‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ने २०१५ सालच्या वारीत पुण्यात एक अनोखं अभियान राबवलं होतं. ज्ञानेश्वर आणि तुकाराम माउलींच्या पालखी-पादुका पुण्यात येतात तेव्हा लाखो भाविक पुण्यात मुक्कामी असतात. या वारकरी बांधवांना अन्नाची शिदोरी अनेक जण देतात, पण मांसाहार वज्र्य असलेल्या वारकऱ्यांमध्ये असलेल्या तंबाखूच्या व्यसनाच्या प्रमाणाकडे
पाहात गेल्या वर्षी आमच्या स्वयंसेवकांनी त्यांना व्यसनमुक्त आरोग्याची शिदोरीही सोबत बांधून दिली. जिथे जिथे लोक मुक्कामास असत तिथे रात्रीचे भोजन झाल्यावर कीर्तन-भजन होत असे. आम्ही याच कीर्तनात जाऊन त्यांना तंबाखू मुक्तीची माहिती देणायासाठी खास बनवलेला माहितीपट दाखवू लागलो. अडीच दिवसात तब्बल ४० गटांमध्ये आम्ही हा माहितीपट दाखवला आणि या सर्व वारकऱ्यांना दुष्परिणाम दाखवणारे हस्तपत्रकही दिले.
यातील अनेक गटांमधील वयस्कर लोकांनी सर्वासमोर येऊन शपथपूर्वक तंबाखूची पुडी फेकून दिली. यातील सावडी अक्का यांनी नुसती पुडीच फेकली नाही तर सर्वाना एक मंत्र त्यांच्या पाठी गायला लावला..
‘‘ऐका, ऐका, तुकोबा माउली काय म्हणतात. तंबाखूला नाही म्हणतात..
‘‘ऐका, ऐका, ज्ञानोबा माउली काय म्हणतात. तंबाखूला नाही म्हणतात’
ग्रामीण भागातील लोकांपर्यंत या तंबाखू सेवनाचे घातक दुष्परिणाम सहज पोहोचत नाहीत म्हणून, पण तसे झाल्यास ते सहजपणे व्यसन सोडण्यास तयारी दाखवून व्यसनमुक्त होऊ शकतील अशी आशा या निमित्ताने वाटल्याशिवाय राहात नाही हे मात्र खरे.
ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान कार्यालय
संपर्क – डॉ. सायली कुलकर्णी
४८१/सी, शनिवार पेठ, श्रीपाल चेंबर्स, पहिला मजला, कार्यालय क्र. १२,
पुणे – ४११०३०