एकुलत्या एक मुलीचं लग्न तर करायचं, पण तो इव्हेंट होऊ न देता पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा व्हायला हवा होता. नातेवाईकांना भेटवस्तूऐवजी गांडूळखत बनविणारे उपकरण भेट देणं असो, घरात निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याची योजना जाहीर करणं असो, उपस्थितांना भेटवस्तू देण्यासाठी कापडी पिशव्या, पुस्तकं, काही झाडांची रोपं देऊ करणं असो, इतकंच नाही तर प्रत्येक आमंत्रिताची स्वास्थ्य चाचणी करणं असो, हे सगळं करणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या विवाहाविषयी कालच्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने..

एकुलत्या एक मुलीचं लग्न म्हणजे आईच्या भावजीवनात खळबळ माजविणारी घटना अन् ती लेक जर स्वत:चे निर्णय स्वत:च घेणारी असेल तर माऊलीला अनपेक्षित धक्के अधिकच. माझ्या मुलीने, तेजसने तिच्या बालमित्राशी, वीरेंद्रशी आंतरजातीय विवाह ठरवला. मी भावनांऐवजी विवेकाचं बोट धरलं. दोन्ही कुटुंबांमधील सांस्कृतिक फरक मी तिच्या दृष्टीस आणून दिला; पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. तिच्या निर्णयाचा मी मान राखला आणि तयारीला लागले.
सर्वप्रथम मी त्या दोघांना एक प्रश्नावली सोडवायला दिली. त्यातील प्रश्न त्या दोघांची तडजोड करण्याची क्षमता जोखणारे होते. प्रश्नांची उत्तरे लिहिताना दोघं अंतर्मुख झाले. त्यांच्या सहजीवनाबद्दल सजग झाले. त्यानंतर विवाहाबद्दल काही विचारवंतांचे लेख त्यांना वाचायला दिले. कामजीवनाच्या शारीरिक आणि मानसिक बाजूंबद्दल शास्त्रीय माहितीही वाचायला दिली. विवाहपूर्व वैद्यकीय तपासण्या आणि तज्ज्ञांकडून समुपदेशन करवून घेण्यास प्रोत्साहन दिले. तसंच लग्नानंतरच्या त्यांच्या सहलीची आखणी करून दिली. या सर्वामुळे आमच्यात विश्वास आणि सहकार्याची भावना अधिकच रुजली.
माझ्या दृष्टीने लग्नाची आवश्यक ती तयारी झाली होती. लग्नापूर्वीच्या खरेदीबद्दल मी पूर्णपणे उदासीन होते. त्यात माझा पैसा, श्रम आणि वेळ घालवला नाही. त्याबद्दल मुलीला स्वातंत्र्य होतंच. आम्ही (पती, पत्नी आणि आमची मुलगी) तिघांनी पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा स्वीकार केलाय. वृक्षारोपण, सायकल वापर, घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन यात आमचा सक्रिय सहभाग असतो. लग्नाच्या निमित्तानं मी घराच्या कुंपणभिंती रंगवून घेतल्या. त्यावर तेजसने पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी सुरेख चित्रं रेखाटली. पाणी, वीज आणि इंधनबचत, वृक्षजतन, प्लॅस्टिकचा वापर टाळणं असे चित्रांचे विषय होते. लग्नानिमित्त घरी येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही हा वसा देणार होतो.

लग्न कसं करायचं यावर मात्र आमचं एकमत नव्हतं. आम्हाला रजिस्टर्ड पद्धतीने लग्न हवं होतं, तर वरपक्षाला विधिवत लग्न करायचं होतं. मी विविध लग्नविधींबद्दल वाचन सुरू केलं. सत्यशोधक विवाहपद्धती, बौद्ध आणि वैदिक लग्नपद्धतींबद्दल वाचलं. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ हे पुस्तक आधीच वाचलं होतं. प्रचलित लग्नविधी काल्पनिक आणि कालबाहय़ समजांवर आधारित आहेत, असं माझं मत झालं होतं. ‘सालंकृत कन्यादान’ ही कल्पनाच मला अमान्य होती. मुलीचं पीएच.डी. आणि सुसंस्कृत वागणं हे तिचे अलंकार आहेत आणि सोन्याच्या अलंकारात गुंतवणूक (स्त्रीधन) करण्याऐवजी गुंतवणुकीचे इतर उत्तम पर्याय मला माहीत आहेत. शिवाय लेकीला देवाणघेवाणीची वस्तू समजायची, तिचं दान करायचं, त्या बदल्यात पुण्य कमवायचं या सगळ्याला माझा ठाम नकार होता.
वरपक्षाच्या समाधानासाठी विधिवत लग्नाचा वचननामा आणि आमच्या समाधानासाठी पर्यावरणस्नेही पद्धतीने असं तेजसचं दोनदा लग्न झालं. लग्नखर्च वधू-वर आणि त्यांचे आईवडील या सगळ्यांनी मिळून केला. आमचे व्याहीसुद्धा समंजस असल्यामुळे आमचे मतभेद मनभेदांपर्यंत गेले नाहीत. लग्नात देणंघेणं, मानपान याला फाटा दिला. मुलीने ‘स्वयंवर’ पद्धतीच्या विधींनी लग्न केलं. मुलीने स्वत:च स्वत:चा वर निवडला (‘स्वयंम् वर’) असल्याने त्या विधींमध्ये दोन्हीकडच्या आईवडिलांचा सहभाग जवळजवळ नसतोच. कन्यादान नसते.

हल्लीची बरीचशी लग्नं एक ‘इव्हेंट’ झाली आहेत. तेजसचे पाय मात्र जमिनीवर होते. लग्नात तिनं रोषणाई, मंडप, मिरवणूक, फटाके यावर खर्च केला नाही. काळानुसार लग्नविधींमध्ये बदल करण्यातच संस्कृतीचे संवर्धन होते असं मला वाटतं. आमच्या घरी केलेले विधी ‘मॉडिफाइड’ होते. आमचे मित्र विनय आणि सुनीती यांनीही त्यांच्या मुलीचं लग्न करताना काही वेगळा विचार केला होता. माझ्या संकल्पना स्पष्ट व्हायला मला त्यांची मदत झाली. आम्ही संस्कृतिरक्षणाऐवजी पर्यावरण रक्षणाला झुकतं माप दिलं.

कागद (पर्यायानं वृक्षतोड) बचत व्हावी. म्हणून आम्ही केवळ ३० पत्रिकाच छापल्या. त्या पाकिटाशिवाय वाटल्या. मी मूर्तिपूजा मानत नाही. म्हणून निमंत्रण पत्रिकेचं शीर्षक ‘निसर्गदेवता प्रसन्न’ असं होतं. आडनाव ही जात निदर्शक असतात. म्हणून पत्रिकेवर कोणाचंच आडनाव नव्हतं. पत्रिकेसोबत अस्टर फुलांच्या बिया जोडल्या होत्या. निमंत्रितांना त्या बिया रुजविण्याची, त्यांची रोपं जोपासण्याची विनंती केली होती. बहुतेक आमंत्रणं आम्ही मोबाइल, ईमेल्स ही माध्यमं वापरूनच दिली. त्यामुळे इंधन, पैसा, वेळ आणि श्रम यांची बचत झाली.

आमचा कार्यक्रम घरीच केला. आमंत्रितांना अनौपचारिक आणि हिरव्या रंगछटेतील कोणताही पेहराव सुचविला होता. सगळ्या कार्यक्रमात भर दिला होता परस्परनाती बळकट करण्यावर. सोहळ्यात गोफ विणला होता निसर्ग, माणूस (विचार आणि भावनांसह) आणि परंपरा यांचा. संपूर्ण समारंभात प्लॅस्टिक, थर्मोकोलचा वापर जाणीवपूर्वक टाळला होता.
मी स्वास्थ्यतज्ज्ञ आहे. तेजसने ‘मधुमेहा’त पीएच.डी. केली आहे. आमच्या ज्ञानाचा थोडा तरी फायदा आमंत्रितांना मिळावा अशी आमची इच्छा होती. प्रत्येक आमंत्रिताची स्वास्थ्य चाचणी केली. त्यात रक्तशर्करा, रक्तातील चरबीचे प्रमाण आणि रक्तदाब मोजला. तपासण्यांचे रिपोर्ट्स पाहून पाहुणे आपल्या फिटनेसबद्दल जागरूक झाले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘सेरेनिटी प्रेयरने’ झाली. प्रार्थनेत देवाकडे सर्वानी प्रसन्नता, धैर्य आणि ज्ञान मागितले. ‘‘प्रचलित लग्नविधींपेक्षा वेगळ्या पद्धतीने लग्न लागणार आहे. सर्वानी त्यात मन:पूर्वक सहभागी व्हावे,’’ अशी पाहुण्यांना विनंती केली. विधींची सुरुवात वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली. त्यासाठी कांचनवृक्षांचे रोप निवडण्यामागेही काही विचार होता. त्याचे पान देठापाशी अखंड, पण टोकापाशी दोन पर्णिकांमध्ये विभाजित झालेले असते. या रूपकाद्वारे वधू-वरांनी परस्परांना अर्थपूर्ण आश्वासन दिलं. ‘‘आम्ही प्रेमाने एकमेकांशी जोडलेले असू, पण आम्ही दोघं आमचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्वही जतन करू.’’
स्त्री-पुरुषाच्या एकत्र राहण्याला समाजाने, कायद्याने दिलेली मान्यता म्हणजे विवाह. वधू-वराने कुटुंब आणि समाज यांच्या प्रति बांधिलकी व्यक्त केली, की ती सूत्रबंधन या विधीत सन्मुख असलेल्या वधू-वरांभोवती समवयस्क भावंडं आणि मित्र यांनी सूत गुंडाळलं.

14पुढचा विधी झाला सप्तपदीचा. वधू-वराच्या आईवडिलांनी पावलागणिक एकेका जीवनमूल्याची शिकवण वधू-वरांना दिली. अहिंसा, सत्य, प्रेम, नम्रता, स्वावलंबन, सर्वधर्मसमभाव आणि गृहस्थी. ही सात मूल्य महात्मा गांधींच्या एकादश व्रतावर आधारित आहेत. आचार्य कालेलकरांनी सद्य सामाजिक परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये काही बदल केले. नंतर वधू-वरांनी सर्वासमक्ष एकमेकांना दिलेल्या वचनांचं सहवाचन केलं. वचनांच्या केंद्रस्थानी व्यक्तिस्वातंत्र्य होते. त्याला जोड दिली होती भावनिक आधार, विवेक, सामाजिक जाणीव यांची. त्या सुंदर संकल्पानं उपस्थितही आश्वस्त झाले.

विनोबांनी ऋ ग्वेदातील ‘‘संगच्छध्वं सवदध्वं..’’ या प्रसिद्ध ऋ चेचा सोप्या हिंदीत पद्य अनुवाद केला आहे. त्याच्या प्रती अभ्यागतांना वाटल्या होत्या. सर्व जणांनी मिळून ते पद्य गायले. नंतर वधू-वरांनी परस्परांना सुताचे हार घातले. उपस्थितांनी नवदाम्पत्यांवर गुलाब पाकळ्यांचा वर्षांव केला. जवळच्या नातेवाईकांना साडय़ा आणि इतर भेटवस्तूऐवजी गांडूळखत बनविणारे उपकरण भेट दिले. स्वयंपाकघरातील जैविक कचरा त्यायोगे त्यांनी घरच्या घरीच जिरवावा, अशी विनंती त्यांना केली. घरात निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याची एक योजनाही जाहीर केली.
उपस्थितांना भेटवस्तू देण्यासाठी एक अभिनव कल्पना राबविली. बऱ्याचदा नको असलेल्या भेटवस्तू घरात गोळा होतात. त्यांचे काय करायचे, असा प्रश्न पडतो. रुखवताऐवजी मी काही टेबल्स मांडली होती. त्यावर प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून आकर्षक कापडी पिशव्या, पुस्तकं, काही झाडांची रोपं, दैनंदिन जीवनात उपयोगी असणाऱ्या अनेक वस्तू मांडल्या होत्या. पाहुण्यांना विनंती केली की, त्यांना उपयोगी असलेल्या वस्तू त्यांनी हव्या तितक्या
घेऊन जा.

निमंत्रण पत्रिकेतच सुचविले होते, की पुष्पगुच्छ, आहेर आणू नयेत. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे रोख आहेर प्रेमाने दिले. तेजसने ती रक्कम कृतज्ञतेने स्वीकारली. केईएम हॉस्पिटल (पुणे) याच्या मधुमेह विभागाच्या लहान मुलांच्या वॉर्डला जमलेली रक्कम तिने देणगी म्हणून दिली.
लग्नविधी विचारप्रवृत्त करणारा आणि अनुकरणीय आहे, असं अभ्यागतांनी म्हटलं आणि तेच मला अपार समाधान देऊन गेलं.

– प्रज्ञा पिसोळकर