लग्नात दिल्या जाणाऱ्या हुंडा नामक अनिष्ट प्रथेने अनेकांचे बळी घेतले आहेत, कायदा असूनही ही परंपरा आजही चालू आहे. कारण ती आपणच चालू ठेवली आहे. शीतल वायाळ या मुलीने नुकतीच केलेली आत्महत्या याच गोष्टीकडे निर्देश करते आहे. यावर आता जाणीवपूर्वक सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. वाघोली भिसे या गावातली ‘गेटकेन’ ही पद्धत काही अंशी तरी लग्नखर्च आटोक्यात आणते आहे. याशिवाय शेतीला पर्याय म्हणून इतर आर्थिक, व्यावसायिक प्रयत्न करणे, ही चळवळ होणे कसे गरजेचे आहे हे सांगणारा लेख.

आपल्या लग्नात हुंडय़ाला देण्यासाठी वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून शीतल वायाळने केलेल्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा हुंडय़ाचा वा हुंडय़ाच्या नावाने केल्या जाणाऱ्या लग्नाच्या खर्चाचा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी त्यातून इतर अनेक प्रश्न आणि पर्यायही सामोरे आले आहेत. या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी समूह प्रयत्नांची, चळवळीची गरजच गावाला आणि माणसांना वाचवू शकणार आहे, हे आणि हेच अधोरेखित झाले आहे.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत

त्यासाठीच शीतलने आत्महत्या केली त्याची पाश्र्वभूमी फक्त हुंडा नाही हे लक्षात घ्यायला हवे. अशा हुंडय़ासाठी अनेक शीतल संपल्या आहेत, मात्र या शीतलने एका मोठय़ा प्रश्नाला वाचा फोडली आहे ती माझ्या दृष्टीने चळवळीचे बीजे आहेत. यानिमित्ताने शीतल राहत असलेल्या भिसे वाघोलीत मी जाऊन आलो. तेव्हा तिथली परिस्थिती आणि ग्रामस्थांनी या प्रश्नाकडे वेगळ्या अंगाने पाहायला लावले.

माझी पाश्र्वभूमी ग्रामीण असल्यामुळे मीही याच समाजघटकातला आहे. या प्रश्नावर बोट ठेवताना जी चार बोटे माझ्या दिशेने येणार आहेत, ते अपराधीपण स्वीकारून त्रयस्थपणे यावर बोलावेसे वाटते आहे. भिसे वाघोली फक्त उदाहरणादाखल घेतो आहे, पण ही परिस्थिती तमाम मराठवाडय़ात कमी-जास्त प्रमाणात सगळीकडे सारखीच आहे. भिसे वाघोली हे गाव मांजरा नदीच्या खोऱ्यातले आहे. अतिशय सुपीक पोताची जमीन असलेले हे गाव आहे. लातूरवरून कळंब रोडने निघाल्यानंतर भोइसमुद्र या गावापासून हिरवीगार शेते दिसतात. तांदूळवाडी, काटगाव, जोडजवळा, वांजरखेड, गादवड ही गावे गेल्या दोन दशकांतील प्रचंड ऊस पिकविणारी गावं. यांच्या भरवशावर मांजरा साखर कारखान्याचा साखरेचा उतारा देशातील अव्वल असायचा. मांजरा पट्टा एकदम पक्क्या बेसाल्टवरचा. १० ते १५ फूट गाळाच्या जमिनी, त्याच्याखाली काळा बेजोड पाषाण. त्यामुळे भौगोलिकदृष्टय़ा फक्त तीन टक्केच पाणी इथल्या भूगर्भात मुरते, तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती. उसाचे नगदी पीक मांजरेच्या पाण्यावर सुरुवातीला एक-दोन वर्षे पोसले. नंतर लोकांनी बोअरवेल पाडल्या. बोअरवेल किती पाडाव्यात? घरटी दोन ते तीन. एकटय़ा भिसे वाघोलीत दोनशे बोअरवेल असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. झाले असे की, आजूबाजूच्या १०० किलोमीटर परिसरात जमिनीची चाळण झाली. ७०० ते ८०० फूट खोल बोअरवेलनी जमिनीच्या आतले गेल्या शेकडो वर्षांचे साचलेले पाणी ओढून काढले. ते १० ते १५ वर्षे पुरले, मात्र बोअरवेलने लोहचुंबकासारखे संपूर्ण जमिनीतले पाणी ओरबाडून घेतले. मागच्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमालीचे कमी झाल्यामुळे जमिनीत पाणी मुरलेच नाही. गेल्या वर्षी धो धो पाऊस पडला, पण जमिनीचे उदर कोरडे असल्यामुळे जे तीन टक्के झिरपले ते फक्त काही दिवसांतच बोअरवेलच्या राक्षसाने संपविले आणि एप्रिलपासून अनेक बोअरना घरघर लागली. त्यात शीतलचे वडील व्यंकटराव वायाळ यांचेही पाणी संपले आणि दीड एकर ऊस वाळला. मागच्या दोन वर्षांत पाऊसमान कमी असल्यामुळे अनेकांना ऊस मोडावा लागला. या वर्षी उत्तम पाणी म्हणून लोकांनी दणक्यात ऊस लावला, पण धरतीच्या पोटातले पाणी संपले आणि यांच्या तोंडचे पाणी पळाले. घशाला कोरड लागली. या ऊसाच्या भरवशावर अनेक व्यवहार झालेले. पाण्याने असा अचानक दगा दिल्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे.

भिसे वाघोलीच्या वरच्या बाजूला १९८५ ला रायगव्हाण मध्यम सिंचन प्रकल्प झाला. त्यात भिसे वाघोलीतल्या अनेकांच्या जमिनी गेल्या. त्यात शीतलच्या आजोबांची १८ एकर जमीन गेली होती. त्याबदल्यात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे योग्य तो परतावा मिळाला नाही आणि त्या पाण्याचा आम्हाला कुठलाही उपयोग झाला नाही. त्यामुळे अनेक जमीनदार अल्पभूधारक झाले. वतनदार घरे होती, त्यामुळे त्यांचे जे खर्च होते ते तसेच राहिले, उत्पन्न कमी झाले. कुटुंब नियोजन करण्याचे गांभीर्य नसल्यामुळे अनेकांच्या कुटुंबांचा आकार वाढला. उत्पन्न कमी, खाणारी तोंडे वाढली आणि व्यावसायिक शिक्षणामुळे पहिले फुकट मिळणारे शिक्षण कमालीचे महाग झाले. शीतलच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी अख्खे घर मुरुड (हे निमशहरी गाव आहे) येथे शिक्षणाची उत्तम सोय म्हणून ठेवले होते. नंतर नंतर आíथकदृष्टय़ा परवडणारे नसल्यामुळे तिथले घर मोडून मुलांना गावातच आणले. पाच एकर शेतात तीन मुली आणि दोन मुलांचे शिक्षण आíथक भार वाढविणारेच ठरत होते.

तत्पूर्वी याच गावातली मोहिनी पांडुरंग भिसे या मुलीला बारावीला ७० टक्के मार्क मिळाले म्हणून तिने नìसगचा डिप्लोमा करायचा निर्णय घेतला, पण खुल्या प्रवर्गात असल्यामुळे तिला प्रवेश मिळाला नाही, असे तिथल्या गावकऱ्यांकडून कळले. लग्न करण्यासाठी मुले बघायला येत, पण हुंडा मागत परंतु वडिलांची ऐपत नसल्यामुळे लग्नही ठरत नव्हते. या परिस्थितीला तोंड द्यायला मोहिनी कमी पडली आणि तिने आत्महत्या केली. संपूर्ण गाव हादरले आणि त्यातूनच एक मार्ग गावकऱ्यांनी प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. ‘पाहुणे’ बघायला आले आणि मुलगी आवडली की कुंकवातच लग्न लावण्याची प्रथा या गावात सुरू झाली, त्यालाच ‘गेटकेन’ हे नाव आहे (साखर कारखान्याचे सभासद नसलेल्या शेतकऱ्यांच्या उसाची तोलाई गेटपासवरून होते आणि त्याला तिथेच पसे दिले जातात, याला गेटकेन म्हणतात, म्हणे). हे लग्न गेटकेन असले तरी बाकी हुंडा देणेघेणे हा रिवाज असतोच, फक्त लग्न समारंभाचा, बडेजावाचा खर्च वाचतो. तसे लग्न गावात अशोकराव भिसे, शाहू लकडे, श्रीमंत वायाळ आणि शीतलच्या दोन बहिणी पल्लवी आणि भाग्यश्री आदींचे झाले आहे. त्यामुळे हे ‘गेटकेन’ लग्नाचे लोण बऱ्यापकी पसरले आहे. ते अधिक वाढावे यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

या गावात इतर उत्पादनाचे साधन म्हणजे दूध. ४५० खातेदार असलेली विविध विकास कार्यकारी सोसायटी १ कोटी १३ लाख रुपयांची आहे. गावात रोज ५ हजार लिटर दुधाचे सहकारी दूध डेअरीत संकलन होते. गाईचे दूध २२ रुपये लिटर आणि म्हशीचे ४० रुपये लिटरने घेतले जाते. मात्र या सगळ्यातून  एकच दिसले, उत्पन्न खूप कमी आणि खर्च खूप मोठा. हा ताळेबंद कसा घालायचा हा फक्त भिसे वाघोलीचा प्रश्न नाही, तमाम खेडय़ांचा आहे. यावर वरवर चर्चा होऊन चालणार नाही. शीतलने आत्महत्या करून उपस्थितीत केलेल्या आर्थिक गणिताच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला समाज म्हणून कृतीतून द्यावे लागणार आहेत. संधिप्रकाशातच मार्ग काढावा लागेल. अधिक अंधारले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. मग सारेच कठीण होऊन बसेल. आपोआप उजाडणारच आहे, अशी वाट पाहत बसलो तर ती काळरात्र भयानक ठरेल.

त्यासाठी आता गावातल्या मुलींनी, तरुणींनीही पुढाकार घ्यायला हवा. भिसे वाघोली हे गाव चळवळीची परंपरा असलेले आहे, असे कृषी विभागातून सेवानिवृत झालेले भिसे सांगतात, या गावात ‘पत्रीसरकार’चे जनक क्रांतिसिंह नाना पाटील येऊन गेले होते. त्यांनी या गावात सभाही घेतली होती. ग्रामगीतेतून ग्रामीण विकासाचा आणि मूल्याचा प्रचार आणि प्रसार करणारे तुकडोजी महाराज येऊन प्रबोधन करून गेले होते. ८० च्या दशकात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद जोशींनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रान पेटविले होते त्यावेळी अख्खे गाव

या आंदोलनात उतरले होते. यात स्त्रियांचा आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता. त्याच भिसे वाघोलीत आता जी गेटकेन प्रथा सुरू झाली, तिचे लोण आजूबाजूच्या गावात पसरत आहे. शीतलच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जी परिपक्वता आहे, ती परिपक्वता जीवन संपवून नाही तर समाजाला जाब विचारण्यासाठी वापरली जाईल, असं वातावरण निर्माण झालं आहे. जो मुलगा हुंडा मागेल त्याच्याशी आम्ही लग्न करणार नाही, अशी सामूहिक नारी-शक्ती इथून उठाव करू शकते. त्यासाठी त्यांनीही शिक्षणाची कास धरुन आर्थिक स्वातंत्र अधिकाधीक मिळवलं पाहिजे. गावाला चळवळीची पाश्र्वभूमी असल्यामुळे गावातील या चळवळीशी जोडलेले लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे चित्र निर्माण होऊ शकतं, नव्हे ते निर्माण करावं लागेल.

महाराष्ट्रातलं समस्त समाजमन शीतलच्या आत्महत्येनं अस्वस्थ झालं आहे. आता महाराष्ट्रातील तमाम नारी-शक्तीनं हे पाऊल उचलायला हवं तरच हे अस्वस्थ चित्र येत्या काळात आश्वासक वळणावर येईल.  प्रत्येकाने आपापला हातभार लावायलाच हवा. ही एक चळवळ व्हायला हवी. लग्नातील देणीघेणी बंद केली पाहिजेच, त्यासाठी आता तरुण, मुलांनीही  एकत्रितपणे पुढाकार घ्यायला हवा. प्रथा-परंपरेलाच प्रश्न विचारायला हवेतच, याशिवाय उदरनिर्वाहासाठी जोडधंदे, व्यापार, कुटीर उद्योग, सामूहिक शेती यावर गंभीरपणे आणि कृतिशील काम होणे गरजेचे आहे. विकासकारण हाच ध्यास घेऊन गावकऱ्यांनी कामाला लागायला हवे. प्रत्येक गोष्ट सरकार करेल, असे म्हणून चालणार नाही, उलट शेतीवरचे अवलंबित्व कमी करायला हवे. विकासाची गंगा आता सामूहिकपणेच गावात आणायला हवी. त्यासाठी फार कष्ट नको, नियोजन हवे आणि अंमलबजावणी हवी. आपली आपल्यासाठीच! शीतलच्या आत्महत्येतून हा धडा तरी नक्कीच घ्यायला हवा..!!

युवराज पाटील y2k2patil@gmail.com

(लेखक अकोला जिल्हा माहिती अधिकारी आहेत.)