अभियंता होणाऱ्या मुलींची संख्या चांगलीच वाढू लागली आहे. केवळ पदवीच नाही तर पदव्युत्तर शिक्षण घेऊन, डॉक्टरेट करून स्वत:ची बुद्धिमता आणि कर्तृत्व या दोन्ही पातळ्यांवर लीलया वावरणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या उभारणीत अंभियंत्याच्या सहभागाचा निश्चितच उपयोग होत असतो. म्हणूनच भारतीय आणि परदेशी स्त्री अभियंत्यांविषयी हे खास दोन लेख महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसानिमित्त भारतात साजरा होत असलेल्या १५ सप्टेंबरच्या अभियंता दिनानिमित्ताने..

काळ बदलला आणि स्त्री-शिक्षण उपलब्ध झाले. या शिक्षणाचा पहिला परिणाम म्हणजे स्त्रीला स्वत:मध्ये असलेल्या शक्तीची झालेली जाणीव. त्या जाणिवेतून स्त्री घराबाहेर पडली ती बालवाडी शिक्षिकेच्या रूपात. कालांतराने ऑफिसमध्ये लिहिण्याचं (कर्मचारी) काम करू लागली. हळूहळू टायपिस्ट, स्टेनो, पर्सनल सेक्रेटरी म्हणून तिचं कार्यक्षेत्र वाढू लागलं. आत्मविश्वास वाढला. मग तिच्या स्त्री प्रकृतीला अनुकूल अशी प्राथमिक, माध्यमिक शिक्षिका, परिचारिका, रिसेप्शनिस्ट अशी कामं ती करू लागली. शिक्षिकेची मुख्याध्यापिका झाली. पूर्वीचं ‘पंतोजींचं’ राज्य स्त्रीने काबीज केलं. तोपर्यंत शिक्षणाचा प्रसार अधिकच वाढला व तिने अकाऊंटिंग, मॅनेजमेंट, डॉक्टरी या क्षेत्रांमध्ये शिरकाव केला; पण अटकेपार झेंडा लावला तो म्हणजे ‘तो इंजिनीयर’ या पुरुषवाचक शब्दाच्या जोडीला ‘ती इंजिनीयर’ हा शब्द रूढ करून घेऊन. हा शब्द इतका रूढ झाला की, पूर्वी ‘४००-५०० इंजिनीयिरगच्या विद्यार्थ्यांमध्ये ५-१० असलेल्या मुली’ हे चित्र पालटून ‘केवळ मुलींचे इंजिनीयिरग कॉलेज’ इथपर्यंत त्यांची मजल गेली आहे.

pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

स्त्री इंजिनीयर!.. या ‘इंजिनीयर’ शब्दात काय जादू आहे या विचाराने मी जरासं खोलात जाऊन या शब्दाची व्याख्या वा व्युत्पत्ती काय आहे याचा शोध घेतला तेव्हा अनेक प्रकारांनी या शब्दाचं स्पष्टीकरण आढळलं. त्यातून असं समजलं की, शास्त्रज्ञ हा संशोधन करतो वा शोध लावतो; परंतु इंजिनीयर त्या शोधाचा योग्य असा वापर करून मानवाचं आयुष्य सुखकर करण्याकरिता उपयुक्त अशी छोटीमोठी यंत्रे/तंत्रे किंवा सुविधा निर्माण करतो. इंजिनीयिरग या शब्दाचं मूळ इंजिनियम (ingenium) या लॅटिन शब्दात आहे. इंजिनियम म्हणजे हुशारी किंवा हुशार संशोधक वृत्ती आणि इंजिनीयर म्हणजे (हुशारी वापरून) एखादं यंत्र/तंत्र किंवा सुविधा निर्माण करणारी (किंवा त्यासंबंधी साहाय्य करणारी) व्यक्ती.

प्राचीन कालापासून मानव इंजिनीयिरगचं तत्त्व वापरत आलाय; परंतु त्याला ‘इंजिनीयिरग असं म्हटलं जायचं नाही. बघा ना, तरफ, चाकं, कप्पी यामुळे मानवाचं आयुष्य किती सुखकर झालं! दुसरं असं की, त्या काळी इंजिनीयिरगलाच संशोधन म्हणत असावेत. (शब्दावरून एक गंमत आठवली. ‘सायंटिस्ट’ – शास्त्रज्ञ – हा शब्दसुद्धा १८४० मध्ये विल्यम व्हेवेल या केंब्रिजमधल्या भाषातज्ज्ञ प्रोफेसरने रूढ केला. त्यापूर्वी शास्त्रज्ञांना ‘नॅचरल फिलोसॉफर’ म्हणत असत.) असो. स्त्री इंजिनीअर्स वा अभियंत्यांबद्दल आपण बोलतोय तेव्हा पुढचा प्रश्न पडला तो असा की, जगातल्या पहिल्या स्त्री अभियंतासंबंधी काही नोंद आहे का? अपेक्षेप्रमाणेच गुगलवर उत्तर होते. त्याचा सारांश असा: एकोणिसाव्या शतकात स्त्री इंजिनीयर्सच्या नोंदी दिसून येतात. इंग्लंडमधील प्रसिद्ध कवी बायरन यांची कन्या एडा लव्हलेस ही स्त्री खरं तर इंजिनीयरच. (इ.स. १८१५ ते १८५२). तिचा मुख्य विषय गणित. त्यात तिने प्रावीण्य प्राप्त केले. त्यानंतर ‘कॉम्प्युटरचा पिता’ ज्याला म्हटलं जातं अशा चार्लस् बॅबेजच्या सहयोगाने पुष्कळ काम केलं. तिला जगातली ‘पहिली कॉम्प्युटर प्रोग्रॅमर’ म्हटलं जातं. तिच्या कार्याचा गौरव म्हणून तिच्या नावाने (एका विशिष्ट उपयोगाकरिता) एक संगणक भाषा – ‘एडा लँग्वेज’ – तयार केली गेली व आजही ती वापरली जाते.

परंतु पहिली इंजिनीयिरगची पदवी मात्र अमेरिकेतील नोरा स्टँटन ब्लॅच बार्नी हिने घेतली. सिव्हिल इंजिनीयिरग या शाखेची पदवी तिने कॉर्नेल विद्यापीठातून १९०५ मध्ये घेतली. तसेच एलिसा लिओनिडा झाम्फिरेस्क्यू हिने युरोपमधील पहिली स्त्री इंजिनीयर म्हणून १९१२ मध्ये पदवी घेतली.

तर.. असा हा स्त्री इंजिनीयर्सचा थोडक्यात इतिहास. सध्या आपण एकविसाव्या शतकात आहोत म्हणूनच आपण ‘जागतिक इंजिनीयर दिवस’ साजरा करताना पुरुषांबरोबरच जगातल्या सर्व स्त्री इंजिनीयर्सना शुभेच्छा देत आहोत, स्त्री इंजिनीयर्सच्या कार्याचा गौरव करत आहोत. असंच कौतुक आणि त्यांच्या कार्याची दखल ‘बिझनेस इनसायडर’ या ऑनलाइन प्रकाशनाने घेतली आहे. त्यांनी अमेरिकेतल्या प्रथितयश आणि उच्चपदस्थ अशा ४३ स्त्री अभियंत्यांची एक यादी जाहीर केली आहे. खरं तर सर्व जणींची कामगिरीच थक्क करणारी आहे; परंतु त्यातील काही जणींची माहिती आपण या  दिवसाच्या निमित्ताने थोडक्यात करून घेऊ या.

पेगी जॉन्सन – या मायक्रोसॉफ्ट कंपनीत ‘बिझनेस डेव्हलपमेंट’ (उद्योग विकास) विभागाच्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आहेत. पेगी जॉन्सन यांनी सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीयिरगची पदवी प्राप्त केली. लगेचच ‘जनरल इलेक्ट्रिक’च्या मिलिटरी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजनमध्ये इंजिनीयर म्हणून काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी क्वालकॉम या नामांकित कंपनीत चोवीस वर्षे मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, सेल्स इत्यादी वेगवेगळ्या विभागांत उच्च पदांवर काम केले व सध्या त्या मायक्रोसॉफ्टमध्ये वर निर्देशित केलेल्या पदावर आपली जबाबदारी सांभाळत आहेत. कंपनीच्या भविष्यकालीन विकासासाठी योग्य अशी आखणी करणे व अचूक पद्धतीने निर्णय घेणे ही जबाबदारी त्या कुशलतेने पार पाडत आहेत. काही काळापूर्वी ‘लिंक्ड-इन’ ही कंपनी विकत घेऊन तिचे मायक्रोसॉफ्टमध्ये विलीनीकरण करणे या फार मोठय़ा (२६ बिलियन डॉलर्स!), कठीण आणि किचकट कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता; पण यावरच त्या थांबल्या नसून देशपरदेशातील अगदी लहान स्टार्ट-अप कंपन्यांपासून मोठय़ा कंपन्यांपर्यंत सर्वाकडे त्यांचं लक्ष असतं व जरुरीप्रमाणे एखादी कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये जोडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. टेक्नॉलॉजीच्या जगात काळ अधिक वेगाने बदलत असल्याने त्या सतत नावीन्याच्या शोधात असतात व मायक्रोसॉफ्टमधील लोकांना त्या दृष्टीने प्रोत्साहन आणि आधार देत असतात. पेगी यांना त्यांच्या कार्यात नेहमीच सतर्क राहावे लागते, कारण मायक्रोसॉफ्टसारख्या मोठय़ा व नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीला आघाडीवर राहण्यासाठी बऱ्याच बाजूंनी विचार करावा लागतो आणि प्रत्येक बाजू तितकीच महत्त्वाची असते. समाजासाठीही त्या पुष्कळ काम करतात. जगातील सर्वसामान्य लोकांना आरोग्य-सेवा सुलभ मिळावी याकरिता पीएटीएच या ‘ना-नफा’ तत्त्वावर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये त्यांचा सहभाग आहे.

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत; परंतु महत्त्वाचं म्हणजे या वर्षीचा ‘बिझनेस इनसायडर’चा ‘नंबर वन मोस्ट पॉवरफुल फिमेल इंजिनीअर इन २०१७’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्या, त्यांचे पती, तीन मुले असे त्यांचे कुटुंब असून त्या सिअ‍ॅटलमध्ये राहतात. चार कुत्रे आणि एक मांजर हेही त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत.

दुसऱ्या आहेत, जिल रुबी  – ‘सुरक्षा’ हा शब्दच आपल्याला जबाबदारी आणि जागरूकपणा यांची आठवण करून देतो. ‘राष्ट्रीय सुरक्षा’ हा शब्द तर जबाबदारी आणि गंभीरता यांची कक्षा आणखीन वाढवतो. मग ‘आण्विक सुरक्षा’ या शब्दांबद्दल काय बोलायचं? पण मित्र-मैत्रिणींनो, या अशा सुरक्षेशी संबंधित असलेल्या कंपनीच्या उच्च पदावर अमेरिकेत एक स्त्री आहे, तिचं नाव आहे जिल रुबी.

रुबी यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील बर्कली विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीयिरगमधील मास्टर डिग्री संपादन केली. आण्विक ऊर्जा या विषयात त्यांची आवड असल्याने त्यांनी सँडिया नॅशनल लॅबोरेटरीमध्ये प्रवेश मिळवला व तिथे थर्मल अँड फ्लुइड सायन्सेस, सोलर एनर्जी, न्यूक्लीअर वेपन्स या विषयांत संशोधनकार्य केले. सँडियामधील अनेक विभागांत त्यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. अशा तऱ्हेने इंजिनीयर म्हणून रुजू झालेल्या रुबी सध्या सँडिया नॅशनल लॅबोरेटरीमध्ये डायरेक्टर म्हणून काम पाहतात. तसेच त्या सँडिया कॉर्पोरेशन या कंपनीच्या प्रेसिडेंटही आहेत. मुख्य सँडिया कंपनीत दहा हजारांच्या वर कर्मचारी असून वार्षिक उत्पन्न अडीच बिलियन डॉलर्स इतके आहे.

रुबी यांचं काम अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून त्या अमेरिकेतील तीन न्यूक्लीअर वेपन लॅबोरेटरींपैकी एका लॅबोरेटरीच्या प्रमुख असणाऱ्या पहिल्या महिला आहेत. हे वाचल्यावर आपल्याला त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि जबाबदारीची पातळी लक्षात येईल. जागतिक सुरक्षा, आण्विक ऊर्जा तंत्रज्ञान, पारंपरिक आणि आण्विक शस्त्रास्त्रे, संरक्षण व्यवस्था याकडे त्यांना लक्ष द्यावे लागते, जेणेकरून अतिरेकी हल्ले कमी होतील व अंतर्गत सुरक्षा अबाधित राहील. तसेच देशाच्या संरक्षण खात्याच्या ‘थ्रेट रिडक्शन अ‍ॅडव्हायजरी कमिटी’चेही त्या काम पाहतात. अनेक विद्यापीठांच्या सल्लागार समित्यांवरही त्यांची नियुक्ती झालेली आहे.

रुबी यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिकेतल्या ‘सोसायटी ऑफ विमेन्स इंजिनीयर्स’ या संस्थेने त्यांना २०१६ चा ‘अपवर्ड मोबिलिटी’ (ऊर्ध्वगामी गतिशीलता) हा पुरस्कार दिला. या पुरस्काराचं कारण म्हणजे रुबी यांनी जगातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या परंतु पुरुषप्रधान इंजिनीअिरग संस्थेमध्ये (म्हणजे संरक्षण खाते) शिरून दाखवलं, इतकंच नाही तर उच्च पद प्राप्त करून यशही सिद्ध केलं; पण त्या इथेच थांबल्या नाहीत, तर इतर स्त्रियांना प्रेरणा देत आहेत.

तिसऱ्या डॉ. रीट्स करी. अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांना अनेक वर्षे सामाजिक अ-समानतेशी झगडावे लागले. त्यामुळे बहुतांशी तो समाज शिक्षणापासूनही वंचित राहिला व साहजिकच त्यांना गरिबीचाही सामना करावा लागला. त्यामुळे या समाजातून आलेल्या व्यक्तीचं यश अधिक उठून दिसतं आणि त्यातही ती व्यक्ती स्त्री असेल तर त्या यशाला अधिक उजाळा मिळतो. अशापैकी एक म्हणजे इंजिनीअर असलेल्या डॉ. रीट्स करी.

मिसूरी विद्यापीठामधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीयिरगची पदवी मिळवली. त्याच शाखेत पडर्य़ू विद्यापीठातून मास्टर्स पदवी संपादन केली आणि त्यापुढे जाऊन बायो-मेडिकल इंजिनीअिरगमध्ये रटगर्स विद्यापीठामधून डॉक्टरेट मिळवली. नंतर त्यांना  ‘नासा’ची एट फेलोशिप मिळाली. (योगायोगाने त्यांचे भावी पतीही त्यांना तिथेच भेटले. तेही एट फेलोच होते.) नंतर त्या दोघांनी १९९५ मध्ये मिशिगन येथे फोर्ड मोटर कंपनीमध्ये काम सुरू केले. मानव आणि यंत्र (इथे मोटर)/ कॉम्प्युटर यांच्यामधला संवाद आणि देवाणघेवाण कसे सुधारता येईल याचा अभ्यास करणे हे रीट्स यांचे कार्यक्षेत्र. त्यातून निघणाऱ्या निष्कर्षांचा उपयोग मोटर कारमध्ये लागणारी चालक आणि प्रवासी यांची सुरक्षितता (सेफ्टी मेकॅनिझम) याकरिता लागणाऱ्या कार्यक्षम तंत्रज्ञानाची निर्मिती करण्याकडे केला जातो. फोर्ड कंपनीमधल्या ‘रीसर्च आणि इनोवेशन सेंटर’मध्ये टेक्निकल एक्स्पर्ट म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना उत्तम कामगिरीबद्दल फोर्ड कंपनीतील प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘हेन्री फोर्ड टेक्नॉलॉजी अ‍ॅवॉर्ड’ दोन वेळेला मिळाले आहे!

डॉ. करी यांचं विशेष म्हणजे व्यावसायिक जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळत असताना समाजाकरिता त्यांचं योगदान सतत चालू आहे; विशेषत: शाळेतील मुलांकरिता. त्यांच्यात विज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनीअिरग व गणित याविषयी आवड निर्माण करणे, त्यांना प्रोत्साहन देणे याकरिता त्या विशेष उपक्रम राबवितात. खास करून कृष्णवर्णीय समाजाला व त्यातही स्त्रियांना विज्ञान, तंत्र शिक्षणाची आवड निर्माण व्हावी याकरिता त्या प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात. अशा स्त्रिया इंजिनीयर होऊन त्यांना चांगलं काम मिळेल आणि समाजात सन्मान मिळेल याकरिता त्या प्रयत्नशील आहेत. इतकं करूनही त्यांच्या दिवसातले चोवीस तास संपलेले नसतात असं वाटतं. (काम करणाऱ्याला कितीही केलं तरी कंटाळा नसतो ना!) कारण ‘स्काऊट आणि गर्ल-गाईड’ यांच्यामध्येही त्यांना खूपच रस असून त्यांच्यामार्फत डॉ. करी समाजकार्य करतात. मिशिगन राज्यातल्या अ‍ॅन-आर्बर शहरात त्यांचे पती आणि दोन मुले यांच्याबरोबर त्या राहतात.

देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या काही स्त्री इंजिनीयर्सची ही थोडक्यात माहिती असली तरी ‘बिझनेस इनसायडर’ने मानांकित केलेल्या सगळ्याच इंजिनीयर स्त्रियांचं कार्य उत्तुंग असंच आहे. उदाहरणार्थ, ‘बेख्टेल’ कंपनीच्या बार्बरा रसिंको, ‘अ‍ॅपल’च्या प्रिया बालसुब्रमण्या, ‘फेसबुक’च्या रेजिना डुगन, ‘ट्विटर’च्या याना मेसरश्मिडट्, गुगलच्या अंजली जोशी या आणि इतर किती तरी जणी ‘बिझनेस इनसायडर’च्या ‘२०१७ मधल्या मानाची पदे भूषविणाऱ्या (शक्तिशाली) स्त्री इंजिनीयर्स’ या किताबाच्या मानकरी आहेत. या सर्व जणी जरी अमेरिकेतल्या असल्या तरी जगात सर्वत्र अशा उत्तुंग कारकीर्द असणाऱ्या स्त्री इंजिनीयर्स आहेतच. या लेखाच्या निमित्ताने आपण त्या सर्वाचे आणि जगातल्या प्रत्येक इंजिनीयर स्त्रीचे अभिनंदन करू या. थ्री चिअर्स फॉर लेडी इंजिनीयर्स !!!

– अंजली श्रोत्रिय

health.myright@gmail.com