आजचा ‘डान्स बार’ ही तमाशा, मुजरा या नृत्य पद्धतीच्या कुळात जन्मलेली आधुनिक स्त्री-अदाकारी आहे. स्त्रीच्या अशा अदाकारीच्या मागे लागण्याएवढी पुरुषाच्या मानसिकतेची अपरिहार्यता काय आणि स्त्रियांनी हे अपमानास्पद जीवन पत्करण्यामागील त्यांची अपरिहार्यता काय? पुरुषांच्या कोणत्या कामऊर्जेची गरज विवाहप्रथा असूनही अपुरी आहे याचे कारण शोधताना उत्क्रांतिवादाकडेच जावं लागतं. प्राचीन काळापासून असलेलं स्त्री-पुरुषांतील नैसर्गिक प्रेम, मैत्र काळाच्या ओघात हरवलं गेलं. त्यांच्यामधील ‘स्वाभाविक मोकळेपणा’ नष्ट होत गेला. चोरटेपणा आला आणि तो कामवासनेत परावर्तित झाला. हे नातं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, निव्वळ मोकळेपणा देण्याऐवजी त्यामागचा ‘उपयुक्त विचार’ परिपूर्ण लैंगिक शिक्षणाने देण्याची गरज आहे. त्यातून स्त्री-पुरुषांतील विश्वासाचे नाते अधिकाधिक प्रगल्भ होत जाऊन कदाचित डान्स बारची आवश्यकताच उरणार नाही.

 

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार

नृत्य ही काही अलीकडे शोध लागलेली कला नाही. नृत्य, तालवाद्य, तसेच चित्रकला आणि मूर्तिकला या चार अत्यंत मूलभूत अशा प्राचीन कला, मानवी भाषांचा उदय होण्याच्या बऱ्याच आधीच्या काळात निर्माण झालेल्या आहेत. या कलांसाठी भाषा कळण्याची, बोलता येण्याची गरज नव्हती. कळपावस्थेतून स्थिर होताना, प्रसंगोपात अग्नीला मोकळ्या जागेत पेटवून, ‘माणूस’ त्याच्या भोवताली जमून पहिल्या प्रथम समूहजीवनाला सामोरा गेला. हळूहळू एकमेकांना ओळखू येण्याच्या स्थितीतून तो टोळी अवस्थेत आला आणि पुढे आपापले जगण्याचे, खाण्याचे, रीती-रिवाज ठरवून या टोळ्यांनी जमात-व्यवस्थेत प्रवेश केला. त्यातून मग पुढे त्याची संस्कृती युगाकडे वाटचाल सुरू झाली. नृत्य आणि वादनकला, या अशा रीतीने कळपातून टोळी अवस्थेत रूपांतर होण्याच्या काळात इतक्या मागे जातात, हे लक्षात घेतलं पाहिजे. जंगलात भटकंती करून, शिकार करून, दिवसभराच्या कष्टाला विश्राम देण्यासाठी अग्नीभोवती गोलाकार जमून, स्त्री-पुरुषांनी नृत्य-वादन करणं, हे तेव्हापासूनचं आहे. त्याला मानवाचा नैसर्गिक श्रमपरिहार म्हणणं वावगं ठरू नये. या नृत्यात प्राचीन स्त्री-पुरुषांनी सहजपणं एकत्र हातात हात घेऊन, एकमेकांना कवेत घेऊन नृत्य करणं, हे तेव्हा होतं आणि आजही आदिवासी जमातीत ते टिकून आहे.

विवाहप्रथा स्वीकारूनही आदिवासी जमातीत विवाहितांचे ‘स्त्री-पुरुष एकत्रित नृत्य’, जे अजूनही मोकळेपणाने टिकून आहे, ते तितकंसं आपल्या संस्कृतिप्रधान समाजात टिकू शकलेलं नाही, हा फरक कशामुळे पडला? आजचा ‘डान्स बार’ ही जी अदाकारी आहे, ती एक प्रकारे तमाशा, मुजरा या नृत्य पद्धतीच्या कुळात जन्मलेली आधुनिक स्त्री-अदाकारी आहे. स्त्रीच्या अशा अदाकारीच्या मागे लागण्याएवढी पुरुषाच्या मानसिकतेची अपरिहार्यता काय, आणि स्त्रियांनी हे अपमानास्पद जीवन पत्करण्यामागील त्यांची अपरिहार्यता काय? या नृत्य प्रकाराकडे, समजा उद्यापासून एकही पुरुष फिरकलाच नाही, तर हे डान्सबार चालू शकतील का? म्हणजे, पुरुष अशा नृत्यांचे पारंपरिक पोशिंदे का होत आहेत आणि अशी कोणती त्यांची कामऊर्जेची गरज विवाहप्रथा असूनही अपुरी आहे, हे प्रथम तपासावं लागेल.

उत्क्रांतीपासून जर पाहिलं तर असं दिसतं की, त्यातील एका टप्प्यावर, प्राण्यामध्ये असणारा प्रजोत्पादनाचा विशिष्ट कालावधी मनुष्य जीवनातून नष्ट झालेला आहे. प्राणिसंख्या मर्यादित ठेवण्याची ‘हिट पीरियड’ ही जी मूळ नैसर्गिक यंत्रणा आहे, ती माणसामध्ये अस्तित्वातच नाही. तेव्हा माणसाने आपली जनसंख्या मर्यादित ठेवणं ही निसर्गाने जणू त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. त्याकरिता विचार, संशोधन आणि कल्पनाशक्ती याचा उपयोग करू शकणारी बुद्धिमत्ता निसर्गाने मानवाला बहाल केलेली आहे. मीलनाचा विशिष्ट काळ नष्ट झाल्याने, स्त्री-पुरुषांमध्ये कामभावनेचं वास्तव्य कायमस्वरूपी झालं आणि मीलन काळातील ‘एकाहून अनेक स्त्रियांमध्ये स्वारस्य’ (अ‍ॅक्सेस टू मोअर फिमेलस्) हे निसर्गातील ‘नरतत्त्व’सुद्धा पुरुषांमध्ये कायम झालं. म्हणजे एका बाजूला बारा महिने असणारं स्त्री-पुरुष आकर्षण आणि दुसरीकडे पुरुषामध्ये स्त्रीबाबत नर-तत्त्व शिल्लक असणं, या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस, माणसाला यशस्वीपणे हाताळायच्या आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. हे नियंत्रण माणसाला सुलभ व्हावं, याकरिता दोन अनोखे अधिकार जणू निसर्गाने माणसाला दिलेले आहेत, जे अन्य प्राणिमात्रात नाहीत. त्यापैकी एक म्हणजे स्त्री-पुरुषांना एकमेकांत स्वाभाविकपणे आणि कोणत्याही बंधनाशिवाय मिसळता येण्याची ‘समज व बुद्धी’ निसर्गाने माणसाला बहाल केलेली आहे, जिचा उपयोग स्त्री-पुरुषांमधील शारीरआकर्षणाचा प्रभाव काबूमध्ये ठेवण्यासाठी माणसाला करून घेता येतो, आणि दुसरा अधिकार स्त्री-शरीरात बदल होऊन येतो, नि तो म्हणजे वयाच्या ४५ वर्षांनंतर, स्त्री ही रजोनिवृत्त होऊन, मनुष्य-प्रजोत्पादन थांबते. मनुष्य संख्या मर्यादित होण्यासाठी निसर्ग अशाप्रकारे हातभार लावतो. मात्र हा निसर्गाचा अधिकार आहे. पण पहिला अधिकार जो बुद्धीच्या वापराने, स्त्री-पुरुषांनी सहजपणे एकमेकांमध्ये मिसळण्याचा आहे तो, माणूस अमलात किती आणतो आणि बंधनात किती टाकतो, यावर स्त्री-पुरुषांचा एकमेकांविषयीचा दृष्टिकोन घडतो आणि त्यावर मग त्यांच्यातील नातं, प्रेम, मैत्र, आकर्षण आणि शरीरसंबंध याचा डोलारा उभा राहतो.

अतिप्राचीन काळापासून ते इ.स.पूर्व २-३ हजार वर्षांपूर्वी पर्यंत, म्हणजे विवाहप्रथा नसण्याच्या कालखंडात, माणसामध्ये मुक्त शरीरसंबंध तर होतेच, पण त्याबरोबरीने आणि त्याशिवाय त्यांचं सहज मिसळणंसुद्धा मुक्त होतं. पुरुषांना अनेक स्त्रियांचा सहवास त्यामुळे मिळत होता, जो ‘एकाहून अनेक स्त्रियांचं सान्निध्य’ या त्यांच्या मूळ गरजेला शमविणारा होता. एकमेकांच्या अडचणीत, स्त्री-पुरुषांच्या परस्पर साहाय्यामुळे त्यांची भावनिकता समृद्ध होत होती. चरितार्थासाठी दोघांनी एकत्रित येऊन भांडीकाम, वस्त्रं, अलंकार, चित्रं-मूर्तिकाम अशी कला-कौशल्यं घडविणं, जंगलसंपत्ती मिळविण्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून भ्रमंती करणं, व्यापाराला एकत्र जाणं, श्रमपरिहारासाठी एकत्रित नृत्य-गायन-वादनाचा आनंद घेणं, यामधून पुरुषांना, स्त्री-सहवासाचा प्रत्यय बौद्धिक, भावनिक व कलेच्या अंगाने घेता येत होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी वास करणारी कामऊर्जा प्रक्षुब्ध पातळी न गाठता, सामान्य पातळीवर राहण्यास मदत होत राहिली. विवाहप्रथा रूढ होण्यापूर्वी अशा प्रकारचे मुक्त आनंद घेण्याची जीवनशैली स्त्री-पुरुषांमध्ये होती. त्या समाजात, पुरुषांमधील संघर्ष-युद्धे वगळल्यास सर्वसाधारण रोजच्या जीवनात बलात्कारासारखे लैंगिक गुन्हे आदिवासी लोकांत नसल्याचं अनेक संशोधक नोंदवतात. त्यांपैकी एक संशोधक एच. एल. देवराय आपल्या ‘ए ट्राईब इन ट्रान्झिशन’ या पुस्तकात मेघालयातील ‘जेन्शिया’ ट्राईब बद्दल लिहितात, ‘द क्राइम लाइक रेप, अ‍ॅबडक्शन, सिडक्शन आर अननोन हिअर’( पृष्ठ ४८) विवाह हा मुळातच मालमत्ताधारक पुरुषाचा वारस समजण्यासाठी, संस्कृतिप्रधान समाजात केला गेलेला प्रयत्न आहे. तो अगदी काटेकोरपणे यशस्वी व्हावा, म्हणून स्त्रियांवर पतिनिष्ठा लादताना, आपण स्त्री-पुरुषांमधील हे आवश्यक मैत्र गमावलेलं आहे. सुप्रसिद्ध युरोपियन लेखक बटरड्र रसेल, आपल्या ‘मॅरेज अ‍ॅण्ड मॉरल्स’ या पुस्तकात म्हणतात, ‘विवाहामुळे स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक प्रेमाची वाताहत झाली.’ ज्या कालखंडात स्त्री-पुरुष नातं ‘पती-पत्नी’ या रूपात प्रस्थापित झालेलं नव्हतं, तेव्हा माता-मूल आणि भाऊ-बहीण ही अतिप्राचीन नैसर्गिक नाती वगळल्यास, अन्य सर्व स्त्री-पुरुष हे ‘स्त्री-पुरुष’ या एवढय़ाच एका स्वाभाविक नाते-बंधातून जोडलेले होते. या नाते-बंधातील स्त्री-पुरुषांच्या जिव्हाळ्याला रसेल ‘नैसर्गिक प्रेम’ म्हणत आहेत, ज्याला आज ओहोटी लागलेली आहे. एका विवाहाद्वारे, चारित्र्याच्या कल्पना माजवून, सार्वजनिक जीवनात स्त्री-पुरुषांची एकमेकांपासून जी फारकत केली गेली, त्यातून त्यांना एकत्र येऊ वाटणाऱ्या, अनेक चोरवाटांनी, नंतर जन्म घेतला. त्यापैकी तमाशा, मुजरा, डान्स बार या भारतीय चोरवाटा आहेत. रेव्ह पार्टीज किंवा पब्ससारख्या पाश्चात्त्य देशांतील सार्वजनिक नृत्यालयात जोडीनं येण्याची मुभा असते, तर काही वेळेस जोडी बंधनकारकसुद्धा असते. एकूण ते स्त्री-पुरुषांचं एकत्रित नृत्य असतं, हे महत्त्वाचं.

मानवाच्या अंगात असणाऱ्या अनेक कलांपैकी, नृत्यकलेत आणि तेसुद्धा स्त्री-पुरुषांच्या सामूहिक नृत्याविष्कारामध्ये, कामवासना नियंत्रित करण्याचं सामथ्र्य सर्वात जास्त आहे. कारण यामध्ये स्त्री-पुरुषांनी एकमेकांना कवेत घेऊन नाचण्यामध्ये त्यांचा जो स्पर्श एकमेकांना होत असतो, तो स्पर्श फार महत्त्वाचा आहे. या स्पर्शामधून दोन व्यक्तींच्या भावना, त्यांची सभ्यता, विश्वास, ममत्व, संयम, हेतू, समता अशा अनेक जाणिवांचा अनुभव स्त्री-पुरुषांना प्राप्त होत असतो. स्पर्शातून माणूस जाणण्याची ही कला आहे. त्यामध्ये कामभावनेची एक लहरही शरीराला व्यापत असते. मात्र हाच स्पर्श जर पुन्हा पुन्हा मिळत राहिला, तर या कामलहरीमधील तीव्रता कमी होत जाते. स्त्री-पुरुष जितके जास्त एकमेकांना परिचित होतील, तितकी त्यांची ही कामप्रवृत्ती हळूहळू सामान्य पातळीवर येऊन, अनेकदा ती पहिल्या आवेगाइतकी, शिल्लकही राहत नाही. त्यामुळे यामागे हमखास शरीरसंबंधांची असणारी भीती हा भ्रम ठरतो. केव्हा तरी राजीखुशीने स्त्री-पुरुषांचे शरीरसंबंध होण्याच्या घटना घडू शकतात, पण आज चोरटेपणातून घडणाऱ्या शरीरसंबंधाप्रमाणे, प्रक्षुब्ध कामभावनेच्या असाहाय्य पूर्तीखातर कुणा तरुणीचा बळी घेतला गेल्याच्या त्या घटना नसतात. सार्वजनिक समूह-परिचयातून गुन्ह्य़ाचे असे धाडस नेहमी कमी पातळीवर राहतं. कारण त्यामागे स्त्रीच्या ओळखीचा गैरफायदा घेणाऱ्या वृत्तीला वाव नसतो.

‘हिट पीरियड’ नष्ट झालेल्या मानवी जीवनात, स्त्री-पुरुषांची कामभावना नियंत्रणात ठेवणारं, त्यांच्यामधील ‘स्वाभाविक मोकळेपणा’ हे महत्त्वाचं नैसर्गिक तंत्र आहे. ज्या आदिवासींमध्ये त्यांच्या उद्योगात, त्यांच्या जगण्यात, त्यांच्या मन रिझविण्याच्या विविध कलांमध्ये स्त्री-पुरुष नेहमीच एकत्र असतात, तिथे ‘डान्सबार’सारख्या खासगीपणाची तेथील पुरुषांना गरज नसते. विवाह हा आज त्यांच्यातही आहे. पण त्याचा अर्थ त्यांनी नीट समजून घेतलेला आहे. विवाह म्हणजे त्यांच्या ‘अवैवाहिक मुक्त लैंगिक जीवनाचा शेवट’, असा तो अर्थ आहे. पण विवाहित स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन काम करण्याच्या, एकमेकांना मदत करण्याच्या किंवा हातात हात घेऊन, कंबरेला विळखा घालून नृत्य-गायन करण्याच्या रिवाजाचा आदिवासींमध्ये लोप झालेला नाही. इथेसुद्धा ‘विवाह मोडून मोकळेपणा करा’ हा मुद्दा नाहीच. विवाह प्रथा टिकवूनही, आवश्यक असणारा सहज मोकळेपणा मिळण्याइतका विश्वास, आपल्या संस्कृतीप्रिय स्त्री-पुरुषांना का निर्माण करता येऊ नये, मैत्री आणि शरीरसंबंध यातील वेगळेपणा समजण्याची शिकवण का देता येऊ नये, हा इथे प्रश्न आहे.

भारतात तर विवाहाखेरीज, ‘जातिव्यवस्था’ हा फार मोठा अडथळा समाजातील स्त्री-पुरुषांनी एकत्र येण्याबाबत असतो. जातीबाहेरचे अपत्य आपल्या परिवारात येऊ नये, याची खबरदारी म्हणून तरुण पिढीच्या सामाजिक एकत्र येण्यावर सक्त पहारे भारतात आहेत. पुरुषाच्या शुद्ध पितृत्वासाठी स्त्रियांना दडपण्याचा प्रयत्न या जातिव्यवस्थेमुळेच भारतात पेचीदार झाला. त्यातून पुढे स्त्री-शिक्षणापासून ते बालविवाहापर्यंत, भारतीय स्त्रीच्या एकूण स्वातंत्र्याभोवती आणि सामाजिक संचाराभोवती फास आवळण्यात आले. यामुळे भारतीय स्त्रियांची परिस्थिती तर शोचनीय झालीच, पण ‘अनेक स्त्रियांच्या सहवासातून होणारे नर-तत्त्वाचे नियमन’ ही पुरुषांची स्वाभाविक गरजसुद्धा बंदोबस्तात गेली. विवाहाच्या आगमनानंतर आपल्या ‘जातिप्रधान’ समाजात, स्त्री-पुरुषांचे एकत्रित नृत्य-गायन आणि त्यांचे सार्वजनिक जीवनात सहकार्याने काम करणं, हे जेव्हा मधल्या शतकात पूर्णत: बंद होऊन गेलं, तेव्हा दरबारी नृत्य, कोठी-नृत्य, मुजरा, तमाशा नृत्य
असे जातीमुक्त नृत्याचे विविध फाटे भारतीय संस्कृतीला फुटले.

विशेषत: स्त्रीबरोबरीच्या एकत्रित नृत्याच्या बंदीने, भारतीय समाजाने स्त्री-पुरुष मैत्री निभावण्याची आपली सशक्त मानसिकता गमावली. स्त्रियांनी, सर्वासमोर नाचायचं, अदाकारी करायची, कटाक्ष टाकायचे आणि पुरुषांनी त्यांच्या साथीने न नाचता ते सर्व दुरून पाहायचं. स्त्री-दर्शनाने उत्तेजित होऊन, फारतर शिट्टय़ा मारायच्या, अंगावरचे शेले फेकायचे, पैसे उधळायचे आणि आपली कामऊर्जा प्रतीकात्मकरीत्या व्यक्त करण्याची पुरुषांनी अशा पद्धतीने धडपड करायची. म्हणजे काय? तर एकूण पुरुषठायी असणाऱ्या चिरंतन कामभावनेस सभ्यतेने वाट मिळवून द्यायचीच नाही, असा आपण जणू चंग बांधलेला आहे. त्याऐवजी स्त्रीचं मुखदर्शन, तिचं हास्य, तिचे इशारे, तिचे ठुमके, मुरके, तिचं होईल तितकं शरीरदर्शन, झालाच तर हस्तस्पर्श, मिळालीच तर शय्यासोबत अशा पद्धतीने स्त्री-पुरुषांमधील सहज नैसर्गिक ‘मैत्र’ दोघांनीही गमावलं आणि ते एकूण त्यांच्या कामवासनेत येऊन सामावलं. ज्या वास्तवामध्ये पुरुष कामप्रक्षुब्ध केले जातात, तर स्त्रिया त्यांच्या परिस्थितीपुढे टेकलेल्या दिसतात, अशा स्थितीत निपजलेल्या कलांचं असं अनिष्ट आणि काहीसं विकृत मनोरंजन आपल्या समाजात फोफावून रूढ झालं आहे, ज्यामुळे एकूण गुन्हेगारीही वाढत चाललेली दिसते. स्त्री-पुरुषांनी नृत्य करताना, ते एकमेकांपासून दूर असायला पाहिजेत, याचा पगडा पिढय़ान्पिढय़ा आपल्यावर एवढा आहे की, न्यायालयानेसुद्धा बारबाला नाचताना त्यांच्या भोवती ‘कुंपण’ घालण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण सध्या काही पुरुषांची परिस्थितीच अशी हाताबाहेर गेलेली आहे की, दुर्दैवाने हे उपाय, हा आपला निरुपाय म्हणून पुढे येतात; परंतु अशा प्रकारे स्त्री-पुरुष एकत्र येण्याच्या रोखाने कुणाच्या बंदीचे किंवा अडथळ्याचे आदेश आले की, प्रश्न न सुटता, ती स्थिती अधिक पॅनिक होत जाते. तेच आपल्या समाजात नित्य होताना दिसत आहे.

तमाशा फडात रमणाऱ्या पुरुषांचे, आजचे वंशज नव्या जीवनशैलीनुसार ‘डान्स बार’मध्ये हजेरी लावीत आहेत. पण म्हणून त्यामागील पुरुषांची मानसिकता बदलली आहे आणि स्त्रीच्या परिस्थितीत काही चांगल्या अर्थाने फरक पडला आहे, असं अजिबात आढळत नाही. डान्स बारमुळे तरुण बहकतात, म्हणून त्यावर बंदी आणण्याची मागणी, ज्या वेळेस जनतेकडून होत असते, तेव्हा हा विचारही इथे पुन्हा पुरुषाचाच केला जातो. त्यांच्या बहकण्याचा, व्यसनी होण्याचा, त्यांचे संसार मोडण्याचा तो विचार असतो. बारबालांच्या स्थितीचा विचार तातडीने मनात येत नाही. त्यामुळे स्त्रीच्या पोषणाचा प्रश्न तिथेच राहून तिच्या शोषणाचे प्रश्न गंभीर होतात. ) वास्तविक, पुरुष हे डान्स बारमुळे बहकत नसून, बहकलेले पुरुष डान्स बारकडे वळतात आणि त्याचे पोशिंदे होतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग हे तरुण पुरुष असे बहकलेले का असतात? आधी आपण पाहिलं की, एका बाजूला पुरुषांमध्ये सतत उत्स्फुरणाऱ्या कामभावनेला निर्दोष वाट (आऊटलेट) मिळण्यास परंपरेने निर्माण केलेले अडथळे आणि दुसरीकडे स्त्रीच्या चरितार्थाच्या न सोडवल्या गेलेल्या प्रश्नामुळे त्यांचा गैरफायदा घेण्याची पुरुषांकडे चालून आलेली आयती संधी, या स्थितीचा, एकत्रित परिणाम म्हणजे, ‘पुरुषांनी ताळतंत्र सोडून वागणं’, अर्थात ‘बहकणं’, असा होत असतो. असे पुरुष मग डान्स बारकडे वळतात. तो जबरदस्तीने बंद केल्यास, अजून दुसरी चोरटी वाट समाजात उगवून येईल, आणि तिकडे ते वाहत जातील. जोपर्यंत स्त्री व पुरुषांचे मूळ प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत पुरुष बहकणार आणि तमाशा, डान्स बार किंवा अन्य काही तत्सम प्रकार चालू राहणार आणि समाजाला पडलेला गुन्ह्य़ाचा विळखाही सुटणार नाही, हे लक्षात घेतलेले बरे.
दोन स्त्रिया, दोन पुरुष किंवा स्त्री-पुरुष यांच्यातील विश्वास आणि सौहार्द हे मानवामध्ये मानसिक स्थैर्य, स्वस्थता व आश्वासकता निपजण्यासाठी गरजेचं आहे. ज्या स्पर्शातून ही आश्वासकता मिळत असते, त्या स्पर्शाला विवाहप्रथा मर्यादा घालीत असते. सुप्रसिद्ध अमेरिकन बायोलॉजिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट डॉ. थेरेसा क्रेन्शाव या स्पर्शाबाबत लिहितात, की दोन व्यक्तींचा स्पर्श हा त्यांच्यामध्ये जिव्हाळा, ममत्व, विश्वास आणि संवेदनशीलता निर्माण करणारा असूनसुद्धा आपण ते ध्यानात घेत नाही. आपण एकमेकांना दु:खात किंवा शरीरसंबंधाच्या वेळेसच फक्त जवळ घेतो. एरवीसुद्धा एकमेकांचा हातात हात घेणं, कुरवाळणं, थोपटणं, जवळ घेणं, आलिंगन देणं या क्रियांची आपल्याला गरज असते. या स्पर्शाने मेंदूला संदेश जाऊन ऑक्सिटोसीन हे ममत्वाचं, जिव्हाळा निर्माण करणारं हार्मोन पाझरतं. दोन व्यक्तींमधील ताण, द्वेश, सूडभावना कमी होण्यास तोच एक मार्ग असतो. त्या अर्थाने, ‘टच’ या इंग्रजी शब्दाला अनुसरून डॉ. क्रेन्शाव स्पर्शाचा उल्लेख ‘टी-टॉनिक’ असा करतात. पशू-पक्ष्यांमध्येही स्पर्शातून एकमेकांना जाणून घेण्याचा, आश्वस्थ करण्याचा प्रयत्न असतो. ‘अ‍ॅनिमल बिहेवियर’ या पुस्तकात आपल्या ‘द ड्राइव्ह टू सव्‍‌र्हाइव्ह’ या प्रकरणात संशोधक पीटर मार्लर म्हणतात, ‘एकमेकांच्या हातांचा प्रेमळ स्पर्श देऊन, दोन चिम्पांझी आपल्यामधील सामाजिक बंध दृढ करतात आणि कुरापत न काढण्याचा विश्वास देतात. स्पर्शातून, एकमेकांना जवळ घेण्यातून, थोपटण्यातून चिम्पांझी स्वत:चे ताण सैल करू पाहतात आणि असं सोशल ग्रुमिंग हे एकमेकांचा सर्वार्थाने अधिक परिचय वाढवून देणारं असतं.’’ हे वास्तव मानवी जीवनाला जोडून, पीटर मार्लर म्हणतात, ‘‘असं ग्रुमिंग क्षुल्लक म्हणून जर आपण दुर्लक्षिलं, तर जगताना विविध दडपणातून अचानक ताण उद्भवून हिंसा, हत्या, विध्वंस अशी लाजिरवाणी कृत्ये करणाऱ्या गटांमध्ये मानवी समाज दुभंगत जातो.’’

स्त्री-पुरुषांच्या सार्वजनिक समूह-परिचयातून लैंगिक गुन्हे कमी होत जातात, हे खरं असलं, तरीसुद्धा त्याकरिता जबाबदारीचं भान येणं याचं महत्त्व शेवटी उरतंच. कारण निव्वळ मोकळेपणा दिला आणि त्यामागे ‘उपयुक्त विचार’ दिला नाही, तर त्या मोकळेपणाचा निर्दोष वापर करता येणार नाही. ‘टाइमपास’ सारख्या चित्रपटातून किशोरवयीन मुलांना मिळालेल्या मोकळेपणाचा चुकीचा वापर होण्याची शक्यता म्हणूनच वाढलेली दिसते. शिवाय चित्रपट आणि रियालिटी शोज मधून ‘घरबसल्या’ डान्स बारचा एक भयानक प्रयोग आपल्याकडे चालू असतो. म्हणजे जो निकोप विचार काही सहस्रकांपूर्वी होता आणि मधल्या काळात, वैवाहिक मूल्यांच्या आक्रमणातून ज्याचा संकोच होऊन गेलेला आहे, तो विचार पुनश्च प्रस्थापित झाल्याशिवाय, स्त्री-पुरुषातील मोकळेपणामध्ये आवश्यक ती सभ्यता येणार नाही. म्हणून मग गरज पुढे येते ती मुला-मुलींना ‘लैंगिकशिक्षण’ देण्याची! जे एकमेकांमध्ये मिसळण्याचे योग्य ते भान मुला-मुलींना देण्याचे उत्तम माध्यम आहे. लैंगिक शिक्षण म्हणजे अनेकांचा समज असा असतो की, ‘मूल कसं होतं’ त्याची माहिती! परंतु त्यापूर्वी या शिक्षणामध्ये स्त्री व पुरुष-शरीराची शास्त्रीय ओळख, दोघांच्या मेंदूच्या जडण-घडणीतील फरक, तसंच कामभावनेची निर्मिती आणि पूर्ती यामध्ये मेंदू व हार्मोनचं असणारं योगदान इथपासून ते एकमेकांच्या शरीराची अपरिहार्यता आणि मर्यादा, स्त्री-पुरुषांच्या कामभावनेची कमी-अधिक तीव्रता, त्याबाबतीतले स्वातंत्र्य व सभ्यता याचं महत्त्व, मानवी जीवनाच्या सातत्यासाठी लैंगिक संबंधाची असणारी नैसर्गिक गरज, त्याविषयीच्या संयमाचे फायदे, त्याकरिता एकमेकांच्या शरीराचा ठेवावा लागणारा आदर, एकमेकांच्या सोबतीत असणारी पूरकता आणि परिपूर्णता, मूल झाल्यावर तरुण-तरुणींच्या वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यं, संततीनियमनाचं महत्त्व अशा अनेक विषयांचा समावेश असणारं हे शिक्षण शालेय पहिलीपासून १२ वीपर्यंत जेव्हा क्रमाक्रमाने येईल, तेव्हा ते शिक्षण अर्थपूर्णतेने खोल झिरपेल. असं शिक्षण घेणारी पिढी ‘स्त्री-पुरुष संबंधाबाबत’ ज्या वेळेस जबाबदार व प्रगल्भ होईल, तेव्हा स्त्री-पुरुषांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती तरी विस्तारित होईल. अनेक अनिष्ट प्रथा, समजुती, अंधश्रद्धा, लैंगिक व आर्थिक शोषण, दुसऱ्याला कमी लेखण्याची किंवा गैरफायदा घेण्याची वृत्ती आणि व्यापक विषमता, या सर्वाचं क्रमाक्रमाने निवारण करण्याचं सामथ्र्य या ‘सेक्स एज्युकेशन’मध्ये कसं आहे हे त्या शिक्षणातून लक्षात येत जाईल. नृत्य हे स्त्रीने पुरुषाला दुरून रिझविण्याचं, उत्तेजित करण्याचं साधन या विचाराला मग थारा उरणार नाही. तो दोघांचाही एकत्रित उपयुक्त आनंद आहे, हे समाजाला समजत जाईल. त्याचा पुढचा परिणाम म्हणजे स्त्री-पुरुषांनी ‘मोकळं मिसळण्याकडे’ संशयाने पाहणाऱ्या समाजाचा अस्त होत जाईल आणि तेव्हा मग आपोआपच
‘डान्स बार’चा प्रश्न कायमचा सुटलेला दिसेल.

– मंगला सामंत
mangalasamant20@gmail.com