अरुण कोलटकर यांच्या ‘चिरीमिरी’ या कवितासंग्रहात एक अप्रतिम कविता आहे. त्या कवितेचे शीर्षक आहे, ‘वामांगी’. ‘चिरीमिरी’तील सर्वच कवितांच्या केंद्रस्थानी बळवंतबुवा हे पात्र आहे. बळवंतबुवाच्या जगात स्त्रिया आहेत,  त्या पंढरपूरला निघाल्या आहेत, एकजण स्टेशन पाहून तिथूनच परत फिरते, एक अंबू चालून चालून दमते-थकते, मलाच्या दगडावर हटून बसते, अंबूसाठी एक टांगा पाठवायला विठोबाला सांगा म्हणते, विठ्ठलाला भेटल्यावर ही अंबू त्याला सुनावते : टाचासुद्धा झिजवत जा की अशाच मधनं मधनं! विठ्ठलरखुमाईबरोबर फोटो काढून घेणारी एक आहे. आपला शेट इकडे येत नाही असे गाऱ्हाणे बळवंतबुवाला सांगणारी कुणी आहे. कुणी गजरा आहे, बळवंतबुवा तिच्या हातात वीणा देतो, वेसवेच्या हाती वीणा दिल्याबद्दल त्याच्यावर टीकाही होते. बबू म्हणून कुणी वेश्या होती. तिच्या अस्थी नाहीत म्हणून बुवा तिचा फोटो इंद्रायणीला अर्पण करतो. कुणी गीताबाई आहे, तिचे अभंग आहेत. तिचा खाष्ट नवरा सासू-सासरा, नणंद यांपैकी कुणीही नसताना त्यांची उणीव भासू देत नाही! इतके सारे जाच सोसताना पांडुरंगाकडे फिर्याद केली तरी तिकडे दाद लागेलच असे नाही; बुवामंडळींच्या आणि टाळांच्या कल्लोळात गीताबाईची वीणा ऐकू जायची नाही. ही गीताबाई विठ्ठलावर विसंबून नाही. ती त्याला सांगते, जा कुण्या जनीचं कर जा दळण, आपले आपण करीन मी. या स्त्रिया फटकळ आहेत, पण साध्या आहेत, त्यांचे जगणे कष्टाचे आहे, पण कुणाविरुद्ध तक्रार नाही. अशा अनेक मुक्या स्त्रिया या कवितांतून बोलक्या झाल्या आहेत.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

‘वामांगी’ या कवितेत रुक्मिणी आहे. बळवंतबुवाचा तिच्याशी संवाद चाललेला आहे. बळवंतबुवा देवळात गेला असताना तिथे विठ्ठल दिसत नाही. रुक्मिणीशेजारी नुसती रिकामी वीट दिसते. जाता जाता बुवा सहज रख्मायला म्हणतो, ‘विठू कुठं गेला, दिसत नाही.’ रुक्मिणी आश्चर्याने विचारते, म्हणजे माझ्या उजव्या अंगाला उभा नाही का? नाकासमोर बघण्यात जन्म गेल्यामुळे तिला आजुबाजूचे दिसत नाही. कधी येतो कधी जातो, कुठं जातो काय करतो, मला काही काही, माहिती नाही, असे ती सांगते. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रीचे स्थान काय, पुरुष आपल्या खांद्याला खांदा भिडवून असेल अशा भ्रमात असलेल्या स्त्रीला आपण एकाकी असल्याची जाणीव कशी होते हे या कवितेतून व्यक्त झाले आहे. या कवितेच्या शेवटच्या ओळी मर्मभेदकआहेत,

आज एकदमच मला

भेटायला धावून आलं

अठ्ठावीस युगांचं एकटेपण

कोलटकरांचा ‘भिजकी वही’ हा संग्रह म्हणजे स्त्रियांच्या वेदनांची गाथाच आहे. लोककथा, पुराणकथा, समकालीन जगातील घटना यांतून ज्या दु:खी, एकाकी, त्रस्त, छळ सोसलेल्या, आकांत करणाऱ्या, अविरत अश्रू ढाळणाऱ्या, होरपळून निघालेल्या, पराकोटीचे दु:ख आतल्या आत सोसणाऱ्या स्त्रिया कवीला जाणवल्या, त्या स्त्रिया या कवितांतून व्यक्त झालेल्या आहेत. ‘त्रिमेरी’ या कवितेत तीन मेरी आहेत. पहिली मेरी ही येशू ख्रिस्ताची आई आहे, दुसरी कदाचित बेथानीची मेरी असावी, तिसरी मेरी माग्दालेन आहे. मेरी १, माउली या भागात एका आईची व्यथा सांगितलेली आहे. दूध तोडल्यापासून निसटलास, तो नंतर माझ्या हाती, परत लागलाच नाहीस तू कधी, असे ती म्हणते. येशूच्या राज्यात त्याचा बाप होता, सगळे जग होते, पण त्याच्या आईला त्या जगात प्रवेश नव्हता. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेचा उल्लेख येथे आलेला आहे. नऊ महिने लेकराला पोटात वागवण्यासाठी बाई हवी असते, पण याबाबतीत एका बाईची मदत घ्यावी लागावी, हा विचार सहन होणे अवघडच. ती येशूची आई होती, पण ती त्याच्या हाताच्या स्पर्शाला, त्याच्या तोंडच्या शब्दाला, प्रेमळ दृष्टिक्षेपाला पारखी झालेली होती. क्रूसावरून त्याचा छिन्नविच्छिन्न देह उतरवण्यात आला तेव्हाही त्याला ती आपल्या मांडीवर घेऊ शकली नव्हती.

पंधराशे वर्षांनंतर मायकेल एंजलो या कलावंताने ती संधी तिला मिळवून दिली. (येथे मायकेल एंजलोच्या ‘पिएटा’ या शिल्पकृतीचा संदर्भ अध्याहृत आहे). येशूला क्रूसावर चढवत असताना ती तोंडात बोळा घालून दूर कुठेतरी उभी असते. एका आईचे एकाकीपण या कवितेतून व्यक्त झाले आहे.

मेरी २, पापीण या भागात कुणा पापिणीला प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांमध्ये प्रश्नकर्त्यांने उत्तरेही दिलेली आहेत. उदाहरणार्थ, हे पापिणी, कुणा प्रेषिताचे पाय तू पावन करीत आहेस. ती जी उत्तरे देते त्यांतून तिचे येशूविषयीचे प्रेम आणि भक्ती व्यक्त होते. उदाहरणार्थ, ती म्हणते, ती पावलं नव्हती, कुणाचीही, ती वतनाची जमीन होती, मला खुद्द, देवानं दिलेली.  तिसरी मेरी म्हणजे मग्दाल्याची मेरी. देवाच्या राज्याचे शुभवर्तमान सांगत येशू गावागावातून भटकत होता, तेव्हा ती येशूच्या भटकंतीत सोबत होती, येशूला क्रूसावर चढवले तेव्हाही ती होती, आणि ती दोन दिवसांनंतरच्या येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळीही उपस्थित होती. किंबहुना पुनरुत्थानानंतर येशूला पहिल्यांदा पाहणारी तीच होती. तिचे येशूशी काय नाते होते? काहींच्या मते ती वेश्या होती, तर काहींच्या मते ती येशूची अनुयायी होती, एकनिष्ठ भक्त होती. कवीच्या मते, अगं जो तुझा आई, बाप, भाऊ, नवरा, लेकरू, सगळं काही होता. मेरी २ आणि मेरी ३ या येशूवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, त्याची भक्ती करणाऱ्या अशा निस्सीम भक्तीच्या प्रतिमा आहेत. धर्मसत्तेने आणि राजसत्तेने दंडित केलेल्या व्यक्तीविषयी पराकाष्ठेचा जिव्हाळा असलेल्या या स्त्रिया होत्या. कवीने या तीनही स्त्रियांना धर्मकथांतून, शिल्पकृतीतून, फ्रेस्कोतून मुक्त केले आणि आजकालच्या जगातून वावरणाऱ्या हाडामांसांच्या बायकांचे रूप दिले.

‘लला’ या कवितेत ललासाठी वेडा (मजनू) झालेला कैस कसा तळमळतो, तडफडतो आहे, ललाच्या वियोगाने तो किती दु:खी झाला आहे याविषयी कवीने लिहिले आहे. आणि लला? कवीने म्हटले आहे, लला बिचारी, तिला रडायचीही चोरी. घरी दारी सासरी माहेरी. घर, सासर, नवरा हे सगळे चांगले असताना लला लवकरच मरण पावली, अशी कथा आहे. कैस मजनू झाला, ललाला वेडे होता आले नाही.

‘आयसिस’ ही इजिप्शियन पुराणकथेतील देवता, तिचे ‘ऑसिरिस’शी लग्न झाले होते. सेत कपटाने त्याला शवपेटीत पडायला सांगतो, तो तसा आत पडलेला असताना आणि हसतमुखाने सगळ्यांकडे पाहात असताना शवपेटी बंद केली जाते, बाहत्तर खिळे ठोकले जातात, तापलेले शिसे ओतून ती शवपेटी बंद केली जाते, आणि नाईल नदीत फेकून दिली जाते. ‘आयसिस’ नाईलच्या काठाकाठाने हिंडत त्या शवपेटीचा शोध घेते. या कवितेत ती पिशी झाल्यासारखी नाईल नदीच्या काठाकाठाने धावत असलेली दिसते. ती बिब्लॉसला जाते, आयसिसला ती शवपेटी सापडते. झ्याऊच्या झाडाच्या बुंध्यात ती लपवून ठेवते. त्या झाडाचा खांब तयार करण्यात येतो, त्याभोवती राजवाडा बांधला जातो. आयसिस त्या राजवाडय़ाभोवती घिरटय़ा घालत असते. शेवटी तो खांब चिरून ती शवपेटी बाहेर काढण्यात ती यशस्वी होते. परंतु तिचे दुर्दैव तिथेच संपत नाही. सेतला सुगावा लागतो. तो ऑसिरिसची खांडोळी करून देशभर विखरून टाकतो. कवी म्हणतो, आणि आला तर तुझ्या अश्रूंनाच, सांधता येईल ऑसिरिस.

असेच काहीसे ‘नाद्यज्दा’बाबतही झाले होते. ती ‘ओसिप मांदलस्ताम’ या रशियन कवीची पत्नी. स्टालिनच्या राजवटीत ओसिपला कठोर शिक्षा म्हणून व्हितोराया रेच्काच्या लेबर कॅम्पमध्ये पाठवण्यात येते. तिथे ओसिपचा मृत्यू होतो. तो कशाने मरण पावला, नेमका कधी त्याला मृत्यू आला याविषयी तिला काही माहिती मिळत नाही. तिने लिहिलेल्या ‘होप अगेन्स्ट होप’ या पुस्तकातील ‘द डेट ऑफ डेथ’ हे कासावीस करणारे प्रकरण आहे. तिने पाठवलेली उबदार पांघरुणे त्याला मिळाली की नाहीत, कॅम्पमधल्या त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे ओसिपलाही विवस्त्र अवस्थेत खड्डय़ात फेकून दिले असेल का हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. धर्मसत्ताच नव्हे, धर्मसत्ता न मानणारी राजसत्ताही व्यक्तीला आणि समूहाला दहशतीच्या, भयाच्या टाचेखाली चिरडू शकते. मग धर्मसत्ता आणि  राजसत्ता एकत्र येतात तेव्हा तर पाहायलाच नको.

‘कसांड्रा’ ही ग्रीक पुराणातली स्त्री, प्रायम आणि हेकुबा यांची मुलगी. तिला अनागत काळातल्या गोष्टी दिसतात, अपॉलोच्या कृपेने ती भविष्यवाणी करू शकते. परंतु त्याची इच्छा पूर्ण करायला ती नकार देते. तेव्हा तो तुझ्या भविष्यवाणीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही असा शाप देतो. या संदर्भातले कसांड्राचे भाष्य : गुरुदक्षिणा म्हणून, जे काही त्याला हवं होतं माझ्याकडून, ते काही मी त्याला देऊ शकले नाही, आणि जे काही म्हणजे काय, तर तेच, शरीर माझं, एक छोटासा भाग माझ्या शरीराचा. पुढे कसांड्रा म्हणते, देव असला म्हणून काय झालं, जात पुरुषाचीच ना शेवटी. पुढे तिने म्हटले आहे, स्त्री या वस्तूला, आपण किती तुच्छ लेखतो, हेच दाखवून दिलं असतं. ट्रॉयचा सर्वनाश होईल हे कसांड्राला आधीच कळलेले असते, ती तसे बोलतेही. पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. ट्रॉयवासीयांना नगराच्या वेशीजवळ अवाढव्य लाकडी घोडा आढळतो, त्याला नगरात प्रवेश देऊ नका असे ती सांगते, ग्रीक तुमचा नाश करतील, पण ते कुणी ऐकत नाही. ट्रॉयचा नाश होऊ नये म्हणून ती धडपडते, पण तिच्या बोलण्यावर कुणाचाही विश्वास नसल्यामुळे जे होऊ नये ते घडते, कदाचित ते अटळ असेल. म्हणून ती ट्रॉयसाठी रडते, त्याच एका ट्रॉयसाठी नव्हे, पुन्हा पुन्हा वसणाऱ्या, समृद्ध होणाऱ्या व पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त होणाऱ्या, ट्रॉयसाठी; आजपर्यंत होऊन गेलेल्या, व पुढंही होणाऱ्या, प्रत्येक ट्रॉयसाठी. पुरुषसत्ताक समाजात स्त्रीचे म्हणणे कुणी ऐकून घेत नाही, तिला वेडी ठरवले जाते असाही एक अर्थ या कथेतून निघतो.

हायपेशिया किंवा कवीने विपाशा हे नामकरण जिचे केलेले आहे ती अलेक्झांड्रियाची, ग्रीक गणितज्ज्ञ, खगोलवेत्ता, संशोधक, तत्त्वज्ञ स्त्री होती. ती अलेक्झांड्रियातील निओप्लॅटोनिक स्कूलची प्रमुख होती आणि तिथे ती तत्त्वज्ञान आणि खगोलविद्या शिकवत असे. विपाशाची कहाणी शोकात्म आहे. ती स्त्री होती हा एक भाग, आणि दुसरा म्हणजे ती ख्रिश्चन नव्हती. तिची ज्ञानसत्रे गाजत होती, पण काहींना तिचे मूíतपूजक असणे मान्य नव्हते. कदाचित तिचे पुरुषांच्या सभेत जाणे, पुरुषांच्या बरोबरीने वागणे, पुरुषांनीही तिच्या विद्वत्तेसमोर मान तुकवणे मान्य झाले नसेल. तिथला बिशप सिरिल म्हणतो, शिकवायची परवानगी नाही स्त्रीला, मग ती किती का हुशार असेना..आणि ही बया काय करते, प्रवचनं देते चक्क, तत्त्वज्ञान शिकवते जगाला, तत्त्वज्ञान. आणि सगळे शहाणे, तिचा प्रत्येक शब्द मोलाचा असल्याप्रमाणे ऐकतात. बिशपच्या मते ही कीड वेळच्यावेळी काढून टाकली नाही तर, एक पिढीच्या पिढी खलास करणार ही बाई. तिच्या रोजच्या जायच्या यायच्या वाटेवर पाळत ठेवून ते तिला गाठतात. कवीने म्हटलेले आहे : भर रस्त्यात तुला नागवं केलं त्यांनी. षंढनीतीच्या, सनातन नियमांना अनुसरून. नंतर ते तिला सिझेरियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य चर्चमध्ये घेऊन जातात. कवीने म्हटले आहे : फरफटत नेलं तुला त्यांनी, आणि बोरूसारखं सोलून काढलं, अक्षरश:, कालवांच्या धारदार शिंपल्यांनी. ती विचारसरणीची बळी होती, की पुरुषसत्ताक व्यवस्थेची की दोहोंचीही, अर्थात हा प्रश्न नसून उत्तरच आहे. एखादी विचारसरणी लोकांवर लादायची असली तर किती अत्याचार, हिंसाचार केला जातो हेही या कवितेतून दिसते.

ममूनची गोष्ट ही आजकालच्या जगात घडणारी गोष्ट आहे. हरियाणातल्या नूह जिल्ह्यतल्या सुद्रनावाच्या गावात घडलेली. ममूनने आपल्यापेक्षा वरच्या जातीतल्या इद्रीसशी लग्न केले म्हणून गावकरी खवळतात. ते तिचा शोध घेतात, गावात आणतात आणि चावडीत तिच्यावर बलात्कार करतात. आईबापाच्या संमतीने आणि गावाच्या साक्षीने हे घडते. नंतर तिचाच चुलतभाऊ तिच्यावर धारदार शस्त्राने वार करतो, आणि ती मेली असे समजून फेकून देतात. कुणीतरी तिला दवाखान्यात घेऊन जातात. ममून मरत नाही, पण तिचे जगणे कठीण होते. कोर्टात तीच ती कहाणी तिला सांगावी लागते. बलात्काराविषयी विचारले जाते. सामुदायिक बलात्काराविषयी कवीने येथे जे लिहिलेले आहे ते अतिशय दाहक आहे. स्त्रीला आपला प्रियकर वा नवरा आणि तोही आपल्याहून उच्च कुळातला निवडण्याचा हक्कच नाही असे त्या गावातले बुजुर्ग म्हणतात हे या घटनेविषयीच्या ‘आऊटलुक’मधल्या वृत्तान्तामध्ये दिसते.

अशा कितीतरी स्त्रिया कोलटकरांच्या ‘भिजकी वही’ या संग्रहातल्या कवितांमध्ये आहेत. इथे एक किम आहे. निक यूट या छायाचित्रकाराने काढलेल्या नापाम गर्ल नावाच्या छायाचित्रातली किम नावाची नऊ वर्षांची मुलगी. १९७२ मध्ये अमेरिकेच्या व्हिएतनामशी चाललेल्या युद्धात किमच्या घराजवळच नापाम बॉम्ब टाकला गेला. ती पंचाहत्तर टक्के भाजली गेली होती आणि तिची कातडी सोलून निघाली होती. अंगावरची वस्त्रे फेकून तशीच ती रस्त्यावरून धावू लागली. तिच्या आसपास आक्रोश करणारी आणखी तीनचार मुले आहेत. बॉम्ब पडलेल्या जागेपासून ती जिवाच्या कराराने धावत सुटली होती. कवीने म्हटले आहे : तशी तू धावत असताना, जिवंत गिळली तुला, निक यूटच्या कॅमेऱ्यानं, ..आणि तेव्हापासून तू, तशीच धावते आहेस.

नापाम बॉम्ब हा अतिशय शक्तिशाली होता, पण श्रद्धा, क्षमाशील वृत्ती आणि प्रेम ह्यंत त्यापेक्षा जास्त ताकद आहे असे नंतरच्या काळात किम म्हणाली होती. कोलटकरांनी इथे किमला उद्देशून एक क्षमासूक्त लिहिले आहे, किम क्षमा कर असे म्हटले आहे. क्षमा कर आम्हा सर्वाना, क्षमा कर कवीला असे या कवितेत शेवटी म्हटले आहे.

‘भिजकी वही’त मुक्तायक्का आहे, हेलन आहे, रजनी आहे, डोरा आहे, सूझन आहे, सर्पसत्रमधली आस्तिकाची आई आहे. प्रत्येकीची दु:खाची कहाणी आहे. शेवटी, आस्तीकाची आई जरत्कारू आस्तीकाला जे सांगते ते महत्त्वाचे आहे. जनमेजयाने जे सर्पसत्र चालवले आहे, ते थांबले पाहिजे, असे तिला वाटते. ती त्याला म्हणते : माणसाचाच बच्चा आहेस, हे विसरू नकोस, कधीही. आणि म्हणून हे सत्र थांबवणं, तुला भागाय, आस्तीका, माझ्या बाळा. नाही. माझ्यासाठी नाही, तुझ्या मामासाठी नाही. आणखी कुणासाठीही नाही. पण ज्या माणुसकीचा तू वारसदार आहेस, त्या माणुसकीची या यज्ञात पूर्णाहुती पडून, ती जळून खाक व्हायच्या, आत.

धर्मसत्तेने आणि राजसत्तेने आपल्या मुलाला क्रूसावर चढवलेले पाहण्याचा यातनामय प्रसंग मेरीच्या वाटय़ाला येतो, जनमेजयाने नागकुलाचा चालवलेला संहार पाहून, अतिशय अस्वस्थ होऊन आस्तीकाची आई त्याला माणूसपणाची जाणीव करून देते, आणि संहार थांबवायला सांगते. सामाजिक, धार्मिक, राजकीय सत्ता व्यक्तिजीवनाची, समूहजीवनाची कशी धूळधाण करून टाकतात हे या संग्रहातील विविध कवितांतून दिसते.

अशा हजारो स्त्रिया असू शकतात, प्रत्यक्ष जगात, साहित्यात, चित्रांत, नाटकांत, चित्रपटांत. अशा अगणित ज्ञात-अज्ञात स्त्रियांची स्मरणे या संग्रहातील कविता करून देतात. या संग्रहाच्या शेवटी ‘अश्रू’ ही कविता आहे. या कवितेतला शेवटचा शब्द विश्वात्मके हा आहे. ‘अगे विश्वात्मके’ असे ते संबोधन आहे. हे संबोधन कवींच्या, कलावंतांच्या, किंवा समग्र स्त्रियांच्या सृजनशक्तीला उद्देशून असू शकेल.  श्रीज्ञानदेवांनी विश्वात्मका असे म्हटले होते, कोलटकरांनी विश्वात्मके म्हटले आहे. काळाचा आणि दृष्टिकोणामधलाही हा फरक आहे, आणि तो लक्षणीय आहे.

देवळात गेलो होतो मधे

तिथं विठ्ठल काही दिसेना

रख्माय शेजारी

नुस्ती वीट

 

मी म्हणालो ऱ्हायलं

रख्माय तर रख्माय

कुणाच्या तरी पायावर

डोकं ठेवायचं

 

पायावर ठेवलेलं

डोकं काढून घेतलं

आपल्यालाच पुढं मागं

लागेल म्हणून

 

आणि जाता जाता सहज

रख्मायला म्हणालो

विठू कुठं गेला

दिसत नाही

 

रख्माय म्हणाली

कुठं गेला म्हणजे

उभा नाही का माझ्या

उजव्या अंगाला

 

मी परत पाह्यलं

खात्री करून घ्यायला

आणि म्हणालो तिथं

कोणीही नाही

म्हणते नाकासमोर

बघण्यात जन्म गेला

बाजूचं मला जरा

कमीच दिसतं

 

दगडासारखी झाली

मान अगदी धरली बघ

इकडची तिकडं जरा

होत नाही

 

कधी येतो कधी जातो

कुठं जातो काय करतो

मला काही काही

माहिती नाही

 

खांद्याला खांदा भिडवून

नेहमी बाजूला असेल विठू

म्हणून मी पण बावळट

उभी राहिले

 

आषाढी कार्तिकीला

इतके लोक येतात नेहमी

मला कधीच कसं कुणी

सांगितलं नाही

 

आज एकदमच मला

भेटायला धावून आलं

अठ्ठावीस युगांचं एकटेपण

 (‘चिरीमिरीमधून साभार, प्रास प्रकाशन)

 

– वसंत आबाजी डहाके

vasantdahake@gmail.com