पाचशे आणि एक हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला महिना लोटल्यानंतरही देशातील चलनकल्लोळ संपुष्टात आलेला नाही. ८ नोव्हेंबरच्या आधीपर्यंत देशातील चलन व्यवहारांत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या नोटा अचानक बंद झाल्यानंतर देशात चलनतुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने केंद्र सरकारने आता रोखरहित व्यवहार अर्थात ‘कॅशलेस’ व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देऊ केले आहे. खरं तर ‘कॅशलेस’ व्यवहार देशाला नवीन नाहीत. तरीही आजपर्यंत अवघे दोन टक्के व्यवहार अशा माध्यमांतून होत होते. आता परिस्थितीची गरज म्हणून म्हणा किंवा उशिराने सुचलेले शहाणपण म्हणून रोखरहित व्यवहारांना प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. यामध्ये डेबिट-क्रेडिट कार्डाचा वापर, नेटबँकिंग, पेटीएम व फ्रीचार्जसारखे अ‍ॅप या माध्यमांचा समावेश आहे. परंतु, तरीही अशा व्यवहारांबाबत पुरेशी माहिती नसलेले किंवा त्याबाबत काहीसे साशंक असलेले अ‍ॅपद्वारे व्यवहार करण्यास धजावत नाहीत. अशा मंडळींना थर्ड पार्टी अर्थात त्रयस्थ अ‍ॅपमार्फत व्यवहार करण्याची भीती वाटत असेल तर, विविध बँकांचे अ‍ॅप त्यांच्या सेवेसाठी तयार आहेत.

सध्या देशातील सर्व प्रमुख बँकांतील आपले व्यवहार मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून हाताळता येतात. स्मार्टफोन बँकिंग ही संकल्पना आता रुजू लागली आहे. त्याचप्रमाणे अनेक मोठय़ा बँकांनी खास खरेदी व्यवहारांसाठी स्वतंत्र अ‍ॅप विकसित केले आहेत. या अ‍ॅपच्या साहय़ाने तुम्ही कुठेही विनासायास खरेदी करू शकता. अशाच अ‍ॅपविषयी आपण या वेळी माहिती घेणार आहोत.

‘एचडीएफसी पे-झ्ॉप’: वापरकर्त्यांना ऑनलाइन बिल भरणा, मोबाइल/डीटीएच रिचार्ज, एम-व्हिसा पेमेंट, प्रवास तिकिटे, सिनेमा तिकिटे यांची खरेदी करण्याची सुविधा या अ‍ॅपमधून मिळते. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर वापरकर्त्यांला त्यावर आपल्या बँक खात्याची माहिती दाखल करावी लागते. ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यवहाराच्या वेळीस वापरकर्त्यांला केवळ एका क्लिकवर वरील सुविधांचा वापर करता येईल. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप अन्य बँकांचे खातेदारही वापरू शकतात.

‘स्टेट बँक बडी’: भारतीय स्टेट बँकेचे ‘बडी’ हे अ‍ॅप १३ भाषांमधून हाताळता येते. या अ‍ॅपमध्ये खरेदी, रिचार्ज, बिलभरणा अशा सुविधांसोबतच आपल्या संपर्काच्या खात्यावर पैसे पाठवण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. याखेरीज विविध हप्त्यांच्या भरण्याची मुदत येताच हे अ‍ॅप वापरकर्त्यांला सतर्क करते. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप बँकेशी जोडलेले असले तरी खातेदाराच्या बँक खात्याला जोडले जात नाही. त्यामुळे आपल्या खात्यातून ठरावीक रक्कम अ‍ॅपमध्ये जमा करून ग्राहक आपले व्यवहार पूर्ण करू शकतात.

आयसीआयसीआयचे ‘पॉकेट्स’: कोणत्याही बँकेच्या खातेदाराला वापरता येईल, असे हे अ‍ॅप खरेदी, रिचार्ज, बिल भरणा, पैसे पाठवणे आदी सुविधा देते. या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे, ‘पॉकेट्स’ सोबत वापरकर्त्यांला मोफत ‘व्हच्र्युअल व्हिसा कार्ड’ मिळते. ज्याचा वापर कोणत्याही ठिकाणी ऑनलाइन शॉपिंगसाठी करता येतो. वापरकर्त्यांला प्रत्यक्ष कार्डही मिळवता येते. याशिवाय या अ‍ॅपमध्ये क्यूआर कोड स्कॅनरसारखी सुविधाही आहे.

या तीन बँकांखेरीज अ‍ॅक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक या बँकांचेही अ‍ॅप तुम्हाला वापरता येतील. जवळपास सर्वच अ‍ॅपमध्ये सारखीच वैशिष्टय़े आहेत. तुम्ही तुमचे खाते असलेल्या बँकेचे अ‍ॅप वापरू शकता किंवा अन्य बँकेच्या अ‍ॅपचाही वापर करू शकता. या अ‍ॅपवरील व्यवहार बँकेच्या माध्यमातून होत असल्याने ग्राहकाची सुरक्षितता जपली जाते. शिवाय वापरकर्त्यांची माहिती चोरली जाण्याची भीतीही कमी होते.

असिफ बागवान 

asif.bagwan@expressindia.com