तीन तलाकचा प्रश्न असो, हाजी अली दग्र्यातील मजारच्या प्रवेशाचा प्रश्न असो की कौटुंबिक अत्याचारांचा, मुस्लीम स्त्रीलाही अनेक प्रश्न भेडसावत आहेत. शिक्षणाचा अभाव आणि त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याच्या मर्यादित वाटा, धर्माचा पगडा, पुरुषप्रधान मानसिकता हे इतर समाजांतील स्त्रियांप्रमाणे तिचेही प्रश्न आहेत. पण तिला ‘मुस्लीम स्त्री’ या परिप्रेक्ष्यातून पाहिले जात असल्याने तिच्या प्रश्नांकडेही बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही अनेकदा संकुचित असतो. अनेक वर्षे अत्याचार, अन्याय सहन केल्यानंतर ही मुस्लीम स्त्री आत्मभानाच्या वाटेवरून वाटचाल करू लागली आहे. स्वत:वरील अन्यायाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू लागली आहे. मुलांना शिक्षणाचा मार्ग खुला करून देऊ लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या २०-२५ वर्षांपासून मुस्लीम स्त्रियांच्या मानसिकतेत प्रचंड बदल होतो आहे. प्रगतीच्या पायवाटेचा आता महामार्ग होऊ पाहतो आहे. त्यासाठी समाजानेही आम्हाला साथ द्यायला हवी, अशी तिची आर्त हाक आहे. तिचं म्हणणं आहे, थोडा है थोडे की जरुरत है..

मुस्लीम किंवा मुसलमान म्हटलं की आपल्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होतात, किंवा केले जातात. मग मुस्लीम स्त्री हा विषय तर खूप दूरचा! आज मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांबाबत जी चर्चा सुरू आहे ती पाहता अनेक विषय समोर आहेत, हाजी अली दग्र्यातील मजारमध्ये प्रवेश घेण्याबाबत असो किंवा सध्या गाजणारा तीन तलाकचा मुद्दा असो. मुस्लीम स्त्री ही धर्माने बांधली आहे, त्यातील पुरुषप्रधानतेने बांधली आहे. आणि माझा प्रत्यक्ष सामाजिक काम करतानाचा अनुभव पाहता, मुस्लीम स्त्रीकडे आपल्या भारतीय समाजात एका विशिष्ट अशा तिरस्कारयुक्त नजरेने पाहिले जाते. तिच्या मूलभूत प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे. अर्थात काही छोटे-मोठे संघर्ष, प्रयत्न झालेले आहेत. शहाबानो प्रकरण, पुण्यातील मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे काम, रजिया पटेल यांनी केलेले काम, मजलिस, भारतीय मुस्लीम स्त्रिया आंदोलनसारख्या काही संघटना, अशी ठळक उदाहरणे आहेत. परंतु संपूर्ण मुस्लीम स्त्रियांना आत्मभानाकडे नेणारी चळवळ अजून झाली नाही, असे निदान मला तरी वाटते. स्त्रीमुक्ती चळवळीने मुस्लीम स्त्रियांना काय दिले, हाही एक प्रश्न मनात डोकावत आहे. याचा अर्थ काहीच बदलले नाही, असे नक्कीच नाही.आर्थिकदृष्टय़ा सक्षम असा वर्गही मुस्लिमांमध्ये  मोठा आहे, तसंच शैक्षणिकदृष्टय़ा प्रगत समाजही आहे. पण  मी ज्या वस्त्यांमधून काम करते आहे त्या आर्थिकदृष्टय़ा निम्न वर्गातल्या वस्त्यांमधूनही आज अनेक मुस्लीम स्त्रिया मोठय़ा प्रमाणात पुढे येताना दिसत आहेत, त्या त्यांच्या प्रश्नावर स्वत: पुढाकार घेऊन काम करताना दिसत आहेत. व्यापक पातळीवर मुस्लीम मुली शिकत आहेत, अगदी उच्च शिक्षण घेत आहेत. अनेक क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत, चित्रपट क्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन, लेखन आदी वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या अनेक जणी असो की खेळाडू मुली.

हे आताच झालंय का? तर नाही. हा बदल गेल्या २५-३० वर्षांमध्ये झालेला जाणवत आहे, जो थोडा आहे, पण आश्वासक आहे. मुस्लीम स्त्रियांमध्ये आत्मभान आलेलं दिसतंय, जे फार सकारात्मक आहे. सगळ्यांनी त्याचं स्वागत करायला हवं. मला नेहमी वाटतं की मुस्लीम स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या नजरेतून बघायला हवेत. बऱ्याच वेळा तिच्या चष्म्यातून न बघता धर्माच्या आणि मुस्लीम म्हणून जी काही ओळख किंवा जो दृष्टिकोन तयार झाला आहे त्या नजरेतून बघितलं जातं. पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. मुस्लीम समाज म्हणून खूप अडचणी आहेत, धर्माची बंधने आहेत, गरिबी आहे, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, तरीदेखील मुस्लीम स्त्रिया पुढे येताना दिसत आहेत, ही खूप आशादायी गोष्ट आहे. मी गेली सोळा र्वष ‘कोरो’ या सामाजिक संघटनेशी जोडून आहे. मुळात मी आले ते एक प्रश्न घेऊनच. ‘माझ्या वस्तीतील मूलभूत प्रश्नांवर बाहेरून आलेल्या मंडळींनी काम का करावं? ते मी केलं पाहिजे’ या प्रश्नाने जरी मी जोडले गेले तरी आज विचार करताना जाणवतं की लहानपणापासून ज्या गोष्टी मी पाहिल्या होत्या, सहन केल्या होत्या आणि तेच माझ्या मुलींच्या वाटय़ाला येऊ नयेत, असं कुठं तरी आत जाणवत होतं आणि ते घडू नये म्हणून माझा सततचा प्रयत्न होता. ‘कोरो’मध्ये मला ती संधी मिळाली. एका टिपिकल मुस्लीम कुटुंबातून मी आले होते त्यामुळे बुरखा सोबत होताच, परंतु त्याचबरोबर एक बाई म्हणून मला घराच्या चार भिंतींमध्ये कोंडून ठेवलं गेलं होतं. त्यातून मला बाहेर पडायचं होतं. मी माझ्या घराच्या खिडकीतून रोज बाहेर बघायची आणि विचार करायची, की मला कधी मोकळेपणाने वावरायला मिळेल, चारचौघांत बोलायला मिळेल? पण हे शक्य नव्हतं, माझ्यावर प्रचंड दबाव होता, परंतु संघटनेच्या बळावर मला यातून बाहेर पडता आलं. मी निर्णय घेतला आणि माझं आयुष्य बदललं. मला नेमकं हेच सांगायचं आहे की मला योग्य संधी आणि दिशा मिळाली, त्यामुळे माझे आयुष्य बदललं, जगण्याचं भान आलं. अशा अनेक स्त्रिया ‘कोरो’सारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून पुढे येत आहेत आणि आल्या आहेत.

कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक तक्रारी आमच्या ‘कोरो’च्या ‘सावित्री समस्या निवारण केंद्रा’त नोंद झालेल्या आहेत, यामध्ये जास्तीतजास्त तक्रारी या मुस्लीम स्त्रियांच्या वतीने दाखल झाल्या आहेत, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे या स्त्रिया शेवटपर्यंत लढतात. आपले हक्क मिळवताना दिसतात. धर्माचा दबाव असला तरी तो झुगारताना दिसतात. स्वत:चे, आपल्या मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी ठोस निर्णय घेताना दिसतात. त्यांची आíथक स्थिती फारशी चांगली नसते, पण त्या लढतात. मुलींच्या शिक्षणासाठी मुलींना त्यांच्या पालकांचा खूप आधार आहे, जो आधी, अगदी २०-२५ वर्षांपूर्वी फारसा नव्हता. मुलींच्या गटांसोबत काम करताना जाणवतं की या मुलींना बाहेरचं मोकळं जग खुणावत असतं. या मुलींमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे, काही करण्याची इच्छा, उत्साह आहे, आकांक्षा आहे. गरज आहे ती त्याला वाव देण्याची. योग्य संधी देण्याची. तुलनेने मुस्लीम मुलेदेखील आज मोठय़ा प्रमाणात काम करताना दिसतात, परंतु या मुलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे.

आमच्या संस्थेतून  काय किंवा इतर अनेक  मुस्लीम संस्थेतून स्त्रिया आता मोठय़ा प्रमाणात संघटित होताना दिसत आहेत.

 

आपले प्रश्न आपणच सोडवायला हवेत याचं आत्मभान आल्याने रस्त्यावरची आणि कागदी दोन्ही लढाई लढत आहेत. त्यांच्या हाती आलेल्या माहितीचा उपयोग त्या प्रश्न सोडवण्यासाठी करत असताना स्वत:चे कुटुंब सावरण्याचे कामही तेवढय़ाच ताकदीने करत आहेत. ‘कोरो’चेच‘महिला मंडळ फेडरेशन’ हे दलित आणि मुस्लीम स्त्रियांचं संघटन आहे आणि ही संपूर्णत: लोकशाही मूल्यांवर काम करणारी संघटना आहे. आज जवळपास ९००० पेक्षा जास्त दलित आणि मुस्लीम स्त्रिया या संघटनेच्या माध्यमातून मुंबईमधील चेंबूर-तुर्भे परिसरातील वस्त्यांमधून विविध मुद्दय़ांवर हक्काधारित काम करत आहेत. मग तो तलाकचा मुद्दा असेल, निकाहनामामधील दुरुस्त्यांचा मुद्दा असेल, स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक आणि कुटुंबाच्या बाहेर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा असेल. भारतीय संविधानाच्या मूल्यांवर आधारित ही संघटना आज सक्षमपणे समाजातील दोन मोठय़ा समूहाला सोबत घेऊन काम करत आहे आणि या संघटनेच्या प्रकियेमध्येच या स्त्रियांची आत्मभानाची प्रकिया सुरू झाली आहे. त्या फार काही मोठे काम करत नाहीत, परंतु आपल्या वस्तीतील त्यांना जाणवणारे, भिडणारे आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी अडथळे ठरणारे अनेक प्रश्न त्यांना आता दिसू लागले आहेत. त्यावर आपणच काम केलं पाहिजे हे समजून त्या या सर्वच प्रश्नांवर काम करीत आहेत. या लेखाच्या माध्यमातून अशा काही स्त्रियांच्या आत्मभान येण्याच्या प्रक्रियेतील काही बदल मांडण्याचा प्रयत्न येथे करतेय.

नसिमुन्निसा मूळच्या लखनौच्या. वडील आणि तीन भावंडे असा परिवार होता. आई लहानपणी घर सोडून निघून गेल्यामुळे वडिलांनीच त्यांचा सांभाळ केलेला. वडिलांचा लाकूडतोडीचा व्यवसाय असल्याने त्यांना कामानिमित्त दूरदूरच्या गावांत, जंगलात जावे लागे. घरी मुलांचा सांभाळ करणारे कुणी नसल्याने ते मुलांना स्वत:सोबत घेऊन फिरत. नसिमुन्निसांना जेमतेम पाचवी इयत्तेपर्यंतच शिक्षण घेता आलं. लग्न सोळाव्या वर्षी झाले. नवरा वीस वर्षांनी मोठा होता आणि त्याच्यासोबत पहिली पत्नी आणि आठ मुले होती. नवऱ्याला दारू आणि इतर वाईट व्यसने होती, शिवाय क्षुल्लक कारणांवरून आपल्या दोन्ही बायकांना मारहाण करीत असे. पुढे नवरा रोजगारासाठी मुंबईत आला. मुंबईत त्याला कचरागाडीवर ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली. त्याने नसिमुन्निसांना मुंबईत बोलावून घेतलं. इथेही त्याने त्यांचा छळ सुरू केला. एके दिवशी तिच्या अंगावरचे सर्व दागदागिने काढून घेतले आणि घरातून हाकलून दिले आणि उलट तिच्या विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार केली. शेवटी कोर्ट-कचेरी होऊन नसिमुन्निसाने नवऱ्यापासून कायदेशीररीत्या स्वत:ची सुटका करून घेतली. मुंबईत शेजार-पाजारच्या काही स्त्रियांसोबत मत्री झाली. या स्त्रिया घरासाठी जमेल ते काम करीत. ते बघून नसिमुन्निसाही स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करू लागल्या. शासनाची दत्तक वस्ती योजना, स्वच्छता अभियान, राजकीय पक्षाचा प्रचार यासारख्या कामांत सहभागी होऊ लागल्या. वेगवेगळ्या धर्माच्या भित्तिचित्रांची विक्री, चोरबाजारातून कपडे आणून विकणे असे अनेक उद्योग करून पहिले. हे सर्व करीत असताना एक बाई म्हणून त्यांना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागे, पण यातूनच आपल्यात निडरता आली, असं त्यांना वाटतं.  मिराजबरोबर नंतर केलेल्या लग्नानंतर आपण खूप सुखी झालो, असं त्या मानतात. आपल्यावर जसा अन्याय झाला तसा कुणावर होऊ नये, अशी कायमच भावना होती, त्यामुळे चाळीत कुणाला काही त्रास झाला की लगेच धावून जातात. वस्तीतल्या मूलभूत सुविधा, स्त्री अत्याचाराची समस्या या मुद्दय़ांवर शासकीय अधिकारी, स्थानिक गुंड, राजकीय पुढारी, जेमतेम प्राथमिक शिक्षण झालेली, सुरुवातीला अन्याय, अत्याचार सहन करणारी नसिमुन्निसा आज इतर स्त्रिया आणि पीडित लोकांच्या अधिकारासाठी महानगरपालिका, शिक्षण विभाग, पोलीस यंत्रणा, राजकीय संघटना, प्रसारमाध्यमे या सर्व ठिकाणी आत्मविश्वासाने वावरताना दिसते. ही ताकद फेडरेशनमुळे मिळाली, असे त्या सांगतात.

असंच उदाहरण शगुफ्ताचं. नवऱ्याने वाजवत गाजवत मिरवत लग्न करून आणलं आणि काही वर्षांनी एकटं असताना तीन तलाक दिले. आज ती त्या तलाकच्या विरोधात न्यायालयात लढतेय. आपला आणि आपल्या मुलाचा अधिकार मागतेय आणि सवाल करतेय, ‘‘शादी सबके सामने करते है तो तलाक अकेले मे क्यूं? यह कैसा धर्म है जो औरोतों को सवाल पुछने कि इजाजत नही देता. यह इस्लाम नही हो सकता.’’ हा बदल का होतोय, असं विचारलं असता ती म्हणते, ‘‘आता जग बदलतंय, ज्ञान सर्व बाजूंनी मिळतंय, अधिकाराची जाणीव होतेय, हा बदल सगळ्यांनीच स्वीकारायला हवा.’’

मुस्लीम वस्त्यांत मुलींच्या लग्नाचं वय वाढताना दिसतंय. शकीला म्हणते, ‘‘पडदा हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. घरी आलेल्या पाहुण्याचं खाणंपिणं करणं,चहा बनवणं, आणि त्यांच्यासाठी पान तयार करणं एवढंच माझं आयुष्य होतं. एवढंच काय तर माझ्या हातात कधी परपुरुषांच्या हातांनी बांगडय़ासुद्धा भरल्या नाहीत. आणि आज मी माझ्या वस्तीत स्त्रियांसोबत घरगुती िहसाचार आणि त्यांच्या अधिकारांच्या प्रश्नावर काम करतेय, कारण मला असं वाटतं की मुस्लीम स्त्रियांना समजून घेण्यामध्ये समाज कमी पडतो आहे. त्यांना गृहीत धरतो. एक स्त्री म्हणून त्यांच्याकडे न पाहता मुस्लीम स्त्री म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरंतर मुस्लीम स्त्रीलाही तेच प्रश्न भेडसावतात जे सगळ्या स्त्रियांना त्रास देतात. मला विचाराल तर तिचे प्रश्न म्हणजे वस्तीत पाणी नाही, शौचालय, रोजगार नाही, सतत भीतीचं वातावरण आहे. तरुण मुले व्यसनाकडे वळत आहेत, कधीही वस्ती तुटू शकते, महागाई प्रचंड वाढलेली आहे. संसार कसा चालवायचा. सामान्य स्त्रियांना हेच प्रश्न छळतात, पण चांगली गोष्ट ही आहे की हे सोडवण्यासाठी आज या स्त्रियाच पुढे येत आहेत. यात ‘‘दरिया की कसम मोजो कि कसम, यह ताना बाना बदलेगा, तू खुद को बदल तू खुद को बदल तब ही तो जमाना बदलेगा,’’ असं म्हणत वस्तीत स्त्रियांसोबत, पुरुषांसोबत, पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून व्यसनाच्या, अत्याचाराच्या विरोधात, वस्ती विकासाच्या मुद्दय़ावर काम करत आहेत.

असंच एक आदर्श उदाहरण अन्वरी खालाचं. आता कुठे त्या पन्नाशीकडे झुकलेल्या, पण गेली १० र्वष त्या संघटनेसोबत जोडून आहेत. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात स्वत:वर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करून केली, स्वत: त्यातून बाहेर पडल्या. आपल्या मुलींना शिकवलं, एवढंच नाही तर स्वत:च्या घरात आपल्या मुलांना, मुलींना स्वत:चे निर्णय घेऊ दिले. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. यात त्यांचे नातेवाईक दूर गेले, पण त्यांनी त्यांची पर्वा कधीच केली नाही. त्यांचं हे धाडसच त्यांना एक आयुष्य वाचवायला उपयोगी पडलं. एके रात्री काही मुलं वस्तीतील एका अल्पवयीन मुलीला डम्पिंग ग्राउंडवर घेऊन जात असताना त्यांनी पाहिले. तेवढय़ा रात्रीही त्या एकटय़ा पुढे झाल्या आणि त्या मुलीला वाचवलं. इतकंच नाही तर त्या मुलांच्या विरोधात तक्रार दाखल केली. वस्तीत अन्वरी खालाला विरोध करण्यासाठी गुंडांनी त्यांची लाइट, पाणी कापले, धमक्या दिल्या, पण त्या मागे हटल्या नाहीत. बल्की त्यांच्यासारख्या शेकडो अन्वरी त्यांनी आत्तापर्यंत तयार केल्यात. त्या सांगतात, ‘‘स्त्रियांमध्ये जी ताकद आहे ती उपजत आहे. लहानपणापासून ती दाबून ठेवली गेली. कधी धर्माच्या नावावर, कधी परंपरेच्या नावावर तर कधी मी एक बाई आहे म्हणून. ज्या दिवशी एखाद्या स्त्रीला अशी संधी मिळते ती त्याचं सोनं करते. मीही तेच केलं आहे, आणि मला खात्री आहे स्त्रियांना असं जास्त काळ दाबून, दुय्यम ठरवून मागे ठेवता येणार नाही. आम्हाला माहीत आहे की आम्हाला घटनेने अधिकार दिले आहेत. ते मिळवण्यासाठीच आम्ही एकत्रित लढा देतोय.’’

आजच्या मुस्लीम तरुणीसुद्धा सजग होत चालल्या आहेत. त्यांच्या नजरेतून त्यांना त्यांचे म्हणून जे प्रश्न वाटतात त्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनीच शोधलेली आहेत. उदा. मुस्लीम मुली बऱ्यापकी उच्चशिक्षण घेताना दिसतात. यामध्ये ज्या मुली गरीब कुटुंबातील आहेत, उदा. हिना वडील नसल्याने आईने धुणीभांडी करून ५ मुलांना वाढवले त्यात हिना तिसरी. दहावीनंतर तिने आपला पुढील शिक्षणाचा खर्च स्वत: करण्याचं ठरवलं व ती एका फूड आउटलेटमध्ये काम करू लागली. त्याच्या जिवावर पदवीधर होऊन आता ती नोकरीही करतेय. तिने तिच्या इच्छेने लग्नही केलंय. आजच्या या मुली आहेत अशी छोटी-मोठी कामं करून घराला हातभार लावत आहेत आणि शिकतही आहेत. इतकंच नाही तर पदवीनंतरही अनेकींनी उच्चशिक्षण घेतलंय. यात एक गोष्ट ठळकपणे नमूद करावीशी वाटते की या मुलींना शिक्षणासाठी घरातून मनाई नाही. मात्र पालकांच्या काही अटी असतात. त्या त्यांनी मान्य केल्या तर त्यांना ही परवानगी मिळते. उदा. नकाब घाला, जीन्स घातली तर चालेल, पण शॉर्ट्स नको. पालकांच्या या काही गोष्टी ऐकल्या तर आपल्याला शिकायला मिळतंय, हे माहीत असल्याने मुलींनी ते मान्य केलं आहे. पण शेवटी त्याही तरुण आहेत. फॅशन करावीशी वाटते, मग त्या वेगवेगळे बुरखे घालून ती इच्छा पूर्ण करतात. हल्ली बुरख्यांमध्येही वेगवेगळे प्रकार, काही रंगांची कलाकुसर, वेगवेगळे पॅटर्न, डिझाइन्स असतात. मुली ती फॅशन म्हणून स्वीकारतात, मला ही फार सकारात्मक गोष्ट वाटते. हळूहळू का होईना बदल होणं महत्त्वाचं आहे.

पण अनेकदा समाजात वावरताना या मुलींना सपोर्टिव्ह वातावरण मिळतंच असं नाही.  एमबीए करत असणारी हेना म्हणते की ती जेव्हा पहिल्या वर्षांला होती तेव्हा ती एकटीच मुस्लीम असल्याने तिला ईदची सुट्टी दिली नाही आणि सांगितलं की जर घ्यायची असेल सुट्टी तर तुझ्या जबाबदारीवर घे. पण या वर्षी ८ मुली एमबीए करत आहेत. त्यांना मात्र सुट्टी दिली.  म्हणजे मुली घर परिवाराशी भांडून जरी शिक्षण घेऊ लागल्या तरी समाजात काही वेळा त्यांना समजून घेण्याची मानसिकता दिसत नाही. शबनम म्हणते, ‘‘आम्हाला तर अनेकदा मोकळ्या चर्चाही करता येत नाहीत. अगदी आतंकवादावर, त्यातल्या विविध मुद्दय़ांवर बोलायचं असेल किंवा आम्ही चर्चा करत असू तर आमच्याकडे इतरांच्या ज्या नजरा वळतात त्या फार त्रास देणाऱ्या असतात, कारण आमच्याबद्दल गैरसमजच जास्त असतात. अनेकांच्या मनात मुस्लीम म्हटलं की ठरावीक प्रतिमाच असते. मुस्लीम म्हणजे मांस, बीफ खाणारे, मुस्लीम म्हणजे आतंकवादी, सब लफडो कि जड याच दृष्टिकोनातून अनेकदा आमच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे या विरोधात आम्हाला बोलायचं असेल तरी बोलता येत नाही. एवढंच काय आम्हाला जर एखाद्या चांगल्या ठिकाणी घर घ्यायचं असेल तरी ते अनेकदा मिळत नाही.’’ याचाच अर्थ मुस्लीम युवतींच्या नजरेत त्यांना भारताच्या नागरिक म्हणून शिकता यावं, स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी सुरक्षित आणि विश्वासाचं वातावरण हवं आहे. आज चेंबूर तुर्भे परिसरातील  मुली आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत आणि हे शिक्षण घेता आलं नाही तर मुली दूरस्थ शिक्षणाच्या माध्यामतून शिकत आहेत. मुद्दा आहे की आपण या सगळ्या जणींना कसं बळ देणार?

माझा अनुभव हा संपूर्णपणे वस्तीपातळीवरील कामाचा आहे, त्यातलीच वरील काही उदाहरणे आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. महिला मंडळ फेडेरेशन आणि ‘कोरो’ म्हणून आम्हाला येत असलेला हा सर्व अनुभव घेऊन आम्ही आता महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांत ‘तळागाळातील नेतृत्व विकास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या ६-७ वर्षांपासून घेऊन जात आहोत. तिथेही अशा अनेक शकीला, अन्वारी, शगुफ्ता, शबनम, हिना, शबाना आम्हाला भेटल्या. ज्या स्व-जाणीव प्रकियेतून आत्मभानाच्या प्रकियेकडे जात आहेत. आणि आपल्या अवतीभवती सामूहिक कृतीच्या माध्यामातून बदल घडवत आहेत. शेवटी प्रश्न फक्त एवढाच आहे की मुस्लीम म्हणून मुस्लीम स्त्रिया म्हणून आपण धर्म, त्याभोवती असलेल्या अनेक गरसमजुतींच्या पलीकडे जाऊन, एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून समाज तिला स्वीकारणार का, या प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे.. त्यासाठी तिचं एकच म्हणणं आहे.. थोडा है थोडे की जरुरत है.

मुमताझ शेख

mumtaz.shaikh@coroindia.org