आपण यशच मिळवायचं याचा सततचा विचार आपल्यासाठी ताण निर्माण करतो. चूक करण्याचा, अपयश मिळण्याचा आपण धसका घेतो. कुणी आपल्याला नाव ठेवेल, टीका करेल, टोमणे मारेल याबाबत आपण शंकाकुल राहतो. लोक आपल्याला नाकारतील, आपण नावडते होऊ अशी भीती वाटू लागते. आपलं अवघं अस्तित्वच आपण यश आणि अपयश या दोन विरुद्ध टोकांच्या परिमाणांवर तोलू लागतो. पण हे योग्य आहे का याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.

सायको थेरपीसाठी समोर आलेल्या व्यक्तीला बघून मला आश्चर्य वाटलं! देशातील नामांकित कंपनीचे मालक आणि संस्थापक संचालक! एका मोठय़ा उद्योगाचं यश ज्यांच्या नावे आहे ते दोशी! बासष्ट-पासष्ट वय, उजळ रंग, पांढरे केस, डोक्याला मध्यभागी छोटे टक्कल, सोनेरी काडय़ांचा चष्मा आणि उत्तम पोशाख! पूर्वी दोन-तीन समारंभांत ओळख झाली होती. त्यांच्या एका कंपनीत मोठय़ा अधिकारी व्यक्तींची एक कार्यशाळा मी घेतली होती. मी हसून त्यांचे स्वागत केले. हस्तांदोलन करून ओळख दाखवत थोडं काही बोलल्यावर मी दोशींना विचारलं, ‘‘दोशीसाहेब, तुम्ही तुमच्या इतक्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून आलात म्हणजे कारणही तसंच मोठं असणार!’’ दोशींनी चष्मा काढून हातात घेतला. दोन-तीन सेकंदांचा पॉज घेऊन परत लावला. थेट बघत म्हणाले, ‘‘मॅडम मी तुम्हाला ओळखतो. म्हणून विश्वासाने इथे आलोय. मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात जितका यशस्वी आहे, तेवढा किंवा त्यापेक्षा जास्तच अपयशी माझ्या कौटुंबिक आयुष्यात आहे. आई-वडिलांनी सांगितलं त्या मुलीशी लग्न केलं. सुदैवाने ती चांगली आहे. तिने मला मनापासून साथ दिली म्हणून मी स्वत:ला बिझनेसमध्ये झोकून देऊन काम करू शकलो. बरीच र्वष आम्हाला मूल नव्हतं. पण वैद्यकीय तपासण्यांत आम्हा दोघांमध्येही दोष नव्हता असं कळलं. बारा वर्षांनी आम्हाला मुलगी झाली. तेव्हापासून घराचं सगळं बिघडलं. मुलगी सतत आजारी असायची. उत्तम उपचार केले तेव्हा हळूहळू आजारपण कमी झालं. घरातल्यांनी इतक्या वर्षांनी घरात आलेलं मूल म्हणून अति लाड केले. त्याचे दुष्परिणाम आम्ही सगळ्यांनी भोगले आणि भोगतोय. मुलगी खूप हुशार आहे, पण आपण श्रीमंत आहोत आणि लाडक्या आहोत याची हवा तिच्या डोक्यात सतत असते. त्यामुळे अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष. नटणं, नवे कपडे, नवे दागिने, सतत शॉपिंग चालू असतं. मित्र-मैत्रिणीही तशाच आहेत. पैसे किती उधळायचे हे तिला बरोबर कळतं. तिच्या आईचं ती काहीच ऐकत नाही. तिला सिगरेट-दारू आवडते हे माहीत होतं. पण आणखीही ती बहकली असावी. घरात कुणाचंही ऐकत नाही. लग्नाला आलेली मुलगी. पण गेल्या आठवडय़ात एका परधर्माच्या मुलाबरोबर पळून गेली. तिला शोधून परत आणली आहे. पण त्या मुलाबरोबर लग्न न करता राहायचं म्हणते. तुमच्यानंतर सगळं माझंच आहे तर आत्ताच त्यातलं थोडं द्या म्हणते. तो मुलगा उनाड, जेमतेम दहावी पास पण स्ट्रीट स्मार्ट आहे. त्याला फक्त माझे पैसे हवे आहेत हे मुलीला कळत नाही. तो मुलगा चांगला हुशार असता तर मीच लग्न लावून दिलं असतं. काय करावं कळत नाही. माझी पत्नी तर सारखी रडत असते. या घरातल्या बाबतीत मी पूर्ण हरलोय. ’’ मी त्यांना धीर दिला. मार्ग निघण्याची शक्यता सांगितली आणि पुढे काय करायचं तेही सांगितलं. योग्य वेळी घेतलेल्या मदतीमुळे समस्यांमधून मार्ग निघतो याची ग्वाही दिली. आणि त्यांचा तो प्रश्न सुटलाही.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
article about elon musk india visit elon musk investment in india
अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

असा यश-अपयशाचा खेळ आपण सर्वच जण जगताना अनुभवतो. जगताना छोटय़ा-मोठय़ा गोष्टींमधलं यश आपल्याला जगण्याचा उत्साह देतं. छोटय़ा मोठय़ा गोष्टींमधलं अपयश आपल्याला निराश करतं. उदासिनता आणतं. एक अगदी सुस्थितीतली आणि खरोखरच सगळ्यांना यशस्वी वाटणारी माझी मैत्रीण एकदा मला म्हणाली, ‘‘छे! आज बेचैन वाटतंय. अस्वस्थपणा आलाय.’’ मी विचारलं, ‘‘का बरं?’’ ती म्हणाली,  ‘‘कंटाळा आला या आयुष्याचा. काही म्हणता काही थ्रिल नाही. सगळं कसं बेतल्यासारखं नीट-नेटकं, योग्य, उत्तम आणि छान. मला आता हे सगळं मिळमिळीत वाटू लागलंय. लोकांच्या असूया, मत्सराच्या नजरा मला कळतात. पण मला या जगण्यात खरंच काही अर्थ वाटत नाही!’’ मैत्रिणीची चूक नव्हती. आई-वडील सामाजिक कार्यकर्ते. त्यांचे संस्कार तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिच्यासाठी तिला जमणारं, आवडणारं सामाजिक काम शोधून त्यात ती रमली तेव्हा तिला जगण्यातला अर्थ पुन्हा गवसला.

परीक्षेत अपयश आलं म्हणून जगणं नकोसं झालेले विद्यार्थी, प्रेमभंग झाला म्हणून जीव देण्याचा प्रयत्न करणारे तरुण-तरुणी, कर्ज झालं म्हणून आत्महत्या करण्याचा विचार करणारे शेतकरी, नोकरी लागत नाही म्हणून जगण्यास वैतागलेले तरुण-तरुणी, वेळेत लग्न होत नाही म्हणून त्रासलेले लोक, घरात सतत भांडणं होतात म्हणून असुरक्षितता वाटणारे लोक, मनासारखं यश मिळत नाही म्हणून अस्वस्थ असणारे लोक- यश अपयशाचे निकष आणि मानदंड समाजाच्या दृष्टीने पाहिले तर एक असतात पण कित्येकदा व्यक्तिपरत्वे हे निकष बदलताना दिसतात.

नेहमी नव्वद टक्क्यांवर मार्क मिळवणाऱ्याला एखाद्याला परीक्षेत ऐंशी टक्के मिळाले तर त्याला नापास होण्याएवढं दु:ख वाटू शकतं. एकदा बारावीत मेरिटमध्ये आलेली मुलगी म्हणाली, ‘‘अहो, आता पुढच्या परीक्षेत कमी मार्क मिळाले तर काय होईल याची भयंकर भीती वाटू लागली आहे.’’ यशाचीही भीती वाटू शकते, कारण यश टिकवण्याची मोठी जबाबदारी शिरावर येऊन पडते. अगदी गरिबीतून आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेले आणि यशस्वी झालेले माझे एक स्नेही म्हणतात, ‘‘कुठे होतो आणि कुठे आलो. देवाचे आभार आहेत. पण एक खंत मरेपर्यंत राहाणार. पदवी काही मला मिळवता आली नाही. काम करण्याच्या नादात आणि गरजेत शिक्षण सुटलं ते सुटलं. त्यामुळे मीच मला नेहमी नापास करतो.’’ मी म्हटलं, ‘‘फॉर्मल सर्टिफिकेटची तुम्हाला काय गरज आहे? कुठल्याही सर्वसाधारण पदवीधरापेक्षा तुमचं वाचन, मनन आणि चिंतन पुष्कळ आहे.’’

संपूर्ण जीवनात फक्त यशस्वी झालेली किंवा फक्त अयशस्वी झालेली व्यक्ती मला तरी माहीत नाही. पण आपण छोटय़ा मोठय़ा अपयशाने धास्तावतो. खचून जातो. परिस्थितीपासून पळून जाऊ पाहतो. इतके निराश होतो की, आपल्याला जीव नकोसा होतो. मग मनात सारखे नकारात्मक विचार येतात. भूक लागत नाही. अन्न गोड लागत नाही. झोपेवर परिणाम होतो. उदासिनतेची, निराशेची मनात काळोखी दाटते. अनेकदा आपल्याला पूर्वी आलेली छोटी छोटी अपयशंही नेमकी बारीक सारीक तपशिलासकट आठवतात. आपल्या बेचैनीत भर घालतात.

एकदा माझ्याकडे आलेल्या एक बाई म्हणाल्या. ‘‘अहो देवाने जन्मताच ‘अपयशाचा शिक्का’ कपाळावर मारून पाठवलाय. आताच बघा. इथे येताना बससुद्धा कधी नीट मिळत नाही. कधी वेळेआधी येऊन डोळ्यासमोरून जाते. कधी येते पण थांबत नाही. कधी थांबलीच चुकून तर आत शिरायला जागा नसते. क्वचित कधी मिळालीच बस तर मध्येच बंद पडते. मला जायच्या स्टॉपच्या आधीच्या थांब्यापर्यंतच जाणार असते. थोडक्यात काय तर कुठेही गेलं नि काहीही केलं तरी मी अपयशीच!’’ मला त्या बाईंना त्यांच्या खेळातल्या प्रावीण्यामुळे मिळालेल्या पदकांची, त्यामुळे सहजगत्या मिळालेल्या नोकरीची, चांगली प्रेमळ कौटुंबिक परिस्थिती वगैरे गोष्टींची आठवण देऊन यशाचं पारडंही थोडं वरती घ्यायला मदत करावी लागली.

आपण यशच मिळवायचं याचा सततचा विचार आपल्यासाठी ताण निर्माण करतो. चूक करण्याचा, अपयश मिळण्याचा आपण धसका घेतो. लोक काय म्हणतील या विचाराने आपण स्वत:चा छळ करून घेतो. कुणी आपल्याला नाव ठेवेल, टीका करेल, टोमणे मारेल याबाबत आपण शंकाकुल राहतो. लोक आपल्याला नाकारतील, आपण नावडते होऊ अशी भीती वाटू लागते. अपयश आपल्याला उद्ध्वस्त करेल अशी धास्ती आपल्याला वाटू लागते. आपलं अवघं अस्तित्वच आपण यश आणि अपयश या दोन विरुद्ध टोकांच्या परिमाणांवर तोलू लागतो.

खरं तर जीवनातल्या यशाची गणितं वेगळीच असतात. आपल्याला वाटलेलं समाधान, होणारा निव्र्याज आनंद, मनातली शांतता, नि:स्वार्थीपणे मदत करण्याची वृत्ती, चांगला स्वभाव हे सारं मोल न करता येणारं असतं. कधी कधी लौकिकदृष्टय़ा आपण थोडे फार अयशस्वी असलो तरी आपण आपल्यापुरते नक्कीच यशस्वी असतो. मनाची हीच सकारात्मकता मग आपल्या कोणत्याही अपयशाची वस्तुनिष्ठ विश्लेषण करून, ठोस उपाय, योजना, प्रयत्न करून पुढील यशाची शक्यता वाढवते!

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in