कुठल्याही दैवताची आरती करण्यापूर्वी श्रीगणेशाची आरती करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ हे गणेशाच्या आरतीचे बोल न ऐकलेला मराठी भाषक भक्त दुर्मीळच म्हणावा लागेल. ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही समर्थ रामदासांची किंवा ‘नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रे’ व ‘शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको’ या गोसावीनंदनांच्या आरत्या सर्वपरिचित आहेत; परंतु त्याखेरीज गणपतीच्या सुमारे पस्तीस आरत्या उपलब्ध आहेत. त्या आरत्यांमध्ये केवळ एकच काकडआरती आहे व ती मोरया गोसावी यांची आहे. -गणपतीची आरती यावरचा हा विशेष लेख गणेश चतुर्थीनिमित्ताने.

आरती हा ईश्वराच्या सगुण उपासनेमधील एक नित्याचा आचार आहे. पूज्य दैवताच्या पूजनाचा संकल्प, दैवताचे आवाहन, पूजन, पुष्प-नैवेद्य हे उपचार पूर्ण झाल्यावर, धूप-दीप यांनी आरती केली म्हणजे पूजेची परिसमाप्ती झाल्याचे समाधान भक्ताला लाभते. प्रात:काळी, आपल्या इष्ट दैवताला जागे करण्यासाठी म्हणावयाच्या काकडआरतीपासून तर देवाला निजवताना म्हणावयाची शेजारती व या दोन्हींच्या मध्ये सकाळची पंचामृतपूजा, माध्यान्हपूजा आणि सायंकाळची अपरान्हपूजा या वेळी देवाला ओवाळताना म्हणावयाची आरती पूज्य-पूजक यातील दुवा ठरते. टाळ, मृदंग, पखवाज किंवा समूहाने तालात वाजविलेल्या टाळ्या व आरतीतील लय यातून सहजच भक्तमनाची एकाग्रता साधली जाते!

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
young man committed suicide as he did not want to marry
खळबळजनक! लग्न करायचं नसल्याने नवरदेवाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मामाला…
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

कुठल्याही दैवताची आरती करण्यापूर्वी श्रीगणेशाची आरती करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ हे गणेशाच्या आरतीचे बोल न ऐकलेला मराठी भाषक भक्त दुर्मीळच म्हणावा लागेल. ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही समर्थ रामदासांची किंवा ‘नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रे’ व ‘शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको’ या गोसावीनंदनांच्या आरत्या सर्वपरिचित आहेत; परंतु त्याखेरीज गणपतीच्या सुमारे पस्तीस आरत्या उपलब्ध आहेत. त्या आरत्यांमध्ये केवळ एकच काकडआरती आहे व ती मोरया गोसावी यांची आहे. ‘सत्त्व-रज-तमात्मक काकडा केला। भक्तिस्नेहेयुक्त ज्ञानाग्निवर चेतविला’ अशा काकडय़ाने हा कवी ‘सिद्धिबुद्धिनायका’ची ‘अहं सोहं’चे टाळ वाजवीत आरती करतो. आरती गायनात एकाग्र झालेल्या भक्ताचे रूप या काकडआरतीतून उमटते. आरती करता करता अनुहत ध्वनी ऐकू आल्याचा व परमपुरुष पाहिल्याचा अनुभव मोरया गोसावींनी व्यक्त केला आहे. चिंतामणी या आरतीकारांनी ‘झडकरी उठी स्वामी येई लवकरी’ अशी सुरुवात करून आरतीत गणेशाच्या दिवसभराच्या पूजाविधींचे वर्णन केले आहे व ‘ऐसे शेजेवरी पहुडले गणपती’ इथवरची गणेशसेवा शब्दांतून मांडली आहे.

माणिकदास, मोरया गोसावी, वासुदेव, वसुदेव, विठ्ठलसुत, चिंतामणी, राघव, पंडित रामात्मज, जनपंडित, शामराज, मौनी, हनुमंत, दास, रविदास, श्रीदास, दासविनायक अशा नाममुद्रा असलेल्या आरत्यांबरोबर काही नाममुद्रा नसलेल्या आरत्याही आहेत. नामा, तुका अशा नाममुद्रा असलेल्या एक एक आरत्या आहेत; परंतु त्या संत नामदेव किंवा संत तुकारामांच्या असाव्यात की नाही याविषयी शंका वाटते. संत नामदेवांच्या विठ्ठलाच्या आरतीतील एक चरण येथे नामारचित गणेशाच्या आरतीत आहे. अखेरचे कडवे असे आहे, ‘गंधपुष्पेदुर्वा तुजला जे वाहती। ते नर भाग्यवंत लक्ष्मी पावती। दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती। सहज नामा याणे गायिली आरती।’ ‘दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती’ हा नामदेवरचित विठ्ठलाच्या आरतीतील चरण याही आरतीत आहे. तुकाची आरती ‘नृत्यनायक गणपतीची’ आहे. नृत्य करणाऱ्या गणेशाचे रूप श्रीदास, गोसावीनंदन यांनी वर्णिले आहे त्याचप्रमाणे मुक्तेश्वरांनीही नृत्यगजाननाची आरती गायली आहे. ‘सारीगमपदनी सप्तस्वरभेदा। धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजती गतिछंदा। तातक् तातक् थैय्या करिसी आनंदा। ब्रह्मादिकअवलोकिती तव पादारविंदा। जयदेव जयदेव जय वक्रतुंडा। सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा।’ अशी त्यांची डौलदार, अनुप्रासयुक्त रचना लक्ष वेधून घेते.

एकनाथ आरतीची सुरुवात ‘सद्गुरुकृपे चंद्र उदयो पैं झाला। वाग्देवी वाक्यें गणेश देखिला। चवथे भक्तिज्ञानें चवथीसी आला। गुरुमूर्ती स्वयें बिंबला।’ अशी करतात व आत्मिक साधनेच्या या चतुर्थ अवस्थेचे सूचन करतात. गणेशाच्या पूजनातील प्रतीकांचा ते उलगडादेखील करतात : ‘प्रेमाचे मोदक निजभाव क्षीर। प्रबोध लाडू गोड अंतरी साखर। शुद्ध सुमने ठेवा सायुज्य सार। महाप्रकार करिती क्षुधेसी आहार।’ आरतीच्या अखेरीस गणेशाकडे त्यांचे मागणे आहे, ‘देई देवा सद्गुरू मन उन्मन। सकामी निष्कामी कामना पूर्ण’. गणेशाला त्यांनी ‘भक्ति-मुक्ति-दाता’ म्हणून गौरविले आहे. रामदासांच्या सुपरिचित ‘सुखकर्ता दु:खहर्ता’मध्ये त्यांनी गणेशमूर्तीचे वर्णन ‘लंबोदर, सरळसोंड, वक्रतुंड, त्रिनयना’ या विशेषणांनी केले आहे. मुद्गल पुराणात गणेशाच्या अवतारांचे जे वर्णन येते; त्यात लंबोदर हा क्रोधासुराचा वध करणारा, वक्रतुंड हा मात्सर्यासुर म्हणजे मत्सराचा वध करणारा असल्याचे म्हटले आहे. गणेशाचा आणखी एक अवतार हा धूम्रवर्ण आहे. ते शिवाचे प्रतीक आहे व म्हणून रामदास येथे गणेशाला त्रिनयन म्हणत असावेत. या अवतारात गणेशाने अभिमानासुराचा वध केल्याची हकिकत येते. षड्रिपूंचा वध करणारा गणेश त्यांना अभिप्रेत असल्याने आरतीच्या प्रारंभी ते त्याचे वर्णन सुख देणारा, दु:ख नाहीसे करणारा, विघ्नाची वार्तादेखील न उरविणारा, प्रेम पुरविणारा या विशेषणांनी का करतात याचे रहस्य लक्षात येते. समर्थाची ही प्रासादिक, अर्थघन आरती शतकानुशतके भक्ताच्या मनावर कदाचित यामुळेच अधिराज्य गाजवते आहे.

प्रासादिकता हा आरतीचा व्यवच्छेदक गुण म्हटला पाहिजे. त्यामुळे ती समूहात सहज म्हणता येते. गणेशाच्या काही आरत्या मात्र संस्कृतप्रचुर असल्याने किंवा उच्चारसुकर नसल्याने मौखिक परंपरेत बाजूला पडल्या असाव्यात. उदाहरणार्थ ‘शामराजरचित’ या आरतीचा मुखडा पाहा : ‘चेडद्युतिमंगलसम मुकुटे जेवि विलसे। गंड क्षेल्ली आल्ली मंडल्ली झंकारत निवसे। मणिमंडित कुंडली नीभ कुंडला युग विलसे। शुंडा-दंडी सुंदर शेंदुर भासतसे’ किंवा वसुदेवरचित आरतीत ‘लंबोदरा दंतिवंदना। यदीया मूर्ती कीर्तिसदना। सिंदुरानुलेपना गहना। सुविलला दुंदुराख्यवहना। आरती शंभुनंदनाची। पदनतजनानंदनाची’ अशी रचना येते; ती अनुप्रासयुक्त असली तरी उच्चारसुकर नाही. आरती सामान्यत: तीन ते चार चरणांची व दोन-तीन कडवी असलेली असते. ‘जयदेव जयदेव जय गजनरवेषा’, ‘जयदेव जयदेव जय संकटहर्ता’, ‘जयदेवा जयदेवा सुंदर गजवदना’, ‘जयदेव जयदेव चिंतामणी देवा’ अशी गणेशाचा जयजयकार करणारे धृपद अशा स्वरूपाची असते. क्वचितच विठ्ठलसुताची व एका अनामिकाची आरती केवळ एका कडव्याची आहे.

काही आरत्या अतिशय सुभग व शब्दरचनेचे सौंदर्य व्यक्त करणाऱ्या, नादमधुर आहेत. जनपंडित या आरतीकारांनी गणेशाचे वर्णन असे केले आहे, ‘राजस उंदीर ठमकत ठमकत मग चाले। हालत हालत दोंदिल डोलत मग चाले। ध्याने ध्याता गाता सर्वही जन धाले। हरिगुण मंडित वाणी जनपंडित बोले’, तर दास हे आरतीकार लिहितात, ‘उंदीरावर बैसोनि दुडदुडा येसी। हाती मोदकलाडू घेऊनिया खासी। भक्तांचे संकटी धावुनि पावसी। दास विनविती तुझिया चरणासी’. बहुतेक आरतीकार गणेशाचे चिंतन त्याच्या वाहनासह करताना दिसतात.

नारदीय भक्तिसूत्रात भक्तीचे जे प्रकार सांगितले आहेत, त्यात ईश्वर विशेषांचे गुणगान हा एक प्रकार नमूद केला आहे. सर्वच आरत्या गणेशाचे रूपवर्णन तन्मयतेने करतात. वासुदेव म्हणतात, ‘अतिसुंदर रत्नमाळ कंठी शोभती। ऋद्धिसिद्धि नायकादि चमर वारिती’. श्रीदास लिहितात, ‘पाहता रूप ज्याचे अद्भुतची गजमुख। शशांक सूर्य वन्ही त्रिनेत्र दंत एक।’ माणिकदासांनी केलेले ‘लप लप लप लप लप लप हालती गजशुंडा। गप गप गप गप मोदक भक्षिसी घेउनी करी उंडा।’ हे वर्णन मोठे मजेशीर आहे. धुंडीदासांनी केलेले गणेशमूर्तीचे वर्णन ज्ञानदेवांच्या गणेशवंदनेचे सहज स्मरण करून देते, ‘आकार हा गंडस्थल ज्याला। उकारी शुंडा ही त्याला। मकार हा संधीमध्ये भरला। सोम हा मात्रा भाळाला। कपाळी टिळक शून्याचा। प्रणव हा खचित। तेज लखलखित।’ इत्यादी एक अनामिक आरतीकार गणेशाचे अवयव व तत्त्वज्ञान यांची अशी सांगड घालतो, ‘विशाल देही असुनी लघु मूषक वाहन। जडदेही सूक्ष्माचे दाविसी अवधान। चारी भूजा धारुनी खुणविसी पुरुषार्थ। दंते तेज प्रकाशे विकसित ज्ञानार्थ। हस्ते परशु सुचवी तोडाया स्वार्थ। मोदकप्रीती सांगे साधा परमार्थ।’

गणेशाचे गुणवर्णन आरतीकारांनी नेहमीच अतिशयोक्तीने केले आहे. गोसावीनंदनांच्या हिंदी आरतीत ते ‘कोटिसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी’ असे गणेशमुखाचे तेज असल्याचे वर्णन करतात, तर विद्याधर गणेशाच्या पायांतील नूपुरनादाचे वर्णन ‘चरणी नूपुरांची रुणझुण ध्वनि उठली। एकविस स्वर्गी भेदुन तद्रुपी संचरली’ असे करतात. चिंतामणी लिहितात की, गणेशाच्या पितांबराच्या ‘प्रकाशें दिनकर लोपला’. माणिकदास गणेशाच्या कर्णकुंडलांचे वर्णन करतात, ‘कर्णी कुंडल झळके दिनमणी उदय तुझा’. नामारचित आरतीतही कुंडलांचे वर्णन ‘श्रवणीं कुंडलांची दीप्ति प्रकाशे। चंद्र सूर्य दोन्ही हेलावत जैसे।’ असे येते. धुंडीदास लिहितात, ‘किरीटीं जडलें भानुकोटी। फाकलें तेज सकल सृष्टी। कुंडलें देखताच दृष्टी। भाळीं सोम होय कष्टी। शुंडा सरळ दिव्य शोभा। सव्य एकदंत। शुभ्र अत्यंत। वेद वर्णित। अखिल स्तुती ज्याची।  झाली कुंठीत मती त्याची।’ खरे तर पुराणांत गणेशाच्या कथा येतात, वेदांमध्ये गणेशाचा उल्लेख नाही; परंतु गणेशाचे मोठेपण वर्णन करताना तुकादेखील म्हणतात, ‘पांगुळले वेद कैसे। चारी राहिले मुके।’, वासुदेवांना वाटते, ‘भक्तकामकल्पद्रुम शारदापति। वर्णिति हे वेद चारी आणखी स्मृति।’

गणेशाच्या पराक्रमांचे वर्णन करतानाही आरतीकार अतिशयोक्तीचा अवलंब करतात. पंडित रामात्मज यांनी रचलेल्या आरतीत ते म्हणतात की, ‘हे गजानना, शेषाला धरणीचे ओझे झाले तेव्हा त्याने तुझेच स्मरण केले. महिषासुराचा वध करतेवेळी ‘विजया देई’ अशी गौरीने तुझीच प्रार्थना केली.’ एवढेच नाही तर ‘त्रिपुरासुर वधुं जाता शिव तुजला चिंती। बळिबंधन कराया वामन करि विनती। धाता सृष्टि सृजितां न चले मंदमति। स्मरण करितां तुझे मग झाली स्फूर्ति।’ असा सर्वशक्तिमान गणेश भक्तांवरही तेवढी व तशीच कृपा करेल अशी श्रद्धा आरतीकारांच्या मनात आहे. ‘चिंतन करितां नासें दु:ख विश्वाचें’ हा भाव एका अनामिक आरतीकाराच्या आरतीत आहे. गोसावीनंदन एका आरतीत म्हणतात, ‘विद्या धन संपदा कनकाच्या राशी। नारी सुत मंदिरें सर्वहि तूं देशी। निर्वाणीं पावसी वेगीं भक्तांसी। गोसावीनंदन गातो कवितांसी।’ त्यांनीच रचलेल्या दुसऱ्या आरतीत ते म्हणतात, ‘तुझें ध्यान निरंतर जे कोणी करिती। त्यांची सकलही पापें विघ्नेंही हरती। वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती। सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती।’

भक्तांच्या या नितांत श्रद्धेतूनच मग त्यांची शरणागतता व्यक्त होते. ‘तुजविण न दिसे देवा शमविल मम पीडा। भक्तसंकटीं येसी धावत दुडदुडां।’, ‘नयनीं शिणलो देवा तव भेटीकरिता। तापत्रय दीनांचे शमवी समर्था।’ असे विष्णुदास म्हणतात. ‘जागृति स्वप्नीं माझ्या हृदयी त्वां राहावे। दुस्तर भवपाशाच्या बंधां तोडावे।’ असे एक अनामिक आरतीकार विनवतात. वासुदेव करुणा भाकतात, ‘गजवदना पुजुनि तुला करिन आरती। तारी मला षड्रिपु हे नित्य पीडिती।’ त्यांनी रचलेल्या आणखी एका आरतीत ते म्हणतात, ‘गातो गुण वासुदेव बंदी गणपती। धावे। पावे। यावे। विघ्नहरा। भक्तवरा। वंद्य सुरा। सुखवी तू मला।’ विठ्ठलसुत अतिशय आर्ततेने विनवतात, ‘छळिती षड्रिपु बहु मजला। यातुनि तारी जगत्पाला। हरि या विविध तापाला। दैन्यहि नेई विलयाला। निशिदिनि करी मज साह्य़ाला। विनति ही तव पदकमला। विठ्ठलसुत बहु प्रेमेंविनवी तारी या दीना। दयाळा करि मजवरि करुणा।’

‘बुद्धी दे’, ‘सद्बुद्धी दे’ हे मागणे तर अनेकांनी मागितले आहे. गणेशाविषयी सख्यभाव व्यक्त करून भक्त या आरत्यांमधून किती सहजपणे आत्मनिवेदन करतात! आपल्याला षड्रिपु छळतात असे ते मोकळेपणाने सांगतात. आपले दैन्य त्याच्यापुढे उघड करतात. आपली शरणागतता पुन:पुन्हा व्यक्त करतात. मुक्तेश्वर आपली आर्तता ‘तव चरणांबुजि अलिपरि करि भ्रमणा’ अशा उपमेमधून मांडतात, तर ‘दास रामाचा वाट पाहे सदना’ अशा साध्या शब्दांतून रामदास आपली अवस्था गणेशापर्यंत पोहोचवतात.

गणेशपूजनाची, गणेशभक्तीची फलश्रुती काही आरतीकार देतात. वसुदेव या आरतीकारांनी म्हटले आहे, ‘स्मरणें विघ्नवृंद वारी। तारी दुरितसागरी। वसुदेव करी परिवितार्थ अतिभक्ति गणपतीची। मंगला भक्ति गणपतीची।’ हनुमंतांनी ‘ऐसी मूर्ती निरंतर ध्यानी जे धरिती। संकट त्यांचे दूर करी तू मंगळमूर्ती।’ असे गजाननालाच जणू बजावले आहे. नामाने ‘गंधपुष्पे दुर्वा तुजला जे वाहती। ते नर भाग्यवंत लक्ष्मी पावती।’ असे आश्वासन दिले आहे.

दत्त किंवा देवी यांच्यावरील आरत्यांमधून जसे ईश्वररूप, जगत्स्वरूप, मानवी संसाराची असारता, मायावाद याविषयीचे तत्त्वविवेचन किंवा नीतीचे विवेचन येते तसे गणेशाच्या आरत्यांमधून फारसे दिसत नाही. मौनीदासविरचित आरतीत ‘अगणित सुखसागर हे चिन्मया गणराया। बुद्बुद्वत जग तव पदी विवर्त हे माया। मृषाचि दिसतो भुजंग रज्जूवर वायां रजतभ्रम शुक्तीवर व्यर्थचि गुरुराया।’ अशा जगात ‘साक्षी सच्चितसुख तू असशी जगदीशा। साक्षी शब्दहि गाळुनि वससी अविनाशा।’ असा गणेश त्यांनी वर्णिला आहे. ही मृगजलवत् माया नसतानादेखील उपाधिविरहित, केवळ निर्गुण रूपात तू असशील या असीम श्रद्धेने ‘तव पद वंदित मौनिदास अभेदेची’ असे ते तद्रूप होतात. सगुण गणेशमूर्तीची आरती करताना धुंडीदाससुद्धा ‘आरती निर्गुण स्वरूपाची। विधिजावरा गणेशाची।’ असे त्याच्यातील निर्गुण ईश्वररूप जाणतात. ‘पंचभूतात्मक व्यापक एकचि घटक तू जैसा’ असे माणिकदासांनीही त्याला वर्णिले आहे.

एरवी मात्र गणेशाची सरळ सोंड, दोंदिल तनू, लंब उदर, सर्प मेखला, रत्नजडित मुकुट, पीतांबर, गणेशाची आयुधे, गणेशप्रिय खाद्य मोदक, गणेश वाहन उंदीर यांची अलंकारिक वर्णने, गणेशाचा पूजाविधी व गणेशाकडून काही मागणे हा या आरत्यांचा आशय आहे. या दैवताविषयीची भक्तांची भक्ती हा या आरत्यांचा स्थायिभाव आहे. अघसंकटभयनाशन, सुखदा, विघ्नेशा, शंभुकुमरा, पार्वतिनंदना, शिवतनया, वक्रतुंडा, गणराया, गौरीच्या बालका, एकदंता, गजशुंडा, प्रथमेश्वरा, सुरपती, शुभदा, भक्तवरा अशा किती तरी नावांनी गणेशाला संबोधून त्याच्याशी लडिवाळ नाते जोडले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाला आजोळी बोलवायचे खरे, पण ‘अहो न्यावे त्वांची माहेरा। अहो जय गणराज उदारा।’ अशी चिंतामणी दासासारखी मागणीही करायची असे भक्त-गणेशामधील अनाम, आनंदाचे नाते आरत्यांमधून उमटले आहे.

(संदर्भ – मराठी आरती, म.वि. गोखले, १९६७ अवतरणांचे शुद्धलेखन या पुस्तकानुसार आहे.)

डॉ. प्रतिभा कणेकर pratibhakanekar@gmail.com