‘‘बॉम्बे बाइट्सची स्पेशालिटी वडापाव, साबुदाणा वडा, थालीपीठ आणि कोंबडी वडे! आणि सर्वात लोकप्रिय म्हणजे घरी केलेल्या माझ्या हातच्या पोळ्या. रेस्टॉरंटसाठी पोळ्या मी स्वत: घरून करून देत होते. त्या पोळ्यांसाठी लोक यायला लागले, अगदी मंथली बेसिसवर!’’ दुबईमध्ये २००८ ला ‘बॉम्बे बाइट्स’ आणि २०१५ मध्ये ‘मुंबईकर्स’ हे रेस्टॉरन्ट सुरू केलेल्या विनता पाटणे यांची चटकदार यशोगाथा.

दारावरची बेल वाजली, मी दार उघडले आणि बाहेर पाहिले तर कोणीही नव्हते. विनता येणार होती. चारची वेळ ठरली होती. मी कॉरिडॉरमध्ये आले, आजूबाजूला नजर टाकली. विनता ठरल्या वेळीच आली होती, पण बाजूच्या फ्लॅटच्या इथे होती. मला वाटले ती चुकून दुसऱ्या फ्लॅटमध्ये जातेय की काय, म्हणून तिला पटकन म्हटले, ‘‘ विनता, इथे ये!’’ ती आत येत म्हणाली, ‘‘अगं, मी बाजूच्या फ्लॅट्समध्ये ‘मुंबईकर्स’ची कार्ड्स टाकून आले. माझ्याकडची मुलेपण कार्ड्स टाकून येतील, मी आता तुझ्या २३ मजली टॉवरमधील प्रत्येक फ्लॅटमध्ये कार्ड टाकून आले. ही अशी कामे मी स्वत: जातीने करते. आमचे ‘मुंबईकर्स’ हे रेस्टॉरंट नवीन आहे ना!’’

मी तिला म्हटले, ‘‘धन्य आहे तुझी.’’ मनात विचार आला, काय हा उत्साह, किती ही मेहनत, केवढी ही निष्ठा! २००८ मध्ये दुबईत सुरू झालेल्या ‘बॉम्बे बाइट्स’ची पाळेमुळे जमिनीत खोलवर रुजली आणि त्यातून आलेला नवांकुर म्हणजेच ‘मुंबईकर्स’ हे नवीन रेस्टॉरंट आणि त्याच्या जाहिरातीसाठी मेहनत घेणारी ही विनता! असे हे झपाटलेपण, एखादी गोष्ट यशस्वी करण्यासाठी हा झोकून देण्याचा स्वभाव, याच गोष्टी यश खेचून आणतात.

म्हटले, ‘‘विनता, परदेशात, दुबईसारख्या वाळवंटात कोणताही व्यवसाय सुरू करून तो यशस्वी करणे सोपे नाही. तू तर त्या वृक्षाच्या जमिनीत पसरलेल्या मुळातून आलेल्या नवांकुराची जोपासना करत आहेस. ‘बॉम्बे बाइट््स’ ते ‘मुंबईकर्स’ या तुझ्या पाऊलवाटेवरचे अनुभव, त्यावरील खाचखळगे या व्यवसायात प्रवेश करणाऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील.’’

जीवनाच्या या वळणावर मागे वळून बघताना तिच्या मनात नेमक्या काय भावना असतील? भूतकाळाच्या कटू स्मृती की वर्तमानातील स्वप्नपूर्तीचा आनंद? माझा विचार सुरू असतानाच ती सांगू लागली, ‘‘अतिशय गरीब घरात माझा जन्म झाला. मुंबईत ठाण्याला नौपाडय़ाला आम्ही राहात होतो. ठाण्याच्या सरस्वती स्कूलमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. घरात गरिबी म्हणजे एवढी होती की, दोन्ही वेळेला पानात काय वाढायचे, हा प्रश्न असायचा. अनंत वरवटकर म्हणजे माझे वडील! ताजी भाजी घेऊन ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी उभी असणारी वरवटकरांची गाडी प्रसिद्ध होती. त्यामुळे वेळेचे महत्त्व बालपणीच मनावर ठसले होते. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त, वडिलांना मदत म्हणून त्यांच्याबरोबर मीपण भाजी विकायला जाऊन बसायची. संध्याकाळी देवाचे हार, दुर्वाच्या जुडय़ा विकायची, घरखर्चाला मदत म्हणून. त्याच वेळी तिथे बसून आजूबाजूला बघत असताना माझ्या मनात एक गोष्ट कोरली गेली ती म्हणजे स्वत:च्या व्यवसायाशिवाय पर्याय नाही. शाळा सांभाळून वडिलांना मदत करून घराला हातभार लावायचे काम मी सात-आठ वर्षे करत होते, पण तरीही तुटपुंज्या मिळकतीमुळे अखेर माझे शिक्षण अर्धवट राहिले. भाजी, हार, दूर्वा यांच्यात बालपण कधी सरले ते कळलेच नाही.’’

शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत तिच्या डोळ्यांतून अश्रूंवाटे बाहेर पडत होती. मी तिला हलकेच थोपटले. भानावर येत विनता म्हणाली, ‘‘आज जीवनाच्या या टप्प्यावर आल्यावर मी एकच सांगते की, माणसाच्या जीवनात शिक्षणाचे स्थान अनन्यसाधारण आहे. जर शिक्षण नसेल तर पावलोपावली अडथळा येतो. लोकांवर अवलंबून राहावे लागते. लोक फसवतात, तुम्हाला गृहीत धरतात. आपल्याला कुणी तरी गृहीत धरतंय, ही भावना फार त्रासदायक असते. केवळ शिक्षणामुळेच तुमच्यात आत्मविश्वास येतो, जो व्यवसाय करताना अतिशय उपयोगी पडतो आणि म्हणून मला सर्वाना सांगावेसे वाटते की, नोकरी करा वा व्यवसाय, शिक्षणाला पर्याय नाही!’’

पण पुढे आयुष्याने नवे वळण घेतले. विनताचे लग्न मात्र तिची पुढची दिशा ठरवून गेले. ती म्हणाली, ‘‘१९८२ मध्ये महाराष्ट्रातील खेड येथील अभय पाटणे याच्याशी विवाह झाला आणि १९८३ मध्ये दुबईत येण्याचा योग आला आणि एका वेगळ्याच वाटेवरून आमची वाटचाल सुरू झाली. आज जे काही आम्ही आहोत त्यात माझे चुलत सासरे सुधीर पाटणे यांचे श्रेय फार मोठे आहे. त्यांच्यामुळेच आम्ही दुबईत येऊ  शकलो आणि म्हणूनच त्यांचा उल्लेख या प्रवासात आवर्जून करणे आवश्यक आहे. एका छोटय़ाशा जागेत सासरे, दोन दीर आणि आम्ही असा संसार सुरू झाला. प्रत्येकाला आपल्या जेवणाचे पैसे द्यावे लागत होते, फक्त मी स्वयंपाक करत असल्यामुळे मला जेवण मोफत होते. ‘अहमद सिद्दीकी’ नावाची कंपनी होती, तिथे अभय नोकरीला होता.’’

‘‘सुरुवातीला पगार तुटपुंजा होता. त्यामुळे संसाराला हातभार म्हणून मी साडीला फॉल लावणे, बेबी सीटिंग करणे अशी छोटीमोठी कामे सुरू केली. त्याच जोडीला जेवणाचे डबे बनवायला सुरुवात केली. त्या काळी दुबईमध्ये कित्येक पुरुष एकटे राहायचे. पगार कमी होते, कुटुंबाला घेऊन राहिले तर बचत व्हायची नाही, तसेच मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय नव्हती. त्यामुळे घरगुती जेवणाचा डबा सर्वाना हवा असायचा. दोन-चार डब्यांवरून संख्या वाढत वाढत ६० डब्यांपर्यंत गेली. ‘एमिरेट्स एअर लाइन’च्या स्टाफला डबे करून देत होते. घरात छोटी मुले, इतर सर्व जण, त्यात डब्यांचा व्याप! त्यातच अभय त्याच्या स्वभावानुसार भारतातून दुबईत नोकरीसाठी आलेल्या लोकांना नोकरी मिळवून द्यायला, त्यांना स्थिरस्थावर व्हायला मदत करायचा. ते लोकही घर मिळेपर्यंत आमच्याकडेच असायचे. साहजिकच त्यांच्या जेवणाची जबाबदारी माझीच असे, कारण आम्हाला जाणीव होती की, आपल्याला जशी कोणी मदत केली तशीच आपणही इतरांना मदत केली पाहिजे; पण तक्रार कधीच नव्हती, मेहनत करायची तयारी होती. मात्र प्रत्येक डबा भरताना लहानपणचे स्वत:च्या व्यवसायाचे स्वप्न मला खुणावयाचे आणि जणू मला नवीन उमेद द्यायचे की, यातूनच उद्या स्वप्नपूर्ती होणार आहे.’’

‘‘हळूहळू अभयचा नोकरीत जम बसला, मोठा फ्लॅट घेतला, दुबईची हळूहळू ओळख होऊ  लागली आणि ‘रेस्टॉरंट’चे विचार मनात वारंवार येऊ  लागले. २००६ च्या सुमारास माझ्या दिराने- संजयने गावाला उपाहारगृह सुरू केले होते. दोन वर्षे झाली तरी जम काही बसत नव्हता. त्यामुळे धंदा गुंडाळून तोही दुबईत आला. अखेर पैशाची बरीच जमवाजमव केली आणि ‘बॉम्बे बाइट्स’ हे रेस्टॉरंट सुरू झाले.. पण सुरुवातीचा काळ म्हणजे आम्हाला दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागे. अगदी जागा शोधणे, लायसन्स मिळवणे, इतर सर्व सरकारी परवानग्या मिळवणे, स्टाफ भारतातून आणणे, त्यांचे व्हिसा, मेडिकल्स इत्यादी प्रत्येक गोष्ट मी स्वत: जातीने लक्ष घालून जबाबदारीने पार पाडल्या. याच काळात दुबईची बारीकसारीक माहिती करून घेतली. भाज्या, चिकन, मासे वगैरे

मार्केटमध्ये कुठे चांगले मिळतात. मसाले, वाण सामान कुठे चांगले मिळते अशी ठिकाणं शोधून काढली. आज वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणाहून सामान आणले जाते. सप्लायर्सबरोबर चांगले संबंध ठेवल्याने सर्व सामान विश्वासाने आमच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन पडते. दर महिन्याला आणि नंतर लागेल तसा माल त्यांना कळवला जातो आणि नंतर तो आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. ‘बॉम्बे बाइट्स’ची स्पेशालिटी वडापाव, साबुदाणा वडा, थालीपीठ आणि कोंबडी वडे! आणि सर्वात लोकप्रिय म्हणजे घरी केलेल्या माझ्या हातच्या पोळ्या. आजपर्यंत रेस्टॉरंटसाठी पोळ्या मी स्वत: घरून करून देत होते. साहजिकच घरच्या पोळ्यांची मजाच काही और! आणि म्हणून त्या पोळीसाठी लोक यायला लागले, अगदी मंथली बेसिसवर! इंडिया क्लब, लेडीज असोसिएशन आणि महाराष्ट्र मंडळ यांच्या कार्यक्रमांच्या वेळी पाचशे-सहाशे माणसांसाठी स्टॉल लावायची संधी मिळाली. त्यामुळे ‘बॉम्बे बाइट्स’ची हळूहळू प्रसिद्धी होऊ लागली. परदेशात महाराष्ट्र मंडळाने दिलेल्या या संधी मी कधीच विसरू शकत नाही.’’

विनता ‘बॉम्बे बाइट्स’च्या आठवणीत मग्न झाली होती. त्या सुखद आठवणीतून बाहेर काढत तिला मी विचारले, ‘‘२००८ मध्ये ‘बॉम्बे बाइट्स’ आणि आता २०१५ मध्ये ‘मुंबईकर्स’ सुरू केलेस. आता हे रेस्टॉरंट कोण सांभाळते?’’

‘‘माझी मोठी मुलगी श्वेता सांभाळते आणि जावई सुशांत कवळेकर ऑफिसनंतर तिला मदत करतो, अगदी डिलिव्हरी पोचवण्यापर्यंतसुद्धा! रेस्टॉरंट हा फॅमिली बिझनेस आहे आणि त्यामुळे सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. हा  रोख रक्कमेचा व्यवसाय आहे, त्यामुळे काऊंटरवर स्वत: जातीने किंवा विश्वासू माणसाला बसवावे लागते, नाही तर धंदा तोटय़ात जायला वेळ लागत नाही. आता माझा नवरा अभय आणि दीर संजय दोघेही नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ‘बॉम्बे बाइट्स’मध्ये ते जास्त लक्ष घालतात. त्यामुळे मी आता ‘मुंबईकर्स’लाही वेळ

देऊ  शकते. मुलीला या व्यवसायातील खाचखळगे समजावून सांगू शकते. तिला जाहिरातीसाठी मदत करते. जेव्हा मोठय़ा ऑर्डर्स असतात तेव्हा जातीने हजर राहून त्या पूर्ण करून घेते.’’

मी मध्येच विनताला म्हटले, ‘‘तुझी मुलगी श्वेता बालपणापासून तुझी धावपळ बघत आहे, त्यामुळे कळत-नकळत प्रामाणिकपणा मेहनत, जिद्द, आत्मविश्वास यांचे संस्कार तिच्यावर झाले आहेत.’’ त्यावर विनता म्हणाली, ‘‘खरे आहे. आमची धाकटी मुलगी विश्वा ही आता बिझनेस मॅनेजमेंट करते आहे. आमची अर्धवट राहिलेली शिक्षणाची इच्छा आता ही पूर्ण करत आहे. तिलाही मी सांगते, ‘उद्या तू कितीही शिकलीस, कितीही मोठी झालीस, तरी नेहमी वाणी गोड ठेव आणि माणसे जोडायला शिक!’ आज दुबईत आम्ही आमच्या अनेक नातेवाईकांना आणले. आजही रंगपंचमी असो किंवा दिवाळी, दसरा असो किंवा नागपंचमी, सर्व सण एकत्रितरीत्या आमच्या घरी साजरे होतात. हे फक्त निमित्त असते, त्यामुळे संबंध सलोख्याचे राहतात.’’

‘‘समोरच्या माणसाची पारख करता यायला पाहिजे. अपमान सहन करायचा नाही, पण वाणी गोड असायला हवी. सप्लायर्स, स्टाफ किंवा ग्राहक सर्वाशीच प्रेमाने बोला. माणसे जोडली गेली पाहिजेत. आज सर्व मिळून ५५ कामगार आमच्याकडे काम करतात. एका कुटुंबात नाही का बरी-वाईट दोन्ही प्रकारची माणसे असतात? आपण त्यांना कधी प्रेमाने, कधी रागावून समजावतोच ना? त्याच प्रकारे यांच्याशीपण वागावे लागते. कधी अतिशय वाईट अनुभवही येतात, तेव्हा नाइलाज होतो. त्यांचा व्हिसा कॅन्सल करून त्यांना परत पाठवावे लागते.’’

मी तिला एखादा कटू अनुभव सांगायला सांगितला जो कायमचा लक्षात राहिलाय. जणू काही तो प्रसंग आताच घडत आहे अशा उद्वेगाने ती सांगू लागली. ‘‘एकदा रात्रीचे १० वाजायला आले होते. ११ वाजता रेस्टॉरंट बंद होणार होते. एक टुरिस्टचा ग्रुप आला १०/१२ जणांचा! आमच्या वडापावची कीर्ती त्यांनी मुंबई, पुण्यात ऐकली होती आणि म्हणून शोधत शोधत ते ‘बॉम्बे बाइट्स’मध्ये आले. २५/३० वडापाव तरी लागणार होते. आमच्या कूकला ऑर्डर पूर्ण करायचा कंटाळा आला होता. त्याने मला येऊन सांगितले, बटाटे नाहीत. बाजारातून नवीन बटाटे आणून उकडून ऑर्डर पूर्ण करणे शक्य नव्हते. तो ग्रुप निघून गेला, कारण वडापावसाठीच ते आले होते. मला आठवत होते आमच्याकडे नेहमी थोडे बटाटे उकडून ठेवलेले असतात. तर मग ते गेले कुठे? मी सर्वत्र शोध घेतला आणि मला ते उकडलेले बटाटे कचऱ्याच्या डब्यात सापडले. कामगारांना कंटाळा आला की ते असा त्रास देतात. त्यांना वेगळे पैसे दिले, तर आणखी १०० माणसांचे कामही ते करतात; पण जेव्हा असे कामगार भेटतात त्यांना त्यांच्याच भाषेत बोलावे लागते. त्या कूकला काढून टाकले तर त्याने व्हॉट्सअप, फेसबुकवर ‘बॉम्बे बाइट्स’बद्दल बरेच उलटसुलट लिहिले! खूप मनस्ताप झाला.’’

काही कामगारांना केलेल्या मदतीची जाणीव असते. वर्षांनुवर्षे ती टिकतात. स्वत:चाच धंदा असल्याप्रमाणे ती काम करतात. अडीअडचणीला उभी राहतात, पण अशी माणसे विरळाच! प्रेमाने त्यांची, त्यांच्या कुटुंबाची केलेली चौकशी, सणावाराला घरून गोडधोड जेवण करून मी नेते, आजारपणात त्यांची काळजी घेणे, डॉक्टरकडे घेऊन जाणे हे आम्ही तेवढय़ाच आस्थेने करतो. त्याचा परिणाम नक्कीच होतो. काही मुले भारतातून आमच्या व्हिसावर इथे येतात, दोन-चार वर्षे राहतात, शिकतात, दुबईची माहिती करून घेतात आणि नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करतात. मला अशा वेळी त्या मुलांचे कौतुक वाटते. त्यांची जिद्द, हुशारी, काही करण्याची धडपड पाहिली की असे वाटते, योग्य मुलाला आपण आणले. त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले.’’

तिला वाटत असलेला आनंद तिच्या डोळ्यांतून ओसंडत होता. ‘‘आमच्या ‘बॉम्बे बाइट्स’ला अनेक नामवंत मराठी कलाकारांनी भेटी दिल्या. मोहन वाघ, मोहन जोशी, सुनील बर्वे, वंदना गुप्ते, गिरीश ओक असे अनेक जण. नाटकाचे संच जेव्हा देशोदेशी प्रयोग करतात तेव्हा वाटेत दुबईत थांबले तर ‘बॉम्बे बाइट्स’ला भेट दिल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. बाबासाहेब पुरंदरे हे अभयचे आराध्यदैवत आहे. त्यांनी दोनदा भेट दिली. त्यांच्या संस्कारात अभय वाढला आहे. अशी आपली मराठी माणसे जेव्हा आमच्या या रेस्टॉरंटला भेट देतात आणि कौतुक करतात तेव्हा मन भरून येते.’’

व्यवहारापेक्षा भावना जपणाऱ्या, आठवणींनी भावविवश झालेल्या विनताला मी म्हटले, ‘‘इथे दुबई म्युन्सिपालटीचे नियम कडक आहेत ना?’’ त्याच्या आठवणींनीसुद्धा ती एकदम सावरून बसली. म्हणाली, ‘‘महाराष्ट्र आणि दुबई येथील रेस्टॉरंटच्या स्वच्छतेत फार मोठा फरक आहे. महाराष्ट्रात अधिकारी आले तपासणीसाठी तरी ते नुसते नाटक असते. अक्षरश: तेथील किचन पाहिले तर ग्राहकांना खाणे जाणारच नाही. ‘दृष्टिआड सृष्टी असते’ असे म्हणतात ना त्याची यथार्थता पटते अनेकदा, पण दुबईत त्याच्या अगदी उलट आहे. हे अधिकारी कधीही न सांगता येतात. रेस्टॉरंटचे छप्पर कुठे उघडे नाही ना हे तपासतात. किचनमधील भांडी, कामगारांचा युनिफॉर्म, त्यांची नखे, हॅन्डग्लोव्हज, डोक्याचे केस कापलेले आहेत ना, कॅप आहे ना, नियमाने त्यांची आरोग्य तपासणी होतो ना याची बारकाईने तपासणी केली जाते. मेन्यूकार्डमध्ये जे पदार्थ दिले आहेत त्याव्यतिरिक्त एकही दुसरा पदार्थ देता येत नाही. म्युनिसिपाल्टीने मोठे ड्रम दिले आहेत. खराब तेल असेल ते त्यात जमवून ठेवले जाते. नंतर ‘म्युन्सिपालटी’चे ट्रक येतात आणि ते तेल घेऊन जातात आणि त्याचे रिसायकलिंग होते. तसेच ड्रेनेज सिस्टम वारंवार तपासली जाते आणि पाइपने त्यातून कचरा काढला जातो. जगामध्ये स्वच्छतेमध्ये दुबई जेवढी प्रसिद्ध आहे तेवढेच दुबईचे किचनही प्रसिद्ध आहे. दुबईचे हे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे आणि ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे.’’

‘‘आज एवढय़ा वर्षांच्या अनुभवातून अनेक गोष्टी लक्षात आल्या. व्यवसाय कोणताही असो, शिक्षण आवश्यक आहे, त्याचबरोबर गोड वाणी. आमचा मुलगा श्रीनील याने स्वत:चे ‘बॉम्बे कट्स’ म्हणून जेन्ट्स सलून सुरू केले आहे. त्यालापण तेच शिकवतो की, व्यवसाय कोणताही असो, आपल्या व्यवसायात कामगार वर्ग, सप्लायर्स, ग्राहक, धंद्यासंबंधित सर्व माणसांशी कधी रागावून, कधी समजावून, तर कधी प्रेमाने बोलून माणूस टिकवण्याची कला आत्मसात केली पाहिजे.

ज्या काळात दुबई म्हणजे फक्त एक ओसाड वाळवंट होते, कोणत्याही सुखसोयी नव्हत्या, दळणवळणाची साधने नव्हती, सरकारी नियमही योग्य प्रकारे तयार केले गेले नव्हते. अशा परिस्थितीत अरबी अधिकाऱ्यांशी जुळवून घेणे म्हणजे तारेवरची कसरत होती. या सर्वानी आमच्यासाठी, पुढच्या पिढीसाठी वाट सोपी करून ठेवली. आज दुबईचे सर्व चित्रच पालटले आहे आणि त्यात भारतीयांचा वाटा फार मोठा आहे. त्या यादीत मराठी उद्योजक आहेत, ही अभिमानाची गोष्ट म्हटली पाहिजे! आणि म्हणूनच त्या सर्वाचा इथे गौरवपूर्वक उल्लेख केलाच पाहिजे.’’

‘‘‘बॉम्बे बाइट्स’च्या आतापर्यंतच्या वाटचालीत, चढउताराच्या प्रत्येक टप्प्यावर माझे पती अभय आणि दीर संजय यांनी जी मोलाची साथ दिली त्यामुळेच ‘मुंबईकर्स’ या नवीन रेस्टॉरंटची प्रेरणा मिळाली आणि त्यासाठी मेहनत करण्याची उमेद मिळाली. त्यांच्या मदतीशिवाय ‘बाँबे बाइट्स्’ उभे राहूच शकले नसते. मला विश्वास आहे उद्या ‘मुंबईकर्स’सुद्धा यशस्वी होईल, पण मनाच्या तळाशी एक खंत मात्र कायम राहील, अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची!’’

mumbaikarsdubai@gmail.com

मेघना वर्तक – meghana.sahitya@gmail.com