यंदाच्या पॅरालिम्पिक स्पध्रेत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री खेळाडूचा मान पटकावणाऱ्या दीपा मलिकच्या नावावर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अशी एकूण ५४ पदके आहेत. तसेच तिच्या नावावर नऊ विक्रमही आहेत. दिव्यांग असूनही इतरांपेक्षा स्वत:ला कमी न लेखता सामान्य खेळाडूंना लाजवेल अशी कामगिरी करणाऱ्या दीपाचा आदर्श समोर ठेवून जास्तीत जास्त दिव्यांगच नव्हे तर धडधाकट खेळाडूही क्रीडाक्षेत्रात चमकदार कामगिरी करत राहतील, अशी खात्री आहे.

‘हे यश माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी एक स्वप्नवत प्रवास होता. एक स्वप्न पूर्ण झाल्याचा मला अभिमान वाटतो. या यशाचा उपयोग मी भारतातील दिव्यांग स्त्रियांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी करणार आहे.’ यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पुरस्कार मिळवलेल्या दीपा मलिकचे हे उद्गार तिच्यातल्या ऊर्जेचा प्रत्यय देणारे. रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या यशापयाशी चर्चा चालू असतानाच रिओ येथेच भरलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतातील थंगवेलू मरियप्पन आणि वरुणसिंग भाटी  या दोघांनंतर दीपा मलिकने रौप्य पुरस्कार मिळवल्याची बातमी आली आणि क्रीडा क्षेत्रात, क्रीडाप्रेमींमध्ये चैतन्य पसरलं. पॅरालिम्पिक स्पर्धेतही यापुढेही प्रयत्नाच्या जोरावर भारताला अधिकाधिक भरारी घेता येणे शक्य आहे, हे या पुरस्काराच्या निमित्ताने अधोरेखित झालं. पण तरीही या पुरस्कार विजेत्यांचं आणि स्त्री खेळाडू असूनही यश मिळवणाऱ्या दीपा मलिकचं महत्त्व नक्कीच कमी होत नाही, उलट तिच्या रूपाने अनेक दिव्यांग व्यक्तींनाही स्फूर्ती मिळाली आहे. तिची ही विक्रमी कामगिरी पाहताना तिचा संघर्षही जाणून घ्यावा असाच आहे.

अर्थात, त्यापूर्वी पॅरालिम्पिक स्पर्धा म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. दिव्यांग खेळाडूंसाठी पॅरालिम्पिक स्पध्रेचे आयोजन केले जाते. ऑलिम्पिक स्पध्रेनंतर सर्वाधिक क्रीडा प्रकारांचे आयोजन केली जाणारी पॅरालिम्पिक ही दुसरी मोठी स्पर्धा आहे. तसे पाहता दिव्यांग खेळाडूंच्या स्पर्धाना शंभर वर्षांहून अधिक इतिहास आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर दिव्यांग खेळाडूंसाठीच्या स्पर्धाच्या आयोजनात वाढ झाली. युद्धात जखमी झालेले सैनिक आणि नागरिकांना जगण्यासाठी ध्येय मिळावे, यासाठी या स्पर्धाचे आयोजन करण्यात येत होते. १९४४ मध्ये ब्रिटिश सरकारच्या विनंतीनंतर डॉक्टर लुडविंग गटमन यांनी ग्रेट ब्रिटनमध्ये रुग्णालयाची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी जखमी किंवा शारीरिक अपंगत्व आलेल्यांना खेळांची ओळख करून दिली. २९ जुलै १९४८ च्या लंडन ऑलिम्पिक स्पध्रेत

डॉ. गटमन यांनी व्हीलचेअरवर असलेल्या रुग्णांसाठी पहिल्यांदा स्पध्रेचे आयोजन केले. त्या स्पध्रेला त्यांनी ‘स्टोक मँडेव्हील गेम्स’ असे नाव दिले. युद्धात दिव्यांग झालेल्या १६ माजी सैनिकांनी यामध्ये भाग घेतला. त्यात एक स्त्री खेळाडूही होती. १९५२ मध्ये या चळवळीत नेदरलँड्सच्या माजी सैनिकांनीही सहभाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय स्टोक मँडेव्हील गेम्स संघटनेची स्थापना झाली. याचे नंतर पॅरालिम्पिक स्पध्रेत नामकरण झाले. १९६० मध्ये रोम येथे पहिल्यांदा पॅरालिम्पिक स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये २३ देशांतील ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यानंतर दर चार वर्षांनी या स्पध्रेचे आयोजन करण्यात येते. ‘दिव्यांग असलो तरी आम्हाला कमी लेखू नका, सामान्यांप्रमाणे आम्हालाही जगण्याचा समान हक्क आहे.. अडगळीत टाकलेल्या वस्तूंप्रमाणे वागणूक देऊ नका,’ असे ठणकावून सांगत रिओ येथील पॅरालिम्पिक स्पध्रेत एकूण १६३ देशांच्या ४३५९ खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये स्त्री खेळाडूंचेही प्रमाण अधिक आहे. समाजाच्या चौकटीत स्त्रियांना आजही दुय्यम स्थान आहे. खेळाडू स्त्रीचा स्वीकार तर फारच नंतरची बाब. ऑलिम्पिक स्पर्धेत साक्षी मलिक आणि पी व्ही सिंधूला पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या मुलाखतीतून ते दिसलंच. असं असताना एखाद्या दिव्यांग स्त्रीला खेळाडू म्हणून किती प्रोत्साहन मिळेल ही शंकाच होती. तरीही रिओ दी जानिरो येथे पार पडलेल्या यंदाच्या पॅरालिम्पिक स्पध्रेत भारताच्या तिघींनी, दीपा मलिक, पूजा खन्ना (तिरंदाजी) आणि करमज्योती दलाल (थाळीफेक) यांनी सहभाग घेतला हेही नसे थोडके. या स्पध्रेत भारतीय दीपाने रौप्यपदकाची कमाई करून ऐतिहासिक झेप घेतली आहे. अनेक दिव्यांग स्त्रियांसाठी आदर्श ठरली आहे. पॅरालिम्पिक स्पध्रेत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान तिने पटकावला आणि भारताची मान उंच झाली.

दीपाला वयाच्या आठव्या वर्षी पाठीच्या कण्याला गाठ आल्याने अर्धागवायूचा झटका आला होता. त्यानंतर २६व्या वर्षी पुन्हा असाच झटका आला. त्या वेळी शस्त्रक्रिया करून ही गाठ काढावी आणि शरीराच्या अध्र्या भागाला पक्षाघात होऊ द्यावा किंवा तिला वाढू देत मरणाची प्रतीक्षा करावी, हे दोन पर्याय तिच्याकडे उरले होते. तिने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेचा भाग म्हणून दीपाच्या पायावर तब्बल १८३ टाके घालण्यात आले. तिचे पती कर्नल बिक्रम सिंग मलिक आणि वडील कर्नल बी. के नागपाल सैन्यात होते. त्यामुळे कठीण प्रसंगाशी कसा मुकाबला करायचा याची जाण तिला होती. म्हणूनच छातीखालील भाग निकामी होऊनही दीपाने जगण्याची इच्छा सोडली नाही. नकारात्मक भावनांना मनात घर करू दिले नाही. या व्याधीवर मात करण्यासाठी दीपाने जलतरणपटू बनण्याचा निर्णय घेतला. तिला महाराष्ट्र पॅरालिम्पिक क्रीडा संघटनेने स्पध्रेत सहभाग घेण्यास प्रवृत्त केले आणि त्यानंतर दीपाचा क्रीडा क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेतल्यावर तिचा आत्मविश्वासही वाढला आणि २००६ पासून तिने भालाफेक व गोळाफेक क्रीडा प्रकाराच्या सरावाला सुरुवात केली. या वाटचालीत कुटुंबाची आणि दोन मुलींची जबाबदारीही तिने समर्थपणे पेलली. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्य़ात कुटुंबाच्या आर्थिक उदरनिर्वाहासाठी हॉटेल व्यवसायही सुरू केला होता, परंतु २०१०च्या राष्ट्रकुल स्पध्रेच्या तयारीसाठी तिला हॉटेल बंद करावे लागले. त्या स्पध्रेत तिला गोळाफेक प्रकारात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर २०१० व २०१४ च्या पॅरा आशियाई स्पध्रेत अनुक्रमे कांस्य व रौप्यपदकाची कमाई केली. गोळाफेक क्रीडा प्रकारापर्यंत दीपा मर्यादित राहिली नाही. तिने साहसी क्रीडा प्रकारात आणि मोटार शर्यतीतही सहभाग घेतला. सुधारित मोटारगाडी चालवण्याचा परवाना मिळवणारी दीपा ही पहिली व्यक्ती आहे. २००९च्या ‘रेड दी हिमालया’ स्पध्रेत आणि २०१०च्या ‘डेसर्ट स्ट्रॉम’ स्पध्रेत तिने सहभाग घेतला होता. दिव्यांग असूनही इतरांपेक्षा स्वत:ला कमी न लेखता सामान्य खेळाडूंना लाजवेल अशी तिची कामगिरी होती. प्रबळ इच्छाशक्तीला कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा, हे तिच्या यशामागचे रहस्य होते. स्वकेंद्रित न राहता दीपाने इतर दिव्यांग स्त्रियांना प्रेरणादायी व्याख्यानं देण्यास सुरुवात केली. या व्याख्यानातून अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. जवळपास ६० दिव्यांग व्यक्तींनी गाडी चालवायला सुरुवात केली. हे शक्य झाले ते केवळ तिच्या प्रेरणेने. ‘‘२००८ आणि २०१२ च्या पॅरालिम्पिक स्पध्रेत तिला सहभागी होता आले नव्हते. मात्र रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घ्यायचाच हे तिने नक्की केले होते. स्वत: गाडी चालवत सिरी फोर्ट क्रीडा संकुलात जाणे, तीन तास सराव करणे, पुन्हा सायंकाळी घरी सराव करणे. तिची ही ऊर्जा पाहून आम्ही थक्क होतो,’’ दीपाची मुलगी देविका सांगते.

दीपाच्या नावावर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अशी एकूण ५४ पदके आहेत. तिला राष्ट्रपती रोल मॉडेल पुरस्कार (२०१४), अर्जुन पुरस्कार (२०१२), महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार (२००९-१०), हरयाणाचा करमभूमी पुरस्कार (२००८) आणि महाराष्ट्राचा स्वावलंबन पुरस्काराने (२००६) गौरविण्यात आले आहे. तिच्या नावावर नऊ विक्रमही आहेत. यामध्ये भालाफेकीचा आशिया स्पध्रेचा भालाफेकीतील तीन राष्ट्रीय विक्रम, जलतरणातील तीन राष्ट्रीय विक्रम, गोळाफेक, भालाफेक व थाळीफेक याचा विश्वविक्रमही तिच्या नावावर आहे. रिओतील विजयानंतर दीपाने स्त्रियांना ‘स्वप्न पाहण्याचे धाडस करा व त्यासाठी अथक मेहनत घ्या’, असे आवाहन केले आहे. तिच्या या आवाहनाला प्रेरणा  मानून अनेक महिला खेळाडू पुढे येतील आणि पॅरालिम्पिक स्पध्रेत भारतातील महिलांची संख्या वाढेल, ही अपेक्षा..

स्वदेश घाणेकर

swadesh.ghanekar@expressindia.com   

8
सुवर्णपदक विजेती तात्याना

द्विशाखी कंटकासह (स्पाइना बिफिडा) जन्मलेल्या रशियाच्या तात्याना मॅकफॅड्डेनचा प्रवासही प्रेरणादायी आहे. पाठीच्या कण्यातील गॅपमुळे तिच्या कंबरेखालच्या भागात काहीच संवेदना जाणवत नव्हत्या. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिच्यासाठी व्हीलचेअर विकत घेणेही तिच्या कुटुंबीयांना परवडणारे नव्हते, शेवटी त्यांनी तिला अनाथाश्रमात टाकले. व्हीलचेअरविना सहा वष्रे तिने अनाथाश्रमात घालवली. कंबरेखालचा भाग पूर्णत: निकामी झालेल्या तात्यानाला फारशी हालचाल करता येत नव्हती, तरीही ती इतर मुलांच्या मदतीने चालणे शिकली. १९९४ मध्ये अमेरिकेतील आरोग्य विभागाचे आयुक्त देबोराह मॅकफॅड्डेन अनाथाश्रमात आले असता त्यांनी तात्यानाला दत्तक घेतले. त्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली, तिला व्हीलचेअर देण्यात आली आणि तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. पण, खेळाडू बनण्याचा तिचा मार्ग सोपा नव्हता. शारीरिक तंदुरुस्तीसोबतच अनेक अडचणींवर मात करत ती क्रीडा क्षेत्राकडे वळली. बास्केटबॉल, जलतरण, आईस हॉकी, स्कुबा डायव्हिंग आदी क्रीडा प्रकारात नशीब आजमावण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र, ती व्हीलचेअर शर्यतीच्या प्रेमात पडली. २००४ च्या अ‍ॅथेन्स पॅरालिम्पिक स्पध्रेत तिने प्रथम सहभाग घेतला. त्यावेळी अमेरिकी संघातील सर्वात तरुण खेळाडू होती. दोन पदकांसह ती मायदेशी परतली. पुढील दोन वर्षांत तिने विश्व अजिंक्यपद स्पध्रेत १०० मीटर शर्यतीत विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्णपदक जिंकले. तिची पदकांची भूक वाढत गेली. २००८ आणि २०१२च्या पॅरालिम्पिक स्पध्रेत त्याची प्रचीती आली. तर २०१३च्या विश्व अजिंक्यपद स्पध्रेत तिने चक्क सहा सुवर्णपदकं जिंकून इतिहास घडविला. रिओ पॅरालिम्पिक स्पध्रेत तात्यानाने महिलांच्या ‘टी ५४’ – ५००० मीटर शर्यतीत ११ मिनिटे ५४.०७ सेंकदाची विक्रमी वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. ४ बाय ४०० मीटर टी ५३/५४ रिले प्रकारातही तिने अमेरिकेला रौप्यपदक जिंकून देण्यात सहकार्य केले. कुटुंबाने नाकारलेल्या तात्यानाला आज जगाने आपलंसं केलं आहे, ते तिने स्वकर्तृत्वावर मिळवलंय.

 

नेदरलँड्सच्या मार्लोन व्हॅन ऱ्हीजनला जन्मजात दोन्ही तळपाय नव्हते. ब्लेड वुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूने पॅरालिम्पिक स्पधेच्या २०० मीटर ‘टी ४४’ प्रकारात लंडन पाठोपाठ रिओतही जेतेपद पटकावून इतिहास घडविला. २००९ मध्ये तिने जलतरण स्पर्धामध्ये

2
सुवर्णपदक विजेती मालरेन

सहभाग घेण्यास सुरुवात केली. तिने जागतिक तसेच युरोपियन स्पध्रेत अनेक जेतेपदही जिंकली आहेत. तसेच तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रमांचीही नोंद आहे. मात्र, जलतरण क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळत नसल्याने तिने धावपटू बनण्याचा निर्णय घेतला. २०१० मध्ये तिने अ‍ॅथलेटिक्समध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. पहिल्याच पॅरालिम्पिक स्पध्रेत तिने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले, तर १०० मीटर प्रकारात तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

 

 

 

10
सर्वाधिक वयस्कर खेळाडू एलिझाबेथ कोस्मॅला

वय वष्रे ७४. पॅरालिम्पिक स्पर्धा १२.९ सुवर्णपदकांसह १३ पदके, ऑस्ट्रेलियाच्या नेमबाज एलिझाबेथ कोस्मॅलांची ही झेप. पॅरालिम्पिक स्पध्रेत सर्वाधिक वयस्कर खेळाडूचा मान त्यांनी पटकावला आहे. कंबरेखालच्या भागाची हालचाल करू न शकणाऱ्या एलिझाबेथ यांनी १९७२ च्या पॅरालिम्पिक स्पध्रेत जलतरण प्रकारातून पदार्पण केले. त्यानंतर नेमबाजीकडे वळत त्यांनी पदकांचा पाऊस पाडला. एलिजाबेथ रिओत पदक जिंकण्यासाठी प्रयत्नशील होत्या. मात्र, त्यांना यंदा अपयश आले.

 

 

 

9
सुवर्ण-कांस्यपदक विजेती एलिझाबेथ मार्क

अमेरिकेच्या सैन्यदलात कार्यरत असलेल्या एलिझाबेथ मार्कला इराक दौऱ्यावर असताना गंभीर दुखापत झाली. वयाच्या २५व्या वर्षी झालेल्या या दुखापतीत तिच्या नितंबाला गंभीर जखम झाली आणि १८ महिन्यांत तिच्यावर चार शस्त्रक्रिया झाल्या. मृत्यूच्या जबडय़ातून परतलेल्या या खेळाडूने जलतरणामध्ये दबदबा निर्माण केला. अमेरिकेतील ऑलिम्पिक समितीने जानेवारी महिन्यात पार पडलेल्या पॅरालिम्पिक जलतरण राष्ट्रीय संघात मार्कचा समावेश केला. रिओ पॅरालिम्पिक स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या अकरा खेळाडूंमध्ये तिचा समावेश करून तिला प्रशिक्षण देण्यात आले. सरावादरम्यान तिने आपले सैन्यातील कर्तव्यही बजावले. सुरुवातीला तरणतलावात सराव करताना तिला प्रचंड वेदना होत असत, परंतु न खचता तिने टप्प्या टप्प्याने आपला सराव सुरूच ठेवला. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातील विश्वविक्रम मार्कच्या नावावर आहे, तसेच अमेरिकन आणि पॅन अमेरिकन २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकचा विक्रमही (३:१७.८९) तिने मोडला. जागतिक क्रमवारीत १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ती अव्वल स्थानावर आहे. कर्तव्यावर असताना झालेल्या अपघाताविषयी चर्चा करणे तिला आवडत नाही. देशसेवेत आलेले अपंगत्व तिने हसून स्वीकारले आहे आणि अजूनही ती देशसेवेसाठी तत्पर असते. रिओ पॅरालिम्पिक स्पध्रेत १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी७ प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावले, तर ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात कांस्यपदक जिंकले ते तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर.

 

स्वदेश घाणेकर

swadesh.ghanekar@expressindia.com