रोजचं रहाटगाडगं रेटताना मधूनच एखादा छोटासा ‘थांबा’ घेऊन स्वत:कडे पाहिलं तर कदाचित स्वत:तल्या काही लपलेल्या कला, छंद दिसू शकतील आणि कदाचित रोजचं रखरखीत रहाटगाडगं मग छान गारव्याचं जगणं होऊन जाईल. आनंदाचे, सुखाचे आणि चांगल्या अनुभवांचे थांबे आपले आपण पकडावे लागतात. ते पकडत म्हणायला हवं, तू जी ले जरा..

मृत्यूपर्यंत श्वास चालत राहतो त्याला जिवंत राहाणं म्हणता येईल. परंतु त्याला ‘जगणं’ म्हणता येणार नाही. जगणं म्हणजे परिपूर्ण जीवन जगण्यासाठीचे जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न, जगणं म्हणजे लढत लढत मिळवलेलं समाधान आणि रोजच्या रटाळ जीवनक्रमाकडे पाहतानासुद्धा शोधलेला आनंद!

काही दिवस विचार करत होते.. अस्वस्थ होत होते. सध्याच्या तरुणांमधली अस्वस्थता, चंचलता मनात भीती उत्पन्न करते. जीवनाला आलेला अफाट वेग पाहताना भोवळ येते. कशासाठी आणि कुठे धावतोय आपण? करिअरसाठी धावणं, पैशासाठी धावणं, व्यक्तिमत्त्व ‘विकासासाठी’ धावणं, दुसऱ्यानं चांगलं म्हणावं म्हणून जिथे तिथे पुढे जाण्याचा अट्टहास. सतत दुसऱ्याला मागे ढकलून ‘आपणच’ पुढे धावणं.. मध्यावर कुणालाच कसं जगायचं नाहीये. मनापासून सांगावंसं वाटलं. ‘‘अरे बाबांनो जरा सावकाश! थोडा वेळ एकाजागी थांबा..विचार करा.. ‘जगण्यातला’ आनंद कधी घेणार, चांगलं जगून बघा. पुन्हा पुन्हा ते सुंदर गाणं आठवत होतं आणि माझ्या मनातली कळकळ बाहेर येत होती. ‘‘इन दिनो दिल मेरा मुझसे है कहे रहा, तू ख्वाब सज, तू जी ले जरा.. है तुझे भी इजाजत, करले तू भी मुहोब्बत..’’

माझ्या या अस्वस्थतेतून माझ्याच आसपासचे काही खळाळणारे जिवंत आनंदाचे झरे काही वेळा दिसतात आणि मी थोडा वेळ निवांत होते. चला, अगदीच रखरखाट नाहीये तर माणसं छान जगून घेतात. माझी एक शेजारीण तरुण, उच्च वर्गातली. शिक्षण साधारण, एक मुलगी पदरात. नवरा कुठेतरी सामान्य नोकरीत. त्यावर उपाय म्हणून ही तरुणी चक्क चार घरच्या पोळ्या करते आणि डबे करून देते. तिच्याशी केव्हाही बोलायला गेलं तर मस्तपैकी हसत हसत बोलणार. पहाटे पाचपासून तिचा दिवस सुरू होतो. तो दिवसभर कामात जातो. हे असं सतत हसणं म्हणजे तिचं छान जगणं वाटतं मला. कधीही परिस्थितीवर वैताग नाही. माझ्याशी एकदा बोलताना म्हणाली, ‘‘माहेरी आई-वडील चांगल्या नोकरीत असल्याने आम्ही दोघं भावंडं अगदी लाडात वाढलो.’’ मी त्यावर तिला म्हटलं, ‘‘मग तुला हे असं स्थळ का पाहून दिलं? नवरा असा सामान्य?’’ त्यावर निरागसपणे म्हणाली, ‘‘काकू, मी फक्त बारावीच पास. शिक्षणात डोकं नाही. मग मला तरी कुठलं चांगलं स्थळ मिळणार? पण आता मुलीला छान शिकवणार. माझ्यासारखं तिचं होऊ नये.’’ मनात म्हटलं, ‘‘बाई गं ‘तू ख्वाब सजा..’ तुला हक्क आहे तो! छान जगतेयस.. जगून घे.. ‘तू जी ले जरा..’’

माझा पेपरवाला.. हा पोरगा गेली दहा-पंधरा र्वष रोज पहाटे पेपर टाकतोय. आधी एका पेपर एजन्सीत नोकरी केली, हळूहळू नंतर ती एजन्सी मालकीची करून घेतली. पण वागणूक तीच. अतिशय शांत, प्रामाणिक आणि सचोटीची. आता मालक झालाय पण तरीही दुपारी एका ठिकाणी साधी नोकरी करतो. कुठलंही व्यसन नाही, उद्दामपणा नाही. नुकतंच लग्न झालं. एक छोटं बाळ आहे. खरंच वारंवार वाटतं, प्रचंड धडपडीतून, कष्टातून दिवस काढून हातात येणारी संध्याकाळ किती समाधानाची असेल?

एका आर्थिकदृष्टय़ा चांगल्या घरातल्या एका मुलानं प्रश्न केला, ‘‘कष्ट करून यश मिळवणं, गरिबीतून यश मिळवणं हे सगळं काही सुखासमाधानात असलेल्यांनी मिळवलेल्या यशापेक्षा मानाचं कसं? आम्हीही जर यशापर्यंत पोचलो तर त्याला काहीच किंमत नाही का?’’ त्याला सांगावंसं वाटलं, ‘‘बाबा रे ए.सी. गाडीतून ज्या क्लासला तुला पोचवलं जातं किंवा सहजासहजी तुझ्या फीज् भरल्या जातात तेव्हा उन्हातान्हातून चारघरी वरकाम करून (शिवाय कधी कधी अर्धपोटी) ही मुलं कशीबशी क्लास गाठतात, तेव्हा तुझ्याइतकी शक्ती त्यांच्यामध्ये राहात असेल का? उपाशी पोटी अभ्यासात लक्ष लागत असेल का? मग त्यानं मिळवलेला पहिल्या क्रमांकाला किती मोल असेल? कल्पना कर.. पण यालाच ‘जगणं’ म्हणता येईल. ‘गरिबीतला आनंद आणि श्रीमंतीतली अशांती’ हा पूर्वीच्या सिनेमातला फंडा मला इथं द्यायचा नाहीये.

पण फक्त सुखाच्याच मागे धावताना छोटय़ा गोष्टीतले आनंदही तुम्ही वेचू शकत नाही, ही खंत आहे. एखाद्या साध्या गोष्टीतला आस्वाद घेण्याची क्षमताच मुळी संपलेली आहे. मी पहाटे फिरायला जाताना वाटेत दोन देऊळ आणि एक मठ लागतो. मी देवभोळी किंवा आस्तिक नाही. तरीही पहाटेचं देवळांसमोरचं ते सडासंमार्जन, तेवत असणाऱ्या समया आणि शांत वातावरणातल्या त्या रामाच्या, मारुतीच्या मूर्ती काहीतरी वेगळाच आनंद देतात. खरोखर फिरायला जाण्यामागे त्या वातावरणाची ओढ हेसुद्धा एक कारण निश्चित आहे. पण हे आनंद एखाद्या वातावरणाचे आहेत हेच मुळी लक्षात येत नाही. सकाळी उठलं की घाईघाईत आवरताना सतत मोबाइल, बकाबका कोंबलेला नाश्ता, मध्येच लॅपटॉप, त्यातलं प्रेझेंटेशन तपासणं शिवाय मध्येच फेसबुकवर ‘मी आत्ता कुठे आहे’ याचं वर्तमान जगाला सांगणं इत्यादी इत्यादी. धावपळीत ‘जगणार’ कधी.. सांगावंसं वाटतं, ‘‘अरे बाबा आयुष्यावर प्रेम कर, स्वत:वर प्रेम कर.. पानाफुलांकडे बघ, चंद्रताऱ्यांकडे बघ.. ‘फेसबुक’ पेक्षा खऱ्याखुऱ्या जिवंत माणसांकडे, जिवंत सृष्टीकडे बघ, जिवंत नात्यांकडे बघ, जिवंत मैत्रीकडे बघ..’’

‘जिवंत’ शब्द मी जाण्ीावपूर्वक वापरतेय. कारण सध्या आम्ही माणसं कुठल्या तरी आभासी दुनियेत जगतोय. त्यामुळे ‘जिवंत अनुभव’ आम्हाला सहज होत नाहीत. एकतर्फी प्रेमातून आत्महत्या, खून, नैराश्य आणि शेवटी मरणाकडे जाणं..सखोलता नसल्याने आम्हाला कुठलीच सहनशीलता नाही, तडजोड करण्याची ताकद नाही म्हणून तयारीही नाही. सारखं स्वप्नात जगायचं! म्हणून खऱ्याखुऱ्या लढाया अंगावर आल्या की आम्ही पळ काढतो. साधंसुधं जीवन आम्हाला लाजिरवाणं वाटतं. माझ्या माहितीतले एक काका वय र्वष ऐंशी. बायको गेलेली, सून-मुलगा-नातू आणि ते असे राहातात. सून-मुलगा कामावर जातात. नातवाचं सगळं हेच करतात. संध्याकाळपर्यंत तो लहान नातू त्यांचा जीव मेटाकुटीला आणतो. पण ते हसत हसत आनंदात सगळं काही त्याचं करतात. कधी बरं नाहीसं वाटलं तर समजून उमजून सून रजा काढते. त्यांच्याच वयाचे दुसरे आजोबा प्रचंड सुखवस्तू कुठलीही जबाबदारी नाही. सून, मुलगा त्यांना छान ठेवतात. मानानं वागवतात. मुलांना पाळणाघरात ठेवलं आहे. यांचीही बायको गेलेली आहे. दिवसभर घरात एकटे, दोन नोकर हाताशी, वळचणीला मोठी बाग तिथे बागेचं काम केलं तरी केवढं तरी आनंदाचं होईल. पण नाही. आजोबांची सारखी कूरकूर. सारखा केविलवाणा चेहरा करून बसायचं, कशात आनंद घ्यायचा नाही. सारखी तोंड वाकडी करून ‘आमच्या वेळी’चं पुराण लावायचं. कसलीही आवड नाही, छंद नाही. ‘जगणं’ सुसह्य़ कसं करावं आणि कसं करू नये त्याची ही दोन उदाहरणं! काहीजण निवृत्त झाल्यानंतर एकदम विचित्र वागायला लागतात. बायका एकदम ‘राहून गेलेल्या’ गोष्टी ‘आता’ करायला लागतात. खरं तर आयुष्याच्या वेगात त्या त्या वेळी जरासं संयोजन केलं तर गोष्टी करता येतातच हा माझा अनुभव-पुरुष एकदम ‘घरात’ लक्ष घालायला लागतात. जे सर्वानाच जाचक व्हायला लागतं. म्हणूनच म्हणावंसं वाटतं वेळच्यावेळी सगळं काही करताना ‘जगण्याचंही’ बघा जरा काही, सकारात्मक विचार करून आयुष्य सुखद करणाऱ्या काही व्यक्ती कौतुकास्पद वाटतात.

माझ्या एका मैत्रिणीला घर सजवायचा नाद आहे. मोठय़ा आजारपणातून उठूनही कुठेही निराश न होता ही आपली लागली परत घर सजवायला. पैसा असला तरीही दृष्टीही हवी आणि नेमका रसिकपणा हवा. दुसऱ्या बाईंच्या आयुष्यात लागोपाठ धक्के बसूनही त्या विलक्षण पॅशनेटली आपल्यातल्या कला जोपासतात आणि ‘जगणं’ सुंदर करतात. आणखी एक जोडपं दोघंही अती उच्चपदावर- सतत कामात पण दोन्ही मुलींवर उत्तम संस्कार, घर कलात्मकरीत्या सजवणं बहुधा ‘घरातच’ सुग्रास अन्न तयार करणं आणि आल्यागेल्याचं विलक्षण अगत्य. मला आश्चर्य वाटतं. लाखालाखांत पगार घेऊनही मोलकरणींचा, कामवाल्या बायकांचा सुळसुळाट नसतो. कुठून आणते ही बाई ऊर्जा? कारण एकच! उत्साह! आणि आनंद घेणं-तिचं म्हणणं, ‘‘माझं घर मला प्रिय आहे. त्यामुळे माझ्या घरातलं काम करायला मला आवडतं. सुट्टीच्या दिवशी मी घरातून बाहेरही पडत नाही. एखादं रुटीन म्हणून ‘कामाच्या’ पाटय़ा टाकणं आणि तेच काम निराळ्या ‘आनंदानं’ पार पाडणं यात खूप फरक आहे. विवेकानंद म्हणतात, एखादं न आवडणारं कामसुद्धा मनापासून, आनंदानं, चिकाटीनं करत गेलं तर तेच न आवडणारं काम आवडीचं होऊन जातं. छानपैकी ‘जगण्याचा’ हा मूलमंत्रच म्हणायला हवा.

रोजचं रहाटगाडगं रेटताना मधूनच एखादा छोटासा ‘थांबा’ घेऊन स्वत:कडे पाहिलं तर कदाचित स्वत:तल्या काही लपलेल्या कला, छंद दिसू शकतील. आणि कदाचित रोजचं रखरखीत रहाटगाडगं मग छान गारव्याचं जगणं होऊन जाईल. आनंदाचे, सुखाचे आणि चांगल्या अनुभवांचे थांबे आपले आपण पकडावे लागतात. तिथे क्षणभर थांबावं लागतं, त्याच्याशी हातमिळवणी करावी लागते. मग बघा आपण आपल्या स्वत:वर प्रेम करता करता त्या रहाटगाडग्यावरही प्रेम करायला लागलोय आणि खरंखुरं ‘जगायला’ लागलोय हे कळतही नाही. म्हणूनच म्हणावंसं वाटतं जिवंत राहण्यासाठी तू चाकोरीत जरूर बांधून घे, पण जगण्याचं विसरू नको. तू जी ले जरा!

– प्रज्ञा ओक