डाग देणाऱ्या नवऱ्याला तिनं एकदाच सुनावलं, ‘लक्षात ठेव, तुझ्या सिगारेटपेक्षा माझ्या चुलीतल्या लाकडाचा जाळ मोठ्ठा असतो..!’ तिला त्याने आधी जेव्हा चटके दिले होते तेव्हाही तिच्या चुलीचा जाळ मोठ्ठा होताच, पण तिला तो ‘दिसला’ नव्हता.. आणि हिम्मतही नव्हती. पण गटात आल्यावर तिला बळ मिळालं. कृतीपेक्षा शब्दही मोलाचं काम करून जातात, हे तिला कळलेलं बघून वाटलं, माझी काळजी मिटली.. आता ‘ती’ची काळजी घ्यायला ‘ती’ समर्थ झाली! बचत गटातील एकोप्यामुळे ग्रामीण पातळीवरच्या अनेक जणींचीही समर्थपणाकडे होणारी वाटचाल खूपच आशादायी आहे.. छोटय़ा छोटय़ा अनुभवांतून ‘ती’ मोठी होते आहे..

बचत गटाच्या चळवळीने ग्रामीण स्त्रीच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. तिची घरची-दारची, गावकीतली-भावकीतली किंमत वाढली हे 1अगदी खरे आहे. एखादे मोठे उदाहरण सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते तेव्हा अनेक छोटी छोटी उदाहरणे घडलेली असतात हे विसरून चालत नाही. कारण अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा एकत्रित प्रभाव खूप मोठा असू शकतो. अशा सगळ्या छोटय़ांना त्यांचा सत्कार झाला नाही तरी चालतो, त्यांची कोणी दखल घेतली नाही तरी चालतं. कारण त्या सगळ्या स्वत:वर खूश असतात. कोणे एके काळी.. आयुष्याला कंटाळलेली मीच का ती? असा अनेकींना प्रश्न पडतो. बचत गट म्हटल्यावर ‘शासकीय मदत मिळवणारा गट’ अशीसुद्धा प्रतिमा काहींच्या डोळ्यांसमोर उभी राहते.. पण असे फक्त शासकीय मदत मिळवण्यापुरते सुरू झालेले गट सभासदाला कधी ‘अवकाश’ मिळवून देऊ शकतातच असं नाही. पण जे गट इतर कोणाशीही स्पर्धा न करता स्वान्तसुखाय चालू असतात, ते बचत गट मात्र सभासदाला गटातून कर्ज देतात.. आनंदही देतातच पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे ‘अवकाश’ देतात! ग्रामीण भागातल्या बाईमध्ये होणाऱ्या बदलांची मी साक्षीदार ठरले ते ज्ञानप्रबोधिनीचं बचत गटाचं काम करत गावोगावी फिरल्यामुळेच! हे असे बदल एका दिवसात होत नाहीत. बदल घडताना आधी घडवणारी तयार व्हावी लागते.. अशा छोटय़ांच्या या गोष्टी!
एकदा बचत गटाला हिराबाई चक्क नवीन साडी नेसून आली. बचत गटातल्या असल्या तरी बायकाच त्या, नवी साडी दिसली म्हटल्यावर बोलणारच की हो सगळ्या.. ‘कुठून घेतलीस?’ ‘कितीला मिळाली?’ प्रश्न सुरू झाले तर हिरमुसून हिरा म्हणाली, ‘मी कुठली आणायला.. भावानं दिली. त्याच्याच पसंतीची!’ क्षणभर शांतता पसरली.. मग मात्र सगळ्याच बोलायला लागल्या, ‘आपल्या मेलीला कोण विचारतो?’, ‘आपल्याला काय अधिकार?’, ‘आपण निस्त्या कष्टाच्या दावेदार.’ अशा काय काय चर्चा सुरू झाल्या. ती चर्चा ऐकून मी अगदी सहजच बैठकीसाठी आलेल्या त्या सगळ्या जणींना विचारलं की, ‘त्यांच्यापैकी किती जणींनी कधी तरी स्वत: दुकानात जाऊन स्वत:साठी साडी आणाली आहे?’ तर धक्कादायक उत्तर मिळालं, १९९७-९८ मध्ये झालेल्या त्या बैठकीतल्या एकीनेही स्वत:साठी कधीही साडी विकत आणली नव्हती! हे मी समजूच शकत नव्हते.
ही चर्चा मात्र सगळ्यांच्याच जिव्हारी लागली. एकीकडे बचत, कर्ज परतफेड, व्याज असे पैसे गटात जमा होत होते. ‘कर्ज कोणाला हवं?’ गटप्रमुखांनी विचारलं तर हिरा म्हणाली, ‘सगळ्यांना! चला गं, पुण्याला जाऊन सगळ्या आपापली हौस करू. आपल्याला हवी तश्शी साडी आणू.. किती जमले गं?’ प्रमुखांनी सांगितलं, ‘तीन हजार. म्हणजे प्रत्येकीच्या वाटय़ाला २०० येतील!’
‘यिल की त्यात आपलं लुगडं.’ गटात १५ जणी होत्या. झालं, कुणाच्या कर्जाची मागणी या आव्हानाला सामोरी जाऊन टिकणारी नव्हतीच! गटात एकदम उत्साह संचारला. किती रात्र झाली याचं भानही राहिलं नाही. या निर्णयाची अंमलबजावणी जणू तातडीनं व्हायला हवी, अशी चर्चा रंगली. कुठे सेल लागलाय या माहितीची देवाण-घेवाण झाली नि दुसऱ्याच दिवशी जायचं ठरलंसुद्धा! आता प्रश्न होता तो ‘कसं जायचं’ एवढाच! तेवढय़ात एकीनं पारावरच्या भिकोबाला हाकसुद्धा मारली. गटाची बैठक असली की त्यांचे नवरे इतर पुरुष मंडळींसोबत बाहेर पारावर बसलेले असायचेच.. उगाच आपला विरंगुळा म्हणून! हाक मारताच भिकोबा आला. ती म्हणाली, ‘अरे गडय़ा, आम्हाला उद्याच्याला पुण्याला घेऊन जाशील का? १५ जणी आहोत. एरवी तुला भाडं देतो, पण उद्याला मात्र फक्त डिझेलला पैसे देऊ. नेतोस?’ त्यानं कशाला जायचंय ते विचारलं नि कारण कळल्यावर हसत हसत, ‘हो, नेतो की,’ म्हणाला. दुसऱ्या दिवशी खरोखर त्या १५ बाया एकत्र पुण्याला आल्या. तेसुद्धा भिकोबाच्या गाडीनं.. तिथे जाऊन प्रत्येकीने स्वत:साठी, स्वत:च्या आवडीची साडी घेतली.. घासाघीस करून बजेटमधली तरीही एकदम भारीतली साडी.. दोनशे रुपयांत येणारी!.. साडी तर घेतलीच वर पदरचे २ रुपये खर्चून टपरीवर कटिंग चहासुद्धा पिऊन आल्या!.. येताना भिकोबा नवी टोपी घालून गाडीतून उतरताना गावातल्यांनी पाहिला! केवळ गटामुळे बायकांना हे करण्याचं धाडस झालं हे मला माहीतच होतं तरीपण मी विचारलं, ‘कसं काय जमलं?’ तर एकीनं हसून उत्तर दिलं, ‘ताई हक्काची पैशाची सत्ता मिळाली नि गट साथीला आला, एकटीदुकटीला जमलं नसतं!’
3
गटानं एकत्र ठरवल्यामुळे जसं काही घडतं तसंच एखादीला मनातली चौकट मोडायलाही गटाचा आधार वाटतो. ती माझी मैत्रीण होती. घरात गुदमरलं की यायची शिवापुरातल्या ‘प्रबोधिनी’च्या कार्यालयात माझ्याशी गप्पा मारायला. थोडं थोडं आवडीनं काम करू लागायची, पण विरंगुळा म्हणून. मला हक्कानं ‘ताई’ म्हणायची. मी तिची ‘खिडकी’ होते. सारं जग बघायची माझ्या अनुभवातून. खूप गप्पा मारायची. तिचा नवरा ड्रायव्हर होता. नवरा गावी गेला असेल तेव्हा कधी तरी हौसेनं स्वत:साठी केलेलं माझ्यासाठीसुद्धा खायला आणायची.. पण नवरा नसेल तेव्हाच! केवळ माझ्यासोबत खायची ‘मज्जा’ तिला करायची असायची! कधी तरी मलाही ‘घरी ये ना’ म्हणायची, पण तिनं कधी फार आग्रह केला नाही म्हणून मीही कधी गेले नाही. मला ‘घरी ये’ म्हणण्याइतकंसुद्धा तिला ते घर तिचं वाटत नव्हतं. तिला त्या घरात गुदमरायचं.. माहीत होतं मला.. म्हणजे तिच्याच बोलण्यात यायचं तसं.. म्हणून मी पण कधी त्या विषयावर आपणहून तिच्याशी बोलले नाही. इतरच गप्पा मारायचो.
एक दिवस ती आली. अंगावर भाजल्याचे डाग होते. डोळे पार सुजले होते. सकाळ पासून काही खाल्लं असेल असं वाटत नव्हतं. मी माझा डबा तिच्यापुढे केला तिनं मानेनं ‘नको’ म्हटलं मीही मानेनंच ‘घे गं’ म्हटलं. माझा शब्द पडू नये म्हणून तिनं उष्टावला. खांबाला टेकून बसली होती.. आभाळच कोसळलं होतं. मीही काही बोलले नाही. अध्र्या तासानं नुसतं थोपटलं तर तिला रडूच कोसळलं. ‘सिगारेटनं डागाळलं मला’ एवढंच बोलली. तिला थोडं ‘पड’ म्हटलं. आज ती प्रथम कार्यालयात झोपली. इथं खूप सुरक्षित वाटतं होतं तिला. तासाभरानं उठली. ‘आता बरं वाटतंय.. जाते घरी’ म्हणाली. मी तिला म्हटलं, ‘चल आज येते तुझ्याकडे, तुझ्यासोबत.. चहा प्यायला’ ‘नको ताई, चहाला दूध नाही घरात.’
‘चालेल मला. तूपण काळाच चहा पिणार ना? मग मीही तसाच घेईन की,’ म्हणत हट्टानं तिच्यासोबत तिच्या घरी गेले. घर म्हणजे एक खोली! तिचा नवरा घरातच होता. खरं तर तिचीच वाट बघत होता, अस्वस्थ होता.. शुद्धीत आल्यावर त्यालाही चूक समजली असावी असं वाटलं. मला चांगलंच ओळखत होता, पण बायकोला बचत गटात जायचं नाही, असं त्यानं सांगितलं होतं तरी त्याची बायको ‘माझ्याकडे’ आली असेल असं त्याला चुकूनसुद्धा वाटलं नव्हतं. मला बघून चांगलाच धास्तावलेला दिसत होता. तिनं चहा केला आम्ही तिघंही प्यायलो. एकाही शब्दाचंही देणं-घेणं नाही. शांतताच काय ते पुरेसं बोलून गेली. निघताना ‘परत येईन’ म्हणून मी तिच्याकडे बघितलं.. आणि निघाले.
या गोष्टीनंतर बराच काळ गेला. आता ती कार्यालयात सहजच कमी वेळा यायची. त्या प्रसंगानंतर ती शेतावर मजुरीला जायला लागली. एक दिवस भेटून सांगून गेली, ‘तू म्हणायचीस ना.. गटात ये, स्वत:चे कमावलेले, स्वत:च्या हक्काचे चार पैसे अडीनडीला हवेत गाठीशी.. आता मलापण पटलं.’ त्यानंतर दरमहा बचत गटाला मात्र न विसरता नक्की यायची तेव्हा भेटायचीच. ‘आज कामाला सुट्टी घेतली.. मीच ठरवते कामाला जायचं का नाही ते,’ हसत सांगायची. छोटासा का असेना पण गटामुळे स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घायला शिकली. एक दिवस तिचा चेहरा सुजलेला होता.. पण ती नेहमीप्रमाणेच हसत होती, ‘काय झालं?.. पुन्हा?’ मी विचारलं. ‘नाही नाही!. तसं काही नाही ताई. या वर्षी गटातून पैसे उचलले त्यातून दुसऱ्याचं शेत करायला घेतलंय. चांगलं पीक आलंय, कालच पिकाला औषध मारलं! तेव्हा तोंडाला रुमाल बांधायचा असतो हे माहीत नव्हतं म्हणून.. त्यानं सुजलंय सगळं.. एवढंच! ताई परत कधी तसं झालं नाही.. गटात यायला लागल्यावर एकदाच नवऱ्याला सांगितलं, ‘लक्षात ठेव, तुझ्या सिगारेटपेक्षा माझ्या चुलीतल्या लाकडाचा मोठ्ठा जाळ असतो..!’ खरं तर तिला आधी जेव्हा डागाळलं होतं तेव्हाही तिच्या चुलीचा जाळ मोठ्ठा होताच पण तिला ‘दिसला’ नव्हता.. आणि असं नवऱ्याला म्हणायची हिम्मतही नव्हती हेही खरंच होतं. बचत गटात आल्यावर गटानं ‘ती’ला बळ दिलं, स्वत:चं अस्तित्व मान्य करायला शिकवलं! ..मग असं नवऱ्याला म्हणायला शब्दाचा आधार मिळाला.. अनेकदा नुसतं बोलणंच परिस्थिती बदलायला पुरेसं असतं. तिचं ते उत्तर ऐकून वाटलं काळजी मिटली.. आता ‘ती’ची काळजी घ्यायला ‘ती’ समर्थ झाली!
अशीच एका गटातली दुर्गा! दुर्गा सांगत होती, ‘गटामुळे जगाचं ज्ञान झालं. पूर्वी वाटायचं कशाला शिकवायचं पोरीला. शेवटी काहीही झालं तरी पोर म्हणजे दुसऱ्याचंच धन ते! पण आताशा आपणच आपल्या मोठय़ा पोरीला बावळट केलं, असं सारखं मन खातं मला..पूर्वी खूप कामं असायची म्हणून आम्ही सगळ्याच जणी अफूची गोळी देऊन आपापल्या पोरींना झोपवायचो.. आता समजलं, पण तेव्हा चुकलंच आमचं.. पण तेव्हा सांगायला कोणी नव्हतं ना!’
‘गटात आल्यावर दुसऱ्या पोरीच्या वेळी मी माझीच चूक सुधारली! पूर्वी पोर बापाला सांगत यायची, पालक सभा आहे, बाईंनी बोलावले आहे, पण मालकांना कुठं पोरीच्या शाळेसाठी वेळ मिळायला? आता धाकटीच्या वेळीही तसंच होतंय, पण आता मला कळाया लागलंय की, मी काय तिची पालक नाही का काय? आता मीच जाते तिच्या बाईचा सांगावा आला तर! जाऊन सांगते तिच्या बाईला की, या पोरीची मी आई आहे.. माझ्याशी बोला काय बोलायचंय ते! पहिली नंतर दुसरीही पोरगीच झाली म्हणून अपराधानं मान खाली घालणारी दुर्गा आता ‘मुलीची’ सन्मानानं पालक झाली. गटामुळे ‘ती’चं ‘ती’च्याच घरी ‘ती’नं स्वत:च पुनर्वसन केलं असं वाटलं!
अशा वरवर साध्यासुध्या वाटणाऱ्या एकेका स्त्रीचं बचत गटाच्या परीसस्पर्शामुळे घडवलेलं कर्तृत्व बघूनही डोळ्याचं पारणं फिटतं! केवळ गटामुळे झालेल्या ‘ती’च्या घडणीतला ‘ती’चा वाटा कल्पनातीत आहे. गावागावातल्या अशा दुर्गामुळे पुढच्या पिढीचं भाग्य खचितच उजळतंय! बचत गटांचं काम करताना अंत्योदय कल्पनेचा सारखा विचार मनात यायचा. बचत गट हा असा उपक्रम होता की, त्यात गावातली प्रत्येक इच्छुक स्त्री सहभाग घेऊ शकत होती. तिचा गटात यायचा जेवढा उत्साह असेल तेवढा तिला फायदा असं समप्रमाण होतं. कारण स्वत:चा फायदा कळण्याची जाणीव-जागृतीसुद्धा सर्वच स्त्रियांची बेताची होती. पूर्वी कधी विचारलं की, ‘तुम्हाला आदर्श वाटणाऱ्या स्त्रिया सांगा’ तर उत्तरं असायची ‘झाशीची राणी’, ‘इंदिरा गांधी’, ‘सावित्रीबाई फुले’.. नंतर एकदम तिची आई, मावशी, सासू अशी कोणी तरी.. बस जणू काही ‘स्टॉक सीमित’ असं होतं. आता या नावात बचत गटात आल्यामुळे खूप भर पडली. टप्प्या टप्प्याच्या कोण कोण दिसायला लागल्या. मग कल्पना चावला, रमाबाई रानडे, किरण बेदी, प्रतिभा पाटील ते थेट तालुक्याच्या महिला पुढाऱ्यांचीच काय पण लता मंगेशकर, आशा भोसले, टी.व्ही. मालिकांमधल्या कलाकार रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी या सगळ्याही बाईच आहेत असं त्यांना ‘दिसायला’ लागलं. ‘बाई’/‘महिला’ या विषयाची मनातली संवेदना वाढली की मग त्याचं ‘दर्शन’ होतं, हे मला त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळालं.
गावात एखादीला पहिल्यांदा काही तरी नवीन/वेगळं करायचं म्हटलं की खूप त्रास व्हायचा पण एकदा का तिनं ‘ते’ केलं की मग इतरांना तेच पुढं करणं, म्हणजे तिचं अनुकरण करणं सोपं जायचं. त्यामुळेच त्यांच्याच गावातली पण दोन-चार पावलं पुढं असणारी छोटी-छोटी उदाहरणं या दृष्टिकोन बदलामुळे दखलपात्र झाली. मग एखादी स्कूटर शिकली नि तालुक्याच्या ठिकाणी कामाला स्कूटरवर जायला लागली, तर एखादी वरमाई आहेर घेणार नाही म्हणाली, कुणी दारूच्या त्रासानं पोळलेली वरमाई म्हणाली, माझ्या पैशानं वरातीत ‘कुण्णालाही पाजणार नाही.. मग भले वरात झाली नाही तरी चालेल!’, एखाद्या विधवेनं काळी पोत घातली तर एखादीनं सवाष्ण म्हणून इतर जातींतल्या, मन जुळलेल्या मैत्रिणीला बोलावून नवा पायंडा पाडला. काही गावांत तर ‘महिला राखीव’मध्ये निवडून आलेल्या मैत्रिणीसाठी कधीही ग्रामसभेत न जाणाऱ्या महिलांनी हजेरी लावली. गावाच्या इतिहासात कागदोपत्री याची नोंद झाली. हे असं व्यवहारात करायचं धाडस येण्यासाठीसुद्धा मना-मनात ठिणगी पडावी लागते. बदल घडू लागला आहे. एकीचं बघून दुसरीही पुढे होते आहे. त्यातूनच सामाजिक कामाला घरातून बाहेर पडताना कोण ‘विचारून येते’ नि कोण ‘सांगून येते’ यावरही चर्चा करायला जमायला लागतं. पूर्वी फक्त नात्यापुरतं असणारं सामाजिक भान आता गावापुरतं तरी व्यापक झालं. जाणिवेतून झालेल्या या प्रक्रियेमुळेच केवळ नात्या पलीकडच्या मैत्रिणी त्यांनी बनवल्या त्यासुद्धा ‘ती’ला गुण-दोषांसह जशीच्या तशी स्वीकारणाऱ्या!.. यातून ‘ती’चा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे आता ज्या गावात काम झाले आहे अशा गावातून ‘ती’ला डावलून पुढे जाता येत नाही, ‘ती’ला विश्वासात घ्यावेच लागते. अशी परिस्थिती ‘ती’च्या वाढलेल्या जाणतेपणानं गावागावात निर्माण झाली आहे. ग्रामीण पातळीवरच्या ‘ती’च्या मनात बदलाची ठिणगी पडलेली आहे.. आणि ती विझणं आता कधीच शक्यच नाही..