डॉ. सीमा राव या कमांडोंना प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील पहिल्या व एकमेव स्त्री प्रशिक्षक मानल्या जातात. सीमा आणि त्यांचे पती मेजर डॉ. दीपक राव दोघे डॉक्टर असूनही गेली २० र्वष ते भारतीय सैनिकांना शस्त्रविरहित लढाईचं प्रशिक्षण देत आहेत. नेव्ही, हवाई दल, सीमा सुरक्षा दल, पोलीस दल, दंगलविरोधी दल, दहशतवादविरोधी दल इतकेच नव्हे तर कमांडोंनाही त्या आधुनिक संकल्पनांचे प्रशिक्षण देत आहेत. राव दाम्पत्य एका पैशाचाही मोबदला न घेता केवळ देशसेवा म्हणून हे प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्याविषयी..

सोळाव्या वर्षांपर्यंत एखाद्या सर्वसामान्य मराठी घरातील मुलीप्रमाणे होतं तिचं आयुष्य. त्या फुलपंखी दिवसांतच तिला तिचा राजकुमार भेटला आणि त्याच्या परिसस्पर्शाने तिचं साधंसरळ जीवन आमूलाग्र बदललं. मार्शल आर्ट या कलेचं एक अनोखं दालन त्याने तिच्यासमोर उघडलं. दोघांनीही आपलं बुद्धिकौशल्य आणि कठोर मेहनत पणाला लावली आणि या कलेचा देशाच्या संरक्षणासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी वेगवेगळी तंत्रं शोधून काढली. स्वत: विकसित केलेलं ते कौशल्य ही जोडी गेली २०/२२ र्वष भारतीय सैन्यदलातील (Armed Force) कमांडोंना एका पैशाचाही मोबदला न घेता केवळ देशसेवा म्हणून देत आहे. आपल्या सैन्यदल प्रमुखांनी यासाठी त्यांची वेळोवेळी पाठ थोपटलीय. मेजर डॉ. दीपक राव व डॉ. सीमा राव यांच्या या विलक्षण राष्ट्रभक्तीला देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा मानाचा मुजरा.

Apple ReALM, Apple
यूपीएससी सूत्र : न्यूझीलंडच्या व्हिसा नियमांमधील बदल अन् ॲपलचे ReALM , वाचा सविस्तर…
Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar engaged with social media sonalee patil
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा, दोघांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

खरं तर दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर (एम.बी.बी.एस), परंतु सुरुवातीपासूनच या पाश्र्वभूमीचा उपयोग शारीरिक क्षमता, प्रतिकारशक्ती इत्यादी वाढवण्यासाठी संशोधन करण्याकडे दोघांचा ओढा. या संदर्भात त्यांनी सांगितलेले एक उदाहरण असे की, हायपोक्सिया मास्क घालून (प्राणवायूचा पुरवठा कमी करून) एक कि.मी. धावणं हे नेहमीच्या पाच कि.मी. धावण्याच्या बरोबरीचं. म्हणजे जर असा सराव असेल तर उंच ठिकाणांवरील विरळ हवामानातही कार्यक्षम राहता येतं. २५ वर्षांपूर्वीचा तो काळ. कराटे, बॉक्सिंग, ज्युडो या मार्शल आर्टचे प्रकार व स्पोर्टस् शूटिंगमध्ये एकेक पायरी वर चढत असताना त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिसही सुरू होती. परंतु रात्री उशिरापर्यंत रुग्णांच्या चक्रव्युहात अडकून पडणं दोघांच्याही पचनी पडत नव्हतं. या परिस्थितीतून शांतपणे कोणता तरी मार्ग काढावा म्हणून त्यांनी आपलं मुंबईतील चंबूगबाळं आवरलं आणि ते तडक पुण्याला निघून आले. त्यांच्या जीवनाला वेगळं वळण लागलं ते याच जागी.

एकदा सहज फिरताना पुण्याचं सदर्न कमांड मिलिटरी स्कूल दृष्टीस पडल्यावर दीपकना राहवलंच नाही. ते तिथले प्रमुख ब्रिगेडियर जी. आर. सी. नायर यांना भेटले आणि म्हणाले, ‘शस्त्रविरहित लढाईसाठी (unarmed combat) अधिक चांगल्या पद्धती आम्ही शिकवू शकतो.’ प्रेझेंटेशन दिल्यावर लगेचच एका दिवसाचं सेमिनार आयोजित करण्याची संधी मिळाली. नव्या वाटेवरचं त्यांचं हे पहिलं पाऊल.

ब्रिगेडियर नायर यांच्याकडून प्रशस्तिपत्रक मिळालं. शिवाय मुंबईत असताना दीडशे-दोनशे पोलीस उपनिरीक्षकांच्या बॅचला प्रशिक्षण दिल्याचा अनुभवही त्यांच्या पाठीशी होता. या शिदोरीच्या आधाराने राव दाम्पत्याने थेट X N.S.G. (ब्लॅक कट)चे संचालक त्यागींपर्यंत धडक मारली. ब्लॅक कॅट कमांडोंना दिलेलं एक आठवडय़ाचं खडतर प्रशिक्षण तिथल्या ट्रेनिंग सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर बलवीर सिंग यांना एवढं पसंत पडलं की, त्यांनी स्वत:हूनच राव पती-पत्नींची लष्करप्रमुख (Army chief) जनरल रॉय चौधरी यांच्याकडे शिफारस केली. इथल्या सहा  आठवडय़ांच्या अभ्यासक्रमात त्यांनी अनेक प्रशिक्षक घडवले. त्यानंतर नेव्ही, हवाईदल, सीमा सुरक्षा दल, पोलीस दल अशा सर्वच ठिकाणांहून शस्त्रविरहित लढाईतील अत्याधुनिक संकल्पना शिकवण्यासाठी त्यांना आमंत्रणे येऊ लागली आणि राव दाम्पत्याला वेळ अपुरा पडायला लागला.

हे प्रशिक्षण देत असताना दोघांना, त्या त्या ठिकाणाच्या रेंजमध्ये वेगवेगळ्या बंदुकीच्या साहाय्याने गोळीबार (फायिरग) करण्याची संधी मिळाली. या प्रकारातही त्यांनी कौशल्य मिळवलं आणि त्याचेही धडे द्यायला त्यांनी सुरुवात केली. १०० मीटर अंतरावरून अचूक लक्ष्यवेध, धावत लक्ष्य टिपणे, वेगवान वाहनातून लक्ष्यवेध.. अशा  अनेक नव्या गोष्टी त्यांनी शोधल्या व त्यातील तंत्र व मंत्र कमांडोंना शिकवले. सीमा म्हणते की, ती शंभर मीटर अंतरावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरील सफरचंदाचा (लक्ष्य) अचूक वेध घेऊ शकते व त्याच वेळी तिच्या डोक्याच्या दिशेने येणारी सुसाट गोळीही क्षणार्धात चुकवू शकते.

कमांडो म्हणजे सवरेत्कृष्ट जवान (बेस्ट सोल्जर्स). असं सांगितलं जातं की, ते देशासाठी कोणतीही आत्मघातकी कारवाई (sucide operation) करण्यासाठी सदैव तयार असतात. संपूर्ण फौज बरोबर असतानाही जिथे जाण्यासाठी आपली हिंमत होणार नाही अशा ठिकाणी रात्रीच्या घनघोर अंधारात पॅराशूटच्या साहाय्याने उतरून शत्रूची महत्त्वाची ठाणी उद्ध्वस्त करून परत येताना कित्येक किलोमीटर्स अंतर पळत येण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. अशा शूर व धाडसी कमांडोंना लढण्यासाठी अधिक उपयुक्त प्रशिक्षण देणारी डॉ. सीमा राव ही भारतातील पहिली आणि एकमेव महिला प्रशिक्षक आहे. या अनुभवाबद्दल सीमाचं म्हणणं.. ‘‘मुळात एक स्त्री अशा प्रकारचं ट्रेनिंग देऊ शकते हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणं हेच माझ्यापुढचं पहिलं आव्हान होतं. तो मिळवण्यात मी यशस्वी ठरले याचा मला अभिमान वाटतो..’’

कमांडोमध्ये त्वरित प्रतिसाद देणारी एक विशेष तुकडी असते (Quick response team). या लहानशा टीमने (४ ते १६ कमांडो)मोठय़ा सैन्याला तोंड कसं द्यायचं, त्यासाठी कोणत्या युक्त्या वापरायच्या यावरही राव दाम्पत्याने संशोधन केलंय. या पद्धतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी दीपक यांनी अमेरिकेत जाऊन ‘लॉ एनफोर्समेंट ट्रेनर’ हा अभ्यासक्रमही केला. तो यशस्वीपणे पूर्ण करणारे ते पहिले आशियाई आहेत. या शिक्षणाने त्यांच्या विचारांना दिशा मिळाली. पर्यायाने क्विक रिस्पॉन्स टीमच्या प्रशिक्षणासाठी प्रात्यक्षिकांची मागणीही वाढली.

अगदी जवळून (३० मीटर्सपर्यंत) केल्या जाणाऱ्या लढाई (क्लोज क्वॉर्टर बॅटल C.Q.B) गोळीबार कसा करावा यासाठीही दीपक व सीमा या दोघांनी अभ्यासपूर्वक नवीन पद्धत शोधलीय. ‘राव सिस्टीम ऑफ रिफ्लेक्स फायर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पद्धतीत हातापायांच्या हालचाली अधिक वेगाने होतात जेणेकरून थोडय़ा अवधीत जास्तीत जास्त शत्रू टिपले जातात. ही नवी दिशा आर्मी हेड क्वॉर्टर्सच्या उच्चपदस्थांना एवढी आवडली की त्यांनी भारताच्या उत्तर आणि पूर्व सीमांवरील सैन्यदलांना प्रशिक्षण देण्यासाठी यांना पाठवलं. त्याचबरोबर सैनिकी शाळांमध्येही (आर्मी बॅटल स्कूल) त्यांनी ही पद्धत शिकवली. समोरासमोरच्या लढाईतील कौशल्य हीदेखील राव दाम्पत्याची खासियत. यात पिस्तूल, चाकू अशा हत्यारांनी केलेला हल्ला तसंच निव्वळ हाताने केलेली चकमकही येते. या प्रकारातील त्यांची सुधारित तंत्र विशेषत: अतिरेक्यांशी लढताना आणि अपहरणाविरोधाच्या प्रसंगात कामी येतात.

राव पतीपत्नीच्या देशसेवेचा झपाटा बघताना मनात प्रश्न येतोच की, हे नि:स्वार्थी काम त्यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय केलं खरं पण मग त्यांच्या चरितार्थाचं काय? यावर दीपक राव म्हणाले, ‘‘एक तर घरात आम्ही होतोच कुठे? आणि जाण्यायेण्याचा खर्च ते ते दल करतंच होतं. झालंच तर आमचं मुंबईतलं घर आणि दवाखाना विकून मिळालेली पुंजीही आमच्यापाशी होती..’’

पंधरा वर्षांच्या अथक सेवेनंतर रावांनी या राष्ट्रीय  योगदानाबरोबर स्वत:ची ‘मिक्स्ड मार्शल आर्ट अ‍ॅकॅडमी’ (M.M.A.)सुरू केली (२००५). सर्वसामान्यांपासून कंपन्यांतील अधिकारी वर्गापर्यंत कोणालाही मार्शल आर्टचं शिक्षण देणारी ही भारतातील प्रथम क्रमांकाची संस्था मानली जाते. इथल्या अभ्यासक्रमात मार्शल आर्टबरोबर पोषक आहार, फिटनेस, वजन नियंत्रण, अध्यात्म इत्यादी विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

एका प्रखर स्वातंत्र्यसेनानीच्या (प्रो. रमाकांत सिनारी) पोटी जन्माला आलेल्या आणि त्याच संस्कारात वाढलेल्या डॉ. सीमाजवळ एवढी कौशल्यं आहेत की तिला अष्टभुजेची उपमा देणं उचित ठरेल. ब्रुसलीने १९६० मध्ये विकसित केलेल्या मार्शल आर्टमधील जीतकोण्डो या प्रकारात संपूर्ण जगामध्ये ज्या दहा स्त्रिया मान्यताप्राप्त आहेत त्यातली ही एक. त्याशिवाय तायक्वोंडोमधील ब्लॅकबेल्टधारक, मिलिटरी मार्शल आर्टमध्येही ब्लॅक बेल्ट, स्कूबा ड्रायव्हर, प्रस्तरारोहण (रॉक क्लायबिंग)मध्ये सुवर्णपदकाची मानकरी, लढाईतील नेमबाजी प्रशिक्षक, सी.क्यू.बी.मध्ये निष्णात पॅराशूट जम्पर, कमांडोंना प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली व एकमेव स्त्री प्रशिक्षक आणि मिसेस इंडिया सौंदर्यस्पर्धेतील अंतिम फेरीतील स्पर्धक.. अशी अनेक बिरुदं तिच्यापाशी आहेत. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं तर एम.बी.बी.एस.बरोबर, एम.बी.ए. (विषय आणीबाणीच्या परिस्थितीतील व्यवस्थापन) आणि शारीरिक शिक्षणात (फिजिकल सायन्स) डॉक्टरेट एवढय़ा पदव्या तिच्या नावापुढे लागल्या आहेत.

गेल्या २०/२२ वर्षांचा हा प्रवास रोमहर्षक वाटला तरी अजिबात सोपा नव्हता. अत्यंत दुर्गम ठिकाणी, अतिशय प्रतिकूल हवामानात त्यांना काम करावं लागलं. तेही एकदा-दोनदा नव्हे तर अनेकदा. सीमाला तर दोन-चारदा शारीरिक दुखापतीही झाल्या. एकदा पाठीच्या कण्याला जबरदस्त मार बसला, एवढंच नव्हे तर पडल्यामुळे डोक्याला मार लागून तिची स्मृतीही काही काळासाठी नष्ट झाली होती. तरीही ते या मार्गावरून हटले नाहीत. अवाक्  व्हावं अशी आणखी एक गोष्ट  म्हणजे हाती घेतलेल्या कार्यात व्यत्यय नको म्हणून सीमाने मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या समंजस जोडीदाराने या बाबतीतही तिला पूर्ण साथ दिली. कालांतराने या दाम्पत्याने एक मुलगी दत्तक घेतली, जी आज मार्शल आर्ट शिकून आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चालली आहे.

सीमाने दोन वर्षांपूर्वी जोडीदाराच्या मदतीने आणखी एक शिखर पादाक्रांत केलंय. स्त्रियांचे सक्षमीकरण हा विषय घेऊन महाभारतातील द्रौपदीच्या कथेवर आधारलेला एक चित्रपट त्यांनी बनवलाय. ‘हाथापाई’ (मारामारी) नावाच्या या सिनेमात निर्माता, लेखक, दिग्दर्शक, कलाकार.. अशा सर्व भूमिकांत यांचा सहभाग आहे. त्यांच्या या कलाकृतीला वितरक मिळावा यासाठी प्रतीक्षा सुरू  आहे.

आजवरच्या प्रदीर्घ अनुभवांवर राव पती-पत्नीने २००६ मध्ये ‘एनसायक्लोपीडिया ऑन क्लोझ क्वॉर्टर स्वॅट बॅटल’ हे पहिलं पुस्तक लिहिलं. या पुस्तकाने एफ.बी.आय.,  इंटरपोल आणि स्वॅट च्या नामवंत विदेशी वाचनालयात मानाचं स्थान पटकावलंय. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या निर्मितीसाठी त्यांनी मित्रमंडळींकडून कर्जाऊ रक्कम उभी केली आणि सर्वच्या सर्व हजारभर प्रती भारतीय सैन्यदलाला अर्पण केल्या. त्यानंतरही ‘कमांडो म्यॅन्युअल ऑफ कॉम्बॅट’ आणि ‘फोर्सेस हॅण्डबुक ऑफ टेरिरिझम’ अशी आणखी दोन पुस्तकं त्यांनी लिहिली.

रावांच्या पराक्रमाची दखल केंद्र सरकारनेही घेतली आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चिदम्बरम यांनी दोघांना बोलावून संपूर्ण भारतातील पोलीस दलात बदल घडवून आणण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रातील

तज्ज्ञ (approved resource) म्हणूनही त्यांना मान्यता दिली. गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार दीपक व सीमा यांनी २००९ ते २०१२ या चार वर्षांत १६ राज्यांमधील पोलीस दलातील क्विक रिस्पॉन्स टीम प्रशिक्षित केल्या. याशिवाय मुंबई पोलिसांची

दंगल काबूत आणणारी (Riot Control)

आणि दहशतवाद मोडून काढणारी (Anti terrorist) अशा दोन पहिल्या बॅचना प्रशिक्षण देण्याचं श्रेयही त्यांचंच.

भारतीय सैन्य दलाला दिलेल्या या अभूतपूर्व योगदानाबद्दल दीपक राव यांना २०११ मध्ये आर्मी प्रमुख व्ही. के. सिंग यांच्या हस्ते सन्मानपूर्वक मेजर हा हुद्दा देण्यात आला. या सन्मानाला ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया रँक अवार्ड’ असंही संबोधलं जातं. तसंच इंडियन आर्मी व टेरिटोरियल आर्मीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलं. मेजर दीपक राव म्हणाले, ‘या बहुमानाचा आनंद आहेच पण त्याबरोबर एक खंतही. कारण आतापर्यंत जे जे काही आमच्या हातून घडलंय त्यात आम्हा दोघांचा बरोबरीचा वाटा आहे. मग हा सन्मान मला एकटय़ालाच का?..’

सर्व क्षेत्रांत स्त्रियांना समान दर्जा देण्याचं स्वप्न दाखवणारं आपलं सरकार सर्वार्थाने पात्र असणाऱ्या स्त्रीवर झालेला हा अन्याय दूर करेल?

संपदा वागळे

uccamumbai@gmail.com

waglesampada@gmail.com