स्वातंत्र्याला यंदा ६९ वर्षे झाली. ग्रामीणभागात वावरताना, माझ्याइतकीच इथली स्त्रीही या सार्वभौम प्रजासत्ताकाची नागरिक आहे, हे स्वीकारताना अनेकदा अपराधी वाटलंय..  एकीकडे महासत्ता होऊ पहाणारा भारत आणि दुसरीकडे समाज म्हणून जिच्याकडे आंघोळीला सुरक्षित जागा नाही, पुरुष डॉक्टरच्या धसक्यानं जी आयुष्याची तिलांजली द्यायला तयार होते, अजून जिने रेल्वे पाहिली नाही, अशा अनेक जणींसाठी आपण काय आणि कधी करणार आहोत हा प्रश्न पडतो.

 

ग्रामीण भागातल्या माझ्या कामाचं निमित्त होतं, बचत गट. कुठलीही शासकीय योजना घेऊन ‘टारगेट पूर्ण करणे’ या स्पर्धेत ‘ज्ञान प्रबोधिनी’ संस्था कधी पडलीच नाही, त्यामुळे ग्रामीण स्त्रीच्या कलाकलाने काम करणं मला जमलं. त्यामुळे ग्रामीण स्त्रीला जे हवं ते मला देता आलं. आरोग्याच्या कामाचंही तसंच होतं. डॉक्टरच्या दडपणाने ही ग्रामीण सखी कधी दवाखान्यात जाणारच नाही हे माहीत असल्याने ती माहिती तिच्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. पुण्यातल्या डॉ. गिरीश गोडबोले यांना, तेव्हा नव्याने माहिती झालेल्या ‘एड्स’ या रोगाबद्दल माहिती द्यायला बचत गटप्रमुख बैठकीत बोलावलं होतं.

डॉक्टरांचे व्याख्यान तासभर चालणार होते. माझ्यासाठी चार-पाच र्वष काम केल्यानंतर निदान बचत गटप्रमुखांची एड्स व इतर आरोग्य विषयावर ऐकायची तरी तयारी झाली होती, म्हणजे हीसुद्धा मोठ्ठी प्रगती होती. ‘महिलांचा प्रतिसाद बघून बोला.. विषय नाही झेपला तर पुसटसा विषय-स्पर्श करून सर्वसाधारण आरोग्य या विषयावर बोला.’ असं डॉक्टरांशी आधीच बोलून घेतलं होतं, पण तसं करावं लागलं नाही. सगळ्यांनी मनापासून ऐकलं. डॉक्टर गेल्यावर मी काहींशी चर्चा केली. एकुणातच माहितीने साऱ्या चकित झाल्या होत्या, भारावून गेल्या होत्या. सावित्रा जरा बोलेल असं वाटलं म्हणून विचारलं, ‘‘सावित्राबाई, डॉक्टरांच्या बोलण्यातला कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटला?’’

‘‘सगळंच महत्त्वाचं होतं, काहीही माहिती नव्हतं. ..पण त्यातही आंघोळ कशी करावी ते त्यांनी भारी सांगितलं.’’ एड्सच्या व्याख्यानातली आंघोळ महत्त्वाची वाटली हे उत्तर मला जरा वेगळंच वाटलं म्हणून मी तिच्याशी तपशिलात बोलले, तर म्हणाली, ‘‘ताई आम्ही आंघोळ पहाटेच्या अंधारातच करतो तेही घराच्या बाहेरच्या बाजूला.. आमच्याकडे काही आंघोळीसाठी बांधलेली जागा नाही. उगाच आपला थोडा आडोसा केलाय. कोणी पाहू नये म्हणून लवकर लवकर उरकायची रोजची घाई असते. थंडीत काकडल्यानं तर पावसात पाऊस लागतो म्हणून उरकतो, खालचं अंग कधी कधी ओलंसुद्धा होत नाही, नीट धुणं तर कधीच नाही.. कायमच ओलेत्याने आंघोळ त्यामुळे सगळ्या अंगाला साबणही लागतोच असं नाही. बरं झालं डॉक्टरला बोलावलंस. निदान कळलं तरी..’ या उत्तराचा मला एवढा धक्का बसला होता की १२-१५ वर्षांनंतरही प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर येतोय!

आपल्यापैकी अनेकांच्या घरी दिवसाढवळ्या आंघोळ करायला, कपडे काढून पूर्ण अंगाला साबण लावता येईल अशी खासगी जागा आहे, म्हणजे आपण किती श्रीमंत आहोत, असं क्षणभर मला सावित्राचं बोलणं ऐकून वाटून गेलं. एड्सबद्दल नंतर बोलू पण आधी नीट आंघोळ करायला शिकवू. स्वच्छतेसाठी, याचंही महत्त्व तेवढंच आहे! गरिबी असली की घराचं बांधकाम पक्कं नसतं, मग आंघोळीला खासगी सुरक्षित आडोसासुद्धा नसतो. हे यापूर्वी आरोग्याच्या दृष्टिकोनातून माझ्या कधीच लक्षात आलं नव्हतं!.. आणि माझ्या आरोग्याच्या कामाला सुरुवात झाली.

आरोग्याचं काम म्हणजे नुसतं आरोग्याचं कधीच नसतं. त्याला आर्थिकही बाजू असते. ती आपण समजू शकतो पण तेवढीच महत्त्वाची सामाजिक बाजूसुद्धा असते हे मला ग्रामीण स्त्रियांनी काम करताना शिकवलं. म्हणजे बघा चाळिशीनंतर अंधूक दिसायला लागतं त्यामुळे गावाकडच्या घरातल्या म्हातारीला साधे तांदूळही निवडता येत नाहीत मग म्हातारं माणूस अजूनच निरुपयोगी बनतं. त्यावर एक साधा उपाय आहे चष्मा वापराचा! या बाईकडे चष्मा खरेदी करायला पैसे नसतात, असं नाही पण चष्मा वापरायचा इतका सामाजिक संकोच असतो की, विचारू नका. का कोण जाणे पण चष्मा आणि शिक्षण याचं नातं मनातून जोडलेलं आहे. अभ्यास करणाऱ्या लोकांनाच चष्मा लागतो, इतरांना नाही असा समज आहे. हा समज नडतो! मला वाटतं, या समजामुळे अनेकींचं ४-५ वर्षांनं तरी आयुष्य कमी झालं असणार. कारण चाळिशीच्या सुमारास आजी झालेल्या अनेकींना ‘आता आपलं काम संपलं’ असं वाटून जगण्यातला उत्साहच संपलेला मी पाहिलाय. परावलंबन हे कोणालाच कधी दीर्घायुष्य मिळवून देत नसावं! कधी कधी मला वाटतं साधा चष्मासुद्धा याबाबतीत क्रांती करू शकतो.. पण वास्तवात तसं घडत नाही.

एकदा एक ताई ‘प्रबोधिनी’ने योजलेल्या स्त्रियांच्या चाळिशीच्या आरोग्य तपासणी शिबिरात आली. ही तपासणी केवळ वैद्यकीय असायची तरी डॉक्टरांपासून व्यवस्थापकांपर्यंत सगळ्याच स्त्रिया असायच्या. आधी आरोग्याची सगळी माहिती सांगितली जायची नि मग गरजेप्रमाणे तपासणी व्हायची. म्हणून ही ताई तपासणीला आली. दुखणं सहन होत नव्हतं तरी अंगावर काढत होती. डॉ. शुभांगी कानिटकरांनी तिला ‘गर्भाशयाचं तातडीनं शस्त्रक्रिया करायला हवं आहे’ असं सांगितलं. कावेरीताई तिच्या गावातल्या बचत गटाच्या हिशोबात मदत करायची. तिला हे समजलं. तिनं गटातून ५००० रुपये कर्ज दिलं नि म्हणाली, ‘‘चल मी येते तुझ्या सोबत हॉस्पिटलमध्ये आपण जाऊ.’’ पण ताईचा काही धीर होईना. तिच्या मनातली अडचण तिने न सांगताच कावेरीने ओळखली. कावेरीनं तिला सांगितलं, ‘‘भिऊ  नको, डॉक्टर शस्त्रक्रिया करतात तेव्हा भूल देतात, आपले डोळे मिटलेले असतात. आपल्याला काहीसुद्धा कळत नाही. डॉक्टर एकटेच आपल्याला खोलीत नेत नाहीत, नर्स, सिस्टर अशी बाया माणसं पण असतात. शस्त्रक्रिया झाल्यावर जाग आली तरी दुखू नये म्हणून औषध दिलेलं असतं. फक्त वेळेवर औषध घेतलं की झालं.’’ मग ती म्हणाली, ‘‘बरं सांगितलंस, अगं, मला ही शस्त्रक्रिया करायला कधीची सांगितली होती पण हिम्मतच होत नव्हती. शस्त्रक्रिया म्हटलं की काय करतात काय न्हाई, कोण सोबत नसतं असं वाटायचं. निस्त्या विचारानं पण घाम फुटायचा. वाटायचं शस्त्रक्रियेच्या भीतीच्या दडपणानं मी मरूनच जाणार. मग विचार केला, असं काय नि तसं काय मरायचंच आहे ना मग शस्त्रक्रियेचे पैसे तरी वाचवू. पण आज इथं साऱ्या बायाच होत्या म्हणून आले.’’ कावेरीने तिला तिच्या गावातल्या शस्त्रक्रिया होऊन ठीक झालेल्या चार जणींची नावं सांगितली. मग तिला सारं पटलं नि ती तयार झाली. पैशांची खरं तर एवढी अडचण नव्हती पण हिम्मत होईना नि गर्भाशयाचं दुखणं असल्यामुळे कोणाकडे बोलताही येईना. अशी परिस्थिती होती. बायाबायांचा कारभार असला की या विषयातही काही मोकळेपणा असतो. तपासणारी डॉक्टर बाई होती म्हणूनच ती ‘आतून’ तपासणीला तयार झाली होती. गटामुळे हिम्मत मिळाली. असं होणारी ‘मी एकटीच नाही’ हे चार बायकांनी तिच्या आधीच केलेलं आहे हे तिला कळल्यावर ‘ती’ला सारं स्वत:चं स्वत: निभावण्यासाठी धीर आला. मग गेली रुग्णालयामध्ये! शस्त्रक्रिया करून यशस्वी होऊन ‘निर्भय’ होऊन परतली. बचत गटामुळे, वेळेत झालेल्या संवादाने तिचे आयुष्य सुखकर झालेच आणि काही वर्षांने तरी वाढले. म्हणून ती आता बचत गटाची प्रचारक झाली! ज्ञानेश्वरांनी जसे सांगितले ‘एक तरी ओवी अनुभवावी’ तसे बचत गट हे ग्रामीण महिलेसाठी अनुभूतीचं व्यासपीठ बनतं ते असं!

गटामुळे विविध प्रकारचे अनुभव घ्यायला मिळतात, इतरांचे कुठले कुठले अनुभव ऐकायला मिळतात त्यातून शहाणपण येतं. हिम्मत वाढते. मला आठवतंय, एकदा रेल्वेने पहिल्यांदाच सहलीला जाणाऱ्या उजाताईला प्रश्न पडला होता, ‘‘एवढं सामान घेऊन रेल्वेत कसं चढायचं? मी तर रेल्वे गाडी सिनेमातच पाहिली होती, सिनेमामध्ये हिरो नाही तर हिरोइन पळत पळत चढते नाही तर पळत पळत उतरते, त्यांच्याकडे कधी सामान नसते. सिनेमातली गाडी नेहमी चालती असायची. मग मी कशी चढू?’’

‘‘मग.. काय विचार केलास?’’ मी विचारलं तर उजा म्हणाली, ‘‘गंगुबाईला विचारलं. तिनं सांगितलं की गाडी स्टेशनवर थांबते. काळजी करू नकोस.’’ बचत गट होता म्हणून ती हा प्रश्न विचारू शकली आणि तिला उत्तरही मिळालं. अन्यथा ती रेल्वेनं प्रवासाला कदाचित गेलीच नसती. उगाच ‘प्रश्न पडायला नको नि हसं व्हायला नको’ म्हणून.

ज्यांच्यासाठी काम करायचं त्याचं शिक्षणही झालं पाहिजे, असं प्रबोधिनीत नेहमी आग्रहानं सांगितलं जायचं. उजाताईच्या या अनुभवाने मी शहाणी झाले. गटाला घेऊन दिल्लीला जायचे होते तर मी भारताचा नकाशा बैठकीत नेला नि पुणे कुठे दिल्ली कुठे हे दाखवले. बहुतेक जणी माणूसभर उंचीचा मोठ्ठा भूगोल शिकवायला वापरतात तो नकाशा आयुष्यात प्रथमच बघत होत्या. नकाशात बघून पुण्यापासून दिल्लीपर्यंतची स्टेशनं सांगितली आणि शिकल्यामुळे म्हटलं, ‘एवढं वर दिल्लीला जायचंय आपल्याला!’ पण ‘वर’ या माझ्या शब्दानं घात केला. गटातल्या काहींनी दिल्लीला येण्यासाठी पैसे भरले होते ते परत मागितले. ‘का?’ विचारले तर म्हणाल्या, ‘‘इथं पुण्यातून छोटासा कात्रज घाट चढून शिवापूरला ‘वर’ येतो तर अध्र्या पाऊण तासाच्या प्रवासानं एवढं डचमळतं मग तू सांगतेस तेवढं तासंतास दिल्लीसाठी ‘वर’ जायचं तर किती काय काय होईल.. नकोच मला माझे पैसे परत दे!’’ मी ‘वर’ हा शब्द उत्तर दिशा अशा अर्थाने वापरला होता. त्यांनी ‘वर’ हा शब्द घाट/उंची अशा अर्थाने घेतला.

अशीच एक नथानाई! आयुष्यात प्रथमच गावातून जीपनं सहलीला मुंबईला निघाली. सारं आयुष्य वेल्ह्य़ाच्या डोंगरातल्या रायदंडवाडीत गेलेलं. २०१५ मध्ये त्यांच्या वस्तीवर पहिल्यांदा दिवे आले, ही त्या आधीची गोष्ट आहे. तोवर तिने टीव्हीसुद्धा कधी पाहिला नव्हता. आम्ही वाटेत लोणावळ्याजवळ एका टपरीशी वडापाव खायला रस्त्याकडेला जीप थांबवली तर माझा हात घट्ट धरून नथा म्हणाली, ‘‘ते तिकडं बघ काय वळवळतंय.’’ मी पटकन जमिनीकडे पाहिलं तर माझी हनुवटी वर करून तिने लांब बघायला लावलं. लोकल ट्रेन चालली होती. ‘गाडी आहे’ हे मी तिला सांगितलं तर ती अजून तिकडेच बघत होती, ‘संपतच नाहीये’ हा तिचा शब्द मी ऐकला. तिचा चेहरा पाहिला.. धस्स झालं मला. आयुष्यात ट्रकपेक्षा मोठं वाहन तिनं कधी पाहिलं नव्हतं, तिला कसं सांगायचं हे काय चाललंय?.. माझीच शब्दसंपदा थिटी पडली. आयुष्यात या माझ्या सखीने कधी प्रवासच केला नाही नि प्रवास केलेल्या माणसाकडून कधी काही ऐकलंही नाही. गावातली चार माणसं मुंबईत कामाला होती पण तिच्यापर्यंत काही काही पोचत नाही हो.. मग कसं कळणार  तिला तिच्या उंबऱ्या बाहेरचं जग?

विकासाच्या धुरा घेऊन गावागावात चालवलेले बचत गट आहेत म्हणून ग्रामीण बाईला असं काही तरी वेगळे करायची संधी तरी मिळते आहे. एखाद-दुसरीसाठी कुठलीही संधी उभी करता येत नाही पण गट असला की असं गटासाठी काही तरी कोणाला तरी ठरवता येतं. गटात असणारीला काही जर शंका आलीच तर निस्तरायला त्यातलीच दोन पावलं पुढं असलेली कोणी तरी जबाबदारी उचलून सहजतेनं उभी राहताना मी पाहिली आहे. त्या अनुभवाने मला असं नक्की म्हणतां येईल की अनेकींची भावविश्व हळूहळू विस्तारत आहेत. आता ‘कोणी तरी’ येऊन ‘त्यांचा विकास’ करण्याची वाट त्या आता नक्कीच बघणार नाहीत. या कल्पनेतून त्यांची गटानं ‘मुक्ती’ केली आहे. आता त्या स्वतंत्र आहेत.

हे जरी खरं असलं.. तरी ‘नागरिक’ म्हणून माझी जबाबदारी काही संपत नाही.. स्वातंत्र्याला आता ६९ र्वष झाली. ग्रामीण भागात वावरताना, माझ्या इतकीच ‘ती’ही या सार्वभौम प्रजासत्ताकाची नागरिक आहे, हे  स्वीकारायचं भान मला ठेवावं लागतं. असं भान ठेवून बचत गटांचं काम करताना वेगवेगळ्या प्रसंगी मला इतकं अपराधी वाटलंय.. की या ‘व्हिजन २०२०’, ‘मंगळावर यान पोचलं’, ‘महासत्ता भारत!’ अशा गप्पा मारायच्या या जमान्यात, समाज म्हणून जिच्याकडे आंघोळीला सुरक्षित जागा नाही, पुरुष डॉक्टरच्या धसक्यानं जी आरोग्याचीच काय पण आयुष्याची तिलांजली द्यायला तयार होते, अजून जिने रेल्वे पाहिली नाही, अशांसाठी काही करणं लागतो हे तरी आपण स्वीकारणार का? यांचं अस्तित्वच नाकारून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेतून तर सोडाच पण त्यांच्या या पातळीची साधी कल्पनाही आपण करू शकत नाही हे विदारक सत्य आहे. जास्त शिकलेल्या माणसाला तर या परिस्थितीचे बौद्धिक आकलन होणेही हल्ली दुरापास्त झाले आहे, असे शहरी शिकलेल्या माणसांशी बोलताना मला सतत जाणवत असते. खरंच ‘स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या’ सुज्ञ वाचकांनी या ग्रामीण स्त्रीला उंबऱ्याबाहेरचं जग दाखवायला हवं.

 

 

सुवर्णा गोखले

suvarna.gokhale@jnanprabodhini.org