‘‘वेगवेगळ्या राज्यांतील मुस्लिमांच्या आर्थिक- सामाजिक स्थितीतल्या फरकातूनच मुस्लीम समाजाला स्वत:च्या उन्नतीसाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता ध्यानात आली आणि शिक्षणाचं प्रमाण वाढू लागलं. ग्रामीण व शहरी भागात मुस्लीम मुलींमध्ये शिक्षणामुळे एक आत्मनिर्भता निर्माण झाली आहे. धार्मिक व वैयक्तिक पातळीवरील अनेक बाबींविषयी त्या कुटुंबात आपले मत ठामपणे व्यक्त करू लागल्या आहेत. शिक्षणामुळेच त्यांना हे बळ प्राप्त झाले आहे.’’ मुस्लीम समाजातील बदलत्या शैक्षणिक आत्मभानाविषयी.

फरीदा लांबे यांनी मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सच्चर समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय मुंबईतील ‘निर्मला निकेतन’ महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या, ‘प्रथम’ या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरलेल्या संस्थेच्या सहसंस्थापक अशीही त्यांची ओळख आहे. सुमारे २५ वर्षांचा शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव त्यांच्याकडे असून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय सल्लागार समिती आदी अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सरकारी समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.

Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

गेल्या दोन दशकांत देशातील मुस्लीम समाजात काही महत्त्वाचे बदल होत आहेत आणि ते बदल प्रत्येक ठिकाणी वेगळे आहेत. त्याचे कारण देशभरातील मुस्लीम समाज हा विविध राज्यांत विखुरलेला आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास उत्तर प्रदेशमधील मुस्लीम समाज आणि केरळातील मुस्लीम समाज यांच्या स्थितीत नक्कीच फरक आहे. त्या त्या राज्यातल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रक्रियांचे परिणाम तिथल्या मुस्लीम समाजावर झाल्याने प्रत्येक राज्यांतील मुस्लीम समाजाची स्थिती वेगळी आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाकडे पाहिले तर आपल्या असे लक्षात येते की इथला मुस्लीम समाज हा तसा मुख्य प्रवाहात आलेला आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा महाराष्ट्रातील मुस्लीम समाज हा पूर्वीपासूनच इथल्या संस्कृतीशी तादात्म्य पावलेला आहे.

मी स्वत: रत्नागिरीतील एका मुस्लीम कुटुंबातील. त्यामुळे मला स्वत:ला जशी उर्दू भाषा बोलता येते तशीच कोंकणी आणि मराठीही येते. माझे वडील महाराष्ट्र शासनात सचिव पदावर कार्यरत होते. आमच्या घरी सुरुवातीपासूनच शिक्षणाचे वातावरण होते. वडिलांचा तर आग्रहच होता की आम्ही सर्व भावंडांनी सरकारी शाळांमध्ये शिकावे. साहजिकच आमचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. मला स्वत:ला अभ्यासाबरोबरच खेळांमध्येही गती होती. हॉकी वगैरे खेळांत मी हिरिरीने सहभागी होत असे. आमच्या ओळखीतल्या काहींना हे फारसे रुचत नसे. पण घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहन अन् पाठिंब्यामुळे ते चालू ठेवण्यात आडकाठी आलीच नाही. मुख्य म्हणजे घरून पाठिंबा मिळाला म्हणून मी हे करू शकले याचा अर्थ इतरही मुलींना जर घरून पाठिंबा मिळाला तर त्या या गोष्टी करू शकतील. ही एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे, ‘तू मुस्लिमांसारखी दिसत नाहीस.’ असं अगदी शाळेपासून मी आत्ताही कधी कधी हे वाक्य ऐकते तेव्हा ते खटकतं. मुस्लिमांसारखी म्हणजे काय नेमकं? मुस्लीम म्हणजे जी काही ठरावीक प्रतिमा डोळ्यासमोर येते तीच त्यांना अभिप्रेत असते का? अगदी आजही? पण या काही गोष्टी सोडल्यास मुस्लीम असण्याचे फारसे वेगळे अनुभव वाटय़ाला आले नाहीत किंवा आपण मुस्लीम असल्यामुळे  इतरांचे आपल्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले असेही झाले नाही.

परंतु ही सर्व परिस्थिती थोडी बदललेली दिसली ती मुंबईतील १९९३च्या दंगलींनंतर. या दंगलींनंतर हिंदू- मुस्लीम दोन्ही समाजांत आपापल्या अस्मिता जपण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. दोन्ही बाजू  घेटोइझमकडे वळल्या. आपापले गट होत गेले. त्यातच त्यांना सुरक्षितता जाणवू लागली. याच काळात अल्पसंख्याकांकडे देशभक्तीचे पुरावे मागितले जाऊ लागले. अशा गोष्टींचा तर मला फार राग येत असे. मुस्लीम समाज मुख्य प्रवाहापासून बाजूला पडतो की काय अशी स्थिती जाणवू लागली. याचे कारण मुस्लिमांकडे स्वत:चे सामाजिक नेते नाहीत. इमाम, मौलवी हे त्यांचे सामाजिक नेते नाही होऊ शकत. ही कमतरता तर त्यांच्यात होतीच, परंतु याबरोबरच वेगवेगळ्या राज्यांतील मुस्लिमांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीतही बराच मोठा फरक होता. (आजही काही प्रमाणात तो आहेच.) या फरकाबद्दलच मुस्लीम समाजात खंत होती. त्याचा सकारात्मक परिणाम मात्र असा झाला की, मुस्लीम समाजाला स्वत:च्या उन्नतीसाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता ध्यानात आली. मुस्लीम समाजात आपल्या राजकीय- सामाजिक स्थितीबद्दल जागरूकता वाढू लागली. त्यातून शिक्षण घेण्याकडे मुस्लीम समाजाने लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे मागच्या दोनेक दशकांत चित्र निर्माण झाले. पुढे मुस्लीम समाजातील मुलीही शिक्षणाकडे वळल्याचे याच काळात दिसू लागले.

मी स्वत: सच्चर समिती, रहमान समिती आदी मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करणाऱ्या समित्यांची सदस्य होते. या अभ्यासांतून पुढे आलेला महत्त्वाचा निष्कर्ष मुस्लीम समाजातील शिक्षणाच्या स्थितीबद्दलचा होता. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. मुस्लीम समाजातील मुले-मुली सरकारी नोकरीत फारशी दिसत नाहीत. कौशल्याधारित शिक्षणाकडे मुस्लीम समाजाचा ओढा असल्याचेही अनेक अभ्यासांतून पुढे आले आहे. अशा परिस्थितीत मुलींचे शिक्षणातील प्रमाण फारच कमी असले तर आश्चर्य वाटायला नको. आठ -दहा वर्षांपूर्वीपर्यंत ही स्थिती प्रकर्षांने जाणवे. समजा, १०० मुली इयत्ता पहिलीमध्ये शिकत असतील, तर त्यातील अध्र्याहून कमी मुली माध्यमिक शिक्षणाकडे वळायच्या, अशी आधीची परिस्थिती होती. विद्यापीठ पातळीवरील शिक्षणात तर मुस्लीम मुलींचे प्रमाण फारच नगण्य होते. पण मागच्या काही वर्षांत यात अधिक वेगाने बदल होऊ लागला. आता ही स्थिती राहिलेली नाही. मुली शिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर उच्च शिक्षण घेण्यापर्यंत मुलींची प्रगती झाली आहे. सरकारच्याच एका अहवालानुसार मुलींपेक्षा मुलांचं उच्चशिक्षणातील गळतीचं प्रमाण अधिक आहे. पालकही मुलींना शाळेत पाठवू लागले आहेत. त्यांनाही आपल्या मुलींनी शिकावे असे वाटू लागले आहे. १०वी, १२ वीनंतर मुलांना नोकरी- व्यवसायासाठी शिक्षण थांबवावे लागते. परंतु पालक मुलींचे शिक्षण सुरूच ठेवतात. शाळा, महाविद्यालये ही मुलींसाठी अधिक सुरक्षित आहेत, अशी या पालकांची भावना आहे. सरकारी पातळीवरही सर्व शिक्षा अभियान, उपस्थिती भत्ता यांसारख्या योजनांमुळे मुलींचे शालेय शिक्षणातील प्रमाण वाढले आहे.

मुस्लीम समाजातील मुलींच्या शिक्षणातही काही विशेष लक्षणे दिसतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम मुलींमध्ये कला किंवा वाणिज्य शाखेतील पदवी घेण्याकडे कल आहे. यातील काही मुली आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही देऊ लागल्या आहेत. परंतु हे प्रमाण तसे कमी आहे. फॅशन, टेक्सटाईलसारख्या क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण अथवा कौशल्याधारित शिक्षणाकडे मुस्लीम मुलींचा ओघ असल्याचे मात्र प्रकर्षांने दिसून येते. ग्रामीण भागातील मुस्लीम मुलींच्या शिक्षणात एक महत्त्वाची बाब म्हणजे, शिक्षणाचा अधिकार हा कायदा झाल्याने आठवीपर्यंतच्या शिक्षणात मुस्लीम मुलींचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. परंतु आठवीनंतरचे शिक्षण देणाऱ्या माध्यमिक शाळांची संख्या आपल्याकडे कमी आहे. प्रत्येक गावात माध्यमिक शाळा नसल्याने आठवीनंतर या मुलींना शिक्षणासाठी लांबच्या गावात जा-ये करावी लागते. त्यामुळे ग्रामीण भागात आठवीनंतर पुढील शिक्षणात मुलींची गळती होते. इच्छा असूनही केवळ शाळांच्या अनुपलब्धतेमुळे शिकता येत नाही अशी स्थिती आहे. यावर उपाययोजना झाल्यास ग्रामीण भागातही मुलींचे उच्च शिक्षणापर्यंत जाण्याचे प्रमाण वाढेल. शहरी भागात शालेय शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण घेण्याकडेही मुस्लीम मुलींचे प्रमाण दखल घेण्याजोगे झाले आहे.

फक्त या मुलींना शिक्षणानंतर नोकरीही मिळणे आवश्यक आहे. मुस्लीम समाजाच्या मुलींनी नोकरी करण्याच्या दृष्टीने काही विशिष्ट धारणा आहेत. मुलींनी नोकरी करण्याकडे कुटुंबीयांचा सहसा कल नसतो. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुस्लीम कुटुंबात मुलीही नोकरी करताना दिसतात. या मुलींनी बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून काम करण्यास पालकांची सहसा ना नसते. मुलींनी सुरक्षित ठिकाणी नोकरी करावी, अशी पालकांची भूमिका असते. त्यामुळे अनेक मुली शिक्षणाबरोबरच काही कौशल्ये आत्मसात करून त्यावर आधारित घरगुती व्यवसाय करताना दिसतात. आम्ही ‘प्रथम’ संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रांत काम करताना शिक्षण आणि त्यावर आधारित उपजीविका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. यात आमचे काम वस्ती पातळीवर सुरू असल्याने विविध वस्त्यांमधील बालवाडींमध्ये तिथल्या माध्यमिक शिक्षण घेतलेल्या मुस्लीम मुलींना शिक्षिकेची जबाबदारी किंवा वस्ती पातळीवरील संस्थेच्या कार्यक्रमांसाठी वस्ती समन्वयक म्हणून काम सोपवतो. अनेक मुस्लीम पालक आमच्या कामात आपल्या मुलींना पाठवण्यास अनुकूलता दाखवतात.

शिक्षण घेतलेल्या व नोकरी-व्यवसाय करणाऱ्या मुस्लीम मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. संवाद माध्यमांच्या सहज वापरातून जगभरची माहिती त्यांच्या हाती येऊ लागली आहे. त्याचेही सकारात्मक परिणाम या मुलींवर होऊ लागले आहेत. आपले चांगले-वाईट त्यांना कळू लागले आहे. स्वत:च्या आयुष्याविषयी निर्णय घेण्यास त्या समर्थ होऊ लागल्या आहेत. शिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, ग्रामीण व शहरी अशा दोन्ही ठिकाणी मुस्लीम मुलींच्या लग्नाच्या सरासरी वयातही वाढ झाली आहे. शिक्षणामुळे त्यांच्यात एक आत्मनिर्भरता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता त्या बोलू लागल्या आहेत. धार्मिक व वैयक्तिक पातळीवरील अनेक बाबींविषयी त्या कुटुंबात

आपले मत ठामपणे व्यक्त करू लागल्या

आहेत. शिक्षणामुळेच त्यांना हे बळ प्राप्त झाले

आहे. कुटुंबीयांनी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले तर या मुली शिक्षणात चांगली कामगिरी करत आहेत. हे प्रमाण आता वाढू लागले आहे हे निश्चित.

आता गरज आहे ती तसेच वाढते ठेवण्याची व त्याला दिशा देण्याची!

शब्दांकन : प्रसाद हावळे

aridalamaby@paratham.org

 

आज अनेक मुस्लीम मुली स्वत:वरच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून न्याय मिळवत आहेत. मुख्य म्हणजे शिक्षण घेत आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. अशाच या दोघी, यास्मिन आणि नगमा. त्यांच्या संघर्षांची आणि त्यातील यशाची ही कथा..

12-1

प्रतिकूल परिस्थितीवर मात

नगमा-

नगमाच्या घरी मुलींसाठी खूप बंधनं होती. घरात भावांचा दबदबा. मुलींना जे सांगितलं जाईल तेच करावं, ठरावीक चौकटीत राहावं अशी सक्ती होती. वयाच्या १६व्या वर्षी नगामाचे लग्न करण्यात आले. नगमाला एक आशा होती की सासरी परिस्थिती वेगळी असेल. माहेरासारखी बंधनं तिथे नसतील. पण लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच तिला वास्तवाची कल्पना आली. तिचं सासर म्हणजे जाचक बंधनांचं आगाराच होतं. घरातील झाडून सगळी कामे करणे, सगळ्यात शेवटी जेवायला बसणे, कोणाशीही जास्त न बोलणे, येता जाता सासरच्यांचे टोमणे सहन करणे अशा अनेक शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या गोष्टी तिच्या पदरात पडल्या होत्या. माहेरी जायचं म्हटलं तर भावांची परवानगी नसायची. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती. दिवसेंदिवस तिचा त्रास वाढतच होता. एक ते दीड वर्ष झालं. काहीच मार्ग दिसत नव्हता. एक दिवस माहेरी गेली असताना तिला महिला संघटनेबद्दल कळले. पुरेसा धीर एकवटून संघटनेमध्ये येऊन आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल ती पहिल्यांदा उघडपणे बोलली. सासरी घरी गेल्यावर तिच्यासमोर एक नवीन संकट उभं राहिलं. घरच्यांना कुठूनतरी तिने केलेल्या तक्रारीबद्दल कळलं. यावर सासरच्यांनी ही बातमी नगमाच्या भावांना सांगितली. भावांनी सासरी येऊन नगमाला बेदम मारलं. जणू काही तोंड उघडून तिने मोठा गुन्हा केला होता. नगमाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. तिचा जाच आणखीनच वाढला. घराबाहेर तिला पाऊल ठेवता येईना, कोणाशी बोलता येईना.

एके दिवशी शौचालयाला जाण्याच्या बहाण्याने तिने एका महिलेमार्फत महिला संघटनेकडे आपली व्यथा सांगणारी चिट्ठी पाठवली. संघटनेने पोलिसांची मदत घेऊन तिची घरातून सुटका केली व एका शेल्टर होममध्ये व्यवस्था केली. एवढी मदत मिळाल्यावर तिने धीर एकटवून नवऱ्याची कायदेशीर तक्रार केली आणि त्याच्याकडून घटस्फोट घेतला. एवढय़ावर न थांबता नगमाने स्वत:साठी एक नोकरी मिळवली आणि मिळालेल्या पोटगीतून भाडय़ाने घर घेतले. आज नगमा स्वत:च्या पायावर उभी राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. संघटनेच्या कामात सामील होऊन ती तिच्यासारख्या परिस्थितीतून जात असलेल्या महिलांना मदत करत आहे. नगमाचा हा संघर्ष आणि त्यातून स्वत:साठी तिने शोधलेला मार्ग निश्चितच महत्त्वाचा आहे.

 

ठाम निर्धार

यास्मिन

यास्मिनची माहेरची आर्थिक परिस्थिती तशी चांगली होती. आजोबा पोस्टात नोकरीला होते, पण विचाराने खूप प्रतिगामी होते. महिलांनी एका मर्यादेत राहावं, सामाजिक बंधनं पाळावीत यावर जोर द्यायचे. मुलींनी जास्त शिकू नये, असं त्यांना वाटायचं. त्यांनी यास्मिनच्या वडिलांना शेती सांभाळायला लावून तिच्या काकांना शिकायला पाठवलं. यास्मिन महाविद्यालयात शेवटच्या वर्षी असतानाच तिचं लग्न ठरलं. मुलगा नात्यातलाच होता, पण शिक्षण फक्त नववीपर्यंत झालेलं. सौदीत ड्रायव्हरचं काम करायचा. पण त्याच्या घरच्यांनी यास्मिनच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि तिचं लग्न झालं. यास्मिनने बीए करून उर्दू टीचिंगचा डिप्लोमा केला आणि सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाली. तिला शिकणं आणि शिकवणं मनापासून आवडायचं.

पण पुढे पुढे नवऱ्याला यास्मिनचं नोकरी करणं खटकू लागलं. त्याच्या मते तो पुरेसं कमवत असल्यामुळे यास्मिनने घरीच बसावं. यास्मिनचा कमी पगारही त्याला खटकत होता. दिवसेंदिवस वाद वाढत होता. यास्मिनच्या आईने हस्तक्षेप केला आणि मुलीच्या बाजूने उभी राहिली. तिच्या सासरच्यांना तिने यास्मिन काम करेल, असं ठणकावून सांगितलं. पण तरीही सासरच्यांची कुरकुर चालूच होती. शेवटी असह्य़ होऊन यास्मिनने नोकरीचा राजीनामा दिला आणि घरीच एक बालवाडी सुरू केली.

यास्मिन या सर्वातून सावरत असतानाच अचानक एक दिवस तिच्यावर मोठं संकट कोसळलं. यास्मिनच्या नवऱ्याचं मानसिक संतुलन ढासळलं. नोकरी सोडून तो घरी बसला.  शिवीगाळ, मारहाण हे तर सर्रास सुरू होतं. यास्मिनला घर कसं चालवायचं हे कळत नव्हतं. दोन मुली आणि मुलगा याचं भविष्य संकटात होतं. नवऱ्याचा रोजचा जाच सहन करत, आíथक भार सोसत तिने घर चालविण्याचा आपला प्रयत्न चालू ठेवला.  कठीण प्रसंगांचा सामना करत ती जगत होती. तिला माहेरचापण आधार उरला नव्हता.

अशा वेळी ‘कोरो’च्या महिला मंडळ फेडरेशनच्या संपर्कात यास्मिन आली. स्वची जाणीव, महिला म्हणून आपले हक्क याची तिला जाणीव झाली आणि नव्या उमेदीने तिने सुरुवात केली. यास्मिन आज मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत असतानाच स्वत: एमए करत आहे. याचा फायदा तिला पुढे नक्कीच होईल. नवरा पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे. त्याचे वर्तन जरा सुधारले असले तरी त्याचा आíथक हातभार शून्य आहे. यास्मिनने ‘महिलांचा हक्क’ हा विषय घेऊन कोरोची फेलोशिप यावर्षी घेतली आहे. तिच्या नेतृत्वाखाली अनेक महिला सक्षम होत आहेत. त्यांना आपल्या हक्कांची जाणीव होत आहे. ही बदलाची प्रक्रिया यास्मिनला खूप पुढे न्यायची आहे. आणि ती ते काम पूर्ण करेल याबद्दल तिला ठाम विश्वास आहे.