हुश्श!.. ‘बायको’वरच्या जोक्सची कारणमीमांसा समजली आणि अचानक शहाणा वाटणारा नवरा नावाचा प्राणी मला अगदी केविलवाणा, गरीब वगैरे वाटायला लागला. चि.सौ.कां., प्रेयसी, पुत्र, प्रियकर, असे गोडाचे शब्द कुठे आणि नवरा बायको असे बेचव शब्द कुठे! माणसं तीच, पण नात्याची नावं, संदर्भ, विशेषणं बदलली की अचानक त्याला एक बेचव कळ येते आणि कळ आली की साहजिकच मोकळं व्हावंसं वाटतं. असं वाटलं रे वाटलं की मग अशा जोक्सचा फ्लश खेचायचा आणि..

.. बायकांवर विशेषत: ‘बायको’वर विनोद करण्याची परंपरा खूपऽऽऽ जुनी, का असेल असं? त्याचा शोध घेण्याचा हा ‘चमतगं’ प्रयत्न.. उद्याच्या जागतिक हास्य दिनानिमित्ताने..

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
VIDEO : कीपॅड फोनवरून खरंच युपीआय पेमेंट करता येते? व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Jugaad Video
चावी न वापरता सुरू करता येईल स्कुटी! अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ

घु र्र घुरर घुर्र घुरर.. मोबाइल व्हायब्रेट झाला. व्हॉटसअ‍ॅपवर एक जोक आलाय. ताजा.. नवरा : आऽऽऽ! माझ्या छातीत खूप दुखतंय..कमालीची कळ जाणवतेय..! प्लीज जरा डॉक्टरला फोन कर लवकर!
बायको : हो हो. लगेच करते.. (मोबाइल घेत) अगं बाई! तुमचा फोन तर लॉक आहे. मला पासवर्ड सांगा बघू पटकन..
नवरा : राहू दे राहू दे.. मला थोडं बरं वाटतंय आता..
पाठोपाठ आणखीन एक आलाय.
नवरा : यावर्षी काळजी करायला नको.. उशिरा का होईना पण पाऊस येईल..
बायको : कधीऽऽ त्यामुळे ‘मान्सून साडय़ांच्या सेलला’ उशीर होतोय त्याचं काय?
आणि एक क्लासिक..
‘ज्या प्रकारे पापाचा घडा भरला की मृत्यू होतो, अगदी त्याच प्रमाणे आनंदाचा घडा भरताच लग्न होतं!’- एक थोर विचारवंत पुरुष.

हसलात की नाही? उत्तम!! आता बायको बायको बायको असं १० वेळा म्हणा बघू.. म्हटलंत? मग आता नवरा नवरा नवरा असं म्हणा १० वेळा. शाब्बास! लग्नातली ‘चि.सौ.कां.’ आणि ‘आमचा पुत्र’ असे अक्षती, अत्तरी, पुष्पी आणि पंगतीतले शब्द किंवा थोडे रोमँटिक होऊनच म्हणायचं झालं, तर प्रियकर आणि प्रेयसीसारखे मधाळ आणि रसाळ शब्द (व्याकरण बघू नका हो, शब्दाची झिंग बघा), जेव्हा नवरा आणि बायको या नावांच्या दोन पायांवर उभे राहतात, तेव्हा आयुष्यभर रेकणाऱ्या, लाथा झाडणाऱ्या आणि ओझी वाहणाऱ्या गाढवाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. हा गाढव दिसायला कितीऽऽ गरीब असतो नं. डोळ्यात पाहा त्याच्या. अगदी गाईच्याच डोळ्यातले शुद्ध भाव दिसतील तुम्हाला. पण असतं का हो असं काही? ह्मम्म.. आता गाढव म्हटलं की हसू यायलाच हवं. पण बायकोच्या जोक्सवर नवरे हसतात नं तेव्हा मला त्यांच्या डोळ्यातले भावसुद्धा असेच गायीच्या वा गाढवाच्या डोळ्यातल्यासारखे शुद्ध, सात्त्विक आणि निरागस वाटतात..

होय, मीच ती! मीच ती माता, मीच ती भगिनी, मीच ती मैत्रीण आणि मीच ती पत्नी. या साऱ्या विश्वाची जननी. होय होय मीच ती. जी आनंदाने स्वत:वरचे जोक्स ऐकते, खाते, पचवते आणि वर तृप्तीचे ढेकर देते.. (बाई म्हणून काही शब्द विचित्र वाटले तर क्षमा करा हं, आणि मी ही ‘त्याच गाढवाचा’ अर्धा भाग आहे असं समजा व मला ‘ज्योक’ म्हणूनच घ्या) आता तुम्ही विचाराल गाढवच का? मलाही हा प्रश्न पडायचा, जेव्हा माझी पणजी कुणाचंही लग्न लागलं की म्हणायची, ‘‘झालं बाई आणखीन एका गाढवाचं लग्न!’’ मी म्हणायचे, ‘‘अय्या गाढवाचं? म्हणजे? आणि यातलं गाढव गं कोण?’’ तर ती म्हणे, ‘‘दोघंही! ती आणि तो. दोघंही अर्धे-अर्धे गाढव..’’ ‘‘ईईई..गाढव काय?’’ त्यावर ती खिदळत म्हणायची, ‘‘आता आयुष्यभर एकमेकाला लाथा मारायला आणि ओझी वाहायला मोकळे.’’ मी म्हणायचे, ‘‘पण मग गाढवच का? घोडा का नाही?’’ तर ती , ‘‘कारण घोडा शेवटपर्यंत रुबाबदार राहतो! तो इथे कसा फिट्ट होईल?’’ असं म्हणत फी फी फी करत तिचं बोळकं हलवत हसायची. लहानपणी पणजीच्या या विनोदाचा अर्थ समजायचा नाही.
तर आता हे अर्ध गाढव (म्हणजे मी) जे काही रेकणार आहे त्याचा अर्थ अर्धाच समजून घ्यावा ही विनंती आणि त्याचा उर्वरित अर्धा भाग त्या तमाम नवऱ्यांनी त्यांना हवा तो अर्थ लावून पूर्ण करावा. (जे ‘बायको’ किंवा ‘बायका’ या नावांनी बनवलेले विनोद रचतात आणि त्या अनुभवामृत रसाच्या सेवनाने रोज पावन होतात) .. तसं केलंत म्हणजे ‘संसार’ नावाच्या धोब्याचे कपडे आंतरपाटाच्या कपडय़ाएवढे स्वच्छ होतील.

तर! अर्धगाढवाने एका शहाण्याला विचारलं, ‘‘अहो बाबा..’’ (आपले बाबा पुरुष असले तरी शहाणेच असतात. म्हणून तोंडून जेव्हा बाबा ऽऽऽ असं पटकन आलं तेव्हाच ठरवलं की हा पुरुष शहाणाच असणार. माझ्या आईला तसं वाटलं नाही तरी काही हरकत नाही) तर.. अर्धगाढवानं विचारलं,‘‘का हो बाबा.. सोशल मीडियावर किंवा एकूणच गप्पाटप्पात बायकोला टार्गेट करून जोक्स का बनवले जातात आणि तमाम नवरा वर्ग कोसळून कोसळून त्यावर का हसतो?’’ यावर बाबा म्हणाले .. (वाम मार्गाने जाणारे वाक्य म्हणण्याआधी त्यांनी चाचपडून पाहिले की उजव्या हाताला वामांगी तर नाही नं? उजव्या मुद्दाम म्हणतेय कारण ‘‘तुम्ही पुरुष कोण होता आम्हाला आमची डावी बाजू दाखवणारे? मी इथे उजवीकडेच उभी राहणार. हवंतर वीट उजव्या बाजूला आणून ठेवा. माझा मूड असेल तरच मी त्यावर उभी राहीन नाहीतर तीच वीट डोक्यात घातल्याशिवाय राहणार नाही.. हा.. सांगून ठेवतेय’’ पाहा.. आत एवढं साचलंय की सारखं विषयांतर होतंय. आता तुमच्यातले काही हसून म्हणणार – अर्ध काय किंवा पूर्ण काय.. गाढव ते गाढवच. पण तुमच्याकडे लक्ष न देता मी माझं उत्तर घेणारच.) तर..

बाबा उत्तरले, ‘‘आम्ही ‘व्हिक्टीम’ असतो गं पोरी! बायकोला जपतो तर तिला वाटतं घाबरतो. खूप बोलत राहिलो तर म्हणते, हा मला वाट्टेल तसं बोलतो किंवा मला बोलायलाच देत नाही. आणि नाही बोललो तर म्हणते, बघा कसा ठोंब्यासारखा गप्प बसलाय. काही किंमतच नाहीये मला. आहे की नाही..? आहे की नाही..? आ.. आ.. आ.. आ..’’ त्या शहाण्या माणसाने चक्क हसत माझ्याकडेच टाळी मागितली. हसत पुढे म्हणाला, ‘‘आम्हाला तिच्या समोर व्यक्त होता येत नाही मग आम्ही जोक्स बनवतो. आमचे आम्हीच हसतो. सक्र्युलेट करतो. मग वाचणारे अगणित डोळे हास्याने लकाकतात. काही आठवतं, काही सेम वाटतं, काही उगाच वाटतं, तर काही, काहीही असतं म्हणून हसायला येतं. पोरी, गंमत वाटेल तुला, पण माझी डावी वीटसुद्धा अगदी वीट येईपर्यंत दात काढून हसते अशा जोक्सवर. नुसतीच हसत नाही तर तीही सक्र्युलेट करते बरं का हेच विनोद.’’ मी विचारतो तिला, ‘‘तुला काय झालं एवढं हसायला’’ तर म्हणते, ‘‘तुमच्या जोकमधली ‘ती’ बायको आहे ना.. तिच्यासारखं मीही कधीतरी वागते तुमच्याशी म्हणून हसायला आलं.’’ आता बघा. तिला हसायला आलं म्हणून तिने ते पचवलं किंवा पचवल्यासारखं दाखवलं. (नंतर आवाज आला नाही तरी काही तरी झिरपलंय हे समजून घ्या) पण समजा तिला हसायला आलं नसतं तर? तर.. तर मग आहेच तिसरं महायुद्ध.. लाटणं, धुपाटणं, अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब!!! उहू उहू उहू.. चालेल महाराजा चालेल.. काहीही परवडेल पण तिचं ते शांत राहाणं परवडणार नाही..

हुश्श! बायकोवरच्या जोक्सची ही कारणमीमांसा समजली आणि अचानक शहाणा वाटणारा नवरा नावाचा प्राणी मला अगदी केविलवाणा, गरीब वगैरे वाटायला लागला. मुळात नवरा बायकोला घाबरतो हे पटणारं नसलं (कारण ते धादांत खरं नाही) तरी तुम्ही पटवून घ्या. कारण तुमच्याकडे दुसरा काही पर्याय उपलब्ध नाहीये. चि.सौ.कां., पुत्र, प्रियकर, प्रेयसी असे गोडाचे शब्द कुठे आणि नवरा बायको असे बेचव शब्द कुठे! माणसं तीच, पण नात्याची नावं, संदर्भ, विशेषणं बदलली की अचानक त्याला एक बेचव कळ येते आणि कळ आली की साहजिकच मोकळं व्हावंसं वाटतं. असं वाटलं रे वाटलं की मग अशा जोक्सचा फ्लश खेचायचा आणि गोल गोल फिरणाऱ्या शब्दातून आपल्या पोटातलं ते कटू वास्तव सरळ सेफ्टीटँकमध्ये ढकलायचं. बस! मग तिकडे (म्हणजे पुरुषांच्या गोटात) त्याचं काय होईल..? म्हणजे माती, खत, ऊर्जा, की अजून काही.. काहीही होवो. तसं ते होईल आणि असंख्य हास्याच्या लाटेवर आरूढ होत महाकाय अशा पुरुषी समुद्राच्या पोटात ते लुप्त होईल..
बायकांवरचे ज्योक्स वाचताना ही कारण मीमांसा डिक्शनरीसारखी पुढय़ात ठेवावी. हा हा हा हा! मी अशा आनंदात बधिर असताना नवरा रेकलाच..

म्हणतात ना, असं सुख, सुखी संसारासारखं फार काळ नाही टिकत.. तर नवरा रेकलाच..
नवरा – अगं गाढव आहेस का गं तू?
मी – हं.. तूच ठरव बरं तू कोणाशी लग्न केलं आहेस?
नवरा – गप्प बस. आम्ही हे जे ज्योक्स वाचतो ते फन म्हणून. गंमत म्हणून. तुम्ही नाही का पुणेकर , रजनीकांत वगैरे ज्योक्स वाचत? किंवा नॉनव्हेज ज्योक्स..? तसंच आहे हे. एवढा लेख वगैरे लिहायला घेतलायस मूर्खासारखा.. त्यावर पानभर लिहिण्याएवढं महत्त्व का देताय तुम्ही? आयुष्यात चिंतन करण्यासारखे अनेक विषय आहेत. आम्ही नवरे आपापल्या नात्यांमधल्या कडू आठवणींना गोड करून त्यावर जरासं स्मित करतो, तर यावर तुमचा एवढा आक्षेप कशाला? आम्ही खूश झालेलं, आनंदी झालेलं, हसलेलं आवडतच नाही का तुम्हा बायकांना? ‘ते’ टॅक्सीवाले नाही का टॅक्सीत बसलेल्या मराठी माणसाला हसवण्यासाठी मीलन सब वेमधून येताना मुद्दाम वाकून गाडी चालवतात. तसंच आहे हे. आणि हे काय फालतू लिहीत बसली आहेस? वीट वगैरे.. लहान मुलंही हसणार नाहीत या जोक्सवर. तुला ना मुळात विनोद बुद्धीच नाहीये. लग्न लागताना ते पुरोहित तुम्हाला विनोद बुद्धीही होमात टाकायला सांगतात की काय! एकदा ते मंत्र नीट तपासून पाहायला हवेत.. त्यापेक्षा ते सगळं डिलिट कर आणि हे ऐक.. ताजा आलाय..
अर्धगाढवाने पवित्र नजरेने मोबाइलचा स्क्रीन चावला.. (सॉरी.. वाचला) – ‘आजचा सुविचार – मांजर आणि नवरा कुठेही सोडले तरी संध्याकाळी घरी परत येणार. पण बोका आणि बायको यांचे कितीही लाड केले तरी ते गुरगुर करणारच’ हा.. हा.. हा.. हा.. ‘‘आणि हा अजून एक ऐक, ‘शादीशुदा लोगों को सलाह.. जिस दिन बाई न आये, उस दिन बीवी से न उलझे.’ दे टाळी!’’ हा हा हा हा..

अर्धगाढव रेकायचं ते रेकलंच. मनातल्या मनात मी म्हटलं, ‘‘बाबा रे..’’(आता हा बाबा वरच्या बाबासारखा आदराने घेऊ नये. तर सिग्नलवरच्या गरीब बिचाऱ्याला आपण म्हणतो नं हं.. तशा अर्थी घ्यावा) ‘‘तू ज्योक्स बनव अजून हस जितकं हसायचंय तेवढं.. मग मीही आहे आणि तूही आहेस.’’
‘जी बायको नवऱ्याला छळत नाही, तिला संसारातलं काही कळत नाही’, हा मला आलेला मोबाइलवरचा मेसेज मी नाही वाचून दाखवला त्याला. पण आणखीही एक ज्योक आठवला.
वकील : ‘‘बाई, तुमचं एवढं जर पटत नाही तर सरळ घटस्फोट का नाही देत नवऱ्याला?’’
बाई : ‘‘ज्यामुळे त्यांना आनंद मिळेल अशी एकही गोष्ट करत नाही मी!’’मोबाइलवरच ज्यांची सकाळ होते, अशा सर्व व्हॉटस्अ‍ॅप प्रेमी गाढवांसारखी मी हसले. पण इतक्यात तो नतद्रष्ट फोन खणखणला..
मी : हॅल्लो..
बाई : म्या आज कामावर येनार नाय.
मी (वैतागून) : काऽऽऽ
बाई : का म्हंजी? आज लग्नाचा वाढदिवस हाय.. नवऱ्यानं नवा फोन आनुन दिलाय. फोन देवलात आदी इठ्ठलाच्या पायाशी ठेवनार..आन मग.. ईस.. लाज वाटतीया. म्या उद्या येते. उद्या माजा फोन नंबर बी देते.
माझा संताप झाला.. नवरा अजूनही मोबाइलवरचं काहीतरी वाचून दात काढत होता. आयशपथ! कामवालीलाही तिच्या नवऱ्याने फोनच आणून दिला होता आणि तोच तो फोन ती विठ्ठलाच्या पायावर ठेवणार होती. देवा देवा! वामांगी रखुमाईचं स्मरण करीत मी सिंकमध्ये डोकावले.. भांडी, केर, लादी, कपडे, इस्त्री, जेवण, वाणी सगळं आठवलं. माझी भांडी धू धू धुतली जात होती. रागाच्या भरात मी पंखेही पुसायला घेतले.
नवरा हळूच दुसऱ्या नवऱ्याला फोनवर म्हणाला, ‘‘आज पंख्याचे दिवस फिरलेले दिसताहेत! ही ही ही कामवाली येणार नाही वाटतं. आतून आवाज येतायत जोरदार. सगळे ज्योक्स सध्या डिलिट करतोय. नाही रे.. पासवर्ड शोधून काढते ती. अरे कधी आम्ही बाहेर मार्केटला गेलो आणि तिला एकटं घरी जायला सांगितलं तर साधं घरही शोधता येत नाही तिला.. पण पायथागोरसच्या प्रकाशित न झालेल्या प्रमेयाच्या चौथ्या ओळीतला ९वा शब्द जरी मी पासवर्ड म्हणून ठेवला ना तरी तो अचूक शोधून काढते. नाही नाही.. नकोच ती रिस्क. आज परवडणार नाही. पण उद्या पाठव हं.. नक्की.. ताजे! हा हा हा हा..’’
मला माहीत आहे. त्याला आणि त्याच्यासारख्या तमाम नवरोबांना त्यातल्या त्यात (तुका म्हणे त्यातल्या त्यात) आनंदी आणि हसतमुख राहायचं असेल किंवा त्याच्या ह्य अर्धगर्दभाला उर्वरित जन्म (सात जन्म नव्हे बरं. छे छे छे.. अशा बायकांवरच्या पी.जे.मुळे ते पवित्र वेल्डिंग वर्क केव्हाच बाद झाले) सहन करायचं असेल तर फोनवरच्या तशा ज्योक्सशिवाय पर्याय नाही.

एक ताजा (कलम).. ‘‘या पृथ्वीतलावरच्या समस्त नवऱ्यांनो.. काम करून घरी आल्यावर मोबाइल, टीव्ही, कम्प्युटरमध्ये विनोदी बायकोला शोधण्यापेक्षा जरा आजूबाजूला बघा. रागावलेली, हुप्प झालेली, संतापलेली, हसत असणारी किंवा शून्यात हरवलेली एखादी वस्तू दिसली तर तिला जरा प्रेमाची चावी द्या. मग बघा.. गाढवसुद्धा घोडय़ासारखंच रुबाबदार आणि देखणं दिसेल!’’

– ऋग्वेदी विरेन
rigvedi_82@yahoo.com