सावकाश विरघळणारी घन स्वरूपातील खते झाडांना वरचे वर देणे गरजेचे आहे. तसेच बागेतील रोपांना द्रावणयुक्त खतेही देणे महत्त्वाचे व गरजेचे असते. कारण ती ताबडतोब लागू होतात. विशेषत: फळे, फुले धरण्यासाठी, फुलगळती होऊ नये यासाठी ही द्रावणयुक्त खते गरजेची आहेत. ही फक्त द्रव नसून ते झाडांसाठी संजीवनी देणारी आहेत, म्हणून त्यास संजीवक असे म्हणतात. त्याद्वारे मातीची उपजावू क्षमता वाढते. म्हणजे मातीत जीवाणू संख्या ताबडतोब वाढते तसेच उपयुक्त जीवाणू कार्यरत होतात. कालांतराने नष्ट होतात. व त्यांचेच अतिसूक्ष्म स्वरूपात जैव खत तयार होते. या नसíगक चक्रामुळे झाडांना वेळोवेळी पोषण मिळते व झाडे टवटवीत होतात, बहरतात. ही संजीवके घरच्या घरी व साध्या-सोप्या पद्धतीने तयार करता येतात.
खरकटय़ा पाण्याचे आबंवण – खरकटे अन्न, हिरवा कचरा, खरकटे पाणी (साबण लावण्यापूर्वी भांडी धुण्याचे पाणी) हे आवश्यक तेवढय़ा प्रमाणात ३ ते ५ दिवस एका डस्टबिनमध्ये साठवून ठेवावे. त्यावर झाकण ठेवणे आवश्यक आहे. तिसऱ्या दिवसापासून यास आंबट वास येतो अर्थात ते फरमेंट होते. जसे आपण इडली, अनारसेसाठी तांदूळ भिजवतो तसा सौम्य आंबट गंध येतो. त्यातील जाडाभरडा कचरा, काडय़ा काढून ते एखाद्या कुंडीत, वाफ्यात वरचेवर टाकता येतो. तो रोपांना मिल्चग म्हणून उपयोगात येतो. या पाण्यात आणखी तेवढेच साधे पाणी मिसळून ते द्रावण झाडांना द्यावे. या आंबट द्रावणास एन्जाईम असे म्हणतात. हे अगदी छोटय़ा प्रमाणात म्हणजे ५ ते १० कुंडय़ांपासून मोठय़ा बागेसाठीही तयार करता येते. यात मसाल्याच्या रस्सेदार भाज्या, वरण, पिठले, ताक, तिखट, सुकी भाजीही मिक्स करता येते. त्याने मातीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते. मातीतील गांडुळासाठी अन्न म्हणूनही त्याचा उपयोग होतो. एन्जाईम हे जमिनीच्या पचन क्षमतेनुसार द्यावे. म्हणजे सुरुवातीस अर्धा कप, पेलाभर, तांब्याभर असे प्रमाण दर आठवडा-पंधरा दिवासांतून एकदा देता देता त्याचे प्रमाण वाढवत जावे. हे आंबट द्रावण गरजेनुसारही तयार करता येते. हे पाणी म्हणजे गायीच्या शेणयुक्त द्रावणास (स्लरीस) उत्तम पर्याय आहे.
sandeepkchavan79@gmail.com