स्त्रियांची बँकेतील खाती वाढू लागली आहेत, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र अर्थसाक्षरता म्हणजे त्यातले व्यवहार कसे करायचे, कधी करायचे, त्यातल्या विविध योजना, कर्जयोजना आदींची माहिती नसेल, तर नुकसान होऊ शकतं. म्हणूनच प्रत्येकीने अर्थसाक्षर व्हावं, हे बँकेत स्वतंत्र खातं असण्याइतकंच महत्त्वाचं आहे.

अर्थ म्हणजे पैसा, जो बँकेच्या माध्यमातून फिरत असतो. बँकिंग जाणकारास पैसा हाताळणे बऱ्यापैकी समजते. याची कसोटी नुकतीच घेतली गेली. प्रत्येकाला धावपळ करावी लागली, पैशाचे गणित वेगळ्या प्रकारे सामोरे आल्याने काहींना आनंद झाला, काहींना सांभाळणे अवघड गेले. कस लागला तो लोकांच्या अर्थसाक्षरतेचा. स्त्रियांना काय कळते, काय नाही याचासुद्धा. बँकिंगची जाण स्त्रीला कितपत आहे, हे तिलाही समजलं आणि इतरांनाही.

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चलनातील पाचशे-हजारच्या नोटा रद्द करण्यात आल्याचे घोषित केले. चलनी नोटांचे विमुद्रीकरण, या धाडसी निर्णयाने काही काळ गडबडीचा, गोंधळाचा गेला. खात्यात पैसे आहेत तरीही चलनाचा तुटवडा, एटीएम्सच्या रांगा, रोख रक्कम नाही. व्यवहार करायला काहींना जमलं, काहींची पंचाईत. डेबिट/एटीएम/क्रेडिट कार्ड कधीच वापरले नाही. साधे चेकबुकदेखील घेतलेले नाही, अशांची फारच पंचाईत झाली. त्यातही स्त्रियांची कुचंबणा निराळीच. अडीअडचणीला घरातल्यांना- घराला बाई कशी सांभाळून घेते याचा गौप्यस्फोट तिला करावा लागला. तिने बाजूला ठेवलेली पुंजी उघड करावी लागली. अर्थात, तिला त्यातही गुण द्यायला पाहिजेत. किती गुण हे अलाहिदा!

मानवी जीवनात पैशांचे अनन्यसाधारण महत्त्व असूनही अनेक स्त्रिया बँकिंग समजून घेत नाहीत, असा अगदी आजचाही अनुभव आहे. ‘फुली तिथे सही’ करण्यातच या फुलाबाईची धन्यता. समाजात प्रचंड वैविध्य असल्याने सर्वाचे मूल्यमापन एकाच पट्टीने करणे अशक्य असते, स्त्रियांचे तर त्याहून अशक्य. ‘नंबर एकच्या आतल्या गाठीच्या, कसे पैसे गोळा केले समजणार नाही.’ ‘स्त्रियांच्या मनात काही राहत नाही, मनात आलं की बोलून जातात.’ ही दोन्ही विरोधी वाक्ये असली तरी एकाच बाईच्या बाबतीत खरी असल्याने तिचे गणित सोडविणे अवघडच.

आज भारतात ५३ टक्के स्त्रियांची खाती आहेत, पण याचा अर्थ त्या अर्थसाक्षर आहेत का? प्रश्न विचार करण्याजोगा आहे. ‘स्त्रियांचे-अर्थज्ञान’ हा विषयच अनेकांच्या चेष्टेचा ठरतो आहे. खरं पाहता, स्त्रिया आर्थिक व्यवहार सांभाळून घराचं उत्तम आर्थिक नियोजन करू शकतात; पण जसजशी आर्थिकविषयक निर्णय परिपक्वतेने घेणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढेल किंवा त्यांना तो घेऊ दिला जाईल, तसतशी देशाची प्रगती निश्चितच वाढेल.

स्त्रिया बचत करतात, परंतु पैशांच्या वृद्धीसाठीच्या योजनांनुसार गुंतवणूक करायला सरावलेल्या असतीलच असे नव्हे. पुरुषप्रधान संस्कृतीत कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनात स्त्रियांचा सहभाग अल्प असल्याने आर्थिक सक्रियता कमी असते. स्वावलंबी होण्यासाठी स्त्रियांनी आर्थिक गोष्टीत लक्ष घालून पाश्र्वभूमी, जोखीम, लाभ, फायदे-तोटे, भविष्य आणि आपापली कुवत यांचे त्रराशिक मांडणं आता गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे व्यवहार करताना नीट माहिती घेऊनच ते करावेत, अन्यथा नुकसान सोसावे लागते. उदाहरणच द्यायचं झालं तर सुमा आणि नंदाताईंचं देता येईल.

लग्नानंतर सुमाचे व तिच्या नवऱ्याचे दोघांचे संयुक्त खाते काढले गेले. माहेराहून मिळालेली सर्व रक्कम त्या खात्यात जमा केली. ती लाखोंच्या घरात होती. तिनेही विश्वासाने सासरच्या मंडळींच्या हाती दिली. सासू-सासरे दोघांच्या नावाने बँकेत सुरक्षित जमा कक्ष होता. त्याच लॉकरमध्ये तिचे सर्व दागिने ठेवले. मधूनमधून नवरा त्यातले पैसे तिला द्यायचा. सणासुदीला सासूबाई दागिनेही आणून देत असत. वरवर सगळं छान दिसतं असलं तरी आत खूप काही शिजत होतं. दोन-चार वर्षांनी एका लग्नाला जाताना दागिने पाहिजे, म्हणून सुमाने नवऱ्याकडे दागिने मागितले, तर तिच्या हाती नकली दागिने ठेवण्यात आले..  पुढे काय?

स्त्रिया आर्थिक व्यवहार सांभाळून घराचं उत्तम आर्थिक नियोजन करू शकतात; पण जसजशी आर्थिकविषयक निर्णय परिपक्वतेने घेणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढेल किंवा त्यांना तो घेऊ दिला जाईल, तसतशी देशाची प्रगती निश्चितच वाढेल.

तर दुसऱ्या नंदाताई. पन्नाशीच्या नंदाताईंनी मुलीच्या बाळंतपणासाठी पैसे जमा केले होते. उनाड मुलाची लक्षणं ठीक नव्हती, पैसे घरात ठेवायला नकोत म्हणून त्यांनी बँकेत खाते काढून त्यात जमा केले. पासबुक, चेकबुक, सही करून ठेवलेले चेक्स एकत्रित कपाटात ठेवले होते. दिवस भरलेल्या पहिलटकरणीला घेऊन दवाखान्यात जाताजाता पैसे काढू म्हणून बँकेत आल्या तर पंचवीस हजाराचे पाचशे रुपये झालेले. विश्वासघात, संताप, निराशा, अडचण, मुलीची अवस्था याने नंदाताई रडकुंडीला आल्या.  जुनी व्हाऊचर्स काढून बघितलं तर मुलाने तीन वेळा त्यातून पैसे काढलेले दिसले. तेव्हा बँकेतल्याच लोकांनी त्यांना सांगितले की, ‘मुलाची तक्रार पोलीस ठाण्यात करा.’ पण बाईने चौकी गाठली नाही.. मुलगा ना तो.. स्वत:चा. पण पुढे काय?

पुढे काय? दोन्ही घरी व्हायचे होते तेच झाले. पुढे नुकसान, मनस्ताप, कुचंबणा, बोलती बंद, धाक, मार, बँकेने काहीही चुकीचे केलेले नसते, तिथे तक्रारीला जागा नाही. इथे त्या दोघींनी काही गोष्टी नीट काळजीने केल्या असत्या तर ही परिस्थिती आली नसती. पहिल्या उदाहरणात सुमाने खाते काढतेवेळी बँकेत खाते वापराच्या सूचनांचा अर्थ समजून उमजून सूचना द्यायची होती. जातीने बारकाईने लक्षपूर्वक नवरा काय करतोय बघायला हवे होते. काही लाखो रुपये खात्यात होते तिच्या. तिला मात्र पाच-दहा हजार देऊन उरलेले सगळे सासरच्या मंडळींनी उडविले. आपल्या दागिन्यांसाठी वेगळा लॉकर स्वत:च्या नावावर घ्यायला हवा होता. तसा आग्रह धरायचाच. इतरेजन म्हणतील त्याला तिने मान डोलावली. चुकली, लुबाडली गेली. काही वेळा ठाम भूमिका घ्यावी लागते, अगदी अशक्य वाटली तरी. जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत तरी.

दुसऱ्या उदाहरणात नंदाताईंना फक्त खाते काढायचे ठाऊक होते, परंतु त्याची काळजी घेणे नाही. चेक सही करून ठेवायचे नसतात, शिवाय चेकबुक व पासबुक एकत्र कोणाला मिळेल असे ठेवू नये. हे कुठे माहीत होतं? कष्टाने साठवलेली रक्कम गेली, पुन्हा बाळंतपणाच्या खर्चाची विवंचना लागली. सगळाच मनस्ताप. ही दोनच उदाहरणे खूप बोलकी आहेत, अर्थसाक्षरतेचा अभाव दाखवणारी. यावरून सगळ्यांनीच शहाणं व्हावं. सुमाने खाते काढतानाच बचत खात्यावर डेबिट/एटीएम/क्रेडिट कार्ड केवळ स्वत:साठी घ्यायला हवे होते. वापरायची रक्कम अधिकांश ठेवून कार्ड वापर वरचेवर करायला पाहिजे होता. तसेच, एखादे पाच/दहा हजारांचे रिकिरग फक्त तिच्या नावावर काढायला हवे होते. त्याचा हप्ता याच खात्यातून घेण्यासाठी तशा सूचना बँकेला द्यायला हव्या होत्या. शिवाय एक-दोन लाख रुपये खात्यात ठेवून उरलेली रक्कम मुदत ठेव एकटीच्या नावाने करायला हवी होती. रिकिरग/मुदत ठेव खात्याचे नामांकन नवऱ्याचे नावे न करता माहेरच्यांपैकी कोणा एकाच्या नावाने करायला हवे होते. त्यांनी सुमाला दिलेले पैसे आहेत. समजा, काही झालं तर ते त्यांना मिळतील, नवरोबाला कशाला लगेच?

पण नाही ना..  नववधू असं काही सांगायला घाबरतात. स्वत: चे पैसे असूनही.  यासाठी काही सूचना ..

एकाच बँकेत सर्व रक्कम ठेवू नये, वेगळ्यावेगळ्या बँकांमध्ये ठेवावी. जाणीवपूर्वक सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी- पीपीएफ खाते काढावे, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी. एखादे दुसरे सिप – सिस्टीमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन सुरू करावे, त्याला बचत खात्यातून पैसे जातील यासाठी इसीएस करतात, तेव्हा बचत खात्याचा चेक कॅन्सल करून द्यावा. इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करावी. डीमॅट खाते, शेअरबाजार गुंतवणूक हेही उत्तम. हे सर्व काही सुमाला करण्याजोगे होते. शिवाय, शेअर गुंतवणूक शिकण्यासाठी एखादा क्लास लावला असता तर तिचे नुकसान टाळू शकली असती. जर हे तिला माहीत असते तर. सगळ्या गोष्टी जरी माहीत नसल्या तरी बँकिंग व्यवहारांमध्ये कशाकशाचा समावेश येऊ  शकतो हे किमान लक्षात ठेवावे, त्यानुसार वेळोवेळी चाचपणी करावी आणि कृती.

याव्यतिरिक्तही घरी बसण्यापेक्षा एखादा छोटा व्यवसाय सुरू करायची कल्पना सुमाने पुढय़ात मांडली असती, पैसे गुंतवले गेले असते, बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय वाढवला असता, स्वतंत्र जागा घेतली असती, स्वत:साठी दुचाकी, चारचाकी सुमाने मजेत फिरवली असती, हाताखाली       दोन-चार कामगार असते; पण झाले काय? केवळ अर्थसाक्षरतेची कमतरता. इथे एक सांगावेसे वाटते, मुलींनी स्वत:च्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहावे आणि आपले आत्मभान सदैव जागरूक ठेवून जगात वावरायला हवे. अगदी लग्न करून सासरी गेल्यावर त्याही घरात तसंच वागलं पाहिजे. दोन्ही घरे मुलींची असतात, ही भावना बळावली पाहिजे.

शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत स्त्रियांनी मुलींनाही कर्ज काढून शिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सासरी गेल्यावरही कर्जाचे हप्ते द्यायचेत याचे भान त्याच वेळी मुलींनीही ठेवायला हवे. तिने कमावलेल्या पैशांवर सासरची मंडळी लगेच हक्क दाखवतात. जशी पदवी, नोकरी घेऊन आली तसेच शैक्षणिक कर्जाचे हप्तेदेखील आणले तर बिघडत नाही. स्वत:चा मानापमान आपणच ठेवून घ्यायचा असतो. हे तेव्हाच जमते जेव्हा स्त्री स्वत:च्या पायावर खंबीरपणे अर्थार्जन करीत उभी असते, आत्मविश्वासाने वावरते तेव्हा. पुरुषप्रधान संस्कृतीत तेही अनेकींना शक्य होत नाही. पैशासाठी जीव घेणारे आपण नेहमी बघतो. त्यापासून सावधानता हवीच.

अर्थसाक्षरतेअभावी फसविण्याची शक्यता अधिक. थोडय़ा दिवसांत दुप्पट रक्कम म्हणजे फसवणूकच असते. याची जाणीव नसल्याने ऐकताच लाळ सुटते, पैसे अडकविले जातात, शेवट फसवणुकीतच. इतक्या मोठय़ा प्रमाणात कोणीच व्याज देऊ  शकत नाही इतकेही लक्षात येऊ  नये? सर्वामागील कारणमीमांसा जाणून घेणे त्याबरोबर आपली निर्णयक्षमता योग्य ठेवणे महत्त्वाचे असते.

स्त्री घरासाठी सगळं करते, त्याबरोबर आपले अधिकारही ओळखायला शिकले पाहिजे. स्त्री कुठेही असो, शहर, खेडं, वाडी तरीही तिने स्वत:च्या नावाने स्वतंत्र असे किमान एक तरी बँक खाते काढले पाहिजे. प्रत्येक वेळी लहान-मोठय़ा खर्चासाठी नवऱ्याची परवानगी, त्याच्यापुढे हात पसरणे, अपमानित होऊन चार शब्द ऐकून घेणे यापासून अनेक स्त्रियांनी आज आपली सुटका करून घेतली आहे. नसेल तर आधी लाचारीची सवय बंद करायला पाहिजे. पैसे वापरायचा तिला असलेला अधिकार तिने वापरलाच पाहिजे. आजमितीस जिथे बँक नाही अशा वस्त्यावाडय़ांपर्यंतही व्यवसाय मार्गदर्शकामार्फत बँकिंग उंबऱ्यात आलेले आहे. तेव्हा आपापले खाते काढून वापरावे. आजची गरज कॅशलेस बँकिंग आहे, तेही शिकावे. तेव्हाच देशाच्या आर्थिक प्रवाहात प्रवेश केला असे होईल. वित्तीय समावेशन आणि जनधन योजना अंमलबजावणी मोठय़ा प्रमाणात केल्याने स्त्रियांनीही आपापली खाती काढली.

कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करावा. पर्यायी माध्यमांमध्ये विविधता, सोय, सोपेपणा आहे. बँकेबाहेरचे व्यवहार ऑनलाइन अधिक सोपे व वेळ वाचवणारे असतात. शिवाय ताबडतोब मोबाइलवर मेसेज येत असल्याने सत्यतेची पडताळणी करणे सोपे होते. वाचणारा वेळ दुसरीकडे लावता येतो. याचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे, फायदा उचलायला हवा.

चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर हे तिन्ही रुजलेले पैशाचे पर्याय आहेत. तरीही, अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना थोडी जोखीम वाटते आणि १/२ दिवसांचा कालावधी नको वाटतो. त्याऐवजी ई-पेमेंटचे पुढील प्रकार प्रचलित आहेत. – प्लास्टिक मनी. (डेबिट/क्रेडिट/एटीएम कार्ड्स), एनईएफटी/ आरटीजीएस, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, आयएमपीएस, एमएमआयडी, मोबाइल पेमेंट अ‍ॅप, यूपीआय- युनिफाइड पेमेंट इंटरफेस, भीम अ‍ॅप आणि तत्सम आणखीन. बहुतांशी सेवा रात्रंदिन उपलब्ध आहेत.

शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत स्त्रियांनी मुलींनाही कर्ज काढून शिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सासरी गेल्यावरही कर्जाचे हप्ते द्यायचेत याचे भान त्याच वेळी मुलींनीही ठेवायला हवे. तिने कमावलेल्या पैशांवर सासरची मंडळी लगेच हक्क दाखवतात. जशी पदवी, नोकरी घेऊन आली तसेच शैक्षणिक कर्जाचे हप्तेदेखील आणले तर बिघडत नाही. स्वत:चा मानापमान आपणच ठेवून घ्यायचा असतो. हे तेव्हाच जमते जेव्हा स्त्री स्वत:च्या पायावर खंबीरपणे अर्थार्जन करते.

स्त्रियांना भिशी प्रकार प्रिय असतो, पण तिथे व्याज नाही. तेव्हा अधिक रक्कम बचत खात्यात भरावी. रिकिरग, मुदत ठेव करीत आपली पुंजी वाढवावी. तीच मुदत ठेव पुढेमागे कामास येते. त्यावर कर्ज/ओव्हरड्राफ्ट मिळतो. हीच आर्थिक तरलता असते. बँकेकडून जोपर्यंत कर्ज घेतले जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने बँकिंग केले असे होत नाही. म्हणून स्त्रियांनी कर्ज विभाग समजून घ्यावा. बहुतेक सगळ्याच बँका स्त्रियांना स्वतंत्ररीत्या बरेचदा कमी दरात कर्ज देऊन स्त्रियांना प्रोत्साहन देतात. कर्ज घेऊन भरारी घेणाऱ्या स्त्रिया आपल्याच आजूबाजूला वावरताना बघा. त्यांच्या धडाडीला सलाम ठोका.

खात्यातील नामांकन सुविधेत आपल्या मनाप्रमाणे करावे. एक पायरी पुढे जाऊन सांगावेसे वाटते, स्त्रियांनी स्वत:चे मृत्युपत्र-इच्छापत्र करावे. आपल्या संपत्तीची वाटणी स्वेच्छेनुसार करायचा अधिकार स्त्रिया वापरीत नाहीत, तो वापरावा. त्यासाठीही बँकेकडून मार्गदर्शन मिळतेच. आपल्या पश्चात पैशावरून भांडणे नको, एकोपा राहावा, यासाठीही स्त्रियांनी पुढाकार घ्यावा. ‘मी गेल्यावर काहीही करा या वाडय़ाचे’.. असे अधांतरी बोलून सोडलेल्या वाडय़ाच्या वाटण्या करताना भावंडांमध्ये किती दुश्मनी पेरली जाते याची अनेक उदाहरणे आहेत.

ग्रामीण स्त्रियांनी बँकेशी चांगलीच जवळीक केलेली आहे. बचत गटांची प्रचंड आर्थिक उलाढाल सर्वज्ञात आहे. मीही अनेक वर्षे बॅकेमध्ये काम केल्यानंतर या संदर्भात एक माहितीपट केला असून त्याद्वारे स्त्रियांना मार्गदर्शन करते. महाराष्ट्रात खेडोपाडी जाऊन अनेक जणी मुली त्याद्वारे स्त्रियांना बँकिंग शिकवितात. मला खूप समाधान आहे त्यात. गृहकर्ज स्त्रियांच्या नावाने होत असताना तिचे नाव घरावर लागते. तो तिचा सन्मान आहे; परंतु आपल्या पत्नीच्या नावाने घर घ्यायला पुरुषी मानसिकता पटकन तयार होत नाही.

आत्ताच्या सरकारच्या अनेक सुविधा स्त्रियांना सन्मानित जीवन जगू देणाऱ्या आहेत. त्याचा फायदा जरूर घ्यायला हवा. जास्तीत जास्त स्त्रियांची बँकेत खाती असायलाच हवीत, मात्र अर्थसाक्षरता नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे अर्थसाक्षर असणं ही काळाची गरज आहे, अगदी प्रत्येकाने..

वंदना धर्माधिकारी vandana10d@yahoo.co.in