लोकांमधील मानसिक ताणतणावाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कारणं कोणतीही असोत, पण वेळीच छोटय़ा छोटय़ा ताणांकडे लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम आधी मानसिक अस्वस्थतेत आणि त्यानंतर गंभीर नैराश्येत होऊ शकतो. अशा वेळी गरज असते ती त्यांचा तणाव ओळखून त्यांना मानसिक आधार देण्याची. अशा आपल्याच लोकांना भावनिक आधार देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तो माणूस तणावमुक्त होऊन आनंदी जीवन जगू शकतो; पण नेमकं काय करायला हवं, तणावग्रस्त व्यक्तींना समजून घेण्यासाठी? ते १५ ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह मानला जातो. त्यानिमित्ताने..

त्याला ठाऊकहोतं की त्याचे आत्महत्येपर्यंत नेणारे विचार योग्य नाहीत. त्याची पत्नी व छोटी मुलगी पूर्णत: त्याच्यावर अवलंबून आहेत. पत्नीने तर माहेरच्या माणसांशी संबंध तोडून त्याच्याबरोबर लग्न केलं होतं. अशा परिस्थितीत तिच्यावर पतीच्या आत्महत्येबद्दल उलटसुलट प्रश्नांचा भडिमार होणार, ती तो कसा सहन करू शकणार होती? पुढे मुलगी मोठी होईल, तेव्हा तिच्या मनात वडिलांची काय प्रतिमा असणार.. तिला तिच्या बाबांचा तिरस्कारच वाटणार.. या सर्व विचारांशी झुंजताना, अरविंदच्या मनात काहूर उठलं होतं. विचारांची त्सुनामी जणू त्याला आत खेचत होती, आपण बुडतोय असा भास त्याला होत होता. प्राप्त परिस्थितीतून काहीच मार्ग दिसत नव्हता. कर्ज फेडणं अत्यावश्यक होतं. पण आर्थिक सहकार्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, असं त्याला वाटत होतं. कुणाशी बोलावं हेच कळत नव्हतं. समजून घेईल असं कुणीही जवळ नव्हतं. मागल्या आठवडय़ात तो त्याच्या मित्राकडे सुनीलकडे गेला होता. सुनील त्याचा कॉलेजपासूनचा मित्र. शिक्षण संपवून करिअरची सुरुवात दोघांनी एकाच वेळेस केली होती. आता सुनीलचं बरं चाललं होतं. जेव्हा अरविंद सुनीलला मनातलं सांगत होता, तेव्हा सुनील म्हणाला, ‘‘अरे तुला आधीच सांगत होतो, लग्नाची घाई करू नकोस. तू त्यावेळेस माझं का नाही ऐकलंस? सगळंच प्लॅनिंग चुकलं तुझं.. आता बस बोंबलत. दुसरं तरी काय करणार आहेस तू? मी तर तुला आधीपासून ओळखतो, अगदी हट्टी स्वभाव आहे तुझा.’’ हे नि असलंच काही.. सुनील नुसतं बोलत होता. त्याला अरविंदच्या मन:स्थितीची काहीच जाणीव नव्हती..

सतरा वर्षांची मेघना बारावीच्या परीक्षेची तयारी करते आहे. म्हणजेच सतत या ना त्या क्लासला जात आहे. घरात तीन पिढय़ा सर्व इंजिनीअर आहेत. मेघनाही हुशार आहे, तिनेसुद्धा एका नामांकित कॉलेजमधून इंजिनीअर व्हावे अशी सगळ्यांची अपेक्षा. पण तिला काही केल्या गणित आणि फिजिक्समध्ये रस वाटत नाहीय. टेक्निकल विषय आपल्याला जमले, तरी आवडतील याची तिला खात्री नाही. ‘‘सगळे करतात, तुला न जमायला काय झालं? हळूहळू सगळं आवडायला लागेल.’’ अशा वाक्यांचा तिला वीट आला होता. त्यातून आई सध्या ऑफिसच्या कामामध्ये खूपच व्यग्र होती. ती मेघनाच्या परीक्षेच्या वेळेस चांगले दोन महिने रजा घेणार होती आणि आतासुद्धा मेघनाचा अभ्यास, आहार आणि आरोग्य यावर तिचं बारकाईनं लक्ष होतं. येणाऱ्या परीक्षेला अजून ४ महिने अवकाश होता, पण मेघना आताच कंटाळली होती. तिच्या मैत्रिणीने लिबरल आर्टस् हा विषय निवडला होता. दिल्लीला एका चांगल्या कॉलेजमध्ये या विषयावर फार चांगला अभ्यासक्रम होता. मेघनाला वाटत होतं आपण तिथली परीक्षा द्यावी, पण आई-वडील आणि आजी-आजोबांचे अपेक्षाभंग करायचे नव्हते.. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं आणि कमी मार्क मिळवूनसुद्धा चालणार नव्हतं.. मेघना अस्वस्थ होती. तिची झोप उडाली होती. कुणाशी बोलावं?

सूरज घरात एकुलता एक. घरात श्रीमंती आणि सुबत्ता होती. सूरज घरच्या व्यवसायामध्ये बाबांबरोबर काम करणार हेही नक्की होतं. त्याबद्दल त्याची काही तक्रार नव्हती. त्याचा प्रश्नच निराळा होता. हल्ली मुली सांगून येत होत्या, पण त्याला काही वर्षांपासून स्वत:च्या लैंगिकतेबद्दल नवीनच काही तरी लक्षात आलं होतं.. आणि त्याला स्वत:लाच धक्का बसला होता. काय म्हणतील लोक? आणि काय म्हणतील आई-बाबा आणि आपले घरचे? हे सगळं उघडपणे कोणापाशी बोलायचं? मित्र आपल्याला दुरावतील का? आपण एकलकोंडे होऊन जगू शकू का? ते आपल्याला जमेल का? आणि अशा अवस्थेत गप्प बसून जर लग्न केलंच तर त्या मुलीवर अन्याय नाही होणार का? पण मग लग्न न करायचं कारण घरात काय सांगायचं? असे अनेक प्रश्न सूरजला भेडसावत होते. कुणाशी बोलावं हे सुचत नव्हतं..

गोखले काका-काकू, वय अनुक्रमे ८६ आणि ८० र्वष. आतापर्यंत त्यांचं सुरळीत चाललं होतं. दोघांची प्रकृती उत्तम होती. नियमित आहार व शिस्तबद्ध जीवनशैली, त्यामुळे एक निरोगी जीवन जगत होती दोघंही. काकांनी खूप पूर्वी आपल्या तिन्ही मुलांना स्पष्ट सांगितलं होतं, ‘‘तुम्हाला करिअरसाठी जिथे कोठे जायचे असेल, खुशाल जा. आमच्याजवळ राहायला पाहिजे, असा आमचा आग्रह नाही, अपेक्षा पण नाही.’’ तिन्ही मुलं उत्तम शिकलीत. मुलगे दोघं परदेशी असतात आणि मुलगी व जावई दोघंही पायलट त्यामुळे सतत आकाश भ्रमंती. अलीकडे काकू रस्त्यात पाय घसरून पडल्या. कमरेचं हाड मोडलं. कसं तरी त्यांना इस्पितळात दाखल केलं. ऑपेरेशन करणं शक्य नव्हतं आणि त्यांना आता काही महिने अंथरुणावर काढणं आवश्यक झालं. मुले येऊन भेटून गेलीत.. घरात माणसं होती कामाला तरी काकूंचे नियमित औषधोपचार आणि बाकी देखरेखीमध्ये काकांची चांगलीच दमछाक होत होती. त्यांना आता राहून राहून वाटत होतं की आता मला काही झालं तर? मुलं कुणीच जवळ नाहीत, हाक मारायला हक्काचं माणूस नाही.. ‘‘आपण कशासाठी जगतोय.’’ असं काकू सारखं म्हणत होत्या, काकांना पण तसंच वाटायला लागलं होतं. ‘‘आपला नाही तरी कुणाला उपयोग नाही. मग आपण जगून तरी काय करायचं?’’..

हे आणि असे काही प्रसंग आपण बघतो/अनुभवतो किंवा आपल्या ऐकण्यात येतात. ते कोणाच्याही घरी घडू शकतात आणि या सर्व प्रसंगांमध्ये समांतर काही असेल तर प्राप्त परिस्थितीतील अटळतेचा भास. परिस्थिती बदलणार नाही या जाणिवेचा मनावर

घट्ट होत जाणारा पगडा आणि त्यामुळे येणारा हताशपणा. कोणी समजून घेणारं नसलं किंवा कोणी समजून घेणार नाही, असं वाटल्यानं एकाकी पडणारे हे अनेक जण आपल्याच आजूबाजूला असतात. पण एक तर आपण त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही किंवा ते तरी.

घेता येईल का अशा व्यक्तींना आपल्याला समजावून? ज्यांना काही तरी बोलायचं आहे, मानसिक द्वंद्वापासून मुक्त व्हायचं आहे. माणसाचं मन फार विचित्र असतं. आपले विचारच आपल्याला आपल्या मनाचा गुलाम तरी करतात किंवा त्याच्यापासून मुक्ती देऊ शकतात. म्हणूनच अशा द्वंद्वांच्या क्षणी कुणाशी तरी बोलणं गरजेचं असतं. पण तेच अनेकदा होत नाही आणि आत्महत्येच्या कडय़ावर उभे राहिलेले, विचारांच्या गर्तेत अडकलेले अखेर खाली उडी घेतात. का बोलत नाहीत अनेक लोक?

याचं कारण मोकळेपणानं बोलायला, या अवस्थेतील माणसं घाबरतात. त्यांना हक्काने मदत मागायला संकोच वाटतो. त्यांच्यावर आलेला प्रसंग हा चर्चा किंवा गॉसिपसाठीचा विषय तर होणार नाही ना याची भीती त्यांना वाटत असते. पण मुख्यत:, कुणी समजून घेईल, हीच मुळी त्यांना खात्री नसते. त्याचं कारण बहुधा हे असेल की बरेचदा त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकण्यापेक्षा समोरची व्यक्ती स्वत: मांडू इच्छिणाऱ्या मुद्दय़ांवर अधिक जोर देते. संभाषण करतानासुद्धा त्यांचा अनुभव पुष्कळदा असा असतो की त्यांचं बोलणं संपायच्या आधी समोरची व्यक्ती स्वत:च्या उत्तरानं अडथळा आणण्यास तत्पर असतात. मग त्यांच्या तपशिलात फाटे फोडले जातात आणि शब्दांमागील भावनांकडे दुर्लक्ष केलं जातं. जोपर्यंत ही माणसं त्यांच्या सल्ल्यानुसार वागत नाहीत, तोपर्यंत त्यांना यांच्यात रस उत्पन्न होत नाही.

हताश आणि उदास माणसांना सहानुभूती दाखवणं सोपं असतं, पण त्यांची मन:स्थिती समजून घ्यायला वेळ नसतो समोरच्या व्यक्तीजवळ. म्हणून श्रवणाला, ऐकून घेण्याला महत्त्व आहे. समानुभूतीचं महत्त्व आहे. व्यत्यय न आणता किंवा उत्तर देण्याची गरज न वाटता, शांतपणे ऐकून घेणं ही त्या वेळेची गरज असते. हे जाणून घेण्याची गरज असते की एका व्यक्तीसाठी असलेली क्षुल्लक समस्या दुसऱ्या कुणासाठी अतिशय क्लिष्ट अशी मानसिक अवस्था असू शकते. मनातील क्लेश, संभ्रमाची अवस्था आणि मुख्य म्हणजे असहायतेची जाणीव या सगळ्यामुळे समोरचा माणूस तणावग्रस्त असेल, हे समजणं आवश्यक होऊन जातं. अशा व्यक्तींना मोकळेपणानं बोलता यावं यासाठी त्यांना समोरच्या व्यक्तीबद्दल विश्वास वाटणं गरजेचं असतं की,त्यांना यांचा दृष्टिकोन कळतो जरी तो त्यांच्या धारणेच्या विरुद्ध असला तरी..

जर हताश, निराश आणि आत्महत्याप्रवृत्त माणसांना योग्य वेळेस भावनिक आधार मिळाला तर, पुष्कळदा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ टळू शकते. मात्र हा भावनिक आधार देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर समोरच्या माणसाच्या तणावग्रस्त मनाला उभारी मिळू शकते. आपल्याला असं वाटतं की पूर्वानुभवावरून आपण कुणाची समस्या सोडवू शकू, पण ते शक्य नसतं, कारण प्रत्येकजण आपापल्या परीने संघर्षांला तोंड देत असतो. मात्र त्यांच्या  भावनांचा गुंता सोडविणं ही खरोखरच त्यांना मदत होऊ शकते. याची तुलना आपण वॉशिंग मशीनमध्ये धुतलेल्या कपडय़ांशी करू शकतो. धुतलेले कपडे एकमेकांत पूर्णपणे अडकलेले असतात. आपण एकेक कपडा नीट उलगडून वेगळा करतो. त्याप्रमाणेच त्यांच्या मनातला विचारांचा गुंता सोडवताना आपण तणावग्रस्त व्यक्तीला वेगवेगळ्या भावना ओळखायला मदत करणं गरजेचं असतं. असं केल्यानं तणावग्रस्त व्यक्तीला हे लक्षात येतं की त्याच्या नकारात्मक भावनांचा गुंता हा त्याच्या वैचारिक आणि विवेकात्मक वर्तनाच्या आड येत आहेत. एकदा गुंता नेमका का झालाय हे लक्षात आणून दिलं की तो सोडवायचा मार्ग मिळू शकतो.

तणावग्रस्त मन हे एका रबरबँडसारखं असतं. रबरबँडमध्ये इष्ट तणाव असतो म्हणून आपल्याला त्याचा उपयोग आहे. परंतु जर हेच आपण जास्त काळ ताणून ठेवलं, तर ते सैल पडेल, निकामी होईल. त्याचप्रमाणे मनामध्ये जर तणाव निर्माण करणाऱ्या नकारात्मक भावना जास्त दिवस साठवून ठेवल्यात, तर मनसुद्धा निकामी होईल. अशा अवस्थेमध्ये बरेचदा टोकाचा निर्णय घेतला जाऊ  शकतो.

आज मानसिक स्वास्थ्याचं महत्त्व ओळखून पुष्कळ स्वयंसेवी संस्था या क्षेत्रामध्ये विनाशुल्क कार्यरत आहेत. गुप्तता आणि गोपनीयता पाळून भावनिक आधार देणारे प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत. त्यांची मदत घ्यायला काहीच हरकत नसते. एक तर हे कार्यकर्ते ओळखीचे नसल्याने त्यांच्याशी मोकळेपणानं बोलणं शक्य असतं. आणि तेसुद्धा तटस्थपणे समस्यांकडे बघू शकतात आणि तणावग्रस्तांशी बोलू शकतात. समोरची व्यक्ती काय सांगते आहे त्याहीपेक्षा काय सांगत नाहीये, याबद्दल ते जागरूक असतात. ऐकताना कुठलेही पूर्वग्रह मनात बाळगत नाही, टीका न करत, सल्ला न देता, शांतपणे आणि मन:पूर्वक समोरच्याचं ऐकून घेतात. आणि योग्य ती मदत करत असतात.

स्वयंसेवी संस्था ‘सामारीतंस मुंबई’, ही हताश, निराश, तणावग्रस्त आणि आत्महत्या प्रवृत्त माणसांना भावनिक आधार देण्याचं काम करते. ‘सामारीतंस मुंबई’चे प्रशिक्षित स्वयंसेवक श्रवणाचं महत्त्व ओळखतात. दादर पूर्व येथे कार्यस्थळ आहे. तुम्ही हेल्पलाइनवर फोन करू शकता, प्रत्यक्ष भेटू शकता किंवा ई-मेल द्वाराही संपर्क साधू शकता. शिवाय श्रवणकौशल्य कार्यशाळा देखील नियमित आयोजित केल्या जातात. या सर्व सेवा नि:शुल्क उपलब्ध आहेत.

जागतिक आरोग्य संघटना यांनी आरोग्याची व्याख्या दिली आहे. त्यानुसार आरोग्य म्हणजे केवळ रोगाची अनुपस्थिती नव्हे, परंतु संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक निरोगीपणा आणि कार्यक्षमता. ऑक्टोबर महिन्यामध्ये जागतिक मानसिक आरोग्य जागरूकता सप्ताह साजरा केला जातो. या प्रसंगी आपण भावनिक आधार देण्याचं आणि घेण्याचं महत्त्व ओळखून, मोकळेपणाने मनातल्या ताण-तणावाच्या भावनांना सकारात्मकदृष्टय़ा सामोरे जाऊ या.

(लेखिका सामारीतंस येथे स्वयंसेवक आहेत.)

सामारीतंस मुंबई

४०२ जास्मीन सोसायटी,  दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व

दररोज दुपारी ते रात्री

(०२२)६४६४३२६७, ६५६५३२६७

samaritans.helpline@gmail.com