‘‘कैदी या घटकाकडे नकारात्मक भावनेने पाहिले जाते. ही ‘निगेटिव्ह फोर्स’ आहे, पण ती ‘क्रिएटिव्ह’देखील आहे. कसलेले गुन्हेगार ज्या सराईतपणे गुन्हे करतात किंवा टोळी चालवतात त्यासाठी अनेक कौशल्ये असावी लागतात. आपण साधे कुणाला रागावून बोललो तरी दिवसभर तोच विचार मनात घोळत राहतो. मग निर्ढावलेल्या पद्धतीने गुन्हे करण्यास किती ‘जिगर’ लागत असावी! ही नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेकडे वळवणे ही तुरुंग अधिकाऱ्यांची भूमिका असायला हवी. एकाच वेळी नियम पाळायचे आणि त्याच बरोबरीने समोरच्या माणसातला ‘माणूस’ पुन्हा जागवायचा अशी ही कसरत असते.’’

पोलीस दल आणि कारागृह विभाग एकच असतो, असे नागरिकांना वाटते. पण ते खरे नाही. कारागृह व्यवस्थापन हा खूप वेगळा भाग असतो. ही एक प्रकारची ‘ह्य़ूमन मॅनेजमेंट’ आहे. माणसांना सांभाळताना आणि त्यातही कारागृहात असलेल्या माणसांना सांभाळताना तुम्ही संवदेनक्षम असणं गरजेचं असतं. एकाच वेळी शिस्त व नियम पाळायचे आणि त्याचबरोबरीने समोरच्या माणसातला ‘माणूस’ पुन्हा जागवायचा अशी ही कसरत असते. ही सगळी भूमिका फार संवेदनशील राहून बजावावी लागते. याच वेळी तुम्हाला तुमचं असं वैयक्तिक आयुष्य असते. त्या आयुष्यातील जबाबदाऱ्याही कुठे गल्लत न होता निभावायच्या असतात. दिवसभराच्या कामानंतर घरी जाताना ‘जेलर’ म्हणून जाऊन चालत नाही. तिथे तुमचे ‘आई’ किंवा ‘वडील’ असणेच अपेक्षित असते. यामुळेच कदाचित स्त्रियांना हे काम उत्तम जमू शकते असे मला वाटते.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा
lokmanas
लोकमानस: सरकारचे घुसखोरीला प्रोत्साहन?

कारागृह खात्यातच येण्याचे मी आधी ठरवले नव्हते, पण लहानपणापासूनच मला गणवेशाचे अप्रूप होते. सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी साचेबद्ध नोकरी करायची नाही, हे तर मनात होतेच. वेगळे काही शिकावे म्हणून मी ‘क्रिमिनॉलॉजी’मध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली. ते करताना कारागृहांना भेटी द्याव्या लागल्या. पोलीस खात्यापेक्षा कारागृह खात्यात काम करणे जास्त आव्हानात्मक आहे असे वाटले आणि मग मी ठरवून या खात्यात आले. माझ्या आई-वडिलांनीही मला कोणताही विरोध केला नाही. त्यांच्या महत्त्वाकांक्षा माझ्यावर कधी लादल्या नाहीत. माझ्या सेवेतील ‘स्टेकहोल्डर’ म्हणजे कैदी. १९९५ मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन मी कारागृह उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हा महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात कारागृह सेवेमध्ये निवड झालेली मी पहिली स्त्री होते. त्यामुळे माझ्यासाठी तो पहिलाच प्रयोग असल्यासारखा होता. एका स्त्री अधिकाऱ्याला कैदी कसे स्वीकारतील ही एक धास्ती सुरुवातीला मनात होती. पण आज एकवीस वर्षांच्या अनुभवानंतर मी ठामपणे सांगू इच्छिते की, लिंग, धर्म, जात याने इथे कुणाला काहीही फरक पडत नाही. अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसणाऱ्याकडे ते ‘पालक’ म्हणून पाहतात, असा माझा अनुभव आहे. स्त्री अधिकाऱ्याला स्वीकारण्याचा प्रश्न मला उलट माझ्या सहकाऱ्यांकडून जास्त जाणवला. शेवटी तुमची कार्यक्षमता तुम्ही कशी सिद्ध करता, आव्हानांना कसे तोंड देता, सेवेच्या प्रति तुमची निष्ठा किती आहे, हे या सेवेत सर्वात महत्त्वाचे.

कारागृहाच्या नोकरीत नवीन असताना समोर येणाऱ्या अवघड प्रसंगांमधून खूप शिकायला मिळते. आपली संवेदनशीलता टिकवून ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हेही प्रकर्षांने जाणवले. साताऱ्यात मला पहिली नेमणूक मिळाली होती. तिथे पोलिसांनी एका देहविक्रय करणाऱ्या बाईला पकडून आणले. ती फार अस्वस्थ दिसत होती, सारखी आत्महत्या करण्याची धमकी देत होती आणि हा प्रसंग हाताळणारी मी अगदीच अननुभवी होते. पोलीस सहकाऱ्यांकडे चौकशी केल्यावर तिच्याकडे मी फार लक्ष देऊ नये, असा सल्ला मिळाला. पण मी तिच्याशी बोलण्याचा आग्रह धरला. नवरा नसल्यामुळे तिने चरितार्थासाठी देहविक्रय करायला सुरुवात केली होती. घरी दोन लहान मुले आहेत आणि त्यांच्याकडे पाहणारे कुणी नाही, हे ती पुन:पुन्हा सांगत होती. तिला घरचा पत्ताही नीट सांगता येत नव्हता. नियमानुसार कैद्याला न्यायालयीन कामकाज आणि वैद्यकीय उपचारांसाठीच बाहेर काढता येते. शिवाय मुलांना न्यायालयीन वॉरंटनुसारच आणावे लागते. मग न्यायालयाला परिस्थिती सांगून आम्ही तिला पोलीस पहाऱ्यात बाहेर काढले आणि तिच्या घरी गेलो. तिची दोन्ही मुले अगदीच लहान, सहा वर्षांच्या आतली होती आणि आई कधी परत येतेय याची वाट बघत बसली होती. आम्ही त्या मुलांना ताब्यात घेतले व दुसऱ्या दिवशी न्यायालयाला तसे सांगितले. खरे पाहता आम्ही एक नियम मोडला होता. पण न्यायालयाने तो प्रसंग समजून घेतला. कागदोपत्री काम पूर्ण करण्यात आले आणि त्या मुलांना तिच्याबरोबर रहाण्याची परवानगी देण्यात आली. विविध माणसांचे असे असंख्य अनुभव हे काम करताना गाठीशी येतात आणि जगणे शिकवून जातात.

मी अगदी नवीन असताना आमच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान फाशीच्या ठिकाणी हजर राहावे लागले. पुरुष असो किंवा स्त्री, फाशी प्रत्यक्ष बघणे हा अनुभव कुणाहीसाठी कठीणच. त्यामुळे माझ्यासाठीही तो अवघड होता, पण जेव्हा आपण एखादी नोकरी स्वीकारतो तेव्हा त्यातील प्रत्येक गोष्ट स्वीकारावी लागतेच, हा पहिला धडा या प्रशिक्षणातच मिळाला आणि तो मनावर कायमचा ठसला.

आणखी एक महत्त्वाचा अनुभव या संपूर्ण कामाच्या दरम्यान मी घेतला तो म्हणजे मानसिकतेचा. कैदी या घटकाकडे कायमच आणि सगळ्याच स्तरांवरून नकारात्मक भावनेने पाहिले जाते. पण ही ‘निगेटिव्ह फोर्स’ वा नकारात्मक ताकद ‘क्रिएटिव्ह फोर्स’देखील असते. कसलेले गुन्हेगार ज्या सराईतपणे  गुन्हे करतात किंवा टोळी चालवतात त्यासाठीही अनेक कौशल्ये असावी लागतात. हे येरागबाळ्याचे काम नाही. आपण साधे कुणाला रागावून बोललो तरी दिवसभर तो विचार मनात घोळत राहतो. मग निर्ढावलेल्या पद्धतीने गुन्हे करण्यास किती ‘जिगर’ लागत असावी! ही ‘निगेटिव्ह’ असली तरी ऊर्जाच आहे. ही ऊर्जा सकारात्मकतेकडे वळवणे ही तुरुंग अधिकाऱ्यांची भूमिका असायला हवी. कायद्याचा भंग केलेल्या, चुकलेल्या माणसाच्या हाताला आणि मनालाही काम देणे, त्याच्या विचारांना चांगले वळण लावून पुन्हा समाजामध्ये पाठवणे हे फार नाजूक आणि पूर्ण समर्पणाने करायचे काम आहे आणि ते होऊ शकते हा माझा अनुभव आहे. त्याच मुळे या क्षेत्रात आल्याचे समाधानही मिळते.

मुळात कैदी ज्या पद्धतीने जगतात तेच आपण समजून घेत नाही. एखाद्या दिवशी समजा आपल्याला सांगितले, की तुम्ही तुमच्या खोलीच्या बाहेर पडायचे नाही, तुम्ही पूर्णत: बंदिस्त असाल तर काय होईल? त्या कल्पनेनेसुद्धा  गुदमरायला होईल. मनुष्यप्राण्याला सर्वात प्रिय काही असेल तर ते त्याचे स्वातंत्र्य. एखादा कैदी जन्मठेप होऊन कारागृहात येतो, अनेक वर्षे चार भिंतींमध्ये राहतो. ही कल्पना त्याच्या दृष्टीने भयंकरच असते. संचित (पॅरोल) आणि अभिवचन रजांवर (फरलो) खूप टीका होते. पण या रजा हा त्या कैद्याला पुन्हा समाजात स्थापित  होण्याचा चांगला मार्ग आहे, असे मला वाटते. आपण कारागृहाबाहेरची मंडळी सतत कार्यरत असतो. ऑफिसला जायचे आहे, कामात आणखी ‘आऊटपुट’ द्यायचे आहे, असे सतत ‘बिझी’ असतो. किंबहुना सतत व्यग्र राहिल्यानेच आपण नीट जगू  शकतो. उलट रिकामे बसून राहावे लागते तेव्हा मनात ना-ना तऱ्हेचे विचार येतात. ‘रिकामे मन सैतानाचे घर’ हे म्हणूनच म्हणत असावेत. एखाद्याला वीसेक वर्षांनी कारागृहाबाहेर सोडले तर त्याला रस्तादेखील ओलांडता येणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे कैद्यांना सतत नवीन उपक्रम देणे, गुंतवून ठेवणे फार गरजेचे आहे. त्यात त्यांना पगार किती मिळतो ही गौण बाब आहे. जो तांत्रिक कौशल्ये शिकतो त्याला रोजगार मिळणे तुलनेने कमी अवघड जाते. त्यामुळे ही तांत्रिक कौशल्ये देणे, शिक्षण देणे आणि त्याच वेळी त्या व्यक्तीचे मन चांगले करण्यासाठी प्रयत्न करणे असे तिहेरी काम कारागृहात सुरू असते.

कोल्हापूर येथे नेमणूक असताना आम्ही घाडगे-पाटील यांच्याबरोबर पब्लिक प्रायव्हेट भागीदारीमध्ये फाऊंड्री सुरू केली. ‘मी काही तरी करू शकतो’ हे समाधान मी त्यात कैद्यांच्या चेहऱ्यावर पाहिले. तिथे काम करताना दिले जाणारे गमबूट, टोप्या, चष्मे या गोष्टींचेही प्रचंड अप्रूप त्यांना वाटत होते. इतर कामगारांसारखीच वागणूक आम्हाला मिळते आहे, ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मी बाहेर जाऊन काम करू शकेन हा आत्मविश्वास त्यांना मिळाला. नाशिकला रुजू झाल्यावर मी येवल्याच्या पैठणीचे माग फिरून पाहिले. त्यात खूप सर्जनशीलता दिसली आणि म्हणूनच कैद्यांसाठी ते काम सुरू करण्यात आले. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात कैद्यांनी वळलेले लाडू पुरवणे हा उपक्रमही लक्षवेधी ठरला. ती फक्त रोजगारनिर्मिती नव्हती. तो एक प्रकारचा सामाजिक बदल होता. कैदी लाडू कसे करणार, ते अस्वच्छ असतील, असा वाद त्या वेळी उभा राहिला होता. पण आमचे कैदी अतिशय स्वच्छ वातावरणात, नखे, केस कापून, अ‍ॅप्रन आणि टोपी घालून लाडू वळतात. आणखी काय शुद्घता हवी? या लाडू वळणाऱ्या स्त्री-कैद्यांपैकी एक जण म्हणाली, ‘आता मला देवाने स्वीकारले आहे. जग काय म्हणेल याचे आता काही वाटत नाही.’ मी महत्त्वाचा (किंवा महत्त्वाची) आहे ही भावना त्यांच्यात निर्माण होणे हा या उपक्रमांचा उद्देश असतो आणि असायला हवा.

सामान्यांना कारागृहाची ओळख होते ती चित्रपटांमधून. ती बऱ्याचअंशी चुकीची असते असे मला वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या मापदंडांवर आमची सर्व कारागृहे पात्र ठरतात. कारागृहाचे स्वत:चे असे ठरलेले ‘शेडय़ूल’ असते. सामान्यांच्या आयुष्यात नसेल इतके हे शिस्तीचे जीवन असते. पण कैदी हा समाजाचाच एक घटक असल्याचेही लक्षात घ्यायला हवे. समाजात जशी भांडणे, बाचाबाची, कधी मारामाऱ्या होतात, तशा त्यांच्यातही होतात. समाजात असते तशीच गटबाजीही काही प्रमाणात असते. पण चित्रपटात जसे भयंकर चित्र उभे केले जाते तसे हे जग नक्कीच नसते. तरीही सुधारणा ही बाब प्रत्येक कैद्याच्या बाबतीत शक्य असतेच असेही नाही. अतिशय गंभीर गुन्ह्य़ातील कैदी, गुन्हेगारी टोळ्यांमधील कैदी, आतंकवादी यांच्या बाबतीत ते करता येत नाही. त्यांच्यासाठी शिस्त हाच प्रमुख मार्ग वापरावा लागतो. हे लोक जसे बाहेरच्या जगावर सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तसेच कारागृह व्यवस्थाही आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करतात. तिथे आमचा खरा कस लागतो.

आर्थर रोड कारागृह हे असे एक वेगळेच जग आहे. सामान्यांसाठी तो फार कुतूहलाचा विषय असतो. सुधारणांचे उपक्रम अशा ठिकाणी समांतर पातळीवर चालवावे लागतात. अधिक आव्हानात्मक कैद्यांना सांभाळणे हे तिथले प्रमुख काम असते. त्यामुळे शिस्त आणि सुरक्षा हा तिथे पहिला अजेंडा ठेवावा लागतो. तिथे घालवलेल्या पाच वर्षांत धमकीचे फोन, माझ्या समोरच्या लोखंडी दारावर गोळीबार असे विविध अनुभव मी घेतले आहेत. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यास अशा वेळी वरिष्ठ अधिकारी आणि शासनाचाही पाठिंबा मिळतो.

गुन्हेगारांचे जग भले बेकायदेशीर आहे, पण ते खूप पद्धतशीरपणे चालवत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुन्हेगार कैद्याच्या कुटुंबीयांची देखभाल त्याच्या उर्वरित टोळीकडून फार चांगल्या प्रकारे केली जाते. आपण किती वेळा आपल्या सहकाऱ्यांची अशी काळजी घेतो? आपल्या हाताखालच्या लोकांची कधी विचारपूस करतो? यातूनच एक ‘टीम’ म्हणून काम करण्याचा उत्साह येत असतो. ‘निगेटिव्ह फोर्स’कडून अशा काही सकारात्मक गोष्टी आपल्यालाही शिकण्यासारख्या आहेत.

सध्या मी पुणे येथे कारागृह महानिरीक्षक (पश्चिम विभाग येरवडा पुणे) म्हणून  कार्यरत आहे. गेली २१ वर्षे या तुरुंगाधिकारी म्हणून, वेगळी नोकरी करताना एक  नक्की जाणवतं की अशा नोकरीचा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो. पण त्यावर मार्गही आहेत. आपल्या नोकरीमुळे आपण कोणत्या कौटुंबिक आनंदांना मुकू शकतो हे एकदा स्वीकारले की, त्याचा बाऊ केला जात नाही. मला कदाचित कुटुंबातील एखाद्या लग्नाला जाता येणार नाही, समारंभांना हातभर मेंदी काढता येणार नाही या गोष्टी मी स्वीकारल्या आहेत. कुटुंबीयांच्या आपल्याकडून अपेक्षा असणे साहजिक आहे, परंतु मग जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा त्यांना जास्तीत जास्त वेळ देणे हे करता येते. माझ्या कुटुंबाने मला कायम पाठिंबा दिला. कसाबचा खटला न्यायालयात उभा राहिला तेव्हा मी ऑर्थर रोड तुरुंगात नेमणुकीस होते. माझी मुलगी दहावीला होती. तिच्या परीक्षेच्या वेळी सुट्टी मिळावी असा अर्ज मी केला होता. तो अपेक्षेप्रमाणे नामंजूर करण्यात आला. मी जेव्हा घरी जाऊन मुलीला हे सांगितले तेव्हा तिने अगदी सहजपणे माझे हात हातात घेतले आणि म्हणाली, ‘ममा, कंट्री फर्स्ट!’ तिने उत्तम अभ्यास केला आणि छान गुण मिळवले. कुटुंबीयांनी असे एकमेकांना समजून घेणे फार गरजेचे आहे. त्यामुळेच खरे तर हा संपूर्ण प्रवास मी निर्भयतेने करू शकले आणि पुढेही करत राहीनच..

गुन्हेगारांचे जग भले बेकायदेशीर आहे, पण ते खूप पद्धतशीरपणे ते चालवत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुन्हेगार कैद्याच्या कुटुंबीयांची देखभाल त्याच्या उर्वरित टोळीकडून फार चांगल्या प्रकारे केली जाते. आपण किती वेळा आपल्या सहकाऱ्यांची अशी काळजी घेतो? आपल्या हाताखालच्या लोकांची कधी विचारपूस करतो? यातूनच एक ‘टीम’ म्हणून काम करण्याचा उत्साह येत असतो. ‘निगेटिव्ह फोर्स’कडून अशा काही सकारात्मक गोष्टी आपल्यालाही शिकण्यासारख्या आहेत.

स्वाती साठे – कारागृह उपमहानिरीक्षक

शब्दांकन- संपदा सोवनी, प्रथमेश गोडबोले

chaturang@expressindia.com