डॉ. हर्बट बेन्सन हा तरुण हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना तपासून औषधे देत होता, ते वर्ष होतं १९६५. त्यावेळी त्याच्या असे लक्षात आले की, काही रुग्ण, औषधे सुरू केल्यानंतर ‘चक्कर येते’ असे सांगतात. हा औषधांचा साइड इफेक्ट आहे, की औषधांमुळे रक्तदाब खूप कमी होतो म्हणून असे होते, हा प्रश्न त्यांना सतावू लागला. निरोगी माणसाचा रक्तदाब  का वाढतो याचा विचार करावा असे त्यावेळी कोणत्याच डॉक्टरला वाटत नव्हते, कारण मनाचा आणि शरीराचा संबंध असतो हे आधुनिक शास्त्राला तोपर्यंत समजत नव्हते. आधुनिक वैद्यकाची प्रगती ‘शरीर आणि मन हे स्वतंत्र आहे’ या रे देकार्त या तत्त्वज्ञाच्या गृहीतकावर विसंबून झाली होती. शरीर हे यंत्र आहे, त्याचे वेगवेगळे भाग आहेत, त्यांचे सूक्ष्म विच्छेदन आणि निरीक्षण हाच रूढ संशोधनाचा मार्ग होता. शारीर अवयवांवर मनातील भावनांचा आणि विचारांचा परिणाम होतो, ही कल्पनादेखील अनेकांना वेडेपणाची वाटत होती.

डॉक्टर बेन्सन यांनी मात्र या प्रश्नाचा छडा लावायचे ठरवले. त्यासाठी बोस्टन हॉस्पिटलमधील नोकरी सोडून ते हार्वर्ड विद्यापीठात शारीरक्रिया विभागात रिसर्च फेलो म्हणून काम करू लागले. मानसिक ताण आणि रक्तदाब यांचा परस्परसंबंध ते शोधू लागले. १९६९च्या ‘अमेरिकन जर्नल ऑफ फिजिओलॉजी’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये त्याचे  हे संशोधन प्रसिद्ध झाले.

त्याच वेळी अमेरिकेत महर्षी महेश योगी यांनी रूढ केलेले भावातीत ध्यान (Transcendental meditation) लोकप्रिय होऊ लागले होते. त्याच्या साधकांना, ध्यान केल्याने आपला रक्तदाब कमी होतो असे वाटत होते; पण ते सिद्ध झाले नव्हते.

डॉ. बेन्सन यांचे प्रयोग समजल्यावर ते साधक स्वत:वर संशोधन करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे आले. त्याच वेळी कॅलिफोर्निया विद्यापीठात रॉबर्ट केथ वॅलेस भावातीत ध्यान करणाऱ्या  साधकांवर असेच प्रयोग करीत होते. डॉ. बेन्सन यांनीही साधक ध्यान करीत असताना त्यांच्या शारीरक्रिया तपासायला सुरुवात केली. नंतर दोन्ही संशोधकांनी एकमेकांचे रिपोर्ट पाहिले. त्यावेळी हे स्पष्ट झाले, की ध्यान करताना माणसाची हृदयाची गती आणि श्वासाची गती कमी होते. भावातीत ध्यानाच्या साधकांनी स्वत:वर प्रयोग करून घ्यायची तयारी दाखवली, त्यामुळेच हे संशोधन शक्य झाले.

भावातीत ध्यानाचे प्रणेते महर्षी महेश योगी हे भौतिकशास्त्राचे जाणकार. स्वामी ब्रह्मानंद सरस्वती हे त्यांचे योगाचे गुरू. त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानावर काही संस्कार करून त्यांनी ही भावातीत ध्यानपद्धती परदेशात शिकवायला सुरुवात केली.

तिथे योगशिक्षक तयार केले. हे शिक्षक त्यांच्या शिष्यांना एक खास मंत्र देतात. ध्यान म्हणजे शांत बसून या मंत्राचा एका लयीत जप करायचा. त्यावेळी मनात येणाऱ्या इतर विचारांकडे दुर्लक्ष करायचे. त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहायचे. एका आसनामध्ये वीस मिनिटे बसून ध्यानाचा सराव दिवसातून दोन वेळ करायचा. असे ध्यान दोन ते तीन वर्षे करणारे १७ ते ४१ वयाचे ‘साधक’ प्रयोगशाळेत येऊ लागले. या तपासणीमध्ये ध्यान सुरू केल्यानंतर साधकाच्या शरीरात तीन वैशिष्टय़पूर्ण बदल होतात असे आढळले : १. ध्यान सुरू केल्यानंतर शरीराकडून वापरला जाणारा ऑक्सिजन दहा ते वीस टक्के कमी होतो. जागृतावस्थेत झोपेमध्ये हे प्रमाण सहा ते आठ टक्के कमी असते. ऑक्सिजनचा वापर कमी होतो. याचाच अर्थ शरीराची चयापचय क्रिया मंद होते. झोपेमध्ये ऑक्सिजनचा वापर चार ते पाच तासांनंतर कमी झालेला आढळतो. ध्यानावस्थेत मात्र हा फरक पहिल्या तीन मिनिटांतच दिसू लागतो. २. दुसरा बदल मेंदूच्या आलेखामध्ये आढळला. ध्यानावस्थेत मेंदूतील अल्फा लहरींचे प्रमाण वाढते. अल्फा लहरी मेंदू शांतता स्थितीत असतानाच दिसतात. ३. ध्यानावस्थेत असताना रक्तातील लॅक्टेट (blood lactate) नावाचे रसायन कमी झाले. १९६७ मध्ये झालेल्या संशोधनात असे लक्षात आले होते की, रक्तातील लॅक्टेटचे प्रमाण जास्त असणारी माणसे चिंतेला जास्त बळी पडतात. ध्यान सुरू केल्यानंतर दहा मिनिटांत रक्तातील लॅक्टेटचे प्रमाण कमी होऊ लागते. याचाच अर्थ, शरीर – मन शांतता स्थितीत जाते. हार्वर्ड विद्यापीठाच्या ज्या खोलीमध्ये डॉ.बेन्सन ध्यान-साधकांवर प्रयोग करीत होते, त्याच खोलीत साठ वर्षांपूर्वी वाल्टर बी. कॅनॉन  यांनी ‘फाइट ऑर फ्लाइट रिफ्लेक्स’चा शोध लावला होता. आणीबाणीच्या परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व सस्तन प्राण्यांच्या शरीरात अँड्रेनलिनचा स्राव होतो, त्यामुळे श्वासाची आणि हृदयाची गती वाढते, कारण शरीराची ऑक्सिजनची गरज वाढते, रक्तदाब वाढतो, हातापायाच्या मोठय़ा स्नायूंकडील रक्ताचा पुरवठा वाढतो, स्नायू अधिक ताठर होतात, त्यामुळे प्राणी लढायला किंवा पळायला सक्षम होतो. हीच युद्धस्थिती!

डॉ. बेन्सन यांच्या लक्षात आले, की या युद्धस्थितीच्या विरुद्ध स्थिती शक्य आहे. तिला त्यांनी नाव दिले ‘रिलॅक्सेशन रिस्पॉन्स’ किंवा शांतता स्थिती! या स्थितीत हृदयाची आणि श्वासाची गती कमी होते, स्नायू शिथिल होतात, रक्तदाब कमी होतो. हे सर्व बदल आणि मेंदूतील अल्फा लहरी, ऑक्सिजनचा वापर कमी होणे, रक्तातील लॅक्टेट कमी होणे म्हणजेच मनाला कोणताही धोका जाणवत नाही. ते निवांत, रिलॅक्स होते आणि शरीर शांतता स्थितीत जाते. ध्यान म्हणजेच शरीर – मनाची शांतता स्थिती, रिलॅक्सेशन रिस्पॉन्स! मानसिक तणाव असताना शरीर – मन युद्धस्थितीत असते, त्यामुळे होणारे आजार बरे करायचे असतील, टाळायचे असतील, तर ‘ध्यान’ चिकित्सा म्हणून वापरता येईल, त्यांनी तसे प्रयोग सुरू केले.

नंतर डॉक्टरांच्या लक्षात आले, की केवळ भावातीत ध्यानानेच नाही, तर कोणताही एक शब्द किंवा ओळ लयबद्ध तऱ्हेने पुन: पुन्हा  म्हटल्याने, दीर्घ श्वसनाने किंवा जाणीवपूर्वक स्नायू शिथिल करण्यानेदेखील हाच परिणाम दिसून येतो. रुग्णाच्या धार्मिक श्रद्धेनुसार त्याला भावणारा शब्द वापरला तर शांतता स्थिती अधिक चांगली असते.  हिंदूंना ‘ओम’च्या जपाने ध्यानस्थिती लवकर साधते, असे मानले जाते. नास्तिक आणि कोणताच धर्म न मानणारे शांती, प्रेम (पीस,लव्ह) असे शब्द अधिक पसंत करू लागले. डॉक्टर कोणत्याच शब्दाचा आग्रह न धरता रुग्णांना ही शांतता स्थिती शिकवू लागले आणि उच्च रक्तदाब, डोकेदुखी, हृदयाचे अनियमित ठोके, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना, अति चिंता आणि नैराश्य या आजारांमध्ये चांगला लाभ दिसू लागला. या सर्व संशोधनात दहा वर्षे गेली होती. १९७५ मध्ये डॉ. हर्बर्ट बेन्सन यांनी ‘रिलॅक्सेशन रिस्पॉन्स’ याच नावाचे पुस्तक लिहिले. रुग्णांसाठी डॉक्टर बेन्सन यांनी शांतता स्थितीत येण्याचा, ध्यानाचा एक धर्मातीत, सेक्युलर फॉम्र्यूलाच तयार केला. तो असा  शांत, सुखावह स्थितीत बसा. डोळे बंद करा. पायापासून चेहऱ्यापर्यंतचे सर्व स्नायू शिथिल करा. नैसर्गिक श्वसन चालू ठेवा. तुम्हाला प्रिय असणारा, भावणारा कोणताही शब्द किंवा ‘वन’ हा श्वास सोडताना मनातल्या मनात म्हणा, त्यावर लक्ष केंद्रित करा. मनात विचार येतील, त्यांना प्रतिक्रिया देऊ नका. एकाग्रता होत नाही म्हणून निराश होऊ नका. मन भरकटले आहे हे लक्षात आल्यानंतर ‘ओ वेल’ असे स्वत:शीच बोलून पुन्हा शब्दावर लक्ष केंद्रित करा. दहा ते वीस मिनिटे असा सराव करा. त्यानंतर शब्दाचा जप थांबवा, पण डोळे उघडू नका, मिनिटभर तसेच बसून राहा. नंतर डोळे उघडून मिनिटभर बसून राहा. सकाळी नाष्टय़ापूर्वी आणि रात्री जेवणापूर्वी दोन वेळा असे ध्यान करा.

(‘ ज्ञान विज्ञान’ या मनोविकास प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील संपादित भाग.)

डॉ. यश वेलणकर

chaturang@expressindia.com