सर्व मंगल मांगल्ये, हे जीविताचं ध्येय घेऊन, आपल्या स्त्रीत्वावर, प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीवर कष्टाने मात करत स्वत:साठी नव्हे, तर समाजासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या दुर्गाचा गौरव पार पडला आणि खऱ्या अर्थाने यंदाचा दसरा साजरा झाला..निमित्त होतं, ‘लोकसत्ता’च्या ‘शोध नवदुर्गाचा २०१७’च्या कार्यक्रमाचं!

समाजातल्या अनेक क्षेत्रातल्या तिमिराला छेद देत आपआपल्या क्षेत्रात तेजाने वाटचाल करणाऱ्या आणि लोकांचं जीवन प्रकाशमान करणाऱ्या या दुर्गाच्या कौतुकासाठी मुंबईसह राज्यभरातून अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. स्त्री हे आदिशक्तीचं, मातृशक्तीचं रूप मानलं जातं. पण त्याही पलीकडे जात सृजन, शौर्य, सामाजिक बांधिलकी, भूतदया, साहस याचे प्रतीक असलेल्या स्त्रिया विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत. परंपरा, रूढीवाद या जाळ्यात न अडकता प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी झटणाऱ्या या स्त्रियांचा सन्मान सोहळा अनुभवताना उपस्थितांच्याही डोळ्यात नकळत पाणी तरळत होते. आलेल्या प्रत्येकाच्या मनात कृतार्थतेचा भाव दाटून येत होता. या दुर्गाना सन्मानित करण्यासाठी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करणारं स्त्री नेतृत्व आवर्जून उपस्थित होतं. तरुणाईला साद घालणारे अभंग, कथ्थकचा आविष्कार यासोबतच गदिमा, पु.लं., वपु यासारख्या नामांकित पुरुष साहित्यिकांच्या नजरेतून ‘स्त्री’ या अभिवाचनाने नवदुर्गा पुरस्काराचा सोहळा उत्तरोत्तर रंगतच गेला आणि प्रत्येक व्यक्ती इथे प्रज्वलित झालेली प्रेरणेची ऊर्जा घेऊनच घरी परतली.

Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

यंदाच्या ‘शोध नवदुर्गाचा’ कार्यक्रमाची संकल्पना ‘त्याच्या नजरेतून ‘ती’ला शोधण्याची होती. त्याचाच आविष्कार सुरुवातीच्या ‘अभंग रिपोस्ट’ या सांगीतिक कार्यक्रमातून झाली. तरुणाईला अभंगांची गोडी लागावी यासाठी ‘अभंग रिपोस्ट’ या बॅण्डची बांधणी करण्यात आली आहे. पाश्चात्त्य संगीताच्या साथीने संत तुकारामांच्या ‘देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर’ या अभंगाने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि प्रेक्षागृह चतन्याने भरले. रूढीवादाला बाजूला सारून देवाचे रूप सामाजिक कामात शोधणाऱ्या आपल्या नवदुर्गाचा आत्मविश्वास या अभंगाने आणखी दुणावला. यावेळी उपस्थित प्रेक्षकही अभंगमय झाले होते..

या सन्मान सोहळ्यात पुरुष साहित्यिकांपासून नर्तक, गायक यांनी नवदुर्गाना मानवंदना दिली आणि ‘लोकसत्ता नवदुर्गा २०१७’ चे हे चौथे पर्व सर्वार्थाने वेगळे ठरले. पुरुषांची सत्ता असलेल्या राजकीय क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण करणाऱ्या राजकीय स्त्री शक्तींच्या हस्ते नवदुर्गाचा सन्मान हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़. नवदुर्गाना सन्मानित करण्याबरोबरच त्यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांना बोलते करण्याची जबाबदारी राजकीय स्त्री शक्तींकडे होती व त्यांनी ती लीलया सांभाळली.

‘‘आई, पत्नी, मत्रीण या रूपांमध्ये प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक दुर्गा असते. या दुर्गाना नवरात्रोत्सवात अभिवादन करणे महत्त्वाचे. मात्र या उत्सवात रंगाच्या दिखाव्यात अडकण्यापेक्षा प्रत्यक्ष समाजात विधायक काम करणाऱ्या कर्मयोगिनींना सन्मानित करणे आवश्यक आहे,’’ असे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. ‘शोध नवदुर्गेचा, जागर स्त्रीशक्तीचा’ या उपक्रमासाठी राज्यभरातून आलेला प्रतिसादातून विधायक काम करणाऱ्या ९ स्त्रियांचीच निवड आव्हानात्मक होती, आपल्या कर्तृत्वाने इतरांची आयुष्ये प्रकाशमान करणाऱ्याचीच यात निवड केली, असे सांगत या कार्यक्रमाची भूमिका चतुरंग पुरवणीच्या संपादिका आरती कदम यांनी स्पष्ट केली. यंदा प्रथमच नवदुर्गाना सन्मानित करण्यासाठी राजकीय स्त्रीनेतृत्वाला आमंत्रित करण्यात आलं होतं. महिला व बालविकास आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री व आमदार वर्षां गायकवाड, आमदार प्रणिती शिंदे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, विधान परिषद आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. पुरस्कार देण्यापूर्वी या दुर्गाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या चित्रफिती प्रेक्षकांसाठी स्फूर्तीदायी ठरल्या. नवदुर्गाच्या कर्तृत्वामुळे आम्हालाही ऊर्जा मिळाली, अशी भावना राजकीय स्त्रीशक्तींनी यावेळी व्यक्त केली.

आमदार प्रणिती शिंदे यांनी कांचन परुळेकर या पहिल्या दुग्रेला सन्मानित केले. स्त्रियांना उद्योजिका बनवण्याचा वसा घेत आपली बँकेतील व्यवस्थापकपदाची नोकरी सोडून ‘स्वयंसिद्धा’च्या माध्यमातून कांचन यांनी ४५०० उद्योजिका घडविल्या आहेत. स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांच्या हाती सत्ता येणे आवश्यक आहे. यासाठी महिला विधेयक आणावे, अशी मागणीही परुळेकर यांनी केली. कांचन यांच्या कार्यातून प्रेरणा मिळाल्याची भावना आमदार प्रणिती यांनी व्यक्त केली. मुंबई व पुण्यासारख्या शहरी भागांमध्ये सामाजिक कामांसाठी आर्थिक पाठबळ मिळणे शक्य होते, मात्र ही मदत ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचवली तर खऱ्या अर्थाने विकासात्मक काम होईल, असे प्रणिती म्हणाल्या.

यानंतर विधान परिषद आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी कुशावर्ता बेळे या दुग्रेला सन्मानित केले. अल्पशिक्षित, घरात बेताची परिस्थिती अशा अनेक अडचणींवर मात करत समाजकारणाबरोबर राजकारणात आपली ठसठशीत छाप उमटवणाऱ्या कुशावर्ता बेळे यांच्या संवादकौशल्याने व्यासपीठावरील राजकीय स्त्री नेतृत्वही अचंबित झाले. पेणच्या वासंती देव यांनी आदिवासी, वृद्ध, वंचित स्त्रियांसाठी ३१ डिसेंबर हा ‘माहेरपणाचा दिवस’ म्हणून साजरा करायला सुरुवात केली. माहेर ही स्त्रीच्या मनाच्या कोपऱ्यातली हळवी बाजू. या एक दिवसाच्या माहेरपणातून मिळणारं प्रेम त्या स्त्रियांना संकटाला दोन हात करण्याची ऊर्जा व आत्मविश्वास देतं. ज्या महिलांना माया देणारा आधार नाही अशांसाठी सुरू केलेला हा खास सोहळा आज पेणमध्ये जिव्हाळ्याचा  झाला आहे. ‘‘३१ डिसेंबरला आमच्या गावात कुठलीच स्त्री कामावर जात नाही. या दिवशी आम्ही एकत्र जमतो, वेगवेगळे खेळ खेळतो. त्यावेळी त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते,’’ असे सांगताना वासंती यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

या दुर्गामधील चौथी दुर्गा म्हणजे आदिवासी व दलित शोषितांसाठी सामाजिक कामाबरोबरच आंदोलनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या कुसुम कर्णिक. ८४ वर्षांच्या कुसुम वयपरत्वे थकलेल्या होत्या, त्यामुळे बोलू शकल्या नाहीत. मात्र गेल्या ५० वर्षांतील त्यांचे काम यावेळी बोलले आणि प्रेक्षकांसाठी त्या मानाच्या ठरल्या. ‘महिला व बालविकास आणि ग्रामविकासमंत्री’ पंकजा मुंडे यांनी त्यांना सन्मानित केले. इतक्या वृद्धावस्थेत असतानाही कुसुम या जिद्दीने लढत आहेत. येथे उपस्थित सर्व नवदुर्गाचे कर्तृत्व पाहून भारावून गेले, अशी भावना पंकजा यांनी व्यक्त केली.

औरंगाबादच्या डॉ. प्रतिभा पाठक ठरल्या शोध नवदुग्रेचा या उपक्रमाच्या पाचव्या दुर्गा. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या डॉ. प्रतिभा फाटक यांच्यातल्या संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करत होत्या. ग्रामीण जनतेला समाधानी आयुष्य द्यायचे असेल तर त्याच्यात आरोग्यभान जागृत करण्याबरोबरच आíथकभान देण्यासाठी डॉ. प्रतिभा यांनी बचत गटांची स्थापना केली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी डॉ. प्रतिभा यांना सन्मानित केले. आज जगापुढे अनेक प्रश्न उभे आहेत. त्यांची उत्तरे शोधण्याबरोबरच प्रामुख्याने उपाययोजना करण्यासाठी नवदुर्गा अविरत मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्याने जगासमोर आदर्श ठेवला आहे, असे म्हणत असताना मुक्ता टिळक यांनी सर्व दुर्गाना मानवंदना दिली.

रुग्णांना वेदनेने जखडवणाऱ्या ‘सिकलसेल’ या आजाराबाबत समाजात जनजागृती करणाऱ्या डॉ. अनुराधा श्रीखंडे ठरल्या आपल्या सहाव्या दुर्गा. शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी डॉ. अनुराधा यांना सन्मानित केले. ‘‘वारकरी पंढरपूरच्या यात्रेला निघाल्यानंतर गावगावचे सांगाती त्यांचा सन्मान करून पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतात त्याप्रमाणे लोकसत्ता शोध नवदुग्रेचा या उपक्रमातून सांगातीचे काम करीत आहे. नवदुर्गा या पालखीमध्ये बसल्या असून आम्ही त्यांच्या पालखीचे भोई झालो आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,’’ असे डॉ. नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

आधुनिकीकरणात गावांची शहरे होत गेली. सिमेंटच्या जंगलात माणसांना राहायला आसरा मिळाला. मात्र चिमणी-पाखरं बेघर झाली. याच चिमण्या-पाखरांना हक्काचा आशियाना मिळवून देण्याचं आगळंवेगळं काम करणाऱ्या सुनीता शिंगारे. घराच्या समोर अडकवलेल्या खोप्यामध्ये चिमण्यांना लहानाचे मोठे होताना, त्या छोटय़ा पंखांनी घेतलेली झेप पाहताना जो आनंद होतो तो शब्दांच्या पलीकडचा आहे, असे म्हणत असताना सुनीता यांच्या चेहऱ्यावर आसू आणि हसू दाटून आलं.

आठवी व नववी दुर्गा ठरल्या हिमालयाच्या १७, ५०० फूट उंचीचे शिखर पादाक्रांत करणाऱ्या पहिल्या अंध महिला गिर्यारोहक परिमला भट आणि कुटुंबाची बेताची परिस्थिती असतानाही राज्यस्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या नेमबाजीच्या स्पर्धामध्ये पदकांचे शतक पूर्ण करणाऱ्या तेजस्विनी मुळे-लांडगे. माजी मंत्री व आमदार वर्षां गायकवाड यांनी या दुर्गाना सन्मानित केले. गगनात उंच भरारी घेण्याची स्वप्ने पाहत असताना जमिनीवरील वंचित, शोषित वर्गासाठी झटणाऱ्या या दुर्गाना आमदार वर्षां गायकवाड यांनी मानाचा मुजरा केला.

या नवदुर्गाची नावे वेगवेगळी असतील; मात्र त्यांचे ध्येय, चिकाटी, व्यासंग यात साम्यता आहे. उपस्थित प्रत्येक दुग्रेचा सन्मान होत असताना दुसरी दुर्गा तितकीच आनंदाने व उत्साहाने दुसऱ्या दुग्रेला प्रोत्साहन देत होती. या आठवणी, ते क्षण टिपून घेण्यासाठी या नवदुर्गा एकमेकांसोबत सेल्फीही काढत होत्या.

‘ती’ची कथा’ आता बदलत आहे. तिची ओळख स्त्रीत्वापलीकडे तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे, कार्य व कर्तृत्वामुळे ओळखली जात आहे. स्त्रियांच्या गेल्या १०० वर्षांच्या इतिहासाच्या बदलाला सुरुवात झाली आहे. गगन भेदणाऱ्या नवदुर्गाच्या कर्तृत्वाची ही बाजू समाजापर्यंत पोहोचविणे हा ‘शोध नवदुग्रेचा, जागर स्त्रीशक्तीचा’ या उपक्रमाचा हेतू आहे. ‘शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही.’ या बाबा आमटेंच्या गीताप्रमाणे आपल्या आयुष्यातील दु:खांना तिलांजली देत समाजाच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या, वंचितांच्या पाठीशी गंभीरपणे उभ्या राहणाऱ्या, कधी सरस्वती बनून ज्ञान देणाऱ्या तर कधी दुर्गा होऊन दृष्ट प्रवृत्तींचा संहार करणाऱ्या या नवदुर्गाचे कौतुक होत असतानाच त्यांना, स्त्रियांना वेगळी, मानवंदना दिली गेली ती ‘त्याच्या नजरेतून ती’ या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांनी.

नामांकित  स्त्रियांवर पुरुष साहित्यिकांनी केलेल्या लेखनाचे अभिनेते संजय मोने आणि सुनील बर्वे यांनी केलेले अभिवाचन ही आगळीवेगळी संकल्पना या कार्यक्रमात लक्षवेधी ठरली. पु.ल. देशपांडे यांनी इरावती कर्वे, जयवंत दळवी यांनी विजया मेहता तर ग.दि. माडगूळकरांनी त्यांच्या आईविषयी केलेले लेखन अभिनेते संजय मोने आणि सुनील बर्वे यांनी आपल्या खास शैलीमध्ये सादर केले. व. पु. काळे यांच्या मुलगा व वडिलांमधील संवादांचेही अभिवाचन यावेळी करण्यात आले. आणि ‘ती गेली तेव्हा’ ही ग्रेस यांच्या कवितेलाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त दाद मिळाली. सारेगमपच्या ‘लिटिल चॅम्प’ कार्यक्रमापासून सर्वाचा लाडका झालेला रोहित राऊत याने आपल्या सुरेल आवाजात त्याच्या गाजलेल्या गाण्यांचे सादरीकरण केले. नर्तक मयूर वैद्य यांची ‘दुर्गा स्तुती’ या सोहळ्याला संगीतनृत्याचा एक वेगळा आयाम देऊन गेली तर सहनर्तकांसोबतच्या ‘गगन सदन तेजोमय’ या गीतावर कथ्थक शैलीतील नृत्याने कार्यक्रमाला यथायोग्य संपूर्णत्व आणलं. नऊ दुर्गाच्या कार्याला आदिशक्तीच्या नऊ रूपांशी जोडत ‘मिती क्रिएशन्स’च्या उत्तरा मोने यांनी त्याला गीत-नृत्याची संगीतमय साथ देत सुंदर गुंफण घातली.

‘आदित्य व्हा तिमिरात या’ या संकल्पनेचा वसा घेतलेल्या या सगळ्याच नवदुर्गाच्या कार्यकर्तृत्वाने तेजोमय होत असणारा समाज इतरांनाही प्रेरक ठरो आणि समाज, जग सुखाने, आनंदाने अधिकाधिक प्रकाशमान होवो, हीच या कार्यक्रम संपतानाची सगळ्यांची भावना होती.

मीनल गांगुर्डे

chaturang@expressindia.com