वीणा सहस्रबुद्धे यांचं सलग पाच र्वष मार्गदर्शन मिळालेली एसएनडीटीमधली आमचीच ‘एकमेव’ बॅच होती. आमची अगदीच नवखी, नवशिकी बॅच वीणाताईंनी अक्षरश: ‘घडवली’. सर्वच नवीन होतो. कुणाला संगीताचं फार शिक्षण नव्हतं की परीक्षांचाही अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीला स्वर लावला की तोच मुळी बेसूर लागायचा. वीणाताई मोठय़ा कष्टानं आमच्या ‘बेसूरपणाची नक्कल’ करून दाखवीत. आमची बेसूर नक्कल त्यांच्या तोंडून ऐकताना हळूहळू सुरात गाण्याची कल्पना नीटपणे लक्षात आली. मग सुरेल गाणं म्हणजे काय हे भानही जागवलं गेलं.. गायिका म्हणून आणि शिक्षिका म्हणूनही ती ज्ञानशिदोरी माझ्यासाठी ‘अक्षय्य शिदोरी’ ठरली आहे.. गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या या गुरूला प्रणाम..

गुरुपौर्णिमा जवळ येत असतानाच थोर गायिका, उत्तम शिक्षिका व माझ्या गायिका म्हणून झालेल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या गुरू वीणा सहस्रबुद्धे आपल्यात नाहीत याचे दु:ख आहे. २००९ मध्ये आम्ही सर्व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन त्यांचा षष्टय़ब्दी समारंभ थाटात केला त्याच्या अमीट आठवणी आजही मनात ताज्या आहेत.. एकाएकी अमेरिकेत वास्तव्याला असताना त्या आजारी पडल्या. त्यानंतर त्यांचे गाणे बंद झाले आणि आता तर ते सूरही हरवले.. अर्थात त्या प्रत्यक्षात गाणार नसल्या तरी त्यांचे ते सूर आमच्या मनातून, रसिकांच्या मनातून कधीच हरवणार नाहीत इतके तेजस्वी, प्रगल्भ व चिंतनशील आहेत..

घरात सांगीतिक पाश्र्वभूमी, मोठमोठय़ा गायकांची ऊठबस तरीही स्वत: उशिरा या क्षेत्रात पाऊल टाकून, दिग्गजांकडून वेचलेले मधुकण व चिंतनशील विचार देणाऱ्या सखोल गायनाने भारलेल्या त्यांच्या मैफली कुणीच विसरणार नाही. त्यामुळे सवाई गंधर्व महोत्सवातील पहिलीच मैफल त्यांनी जिंकली आणि नंतर त्या एस.एन.डी.टी महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख म्हणून काम करू लागल्या. संगीतात बी. ए, एम. ए. करणाऱ्यांना वीणताईंनी शिकवणंच मुळी भाग्याची गोष्ट होती. त्यांच्यामुळेच महाविद्यालयाचीही शान वाढली. खूप विद्यार्थिनींना प्रवेश घ्यावासा वाटू लागला. मी १९८५ मध्ये चिपळूणहून बी. ए (संगीत) करण्यासाठी पुण्यात आले. योगायोग म्हणजे विविध वयाच्या आम्हा तेरा नवोदित विद्यार्थिनींना त्यांच्या हाताखाली शिकायला मिळाले. बी. ए. ची तिन्ही वर्ष पूर्णत: वीणाताईंकडेच. त्यांच्या शिक्षकी पेशाचे दर्शन तेव्हा झाले.. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या माझ्या गुरूंना, वीणाताईंना कृतार्थतेने प्रणाम करते.

वीणाताई सांगलीच्या बोडस घराण्यातील. वडील शंकरराव बोडस हे पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य. पलुस्करांचे अनेक शिष्य संगीत प्रसारासाठी देशभर गेले. त्यापैकी शंकररावांनी कानपूर येथून संगीतप्रसार केला. तेथील वास्तव्यामुळे महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या पुष्कळ गायक गायिकांचं येणं जाणं वीणाताईंकडे होत असे. त्यामुळे गायन, वादन, सांगीतिक चर्चा या वातावरणातच वीणाताई वाढल्या. मात्र वीणाताईंनी शिक्षणाकडे लक्ष द्यावं, असं शंकररावांचं मत. त्यामुळे इंग्रजी, संस्कृत, संगीत घेऊन त्या बी.ए. झाल्या. कथ्थक नृत्य शिकल्याने ठेक्याची जाण आली. सतारीवरही चांगला हात होता. पण नृत्य व सतार मागे पडली. पुढे काय करावं म्हणजे स्वत:ची ओळख होईल असं त्यांच्या मनाला वाटत राहिलं. दरम्यान, आकाशवाणी शास्त्रीय संगीत स्पर्धेसाठी तयारी करावी म्हणून काशिनाथ बोडस या त्यांच्या भावाकडे त्यांनी शिकण्यास सुरुवात केली. त्यात प्रथम क्रमांक आल्यावर वडील म्हणाले, ‘‘काय केलं म्हणून क्रमांक आला?’’ मग भावानेच सांगितलं की ती गाणे शिकायला येत होती. त्यानंतरच मग वडिलांचंही मार्गदर्शन वीणाताईंना मिळू लागलं.

कानपूरच्याच डॉ. हरी सहस्रबुद्धे यांच्याशी विवाह होऊन त्या अमेरिकेला गेल्या. रियाझ चालू होताच. त्यावेळच्या डोळस रियाझामुळे वीणाताई स्वत:ला शोधत राहिल्या. जिद्दीने, मेहनतीने स्वत:ची वाट चोखाळत राहिल्या. प्रत्येक गायकाचं गाणं ऐकून त्या त्या गायकीतला प्रभाव आपल्या संगीतात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही गायकांच्या रेकॉर्डस् ऐकून त्या त्या गायकीची एकलव्यासारखी साधना केली. पंडित बळवंतराय भट्ट, वसंत ठकार, पंडित गजाननबुवा जोशी, पंडित रामाश्रय झा यांसारख्या दिग्गजांकडून ‘मधुकण वेचण्यास’ सुरुवात केली. साधना करताना आत्मचिंतनाची जोड दिली. त्यांची गायकी ग्वाल्हेर घराण्याची आहेच पण स्वत:ची वैशिष्टय़पूर्ण अशी शैलीही आहे.

दरम्यान, डॉ. हरी सहस्रबुद्धे यांना पुणे विद्यापीठात शिकवण्यासाठी विचारणा झाल्याने त्यांनी पुण्यात स्थलांतर केलं. याच टप्प्यावर त्यांच्या गाण्याला अधिक व्यापकता आली. वीणाताई १९८५ मध्ये पुण्यात आल्या, सवाई गंधर्व महोत्सवात प्रथमच गायल्या आणि मग ‘त्या आल्या-गायल्या आणि त्यांनी जिंकलं’, असंच झालं तेव्हा. त्यानंतर मैफलींचा ओघ वाढू लागला. याचदरम्यान त्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयात ५ वर्षे नोकरीवर रुजू झाल्या. त्यावेळी संगीत घेऊन बी.ए. वा एम.ए. करणाऱ्या मुलींना वीणाताईंनी शिकवणं ही भाग्याचीच गोष्ट. वीणाताईंच्यामुळे महाविद्यालयाचीही शान वाढली, असं म्हणता येईल. वीणाताई शिकवत आहेत म्हणताना प्रवेश घेणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली.

त्याच वर्षी मीही चिपळूणहून संगीत घेऊन बी.ए. करण्यासाठी एस.एन.डी.टी. महाविद्यालयात प्रवेश घेतला. आम्ही नव्याने संगीत शिकणाऱ्या मुली आणि अगदी ३५ ते ५५ वयोगटातल्या स्त्री विद्यार्थ्यांना एकत्रितपणे शिकवताना त्यांच्यातील ‘शिक्षकी पेशाचं’ही दर्शन झालं आहे. आम्ही सर्वच नवीन होतो. कुणाला संगीताचं फारसं शिक्षण नव्हतं की परीक्षांचाही अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीला स्वर लावला की तोच मुळी बेसूर यायचा. वीणाताई मोठय़ा कष्टानं आमच्या ‘बेसूरपणाची नक्कल’ करून दाखवीत. आमची बेसूर नक्कल ऐकताना हळूहळू सुरात गाण्याची कल्पना नीटपणे लक्षात आली. मग सुरेल गाणं म्हणजे काय हे भानही जागवलं गेलं. मी तर थोडय़ाफार बंदिशी, ज्या त्रिताल, एकतालमध्ये असत, त्याच शिकल्या होते. त्यामुळे शास्त्रीय संगीतातील ख्याल प्रकार अवघड असतो वगैरे कल्पना केली होती. जेव्हा कळलं की असा बडा ख्याल शिकायचाय, तेव्हा सुरुवातीस भीतीही वाटली. पण वीणाताईंनी ख्यालाचा ठेका शिकवताना एक एक मात्रेचे ४ भाग हातावर बसवून, तो ठेका स्वत: वाजवून ओळखायला लावला. त्यामुळे तबल्याची बोलाक्षरे लक्षात येत गेली. कुठल्या मात्रेला मुखडा येतो व सम घ्यायची हे तंत्र अलवारपणे उलगडून दाखवलं. त्यानंतरचे आलाप त्यांनी हातावर मोजून व्यवस्थित स्वरलेखन करून फळ्यावर लिहिले की आम्ही लिहून ते पुन्हा हातावर बसवून पाठ करीत गेलो. त्यामुळे गुण मिळवणं, ख्याल व्यवस्थित गाता येणं हे झालं. त्यामुळे त्या अनुषंगाने आत्मविश्वासही येऊ लागला. अल्पावधीतच ख्याल गायनाची पद्धती, ताना, बोल आलाप, बोलताना तो मांडणं हे कळत गेलं. २-३ आलाप वा ताना असल्या तरी तो रागही पक्का समजत असे हे त्यांच्या शिकवण्याचं कौशल्य होय.

वीणाताई स्वत:सुद्धा तबला वाजवू शकत. त्यामुळे एखादेवेळी तबल्याला कुणी नसेल तर त्या स्वत: ठेका धरीत. शिकवलेला ख्याल ४/५ वेळा म्हणून घेतला की प्रत्येकीनं दिलेला आलाप म्हणायचा, त्यानंतर कुणाला वेगळं गाऊन बघायचं आहे का असं विचारून उत्साहित करायच्या. सुरुवातीला राग गायन मुक्तपणे शिकलेले असल्याने मला स्वत:ला फार अडचण जाणवत नसे. त्यामुळे ऐकलेल्या किंवा लिहून घेतलेल्या स्वरांच्या आधाराने मी जर वेगळा प्रयत्न केला की त्या खूश होत असत. बी.ए.ची एकूण ३ वर्षे व नंतर एम.ए.ची २ वर्षे असं एकूण ५ वर्षे वीणाताईंचं मार्गदर्शन मिळालं. असं सलग ५ वर्षे केवळ त्यांचेच मार्गदर्शन मिळालेली आमचीच ‘एकमेव’ बॅच होती. अगदी एम. ए. करणाऱ्या मुलींनाही केवळ २/३ रागच वीणाताई शिकवत. त्यामुळे आमची अगदीच नवखी, नवशिकी बॅच वीणाताईंनी ‘घडवली’ असंच मी म्हणेन. त्यावेळची ज्ञानशिदोरी ही माझ्यासाठी तर ‘अक्षय्य शिदोरी’ ठरली

ख्यालगायनासाठी विलंबित आलापासाठी आवश्यक असलेले स्वराकृती किंवा आकृतीबंध हा त्या रागाच्या सुबक मांडणीवरच जमून येतो. राग मांडणी करताना गळ्यावर तो राग चढलेला असेल, विशिष्ट आलाप, त्यांचे स्वरसमूह, स्वरमेळ कळला असेल तरच तो राग किमान अर्धा ते पाऊण तास रंगवता येतो. तशा दृष्टीने वीणाताईंमधील मुक्त गायिकेचे चिंतन आम्ही ऐकतही गेलो. तास संपले की थोडा मोकळा वेळ असे, मी तर तेथेच वसतिगृहात राहात होते. त्यामुळे वीणाताई गाताना त्यांचे श्रवणसंस्कारही मला उपयोगी पडले. मग बंदिश आणि नंतर इतर गोष्टी. या क्रमामुळे ५ वर्षांच्या कालावधीनंतर जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा ३५/४० राग चांगल्या प्रकारे गाता येईल इतपत माझी तयारी होऊ शकली. त्याचा फायदा असा झाला की रेडिओ स्वरचाचणी व विविध स्पर्धा यांमध्ये मला उत्तम यश मिळालेलं आहे. त्यावेळचा आत्मविश्वास व केलेली तयारी आज ३० वर्षांनीही उपयोगी पडते.

महाविद्यालयीन शिक्षणात आम्ही मुलींनी युवा महोत्सवात भाग घेतला तेव्हा वीणाताईंनी आमची समूह गीते बसवून घेतली व दोन वर्षे त्या दोन्ही गीतांना क्रमांक मिळून आम्ही पुढच्या विभागीय स्पर्धेसाठी उदयपूर येथेही जाऊन आलो. आयुष्यात प्रथमच महाराष्ट्राबाहेर जाण्याची संधी सर्वाना मिळाली. स्नेहसंमेलन, ठाकरसी डे अशा वेळेलाही त्यांनी विविध गाणी, भजने बसवून घेतली. त्यामुळे समूहगीताचे तंत्रही त्यांना चांगले अवगत होते. आज मी शाळेत शिकवते तेव्हा प्राथमिकच्या मुलांना सोप्या पद्धतीने मला शिकवता येते याचे मूळ तिथेच आहे. वीणाताई नृत्य शिकल्यामुळे एके वर्षी स्नेहसंमेलनात त्यांनी आमचे कोळीनृत्यही बसवून घेतले होते. त्यांचे सहज पदन्यास, नृत्याची शैली पाहून आम्हाला तर लाजच वाटायची. जराही अंग लवत नसे आमचे आणि वीणाताई सहज मनमोहक हालचाली दाखवीत. शेवटी एकदाचं जमलं आणि आम्हालाच हुश्श झालं.

मी वसतिगृहात राहात होते. त्यामुळे ‘स्थानिक पालक’ म्हणून त्या मला नेहमी सही देत. त्यामुळे त्यांनीच एकदा व्रत केले तेव्हा रात्री गाण्याचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही (माझी मैत्रीणही होती) झोपायला त्यांच्याकडे गेलो. त्या दिवशी सकाळी जेव्हा प्रसादाचे गाकर बनवणे सुरू होते तेव्हा आम्ही २/४ विद्यार्थिनी, नातेवाईक जमलो होतो व गाकर बनवत होतो. तेव्हा एका प्रसिद्ध गायिकेला त्यांनी माझ्याविषयी सांगितलं की, ‘ही वसतिगृहात राहून शिकते, कोकणातून आलीय वगैरे..’ त्या बाईनी सहज विचारलं की, ‘‘किती तास रियाझ करते?’’ त्यावर ‘‘रियाझ किती पेक्षा कशी गाते ते विचार’’ असं वीणाताई बोलून गेल्या. माझ्याबद्दलचं कौतुक अजून किती हवं?

त्यानंतरच्या काही दिवसांनी दगडूशेठ गणपतीसमोर गुढीपाडवा महोत्सवात त्यांचं गायन व्हायचं होतं. मला त्यांनी तंबोऱ्याला बसायला सांगितलं, पण माझ्याकडे तेव्हा छानशी साडी नव्हती. तर स्वत:चा ब्लाऊज टाचून मला त्यांनी एक पिवळ्या रंगाची छान साडी नेसायला दिलेली अजूनही आठवते. रात्री कार्यक्रमानंतर त्यांच्या घरी येऊन झोपलो व दुसऱ्या दिवशी जेवून मगच मी वसतिगृहात येऊन महाविद्यालयाला गेले. ते सगळे प्रसंग आजही तितकेच ताजे आहेत. आम्ही फक्त त्यांच्या विद्यार्थिनी नव्हतो, मुलीच होतो. नंतरच्या काळात १९९१ नंतर माझी नोकरी, वीणाताईंचं औंधचं लांबचं वास्तव्य यामुळे माझा जरा संपर्क कमी होत गेला. पण सवाई गंधर्व महोत्सव अलीकडे केलेली त्यांची षष्टय़ब्दीपूर्ती यामुळे पुन्हा संपर्क झाला. दरम्यान वीणाताईही दोन्ही मुलांच्या परदेश वास्तव्यामुळे पुण्यात खूप कमी असत. एकतर त्यांनी ९१ मध्ये महाविद्यालय सोडलं व मैफलींमुळे देश-परदेशांत त्यांचे दौरे सुरू झाले. त्यामुळे मैफली, परदेशागमन, यामधूनच कधीतरी ४/५ महिन्यांच्या काळात पुण्यातील वास्तव्यात त्यांच्याकडे अपर्णा गुरव, सावनी शेंडे, शीतल ओरपे, अतुल खांडेकर, शामा जोशी, वंदना घांगुर्डे, चिन्मयी आठल्ये, अंजली मालकर, रचना बोडस, जयंती कपाडिया (नंतर झालेली सून) सुरभी जोशी आणखी कित्येक जणींना त्यांनी अव्याहत विद्यादान केलं. दरम्यान, श्रीनिवास खळेंनी दिलेल्या चालींची भावगीत ध्वनिमुद्रिका,

ऋ तुचक्र, विविध रागांच्या रेकॉर्डस्, सीडीज यामुळे त्यांची गानगंगा अखंड ओघवती राहिली. बहुतेक सर्व मोठय़ा महोत्सवातील गायन, समीक्षकांची उत्तम दाद, स्वच्छ, सुरेल गळ्यावर फिदा असलेले रसिक, ‘तराणा’ या विषयावर गांधर्व महाविद्यालयाची आचार्य ही पदवी, विद्यार्थिनींचेही वीणाताईंवरील प्रेम ही व्यक्ती म्हणून त्यांची काही वैशिष्टय़े सांगता येतील.

डॉ. हरी सहस्रबुद्धे यांच्या पाठिंब्यानेच त्यांचे संगीत जागते राहिले. गाता गाता स्वयंपाक करीत संसार- संगीत दोन्हींतील समतोल त्यांना साधता आला. गायिका, गृहिणी, आई यात यशस्वी झाल्याच, पण सून जयंतीलाही घडवून आपला वारसा तिच्या हाती त्यांनी दिला आहे.

वीणाताईंनी केलेल्या सांगीतिक कामगिरीत

ऋतुसंगीत, कृष्णलीला, तराण्यावरील प्रयोग, बंदिशीच्या मांडणीसंदर्भात व्याख्यानं -प्रात्यक्षिक या सर्वाचा समावेश आहे. ‘उत्तराधिकार’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांची स्वत:ची जडणघडण, गाण्याची भूमिका याचा समावेश तसेच भाऊ काशिनाथ बोडस यांच्या व स्वत:च्या रचना असलेल्या बंदिशींचा समावेश असलेले ‘नादनिनाद’ ही दोन पुस्तकं प्रकाशित झाली असून वीणाताईंना उत्तर प्रदेशचा ‘संगीत अकादमी पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

वीणाताई मला योग्यवेळी गुरू म्हणून लाभल्याने माझी सांगीतिक पायाभरणी जोरदार झाली. जी जडणघडण झाली ती पुढच्या काळात इतर राग किंवा संगीतप्रकार शिकताना त्याचा फार मोठा उपयोग होतो हे जाणवतं. एकदा राग पक्का असेल तसंच पायाही पक्का असेल तर आपला विचारही विस्तृत होत जातो, आपला आवाका अजमावीत आपले प्रयत्न कसे करायला हवेत हेही कळत जातं. आज ३० वर्षे मी सांगीतिक क्षेत्रात आहे. सर्व तऱ्हेचे गायन करते, इतरही काही गुरूंचे मार्गदर्शन घेते, पण वीणाताईंच्या मूळच्या पायावरच ही सांगीतिक इमारत मी वाढवते आहे. आपल्या कक्षा वाढवताना ‘स्काय इज द लीमीट’ आहे हे लक्षात येत जातं. आज माझ्यासह वीणाताईंच्या अनेक विद्यार्थिनींना हा अनुभव येतो. त्यांनी दिलेली ज्ञानशिदोरी व स्वरलयींचे पंख लावून आज आम्ही अनेकजणी संगीतावकाशात मुक्त, स्वच्छंद विहरतो, ही आमची मर्मबंधातली ठेवच होय.

-डॉ. राजश्री भाटवडेकर-महाजनी

 

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…

Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

Video Drunk Teacher Abuses Students In Sarkari School
मद्यधुंद शिक्षकाचा शाळेत धिंगाणा; शिवीगाळ ऐकून भडकलेल्या विद्यार्थ्यांनी ‘असा’ काढला राग, पाहा Video