‘छांदसी’ या समीक्षाग्रंथात पु. शि. रेगे यांनी म्हटलंय की, ‘जीवनात विविध रूपांनी वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषत: तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप’ त्यांच्या कविमनाला मोहवीत आले आहे. खरोखरच त्यांची बहुतांश कविता स्त्रीरूपांभोवती रुंजी घालते. पु.शिं.च्या सगळ्याच लेखनाच्या गाभ्यात काव्यात्मता आहे आणि त्यांच्या कवितेच्या गाभ्यात आहे रतिभाव. आणि अर्थातच रतिभावाच्या केंद्राशी आहे चतन्यमय, लसलसते, ताजे स्त्रीरूप! ‘शार्लट’ या कवितेत त्यांनी म्हणून ठेवलंय,

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या

तसं पाहिलं तर

माझं आतापर्यंतचं सगळं लेखन

(वर्क, जर इंग्रजीच वापरायचं तर)

शार्लटवर आणि तिच्याभोवती

झालेलं आहे.

कोण ही शार्लट? वास्तवात शोधाशोध करण्याऐवजी मानू या की, ती आहे कविमनातली आदिम स्त्री! शार्लट हा कविमनातला ‘राधाभाव’ आहे. स्त्री-पुरुषांमधल्या गहन-खोल आकर्षणाचं दुसरं नाव आहे जीवनोत्सुकता. या जीवनोत्सुकतेनं रसरसलेली आहे रेग्यांची कविता. स्त्रीच्या देहरूपाची अपरंपार मोहिनी त्यांच्या कविप्रतिभेला आहे.

स्त्रीदेहाचं, त्याच्या गूढ सौंदर्याचं आणि त्याच्या निर्मितीच्याही गूढरम्यतेचं अप्रूप रेग्यांच्या कवितेनं परोपरीनं शब्दांकित केलंय.

राधा ही आपल्याकडची प्रेमाची आदिप्रतिमा आहे. राधाकृष्ण हे आदि प्रेमयुग्म. मुग्ध, लाजऱ्या-बावऱ्या, नवथर अनावर आकर्षणापासून ते ‘कृष्णमय’ होण्यापर्यंतच्या सगळ्या सगळ्या प्रेमावस्थांचं आदिमस्तोत्र म्हणजे राधाकृष्णाची कहाणी. त्यात शृंगार आहे, रस आहे. प्रतीक्षा आहे, वियोगमाधुरी आहे. गाढ एकरूपता आहे. राधा चिरंतन अभिसारिका आहे. ती धीट प्रणयिनी. तीच उमा. तीच दाक्षायिणी. उर्वशी तीच. पांचालीही तीच. ‘कान्हुडय़ाच्या रंगात रंगुन गेलेली..’, ‘पिवळी पिवळण होती ती कृष्णरंगात रंगून काळी कमळण’ झालेली. हसऱ्या, नाचखुऱ्या डोळ्यांची ही राधा रेग्यांच्या कवितेत ‘मन ओवाळुन तन भोवाळुन’ फुगडण घालते.  रेग्यांच्या कवितेतली ती क्वचित कधी चंचलही आहे.

डोळे मोडीत चालसी,

उगा गाव चालविसी..

मागे वळून पाहसी;

उभा गाव चाळविसी

अशी ‘छटेल थोडी, हटेल किंचित, बनेल किंचित, मनेल मोठी’ ही आहे ती. पण सहसा तिची प्रेमनिष्ठा ‘त्याच्या’वर असते. त्याच्याच ‘नेत्रांचे अवगुंठन’ घेऊन तिची नवथर काया नटते. त्यालाही ‘माझे मजला काहि मिळाले’ अशी आत्मखूण पटते त्यामुळे. स्त्रीच्या अंगसौंदर्याची किती चित्रे रेखाटावीत रेग्यांनी! ती अत्यंत अत्यंत सूचक असतात, मितभाषी असतात;  तर कधी ती केवळ रंगसंवेदनामय असतात.

लाल तुझा अंगवठा

लाल तुझ्या अंगी ताण;

लाल रक्ताच्या पेशींचा

किती केलास ग साठा?

किंवा ‘खुणा’ ही दोनच ओळींची कविता पाहा –

अन् फिकट गुलाबी ढगा आडच्या

खुणा मांडिवर तिच्या नभाच्या.

अशा एखाद्या अनोख्या प्रतिमेमधून रेगे तिच्या अंगकांतीचे सौंदर्य साक्षात करतात.

आदिम असली तरी रेग्यांची स्त्रीप्रतिमा अनघड, रांगडी नाही. ती नागर आहे. संस्कारित आहे. ती रतिक्रीडेत चतुर आहे. स्वत: तर रमणारी आहेच, पण ‘त्याला’ही रमवणारी आहे. ती चतन्यमय, गतिशील आहे. जीवनोत्सुक आहे. म्हणूनच ‘भरहर्षे भोगवणारी’देखील आहे.

यातला ‘भरहर्षे’ हा शब्द फार महत्त्वाचा. तिच्या आनंदाची कदर करणारा. पुन्हा ती निर्मळ, मोकळी आहे. कशाचीच पुटं नाही चढलेली तिच्यावर. ना समाजसंकेतांची, ना रूढींची!   ती लाज-बावरी आहे खरी, पण ते बावरेपण आतूनच उमलून आलं आहे. स्वाभाविकपणे नवथरपणाची लव कांतीवर उमटावी तितकं नैसर्गिक.

तू पण असली नवीनवेली

गात्रे गात्रे रक्तपालवी

फुलाफुलांवर तुझीच कांती

कोमल खुलली

ती आरपार स्वच्छ आहे. स्वत:च्या देहभावाशी, त्यातला भाव उर्मीशी प्रामाणिक आहे. निखळ आणि अस्सल आणि म्हणून न:नतिक. रेग्यांची ‘अहल्या’ कथा-पुराणांमधून हलकेच निसटली आहे. नतिकतेच्या रूढ कल्पना पार करून पलीकडे ठाकली आहे. रतिसुखाचा तिचा हा निर्भर आनंद, दाटलेलं सुख ती मोकळेपणाने सांगते. तो अनुभव कोणासह घेतला ही बाब गौणच. कारण  इथे अनुभव आणि तो सर्वागानं घेणारी ती महत्त्वाची. आश्चर्यकारकपणे मुक्त आहे ती. रेग्यांचीच दुसरी कविता अशावेळी आपल्या चौकटबद्ध मनांना सावरते.- तू हवीस यात न पाप

तू नुसते बघताना

हे मज कळे अपाप.

‘तू हवीस यात न पाप’ हे आतून कळणं, आपापत:च उमजणं, ही रेग्यांच्या कवितेआतली ताकद आहे. ती शिकवणारी आहे, समजून घेणारी तर आहेच, पण समजवणारीही आहे.

त्यांची कविता गाभ्यातल्या रतिभावानं घमघमलेली आहे. शरीरभावानं धुंदावलेली आहे. स्वत:च्या ‘हट्टा’लाही सर्जनाच्या किमयेनं नटवू शकणारी ती ‘निर्माणशक्ती’ आहे. त्यांची ‘शहनाज’ ही तर ‘श्री’च आहे. प्रसन्न, गूढ, सुजाण. ‘त्याच्या’ ‘अनपढ’तेला समजून घेताना त्यालाही सुजाण बनवणारी. ‘नि:शब्द हातांनी थोपटणारी’, ‘त्याला’ अपत्याच्या रूपात पाहू शकण्याइतकी प्रौढ, शहाणी. म्हणूनच जणू,

तू दिसतेस तृप्त मोगरीसारखी

नितांत मोहरलेली..

अशी तिच्यातल्या मातृत्वशक्तीची त्यालाही ओळख पटते आणि ती सर्वमयी, सर्वभर झाल्याचा अनुभव तो घेतो. तिच्याच सर्जनाची अपरंपार रूपं त्याला सर्वत्र दिसतात. त्याच्या सान्निध येतात.

स्त्रीच्या सर्जक गूढाचा अनुभव या कवीला विस्मित करतो. तसा तो यापूर्वीही अनेकांना करून गेलाय. ‘थांब उद्याचे माउली तीर्थ पायाचे घेतो’ (मर्ढेकर) असं अगदी थेट जरी रेग्यांची कविता म्हणत नसली तरी ‘उर्वशी’, ‘शहनाज’ वगरे कवितांमधून हा विस्मयाचा भाव प्रकटला आहे. पण कसा? तर,

तापल्या सोन्यासारखी

रसरशीत ती कांति

तिथे कशी ग फुलली

फिकी पिवळी शेवंती!

असा! ‘टिपिकली’ रेगे.

रंगसंवेदनातूनच बोलतो हा कवी. रंगरेषांचा, छाया-प्रकाशाचा, आकार-अवकाशाचा निगूढ खेळ आहे रेग्यांची कविता. सूक्ष्मातली सूक्ष्म अनुभवछटा व्यक्त करताना भाषेशीही चाललेली ही क्रीडा आहे. किती आत्मरत असावं या कवितेनं! बाह्य़जगाशी, तिथल्या घडामोडींशी, विचारप्रणालींशी तिचा काही वास्ता नाही. ‘पुष्कळा’ कवितेतल्या ‘पुष-पुष्कळलेल्या’ तिच्यासारखी ती आहे. पुष्कळच आहे.

पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन;

पुष्कळातली पुष्कळ तू

पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी.

देह-मनासह तिचं ‘त्याच्यासाठी’ असणं- ‘पुष्कळ’ असणं हेच तर तिचं वैशिष्टय़. म्हणून ती तिच्या रसिकालाही पुष्कळ-पुष्कळ देते.

‘त्रिधा राधा’ ही रेग्यांची गाजलेली कविता.

आकाश निळे तो हरि

अन् एक चांदणी राधा

बावरी

युगानुयुगिची मन- बाधा.

विस्तीर्ण भुई गोविंद

अन् क्षेत्र साळिचे राधा

स्वच्छन्द

युगानुयुगिची प्रियंवदा.

जलवाहिनी निश्चल कृष्ण,

बन झुकले काठी राधा

विप्रश्न

युगानुयुगिची चिर-तंद्रा.

(‘गंधरेखा’ या संग्रहात ही कविता पुन्हा घेताना रेग्यांनी ‘स्वच्छन्द’च्या जागी ‘संसिद्ध’ हा शब्द घातला आहे. तोही अर्थसूचक आहे.)

या कवितेत राधेच्या तीन प्रतिमा आहेत. पहिली आहे ती ‘बावरी. युगानुयुगिची मन – बाधा.’ रतिक्रीडेला, प्रेमानुभवाला अनभिज्ञ असलेली, पण त्या उंबरठय़ावर ओठंगून उभी असलेली. लजवंती. स्त्रीचं हे मुग्धरूप. या मुग्धेची पुरुषाला पडणारी भूल, हेही युगानुयुगं चालत आलेलं.

दुसरी आहे ‘संसिद्ध. (किंवा स्वच्छंद). युगानुयुगिची प्रियंवदा.’ अल्लड आकर्षणातून आणि मन-बाधेतून पल्याड जाताना येणारी अवस्था- संसिद्ध. स्वस्थ. सज्ज. पहिलेवहिले खळाळ अनुभवून आता डोहात बुडी घेण्याचा गूढ आनंद उमगलेली. स्वच्छंद. प्रियंवदा.

आणि तिसरी प्रतिमा आहे, ‘विप्रश्न. युगानुयुगिची चिर-तंद्रा.’ दोन असूनही एकात्म असल्याचा, अद्वैताचा अनुभव आल्यामुळे, मी-तूपण फिटल्यामुळे, सारे संदेह मिटल्यामुळे नि:शंक झालेली. चिर-तंद्री अनुभवणारी. कृष्णाच्या जलवाहिनीच्या रूपात स्वत:चे प्रतिबिंब काठावरून बघणारी. या अवस्थेत दोघांत थोडे अंतर आहे, पण दुरावा दुरावल्याची खात्री आहे. सह-वासाचे आश्वासन आहे. आनंदमय तृप्ती आहे.

बावरी, संसिद्ध आणि विप्रश्न ही आहेत राधेची भावरूपे. रेग्यांच्या कवितांमधून स्त्रीची ही तीनही भावरूपे त्यांच्या अनोख्या विभ्रमांसह, नव्या छटांसह पुन्हापुन्हा नव्हाळीनं प्रकटतात. उमाठय़ाच्या खांद्यांचे दंवंधर चापेपण तिचे होते.

तिला हवा होता

साळुंकी वाऱ्याचा

लाज-भिऊ शेला

आणि पुन्हा

अडवणाऱ्या खोडीच्या पावसाची

धनंतर बरसात्

मी केव्हाचे दिले आहेत म्हणून

माझे श्वास, उच्छवास

वाऱ्याला.

वाऱ्याचा शेला तिला हवा म्हणून त्याने आपले श्वास-उच्छवास कधीचेच वाऱ्याच्या स्वाधीन केले आहेत. आणि त्या वाऱ्यातून तो तिला पांघरतो आहे. पायात भिंगरी असलेलं हे बावरं वय. मात्र पुढच्याच कडव्यात धनंतर पावसात चिंब भिजण्यासाठी ती सज्ज झालेली दिसते. धीट. उत्फुल्ल. स्वच्छंद.

जे मत्त फुलांच्या कोषातुन पाझरले,

निळ्या लाघवी दंवात उलगडले,

जे मोरपिसावर सांवरले,

ते –  त्याहूनही – आज कुठेसे

पुन्हा एकदा

तशाच एका लजवंतीच्या

डोळ्यांमध्ये – डोळ्यांपाशी

झनन-झांजरे मी पाहिले..

पाहिले न पाहिले.

या कवितेतली ‘ती’ ही लजवंती आहे. मुग्धा आहे. प्रणयाच्या धुंद प्रदेशात अजून पाऊल पडले नसले तरी मत्त फुलांच्या कोषातून पाझरलेले ‘झनन-झांजरे’ असे काही तिच्या डोळ्यांत तरळतेय. हे झनन-झांजरे आणि पुढच्या कडव्यांमधले ठिबक-ठाकडे, बहर-बावरे असे काहीतरी तिच्यापाशी आहे. अस्फुट, अस्पष्ट पण अधीर. आहे न आहे असे.. म्हणून तर त्याने ते पाहिले – न – पाहिले! हे बावऱ्या-मन-बाधेचे वेगळे रूप!

लंपट ओले वस्त्र होऊनी

अंग अंग तव लिपुन घ्यावे.

हुळहुळणारे वस्त्र रेशमी

होउन वर वर घोटाळावे

याही कवितेत तीच ती सुरुवातीची मन-बाधा, भुरळ, अनावर ओढ प्रकटते. ‘लंपट ओले वस्त्र’ होण्याची कांक्षा मोकळेपणाने शब्दरूप होते. आणि मग लगेचच काहीसे अलग व्हावे, रेशमी वस्त्र होऊन पायाशी घोटाळावे.. तिला निरखावे असे वाटते. त्याच्यापुढे जाऊन नंतर पश्मिन्याची शाल व्हावे – अशी माया-करुणेची भावावस्था येते. उसळत्या, फेसाळत्या, आवेगी सायुज्यतेनंतरची निरंतर, चिरकाल सोबतीच्या आश्वासनाची ऊब.. पुन्हा एकदा मन-बाधा, संसिद्ध आणि एकरूपतेच्या प्रतिमा..

‘रात्र असावी’ हीदेखील अशीच स्त्रीच्या त्रिविध रूपांचा बंध समोर ठेवते. वारवधू, पुरंध्री आणि नववधूचे सहजभाव निळ्या मऊ जवसफुलांच्या, काळ्या डोहाच्या आणि मोरपिशी झाकीच्या प्रतिमांशी जोडून पुन्हा एकदा रत्युत्सुक स्त्रीप्रतिमांच्या तीन छटा रेगे दाखवतात.

‘त्रिधा राधा’त जलवाहिनीच्या रूपातला कृष्ण निश्चल आहे. जलवलयांचे, लाटांचे उसळते प्रवाहित्व त्याने आवरून-सावरून धरले आहे- कारण तंद्रीत हरवलेल्या काठावरच्या बनरूपी राधेचे प्रतिबिंब त्याने हृदयाशी धरलेय ना. ते कुठेच जराही डहळू नये, हलकाही धक्का त्याला लागू नये, याची कसोशीने काळजी तो घेतोय. युगानुयुगीची ही तंद्री ही विप्रश्न अवस्था. ती जपणं ही मोठीच साधना. ‘शेवगा’ या कवितेत तिचंच एक वेगळं रूप दिसतं.

दोन प्रहर निवांत सारे

श्रमभाराने बाजेवरती

पांगुळलेली तू

खिडकीबाहेर ढाळितो चवरी

आसुसलेला शेवगा दारचा.

शरीराने काहीसे दूर, पण भाववृत्तीने एकरूप झालेले दोघे या कवितेत दिसतात. श्रमलेल्या, पांगुळलेल्या तिच्या देहावर दारचा शेवगा शुभ्र नाजूक फुलांची चवरी ढाळतोय. तिचे श्रम हलके करण्याची त्याची ही कृती ‘निश्चल जलवाहिनी’शी किती साम्य दाखवते! शेवगा आसुसलेला आहे, पण संयम बाळगतो. या संयमात आहे, प्रेमाची भावरूप जाणीव. ‘लंपट ओल्या’ अनावरतेकडून प्रौढ समंजसपणाकडे गेलेली. अधिक शाश्वत.

लक्षात येतं, ही सगळी आनंदाची देवघेव आहे. तिथे मनमोकळा अंगसंग आहे. जुलूम-जबरदस्ती नाही कुठलीच. बळजोरी नाही, लाचारी नाही. दुराग्रह, अट्टहास नाहीत. काही शाबीत करणं नाही. काही सिद्ध करणं नाही, मोकळेपणा आहे, पण सवंगपणा नावालाही नाही. बुजरेपणा आहे, पण भय नाही.

कवीच्या निरभ्र सौंदर्यदृष्टीचं अवगुंठन ल्यालेली भाषा स्त्रीरूपाच्या अवघ्या रंगरेषा अभिव्यक्त करते, सूचकतेने करते म्हणून कलात्मक आनंदही देते.

स्त्रीदेहसौंदर्याचा असा रूपोत्सव मांडत असली तरी रेग्यांची कविता फक्त तिथेच रेंगाळत नाही. ती कामपूर्तीच्या गाढ अनुभवाच्या पल्याड जाते अनेकदा. शरीरापलीकडच्या भावरूप प्रेमाकडे जाते. तिचे उन्नयन होत राहते. मात्र हे उन्नयन आध्यात्मिक किंवा पारमाíथक पातळीवरचे नव्हे. दैवी नव्हे. ते सर्वस्वी मानवी पातळीवरचं आहे. माणसाच्या आवाक्यातलं आहे. मानवी प्रेमाचं जे गन्तव्य आहे, ते अगदी स्पष्टपणे जाणवतं त्यांच्या ‘शहनाज’, ‘लीलीची फुले’, ‘देशांतरीच्या गोष्टी सांगता’, ‘शेवगा’ इत्यादी कवितांमधून.

लीलीची फुले

तिने एकदा

चुंबिता, डोळा

पाणी मी पाहिले..!

लीलीची फुले

आता कधीहि

पाहता डोळा

पाणी हे साकळे..!

करुणकोमल, ओलसर प्रेमभाव किती उत्कटपणे ठिबकतोय या कवितेतून. मुळात लीली हे पाणफूल. अशा फुलांना चुंबताना तिच्या डोळ्यांत – कशामुळे कोण जाणे, पाणी तरळते.. तो ते पाहतो. आणि ‘आता कधीही’ लीलीची फुले पाहताना त्याच्या डोळ्यांत पाणी साकळते. अनावश्यक तपशील न देता पु. शि. नेमक्या अनुभवाला कसं शब्दरूप देतात, ती किमया तर आहेच वाखाणण्याजोगी; पण ‘तिच्या’ मनोव्यथेशी ‘त्याचं’ स्वाभाविकपणे एकरूप होणंही किती हृद्य आहे! तिचे पाणी, त्याचे पाणी जणू एकाच स्रोतातून इथे वाहते आहे! कसली मागणी नाही – पुरवणी नाही, अपेक्षा नाही – अपेक्षापूर्तीही नाही. अधिकचा शब्दही नाही. असंही असतं प्रेम. अनाहूतपणे, अवचितपणे ते गवसतं. शरीरभावाच्या, पाíथवाच्या पलीकडे जाणारं, ‘मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं’. हे उन्नयन.

निव्वळ प्रकृतीचं, पुरुषाच्याही मनातल्या प्रकृतीचं आणि प्रकृती-पुरुष नात्याचं गूढ उकलण्याच्या एकलक्ष्यी प्रयत्नात रेग्यांच्या कवितेतली स्त्रीप्रतिमा कधी कधी आपल्या आकलनाच्या बाहेर राहते. त्यांच्या ‘सावित्री’, ‘अवलोकिता’, ‘रेणू’ आणि ‘मातृका’ या कादंबऱ्यांमधल्या स्त्रिया कविमनाच्या बाहेरच्या जगात वावरतात, म्हणून की काय, त्या कवितेतल्या स्त्रीप्रतिमेपेक्षा अधिक ‘मानवी’ आहेत. आणि मानवी आहेत म्हणून त्यांना मातीच्या मर्यादाही आहेत. त्यांच्या कवितेतली स्त्री मात्र खास त्यांचीच, प्रतिभा निर्मिती आहे. प्रतिभेसारखीच अ-लौकिक आहे. त्यांच्या चकित करणाऱ्या शब्दलाघवासारखी. मोहन घालणारी. काहीशी उखाणे घालणारी आणि ते उखाणे सोडवण्यात रसिकाचा आनंद सामावला आहे.

झेलिले न पुंजके

झेलिले तुलाच मी

गुलाल लाल शुभ्र वा

तूच तूच त्यात मी

अंग अंग पाखुनी.

 

उरी शिरी विदेह देहि

वर्षसी असा-तसा

की एक मीच न्हाणुडी

कान्हुडाहि तू तसा

अंग अंग अंगुनी.

 

काय लिंपता उभी

काय राहिले सुधे

द्वारिकेत राधिका

राधिकाच मी मुदे

रंग रंग होऊनी.

(गंगाघर पाटील संपादित सुहृदगाथामधून साभार, कॉन्टिनेंटल प्रकाशन)

 

– डॉ. वंदना बोकीलकुलकर्णी

vandanabk63@gmail.com