आपल्या मुलांची भावभावनांशी गाठ पडेल तेव्हा त्यांना त्यांची कल्पना असावी, त्याबाबतीत ते अनभिज्ञ नसावेत तर जागरूक असावेत आणि त्या भावभावनांचं व्यवस्थापन त्यांना नीट जमावं म्हणून मुलांसाठी चार हिताच्या गोष्टी बाबाकडून पत्राद्वारे.
प्रिय मुला,
आज मी तुला तुझ्या मनात निर्माण होणाऱ्या जाणिवांबद्दल आणि भावनांबद्दल थोडं सांगणार आहे..शिकविणार आहे. आयुष्यात आपल्याला ज्या आठ प्रकारच्या जाणिवांचा वारंवार अनुभव येतो त्या जाणिवांची आज मी तुला ओळख करून देणार आहे. तुला तुझ्याही आयुष्यात या जाणिवा, भावना नेहमी भेटणार आहेत. म्हणूनच त्याची योग्य ओळख करून देण्याबरोबरच त्याबाबतीत तुला सजग, सुसंस्कृत करण्यासाठी हा पत्रप्रपंच..कारण जेव्हा या भावभावनांशी तुझी गाठ पडेल तेव्हा तुला त्यांची कल्पना असावी, त्याबाबतीत तू अनभिज्ञ नसावंस तर जागरूक असावंस आणि त्याचं व्यवस्थापन तुला नीट जमावं म्हणून या चार हिताच्या गोष्टी तुझ्या बाबाकडून!
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनात जेव्हा-केव्हा एखादी भावना जागृत होते तेव्हा ती आहे तशी स्वीकारली पाहिजे. आधी तिचा स्वीकार, मग तिला ओळखणं आणि त्यानंतर रिती करणे या गोष्टी तुला शिकाव्या लागतील. प्रत्येक वेळी आपल्याबरोबर कुणी असेलच असं नाही त्यामुळे तू स्वत:च स्वत:बरोबर अस. भावना उचंबळून येतील तेव्हा तुझा तुझ्यावर ताबा हवा.. त्या येतील तशा निघूनही जातील. तू मात्र स्वत:ला स्वत:ची सोबत कर.. सुसंस्कृतपणे!
पहिली भावना म्हणजे क्रोध – एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा, क्रोध ही अतिशय सर्वसामान्य भावना आहे. क्रोधात किंवा रागात ऊर्जा असते. एवढंच नाही तर आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यावरच आपण रागावतो म्हणजे या भावनेत प्रेमसुद्धा आहे मित्रा. पण द्वेषातून आलेला राग किंवा मत्सर वाटून एखाद्याचा केलेला राग हे मानसिक अनारोग्याचं लक्षण ठरतं आणि तो राग जर कुणावर निघाला तर त्याचा परिणाम केवळ दुख:दायकच असतो.. संवादाला मारक ठरतो. क्रोध या भावनेला फारच चुकीच्या पद्धतीने हाताळलं जातं. खरं तर क्रोध ही एक सकारात्मक भावना आहे, पण त्याला नकारात्मक किनार दिली जाते. आपल्याकडे मुलींना नेहमी राग गिळायला आणि गप्प राहायला शिकवलं जातं. आपण मुलींना सांगतो, की गप्प बसायला शिक.. उद्या तुला तुझ्या नवऱ्याच्या घरी नांदायचं आहे ना मग राग-रुसवे चालणार नाहीत. राग बोलून दाखविण्यापेक्षा जीभ दाताखाली दाबून ठेव म्हणजे रागात काही बोलणार नाहीस. हे असं ज्ञान देणं चुकीचं आहे.
तुम्ही मुलं जेव्हा भर रस्त्यात कोणत्या तरी कारणास्तव रागावून ओरडता तेव्हा तो असतो आक्रमकपणा, पण तुम्ही जेव्हा घरात तुमच्या पालकांसमोर किंचाळता तेव्हा ती सुद्धा संतापाचीच भावना असते. म्हणूनच जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमच्या शरीरात निर्माण होणारी संवेदना ओळखायला शिक.. तुमच्या हृदयाचे ठोके जलद पडत असतील आणि तुम्हाला छातीत धडधड वाढल्यामुळे बेचैन झाल्यासारखं वाटेल. या भावना उचंबळून येतील तशाच थोडय़ा वेळाने निघूनही जातील, पण ही परिस्थिती जर वारंवार उद्भवत असेल आणि त्यामुळे जर वरचेवर बेचैन वाटत असेल तर रात्री तुझी झोप नीट होतेय का, कसला ताण आलाय का? नीट जेवतोस का? हे प्रश्न स्वत:ला विचार. हे प्रश्न सोडविण्यासाठी तुला मदत घ्यावी लागेल.. आम्ही आहोतच तुझ्या मदतीला. म्हणून म्हटलं की राग कसा, का आणि किती वेळा येतो हे ओळखायला शिक. तो दाबून ठेवत गेलास तर त्याची विरुद्ध प्रतिक्रिया उमटेल म्हणजेच त्याचं रूपांतर संतापात होईल. संताप हा रागापेक्षा अधिक हानिकारक असतो. संताप म्हणजे आपण विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखं असतं. संतापात माणूस असंतुष्ट आणि अधिक संतप्त झालेला असतो. या संतापाची कल्पना नसेल तर प्रत्येक गोष्टीला माणूस संतापाच्या भरात विरोध करू लागतो आणि ते जास्त धोकादायक असतं. संतापाचा थेट परिणाम माणसाच्या शरीरावर होत असतो. तुमच्या रक्तवाहिन्या हळूहळू आकुंचन पावत जातात आणि वाईट कोलेस्टेरॉल त्यावर जमू लागतं. ज्या व्यक्ती शीघ्रकोपी किंवा संतापी असतात त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो हे सिद्ध झालंय. द्वेष, संताप आणि सुडाची भावना या गोष्टीसुद्धा हृदयविकाराचा धोका वाढवतात. म्हणूनच क्रोध या भावनेचा स्वीकार करा नाही तर ते दुसऱ्या भलत्याच मार्गाने उफाळून बाहेर येईल. आपल्याला एखाद्या गोष्टीचा, एखाद्याच्या वागण्याचा, बोलण्याचा राग येऊ शकतो – ही अगदी सर्वसामान्य भावना आहे. ती नाकारू नका. वर सांगितलं त्याप्रमाणे प्रेम आहे तिथेच राग येतो. शेजाऱ्यांपेक्षा तुला आमचा जास्त राग येतो कारण तुझं आमच्यावर प्रेम आहे म्हणून. पण बाळा, माझं म्हणणं नीट लक्षात घे. आता आमच्यावर तुझं प्रेम आहे म्हणून तू सगळ्यांचा राग आमच्यावर काढावास असं नाही. वस्तू फेकणं किंवा घरात तोडफोड करणं हे आक्रमकपणाचे लक्षण आहे.. आमच्यावरच्या प्रेमाचं नाही. तुला जेव्हा आणि ज्याचा राग येईल तेव्हा तुला त्या व्यक्तीला तसं सांगता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, ‘आई, तू आज मला चार लोकांसमोर बोललीस ते मला अजिबात आवडलं नाही.’ हे जर सांगता आलं नाही तर नंतर कधी तरी त्याचा स्फोट होऊ शकतो. तू जर या तुला न आवडलेल्या बाबीकडे त्याच वेळी लक्ष दिलं नाहीस तर नंतर ती गोष्ट तुला जास्त खटकेल आणि नंतर कधी तरी नकारात्मक मार्गाने अधिक वेगाने बाहेर येईल. त्यापेक्षा त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी (आवडलेल्या आणि न आवडलेल्या) बोलून-सांगून मोकळा होत जा. नंतर ती गोष्ट उगाळीत बसण्यात काहीच अर्थ नसतो. उलट त्याचा मनस्ताप अधिक होतो. कदाचित तो राग वडिलांवर निघू शकेल आणि मग उगाच काही तरी रागाच्या भरात चुकीचं बोललं जाईल; ज्यातून विनाकारण विसंवाद होईल. पण तुला न आवडलेली गोष्ट जर तू आधीच म्हणजे त्याच वेळी स्पष्टपणे सांगून टाकलीस तर हा पुढचा विसंवाद टाळता येईल.
म्हणून म्हटलं ना की तुला तुझ्या रागाचं कारण आणि त्याचं स्वरूप ओळखून, त्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. त्यासाठी तुला न आवडलेल्या गोष्टी त्या त्या वेळीच योग्य शब्दात सांगता यायला हव्यात. बरेच वेळा तुझ्या वयाची मुलं मला सांगतात की, ‘राग आला तर तो शब्दात कसा सांगायचा हेच आम्हाला माहिती नाहीये.’ मग मी त्यांना सांगतो की प्रयत्न करून पाहा. तुम्हाला न आवडलेल्या, न रुचलेल्या गोष्टी तुमच्या पालकांना मोकळेपणाने सांगा.. ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे.. असं केल्याने तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता येईल आणि त्यांचीही बाजू कळेल. यातून आपापसातील प्रेम तर वाढीस लागेलच पण तुमच्या आणि आमच्यात एक संवादाचा सेतू बांधला जाईल. आज याच सेतूची खूप गरज आहे.
स्वभावातील आक्रमकपणा बरेच वेळा आपल्याला रागाचं मूळ कारण शोधूच देत नाही म्हणून आक्रमक होण्याऐवजी स्वत:च्या रागावरसुद्धा प्रेम करायला शिकलं पाहिजे. जेवढं रागाच्या जवळ जाऊन त्याला ओळखायचा प्रयत्न करशील तेवढं अधिक लवकर गुंता सुटेल आणि मनाला शांती मिळेल. बरेच वेळा दु:ख हे सुद्धा आक्रमकपणाला कारणीभूत ठरतं. दु:ख दूर सारलं की आक्रमकपणा कमी होतो. मनातील भीती, अनिश्चितता या गोष्टींमुळेसुद्धा नैराश्य येतं आणि त्याचं रूपांतर आक्रमकपणात होऊ शकतं. रागाची अनेक रूपं आहेत. ती ओळखून, त्याचं मूळ शोधलं तर त्यावर उपचार करणं सोपं जातं. बरेच वेळा माणसं बोलताना समोरच्याला सारखे टोमणे मारत बोलतात किंवा समोरच्याच्या वर्मी लागेल असं त्यांचं बोलणं असतं. हा सुद्धा संतापाचाच एक प्रकार आहे. या स्वभावामुळे आयुष्यावरचा तुमचा फोकस उडून जातो आणि त्याबरोबर आयुष्याचा अर्थही. अशी माणसं कधीच त्यांच्या अंगभूत कलागुणांना पूर्ण वाव देऊ शकत नाहीत. संतापी वृत्तीतून येणारी नकारात्मकता त्यांना नेहमी मागे खेचते आणि मग त्याचं पुन्हा एक वेगळं नैराश्य त्यांना घेरून उरतं.
बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्या प्रत्येक वर्तणुकीमागे एक कथा असते आणि प्रत्येक कथेमागे अनेक कथा असतात. आजूबाजूला जरा डोळे उघडे ठेवून नीट बघ. यशस्वी माणसं त्यांच्या रागाला विजेच्या तारेला जुंपतात. राग ही भावना त्यांच्या निश्चयाच्या, निर्धाराच्या कधीच आड येत नाही. महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्धचा त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग पत्करला होता. त्याचं तत्त्वज्ञान आज जगाला मार्गदर्शन करतंय. तुला क्रिकेटचा खेळ आवडतो ना; मग त्यात बघ जेव्हा बाउन्सरचा चेंडू फलंदाजाला लागून जातो तेव्हा त्याला राग येतो पण तो फलंदाज त्या रागातून धडा घेतो आणि चित्त एकाग्र करून पुढचा तसाच आलेला चेंडू सीमापार धाडतो. पण जर त्या फलंदाजाने त्या रागातून धडा घेतला नाही आणि त्या रागाला आपल्यापेक्षा वरचढ होऊ दिलं तर पुढच्याच चेंडूवर तो बाद होतो.
वाईट दिवसांमध्ये जर कधी मी सांगितलेल्या या गोष्टी तू विसरलास तर एका शांत जागी जा आणि आत्मपरीक्षण कर. स्वत:शी कधीच कठोरपणे किंवा निर्दयीपणे वागू नकोस बाळा. भावनांचा उद्रेक तुला काही तरी शिकवून जाईल आणि तू जेवढं जास्त शिकशील तेवढं तू स्वत:ला अधिक चांगलं ओळखू शकशील आणि इतरांनाही. रागाकडे दुर्लक्ष केलंस तर ते तुला सारखं जाचत राहील आणि मग शरीर आणि मनाचा वाद्यवृंद बेसूर होईल. आक्रमकपणाचा कधीच गर्व बाळगू नकोस. योग आणि विपश्यना यांच्या मदतीने आक्रमकपणा कमी करता येतो. जर पुन:पुन्हा क्रोध वृत्ती उचंबळून येत असेल तर मानसोपचारतज्ज्ञाची भेट घे..
माझ्या प्रिय बाळा, आज झोपण्यापूर्वी आम्ही तुझ्यावर किती वेळा रागावतो हे एकदा स्वत:लाच विचारून बघ, कधी तरी किंवा फार क्वचित, हो ना ! मग बाळा ते तर आमचं प्रेम आहे तुझ्यावरचं.
तुझाच बाबा
– डॉ. हरिश श़ेट्टी
harish139@yahoo.com
शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी

Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’