दिवाळीच्या आधी, ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये आणि दिवाळीनंतर किती काय काय घडत असतं! ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ हे शाळेच्या अगदी बालवाडीच्या वर्गात शिकवलं तरी मनात ठसतं ते फराळाच्या पदार्थाच्या खमंग वासाने, मिठाई- चॉकलेट्स- ड्रायफ्रूटच्या बॉक्सेसने; पणत्या, कंदील, दिव्यांच्या माळांनी; रांगोळी, उटणं, अत्तरं, किल्ले, फटाके, नवे कपडे, नवी खरेदी, पाहुणे या सगळ्यांच्या सहभागाने. हा सण आहेच तसा! दिवाळी असण्याचा, दिवाळी जगण्याचा आणि दिवाळी सण म्हणून साजरा करण्याचा बेत व्यक्तिगणिक वेगळा असतो. पण या सणात आसमंतात भरून राहिलेलं चैतन्य घरात शिरतं तसं मनातही शिरतं!

दिवाळीला आपण आजूबाजूच्या परिसराची, घरातल्या कानाकोपऱ्यांपासून सगळ्या जागेची स्वच्छता करतो, जुने टाकून येणाऱ्या नव्यासाठी जागा करतो, सगळीकडची धूळ आणि कचरा काढून टाकतो. झाडून, पुसून, धुऊन आणि रंगवूनही घरदार शक्य तेवढे चकचकीत करतो. कारण हा दिव्यांच्या रोषणाईचा सण आहे. हा प्रकाशाचा आणि तेजाचा उत्सव आहे. इथे अंधाराला, काळोखाला, वाईटाला थारा नाही. उजेडाकडे, प्रकाशाकडे, उन्नतीकडे आणि संपन्नतेकडे नेण्याची धारणा असलेला हा सण आहे.

Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…
Surya Grahan 2024
गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीआधी ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात सोन्यासारखं चमकू शकतं भाग्य

चला तर मग घराचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा बाह्य़ मेकओव्हर करतानाच आपल्या मनाचाही मेकओव्हर करू या! मेकओव्हर करताना आधी स्वच्छता करायची, मग त्रुटी भरून काढायच्या आणि नंतर सजावट करून प्रसन्न व्हायचं! आता आपल्या मनात स्वच्छता करायची आहे, या दृष्टीने आपणच आपल्या मनात अगदी आतल्या मनातही पाहिलं की किती उगाचच जमवलेली निरुपयोगी गोष्टींची अडगळ दिसेल, जळमटं दिसतील, धूळही दिसेल.

पूर्वग्रहांची कितीतरी जळमटं मनात असतात जी नीट पाहिली तरच दिसतात. कुणाविषयी आपण कधीतरी नकारात्मक ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, अफवांमधून उडत कानावर आलेलं असतं. कधी एखाद्या परिचितानेच आपल्याशी बोलताना कुणा व्यक्तीबाबत वाईट नकारात्मक शेरेबाजी केलेली असते. कधीतरी ‘‘तुमच्याबद्दल अमुक तमुक ‘असं’ सांगत होता’’, हे वरवर निरुपद्रवी वाटणारे पण बरोबर घाव घालणारे एखाद्याने सांगितलेले असते. हे सारं नकळत आपल्या मनात जळमटं म्हणून राहू शकतं. कुणा ओळखीच्या माणसाचे कडू कटू अनुभव आपण ‘आपल्यावर असा प्रसंग आला तर!’ म्हणून कोपऱ्यात ठेवतो. ‘अ’ने ‘ब’वर केलेली नकारात्मक टीका, शेरेबाजी, अनुदार उद्गार यांच्यावर कधी कधी आपण आंधळा विश्वास ठेवतो. तो ही असाच सांदीकपारीत असतो. कुणा भविष्यकाराने त्याची आपल्याला नीट माहिती नसतानाही आपली पत्रिका/ हात/ चेहरा इत्यादी पाहून स्वत:चे ज्ञान पाजळत, ‘‘तुमचा कधीच उत्कर्ष होणार नाही,’’ किंवा ‘‘तुम्ही अल्पायुषी आहात’’, किंवा ‘‘तुमचे घरातल्यांशी कधी पटणारच नाही,’’ किंवा, ‘‘सगळं मिळूनही तुम्ही दु:खीच राहाल. काय करणार, उपभोगाची रेषाच नाही ना!’’ यांसारख्या दिलेल्या भविष्य सल्ल्यावर अवलंबून त्यांची जळमटं डेकोरेशन्ससारखी कोपऱ्या कोपऱ्यात टांगून ठेवतो. ही असली सगळी जळमटं विवेकबुद्धीच्या आणि तर्कशुद्धतेच्या झाडूने चांगली झटकून झाडून फेकून द्यायची. आपले अनुभव, आपली माहिती ही सत्यतेच्या निकषावर बघायची. लोकांकडून कळलेल्या ‘ऐकीव’ गोष्टींवर पट्कन भाबडा विश्वास न ठेवता त्यातलं खरं-खोटं सावधपणे, सजगपणे तपासून घ्यायचं.

सगळंच खोटं ठरतं असं नाही. पण सत्याच्या कसोटीवर खरं उतरलेलं सारं आपल्याला मार्गदर्शक होतं आणि आपलाही आत्मविश्वास त्याचा रोजच्या जगण्यात वापर करताना वाढतो.

आणखी एक अडगळ असते लोकांनी आपल्याबद्दल काढलेल्या अनुद्गारांची, शेरेबाजी टीका-टिप्पणीची, टोमण्यांची, दिलेल्या शिव्यांची. बहुतेक वेळा हे आपल्याला कुणी कुणी येऊन सांगितलेलं असतं की ‘ते’ ‘तसं’ तुमच्याबद्दल बोलत होते! क्वचित् कधी कुणी प्रसंगपरत्वे आपल्या तोंडावरच बोललेलं असतं. असले ‘लोक काय म्हणतात’ ते सारं आणि आपले ‘त्यांनी’ केलेले अपमान आपण अहंकाराच्या सुंदर वाटणाऱ्या वेष्टनाने अगदी गिफ्ट रॅपरसारखे रॅप करून मनात दर्शनीच ठेवतो! वर्षांनुर्वष त्यांच्याकडे बघत ताजेतवाने ठेवतो. ‘मी’ ‘माझं’ ‘मला’ – हे दिसायला मस्त दिसलं आणि वाटायला मस्त वाटलं तरी ते घाणच! काढू या मनाबाहेर एकदाचे बाहेर. जोपर्यंत व्यक्ती थेट समोर येऊन नकारात्मक वागत, बोलत नाही तोपर्यंत ‘ऐकीव’ माहितीला महत्त्व द्यायचं नाही. त्या व्यक्तींना ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ द्यायचा उदार मनाने आणि समोर आले की आपल्या सहजपणाने चांगले सकारात्मक वागायचे. जसं आपल्याला सगळी माणसं आवडत नाहीत तसंच सगळ्यांनाच आपण आवडूच असं नाही! हा विचार मनात जागृत ठेवला की आपल्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांना आपण मनातल्या मनात क्षमा करू शकतो. शिवाय आपण सर्वज्ञ आणि परफेक्ट नाही याची जाणीव असली की आपल्या चांगुलपणाचे सर्टिफिकेट सगळ्यांनी द्यावे अशी आपण अपेक्षाही करत नाही!

मनाच्या सांदीकोपऱ्यात संशयाच्या मुंग्याही दिसतील. संशयाला भूत म्हणतात. ही भूतं मनात नाचू लागली की नातेसंबंध हमखास बिघडतात. स्वत:च्या क्षमतांबाबतचा संशय थेट आत्मविश्वासावरच हल्ला करतो. ‘मला येईल का नाही? मला कसे जमेल? मी हा प्रसंग कसा निभावून नेऊ शकेन?’ – असे पडणारे प्रश्न आपल्या कुवतींबद्दल, क्षमतांबद्दल, कर्तृत्वाबद्दल संशय निर्माण करतात. हा संशय मनात मोठा भीतिदायक प्रश्न आणतो. ‘आता माझे कसे होणार?’ हा प्रश्न पडला की मनाच्या दारा-खिडक्यांमधून काळजी, भीती, धास्ती, चिंता, नैराश्य, विषाद, दु:ख, बेचैनी, अस्वस्थता यांची झुरळं पटापट आत येतात. यांचे विषारीपण इतके असते की सगळ्या आनंदाच्या, सुखाच्या, बरं वाटण्याच्या, मस्त छान वाटण्याच्या ‘फील गुड’ फॅक्टरच्या प्रसंगांमध्ये आपण स्वत:ला लो प्रोफाइल ठेवू लागतो. नैराश्याचं ‘स्लो पॉयझनिंग’ आपली मजा हिरावून घेतं. इतकं की हळूहळू आपलीच आपल्याला कीव येऊ लागते. स्वत:चीच दया येऊ लागते. चला तर तो स्वत:वरच्या भरवशाचा, आत्मविश्वासाचा झाडू घेऊन एक एक झुरळ बाहेर काढू या. संशयाच्या मुंग्यांना पळवून लावू या. सगळा कचरा, सगळी घाण मनाबाहेर घालवायची, पार कचराकुंडीत टाकायची. मन स्वच्छ करायचं. त्यात विवेकबुद्धीचे तोरण बांधायचं! आत्मविश्वासाने चांगल्या विचारांची, सकारात्मकतेची झुंबरं टांगायची! सुसंवादाचे आणि सकारात्मक नातेसंबंधांचे किल्ले बांधायचे! एक एक दिवा उजळत जायचं – आनंदाचा, मायेचा, प्रेमाचा, दयेचा, क्षमेचा, सहकार्याचा, मांगल्याचा! ‘आजचा दिवस छान आहे आणि मी मजेत आहे’ – या वाक्याचा नंदादीप रोजच्या रोज सतत उजळत ठेवायचा! त्यातून मग सकारात्मक कृतीही घडू लागतात! मनाचा हा मेकओव्हर कृतींची संपन्नताही देतो! प्रगतीकडे नेतो!

– अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in