाधान अंगभर खेळते. आपल्याला फक्त तेच मिरवायचे असते का? फुटपट्टय़ा आपल्या आणि आयुष्य तिचे हे बरोबर आहे का? काही समजत नाही.. गुंतागुंत आहे सगळी..

तीन-चार महिन्यांपूर्वी सुहानीने एका बालनाटय़ शिबिरात किती उत्साहात भाग घेतला होता. आपण तिचे किती कौतुक केले होते. एका आघाडीच्या अभिनेत्यासोबत तिचे फोटो आपणच फेसबुकवर टाकले. किती तरी दिवस त्यावरील लाइक आणि कॉमेंट्स चेक करीत होतो. काय होता त्याचा अर्थ? आपण फक्त ‘माझी नात’ म्हणून मिरवीत होतो. आता मात्र शाळेत जाण्याचा तिचा असहकार आपल्याला आवडेनासा झाला आहे. आपला मान, आपली प्रतिष्ठा या सगळ्यांशी तिचे शाळेत न जाणे जोडून आपण अगदीच अनैसर्गिक वागलो का! खूप वेडेवाकडे विचार मनात येत राहिले आणि खिन्न वाटत राहिले..

‘‘तुम्हाला न काही तरी विषय लागतो काळजी करायला.. चला.. जेऊर येत आहे. तो वडेवाला येईल आता. घ्यायचे ना?’’ नभाच्या प्रश्नाने मी भानावर आलो. स्वत:शीच हसलो. आपल्याला काही झटकता कसे येत नाही? कुणास ठाऊक..

‘‘अगदी खरं सांगू का? हा विषय फार अवघड नाही, पण सोपादेखील नाहीय. सुहानीच्या स्वभावात बदल होतो आहे आणि तो बदल आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळा आहे. कसं बोलत होती ती त्या दिवशी?’’

‘‘खरंय. मीदेखील घाबरलेच होते. या वयात मुलांमध्ये असे बदल होतात. आपल्याला ते पचवणे अवघड जाते. फार नाजूकपणे हाताळणे गरजेचे असते.’’

मला अगदी नेमके आठवते.. सगळा आरडाओरडा, रडणे, आरोप करणे संपल्यावर बसची वेळ होऊन गेली अन् हीच सुहानी एकदम शांत झाली. ‘सॉरी बापू’, ‘सॉरी आजी’ म्हणत पूर्ववत झाली अन् आता चकित होण्याची वेळ आमची होती. तिला तिचा हेतू साध्य करायचा होता आणि आम्हाला ती कशी का होईना शाळेत जाणे हे आमचे यश वाटत होते. ती जिंकली इतकेच..

‘‘आपल्याला यश येत नाही वाटलं आणि आपण चुकत गेलो..’’

‘‘जाऊ  दे आता ती विसरली पण असेल.’’

‘‘खरंच विसरेल ना..?’’

‘‘खरे तर मला वाटतं मानसीने जॉब नकोच होता करायला. निदान आता तरी सोडायला हवा.’’

‘‘म्हणणे सोपे आहे, कदाचित योग्यसुद्धा असेल, पण अवघड आहे ते पुण्यासारख्या शहरात.’’

‘‘पण आता ती रोज शाळेत सोडणार म्हणजे तिचीच धावपळ.. ’’

‘‘आता याला पर्याय नाही. मानसीला ते करणे भाग आहे आणि करेल ती.’’

‘‘फुकटचं दुखणं आहे झालं,’’ असे म्हणत मी मोबाइलमध्ये शिरलो.

‘‘तिच्या बाबाने काय कमी त्रास दिला होता का?.. ते तर तुम्हाला आठवतदेखील नसेल.’’

हे शरसंधान अर्थातच माझ्यावर होते. विचार करीत मग डोळे कधी मिटले समजलंपण नाही.

मळभ हळूहळू दूर झाले.. पण नवीन प्रश्न मनात येतच होते.

आपल्याला नेमकी कशाची घाई झाली होती? ठरावीक चाकोरीशिवाय अन्य पर्याय नसतातच का? इतक्या छोटय़ा मुलीच्या मर्यादांचा विचार आपण का नाही करीत? आणि अजूनही काही प्रश्न मनात येत राहिले, पण उत्तरे सापडत नव्हती.

तेवढय़ात निखिलचा फोन आला. बाकी चौकशी झाल्यावर अखेर सुहानीचा विषय आलाच.

‘‘जाईल हो ती शाळेला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तिला थोडा वेळ तरी द्या.’’

मला खूप बरे वाटले. बापाचा विश्वास होता तो. आवडला मला.

आजोबा मात्र इथे गोंधळून गेला होता!

रुटीन आता सुरू झाले होते. सुहानीचा प्रश्न (कदाचित दूर असल्यामुळे) जरा मागे पडला आणि एक दिवस फोन आला. ती शाळेत जाऊ  लागली. तीच बोलत होती. ‘‘बापू, आज मी न रडता शाळेत गेले.’’ एक क्षणभर भडभडून आले. पाणी वाहते झाले होते.. मनापासून मी आभार मानले. कुणाचे कुणास ठाऊक? वाटलं प्रश्न म्हणा किंवा समस्या तशी छोटीच होती. मुलं कधीकधी अनाकलनीय वागतात.. पण मोठी म्हणवणारी माणसेदेखील वागतात तशी..

या सगळ्या प्रकरणात सुहानीच्या बापूकडून एक प्रकारे हिंसाच झाली होती. निदान त्या वेळी तरी बापू आजोबांना तसेच वाटत होते.

jayantraleraskar@gmail.com