शोधिनी’मार्फत नाशिक आणि धुळे जिल्ह्य़ात राबवला जाणारा एक छोटासा प्रकल्प. १४ ते २५ वयोगटातील मुलींमध्ये या संशोधनामुळे एक वेगळाच आत्मविश्वास आलाय ज्यामुळे मुलींच्या सगळ्याच प्रश्नांवर लग्न हे एकच उत्तर मानणाऱ्या पारंपरिक विचारांनाच प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केलीय. बालविवाह मोडून ते पुढे होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुलींनी गावात मुलींसाठी वाचनालय सुरू केलंय. आपल्याच महाराष्ट्रातल्या एका प्रदेशात हुंडय़ाला पैसे नाहीत, शिक्षणाला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलींच्या पाश्र्वभूमीवर स्वत:साठी ठामपणे उभं राहण्याचा हा छोटासा प्रयत्न खूप काही मोठं घडवू पाहाणारा आहे, त्याचा विस्तार नक्कीच मुलींचा ‘उद्या’ उज्ज्वल करणारा आहे.

आतापर्यंत स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न केले गेले. यामुळे स्त्री सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत मोलाची भर पडली असली तरी हे प्रयत्न एका विशिष्ट स्तरापुरतेच राहिले. ते ग्रामीण भागापर्यंत तितकेसे पोहोचले नाही. याचे कारण असे की, संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली विषमतेला बळकट करणाऱ्या व्यवस्थेची मुळे ग्रामीण भागात खोलवर रुजलेली असल्याने तेथील स्त्रियांना मुळात स्त्री-पुरुष विषमतेचे आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे आपण बळी पडतो आहोत हे पटवून देणेच आव्हानाचे असते. त्यामुळे विषमतेचे हे वास्तव स्वीकारून ते बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि प्रसंगी अशक्यच ठरते. त्यासाठी शिक्षणातून सक्षमीकरण आता गरजेचं झालं आहे, ज्याचं एक छोटंसं, पण उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्य़ात ‘शोधिनी’ म्हणून स्वत:च्या आयुष्याचा शोध घेऊन जाणीवपूर्वक भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुली, तरुणी.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

शिक्षण हे सबलीकरणाचे एक महत्त्वाचे साधन आहे हे सर्वमान्य आहे. भारताच्या विकास आराखडय़ात शिक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे. राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीस विनाभेदभाव शिक्षण मिळण्याकरिता प्रयत्न करण्याचा हक्क बहाल करण्यात आलेला असला तरी आपल्या समाजव्यवस्थेत या हक्कावर अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि लैंगिक मर्यादा आहेत आणि स्त्रियांचे शिक्षण म्हटले की, त्या मर्यादा अधिकच गडद होतात. स्त्रियांना घटनेद्वारे दिल्या गेलेल्या शैक्षणिक हक्कांमध्ये अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचे अनेक अंत:प्रवाह दिसून येतात आणि ते त्यांच्या शिक्षणाची दिशा आजही ठरवत आहेत. उमा चक्रवर्ती या इतिहासकार म्हणतात की, स्त्रियांकडे आजही फक्त पत्नी आणि माता या दोनच दृष्टिकोनांतून पाहिले जाते. स्त्रियांना सुरक्षित करणे, आज्ञाधारक नागरिक बनवणे आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात त्यांचा हातभार लावण्यासाठी मदत व्हावी याचसाठी फक्त त्यांना शिक्षण दिले जाते; पण त्यांनी या संरचनांना प्रश्न विचारू नयेत, हीच त्यांच्याकडून त्यांना शिक्षण देणाऱ्यांची अपेक्षा असते. यावरून आपल्याकडे असलेले स्त्रीदाक्षिण्य हा दांभिकपणा आणि तिचे माता, बहीण किंवा पत्नी म्हणून केले जाणारे उदात्तीकरणसुद्धा बेगडी आहे हे लक्षात येते; पण हे उदात्तीकरण झुगारून संरचनेला प्रश्न विचारण्याचे प्रयत्न सध्या नाशिकमध्ये सुरू आहेत. एखाद्या दुर्लक्षित गावातील दुर्लक्षित जमातीतील आणि त्यातही ‘मुली’ म्हटल्या की लग्न आणि चूल-मूल हेच त्यांचे आयुष्य असताना या मुली ‘शोधिनी’ म्हणून स्वत:च्या आयुष्याचा शोध घेऊन भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आपल्याच गावात एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न होत असल्याची बाब  या मुलींनी सरपंचांच्या लक्षात आणून दिली.  विशेष म्हणजे त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या गावात एकही बालविवाह होणार नाही हे सरपंचांकडून जाहीरपणे कबूल करवून घेतले. आतापर्यंत फक्त व्यवस्थेच्या बळीच ठरत आलेल्या या मुली आता मात्र स्वत:चा एक वेगळा दबावगट तयार करत आहेत. ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे.

या ‘शोधिनी’ म्हणजे नाशिकमधील ‘अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट, युनेस्को’ज् इन्स्टिटय़ूट फॉर लाइफलाँग लर्निग आणि अ‍ॅस्प्बे यांच्या वतीने केल्या जाणाऱ्या संशोधनातील संशोधक आणि संशोधनाचा विषयसुद्धा. १४ ते २५ वयोगटातील मुलींविषयी शिक्षण, लिंगभाव, कौशल्ये आणि सक्षमीकरण या विषयांना धरून होणाऱ्या या संशोधनासाठी नाशिक जिल्ह्य़ातील दुगाव, मनोली, कोचरगाव तसेच धुळे जिल्ह्य़ातील निजामपूर आणि वाघापूर या ५ गावांमधील मुली ‘शोधिनी’ म्हणून आपापल्या गावातील संशोधन करत आहेत. हे पारंपरिक संशोधन नसून कृती संशोधन असल्याने यात संशोधकाच्या संशोधक म्हणून आणि संशोधनाचा विषय म्हणून वठवलेल्या दुहेरी भूमिकेमुळे या संशोधनाला एक वेगळाच आयाम आणि खोली प्राप्त झाली. आपल्या गावात मुलींच्या वाढीसाठी पूरक आणि मारक अशा कुठल्या व्यवस्था आहेत? पितृसत्तेचं मूळ असलेल्या या समाजव्यवस्थेचा परिणाम मुलींच्या विकासावर कसा होतो आहे? उपजीविकेसाठी शिक्षण सोडावे लागले असले तरी भविष्यात या मुलींच्या उपजीविकेसाठी पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त काही पर्याय उभे करता येऊ  शकतील का? पुस्तकातून पुरवल्या जाणाऱ्या माहितीला जर आपण शिक्षण म्हणत असू, तर या शाळेत न जाणाऱ्या किंवा कधीच शाळेत न गेलेल्या मुलींकडे असणाऱ्या आणि कुठल्याच पुस्तकात नसणाऱ्या कौशल्यांना आपण कुठल्या व्याख्येत बसवणार आहोत? लग्नापूर्वी मजुरीचे साधन आणि लग्नानंतर मुलं जन्माला घालून घर सांभाळण्याचे ‘साधन’ या पितृसत्तेने ठरवून दिलेल्या साच्यात गुदमरलेली या मुलींची सर्जनशील स्वप्नं काय आहेत? ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी व्यवस्थेला झुगारून कुठल्या दिशेने प्रयत्न करता येतील याविषयी व्यवस्थेच्या दृष्टीने स्वप्नवत असणारी त्यांची कल्पना काय आहे? या मुलींच्या आयुष्यातील सगळ्याच समस्यांचे एकमेव उत्तर असणाऱ्या ‘लग्न’ या संकल्पनेलाच प्राथमिक प्रश्न विचारून उत्तरापर्यंत पोहोचता येईल का? या आणि अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या संशोधनाच्या प्रक्रियेदरम्यान होतो आहे.

हे कृती संशोधन असल्याने संशोधनातून मिळणाऱ्या निष्कर्षांइतकेच महत्त्व संशोधनादरम्यान संशोधकात होणाऱ्या बदलालाही होते. खरं तर संशोधकामध्ये होणारा बदल हेच संशोधनानंतर होणाऱ्या किंवा होऊ  शकणाऱ्या बदलाची लहान प्रतिकृती होते. संशोधन करत असताना या ‘शोधिनीं’मध्ये ज्ञान, वृत्ती आणि वर्तन या तीन पातळ्यांवर चक्रीय पद्धतीने घडणारा बदल दिसून आला. आपल्या शिक्षणव्यवस्थेत बहुतांश माहिती पुस्तकातून पुरवली जाते; पण प्रत्यक्ष संशोधन करत असताना जेव्हा मुलींनी आपल्या गावाचा नकाशा तयार करून त्याचा अभ्यास केला, शिक्षणाविषयी जनगणना आणि सर्वेक्षण केले तेव्हा त्यांना आपल्या गावातील मुलींची/स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे समाजातील घटक कुठले आहेत याचे आकलन झाले. संशोधनादरम्यान या आकलनाचे आणि माहितीचे रूपांतर ज्ञानात केल्यामुळे मुलींच्या वृत्तीत हळूहळू बदल घडताना दिसू लागला. आतापर्यंत स्वत:च्या आयुष्याविषयी कुणीही घेतलेला निर्णय चकार शब्द न काढता स्वीकारणाऱ्या मुली आता मात्र लहान लहान गोष्टींविषयी चिकित्सक विचार करत आहेत. त्यांच्यावर होणारा अन्याय आणि पिळवणूक गपगुमान सहन न करता आता आपल्या वेदनांना वाचा फोडून त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. आपल्याच घरात मुलगा आणि मुलगी यांच्यात आतापर्यंत होणारा भेदभाव आता मात्र त्यांना अस्वस्थ करतो. घरात, शाळेत, गावात होणारी लैंगिक हिंसा किंवा तत्सम कृती आता खाली मान घालून सहन न करता त्याविषयी त्या मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत.

‘‘माझ्या आईला मुलाची अपेक्षा असताना मी झाली म्हणून माझं नाव फशा ठेवलं. आतापर्यंत सगळे मला फशा म्हणूनच ओळखायचे आणि माझ्याकडे बघून केविलवाणे हसायचे; पण आता मात्र गावात माझी ‘शोधिनी’ म्हणून ओळख तयार झाली आहे. लोकांची माझ्याकडे बघण्याची नजरच आता बदलली आहे,’’ असं म्हणणारी फशा मुलींकडे पाहण्याच्या गावकऱ्यांच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलाचा चेहरा आहे असे वाटते. ‘‘पैसे नाही म्हणून मलाच का शाळेतून काढले? भावाला का नाही?’’ असा प्रश्न आर्थिक परिस्थिती नसल्याने शाळा सोडावी लागलेल्या मुली जेव्हा विचारतात तेव्हा गरिबी, लिंगभेद आणि पितृसत्ता यांतील सहसंबंध आणि त्याचा मुलींच्या आयुष्यावर होणारा परिणाम अधोरेखित करतात. या त्यांनीच निर्माण केलेल्या ज्ञानामुळे त्यांच्या वृत्तीत झालेला बदल आपोआपच वागण्यातूनही दिसून येतो.

‘बाईने ग्रामपंचायतीची पायरी चढू नये’ असं मानलं जाणाऱ्या या गावातल्या मुली आता ग्रामसभेला हजेरी लावतात. खरं तर प्रत्येक गावात प्रत्येक महिन्याच्या ग्रामसभेच्या एक दिवस आधी स्त्रियांची ग्रामसभा घ्यावी, असा नियम असताना प्रत्यक्षात मात्र ते सारं कागदावरच राहतं; पण आता आपल्या गावाविषयी संशोधन केल्याने मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे या मुली इथल्या उदासीन व्यवस्थेला आव्हान देऊ  पाहत आहेत.

यंदाच्या ८ मार्चच्या जागतिक महिला दिनी येथील स्त्रियांनी ग्रामपंचायतीत जाऊन महिला विशेष ग्रामसभा घेण्याची हट्टवजा मागणी सरपंचांकडे केली आणि संशोधनातून आलेले निष्कर्ष त्यांच्यासमोर मांडले. गावातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि गावकऱ्यांसाठी ही घटना आश्चर्याचा धक्का देणारी होती. या अभ्यासाच्या संशोधनामुळेच आत्मविश्वास आलेल्या या मुलींनी मग आणखी एक धाडसी पाऊल उचलले. आपल्याच गावात एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न होत असल्याची बाब त्यांनी सरपंचांच्या लक्षात आणून दिली. या बालविवाहाला मूकसंमती असलेल्या गावकऱ्यांना ते कसे चुकीचे आहे हे पटवून दिले आणि विशेष म्हणजे त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या गावात एकही बालविवाह होणार नाही हे सरपंचांकडून जाहीरपणे कबूल करवून घेतले. आतापर्यंत फक्त व्यवस्थेच्या बळीच ठरत आलेल्या या मुली आता मात्र स्वत:चा एक वेगळा दबावगट तयार करत आहेत. ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे.

आपल्याच घरात मुलगा आणि मुलगी यांच्यात आतापर्यंत होणारा भेदभाव आता मात्र त्यांना अस्वस्थ करतो. घरात, शाळेत, गावात होणारी लैंगिक हिंसा किंवा तत्सम कृती आता खाली मान घालून सहन न करता त्याविषयी त्या मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत.

शाळेपासून दुरावल्यामुळे वाचनासाठी कुठलेच साहित्य उपलब्ध होत नाही हे लक्षात आल्यानंतर गावात फक्त मुलींसाठी ‘शोधिनी वाचनालय’ सुरू केले गेले.हे वाचनालय म्हणजे गावात सुरू असलेल्या स्त्री सक्षमीकरणाच्या छोटेखानी चळवळीचे एक प्रतीक आहे. वाचनालय मुली स्वत:च चालवतात. एकत्र येऊन पुस्तकं वाचतात, चर्चा करतात, एकमेकींच्या अडचणी समजून घेऊन त्या आपापल्या पातळीवर सोडवतात. मुलींच्या अशा एकत्र येण्याने गावातील प्रस्थापित व्यवस्थेला धक्का बसू शकतो, अशी भीती वाटल्याने काहींनी वाचनालय बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला; पण मुलींनी हा प्रयत्न हाणून पडला आणि पुन्हा त्याच जोमाने वाचनालय सुरू ठेवले. वाचनालयाच्या रूपाने मुलींना मिळालेला हा अधिकार, त्यातून आलेली समज, आत्मविश्वास आणि बळ गावातील कित्येक मुलींना प्रेरणा देणारे ठरू शकेल. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक पातळ्यांवर मुलींमध्ये झालेला हा लहानसा बदल एखाद्या मोठय़ा परिवर्तनाची ठिणगीसुद्धा ठरू शकतो. आता या संशोधनातून आलेल्या निष्कर्षांवरून पारंपरिक शिक्षणपद्धतीव्यतिरिक्त मुलींच्या सर्वागीण विकासासाठी आणि त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांचे रूपांतर ज्ञानात करण्यासाठी शैक्षणिक प्रारूप कसे तयार येईल या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

नाशिक , धुळे जिल्ह्य़ातला हा छोटासा प्रयत्न असला तरी शिक्षणाची ही चळवळ राज्याराज्यात पसरणे गरजेचे आहे.

जसे हे संशोधन ग्रामीण भागातील मुलींना दिशा देणारे होते तसेच ‘अभिव्यक्ती’त या संशोधनासंबंधी काम करत असताना माझ्यासारख्या शहरी वातावरण मिळालेल्या मुलीलासुद्धा एक वेगळी दृष्टी देऊन शहरी आणि ग्रामीण यांच्यातील तुटलेली नाळ सांधणारे होते. सुरुवातीला मुलींची निवड करण्यासाठी पहिल्यांदा गावात गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून शहरीकरणाने पोसलेला माझा ‘कम्फर्ट झोन’ आपोआपच गळून पडला. एखादं खेडं म्हटलं की छोरा-छोरी, गन्ने का खेत, नदीचा किनारा आणि चांदणं या माझ्या रोमँटिक कल्पना पुसट झाल्या आणि वास्तव झोंबायला लागले. ‘‘उशाशी जागतिक ख्याती असलेले धरण असतानासुद्धा केवळ नळाला पाणी येण्याची एक ठरावीक वेळ नाही म्हणून आम्हाला शाळेत जाता येत नाही.’’ ‘‘शाळेत जाण्याच्या वेळेतच गावाच्या फाटय़ावर, बस स्टँडवर गावातील टवाळ पोरं बसलेली असतात आणि मुलींची छेड काढतात. पालकांकडे तक्रार केली तर तुझीच काही तरी चूक असेल म्हणून शाळेत जाणंच बंद केलं जातं.’’ ‘‘हा शेतीच्या कामांचा सीझन आहे. शाळेत गेलं तर मजुरी बुडते. मग चूल कशी पेटणार? भूक लागली म्हणून पुस्तकं खाता येत नाही. तेव्हा काय करायचं?’’ ‘‘माझ्या आईला मुलाची आशा असताना सलग ९ मुलीच झाल्या. मी नकोशी असतानासुद्धा तिने मला जगवलं हेच काय ते नशीब. खायला मिळत नाही तर शिकवणार कसं?’’ ‘‘शाळेत का जात नाही गं? शिकली नाहीस तर तुझी प्रगती कशी होईल बरं?’’ या माझ्या गिळमिळीत प्रश्नाच्या उत्तरादाखल ही अशी भयानक उत्तरं (खरं तर प्रश्नच) ऐकल्यानंतर सुन्न व्हायला झालं. शहरी मुखवटय़ावर एक सणसणीत चपराक बसली आणि त्यांच्याकडून उत्तरं मिळवायला गेलेल्या मलाच अनेक अनुत्तरित प्रश्नांनी कोडय़ात टाकलं.

संशोधनातील प्रश्नांव्यतिरिक्त माझ्या डोक्यात भिरभिरणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना हळूहळू स्वत:च्या अतिरेकी सुखचैनीचा तिटकारा यायला लागला. विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेचे अस्वस्थ करणारे वास्तव आतून पोखरायला लागले. या गावांमध्ये सतत गेल्यानंतर इथल्या प्रत्येक मुलीने बोट धरून मला या समाजव्यवस्थेला तगवून धरणाऱ्या एकेका खांबाचे दर्शन घडवले.

‘‘भावाने कितीही मोठी चूक केली तरी फक्त तो म्हातारपणाची काठी आहे म्हणून पोटात घातली जाते, पण आम्ही मुली कुठे चुकलो तर मात्र त्याचा गावभर बोभाटा केला जातो आणि शिक्षा म्हणून आमचं लग्नच लावून दिलं जातं. याचमुळे मला शाळा सोडावी लागली असली तरी आता मात्र खूप शिकून नोकरी करून आईला सांभाळायचं आहे. फक्त मुलगाच नाही तर मुलगीसुद्धा आईवडिलांचा सांभाळ करू शकते हे गावाला दाखवून द्यायचं आहे,’’ असं म्हणणारी पुष्पा गावकऱ्यांच्या मनात रुजलेल्या ‘मुलगी म्हणजे परक्याचं धन’ या गृहीतकाला छेद देताना दिसते. ज्या गावात एखादं प्रकरण डॉक्टरांच्या हाताबाहेर गेलं तर डॉक्टरच स्वत: कुठल्या तरी भगताकडे जाण्याचा सल्ला देतात, त्याच गावात कुठलीच संबंधित शैक्षणिक पाश्र्वभूमी नसताना सुनीता डॉक्टर होण्याचं स्वप्न बघते. कुठलीच अनुकूलता नसताना सुनीताला आपल्या स्वप्नाशी जोडून ठेवणारा असा कुठला जादूई धागा असेल याचे नवल वाटल्याशिवाय राहत नाही. आपल्या स्वप्नाचं समर्थन करत असतानाच जेव्हा ‘मुलीचं लग्न झालं की संपतं सगळं’ असं म्हणणारी ही १८ वर्षांची सुनीता अशा कुठल्या घटनेमुळे हा निर्णय घेते, असा प्रश्न मनात पिंगा घालतो. लैंगिकता आणि स्त्री पुरुषांच्या लैंगिक गरजा याविषयी शहरातही मोकळेपणाने बोलले जात नसताना कोचरगावातली सुमन मात्र या विषयावर सहजपणे बोलते. लैंगिकता आणि त्यातही फक्त मुलींच्या लैंगिकतेभोवती समाजाने उभारलेल्या तटबंदीला आव्हान देऊन ती पार करण्याची ताकद सुमन बाळगते, पण तोच तिच्यासाठी अडथळा आहे. यासाठी गावाने तिच्यावर लावलेला ‘वाया गेलेली मुलगी’ हा स्टॅम्पसुद्धा ती सहज स्वीकारते. आपल्या शाळेविरुद्ध आंदोलन केल्यामुळे शाळेपासून दुरावलेली सुमन आता शाळेबाहेर राहूनसुद्धा या व्यवस्थेविरुद्ध अदृश्य आंदोलन करत असते.

आपल्या मनात आलेला विचार क्षणात जगभर पोहोचवण्यासाठी शहरात प्रत्येकाच्या हाताच्या बोटावर साधन उपलब्ध आहे; पण खेडय़ात मात्र टी.व्ही., टेपरेकॉर्डर, मोबाइल यापैकी काही नाही. मनातलं बोलण्यासाठी मैत्रिणी नाहीत, मित्र असणं तर शक्यच नाही. पोट भरण्यासाठी शाळेतली पाटी सोडून शेतात पाटय़ा टाकायला जावं लागतं. घरात मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही. या अशा शांततेच्या संस्कृतीत या मुली गावातल्या चिंचेशी, होय चिंचेच्या झाडाशी मैत्री करतात. आपली सुखदु:खं, भावभावनांच्या भरत्या ओहोटय़ा या चिंचेजवळ मांडतात. जगभर संवादाच्या मुद्दय़ावर चर्चा रंगत असताना हा गावात चिंचेशी होणारा संवाद मात्र या चर्चेत कुठेच नसतो.

भारत हा खेडय़ांचा देश म्हणत असताना या खेडय़ांमधील जीवन मात्र अजूनही मुख्य प्रवाहात आले नाही. स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया या चमचमत्या घोषणांना काळोखाचे अस्तर आहे. झगमगणाऱ्या इंडियामध्ये दडलेला हा भारत स्वत:चा काळोख लपवण्यासाठी इंडियाच्या दिशेने धावतो आहे. जागतिक स्तरावर महासत्ता होण्यासाठी पाठलाग करत असताना आपण महात्मा गांधींनी सांगितलेल्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेकडे दुर्लक्ष करतो आहोत, ही एकविसाव्या शतकाची शोकांतिका आहे.

काजल बोरस्ते kjlbrst165@gmail.com