५ ऑगस्टपासून ब्राझील येथील रिओ येथे सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या १२१ जणांच्या भारतीय पथकात ५४ स्त्री क्रीडापटू आहेत, मात्र १९७६ च्या माँट्रियाल-ऑलिम्पिकपर्यंत भारतीय पथकात स्त्रियांची संख्या अगदीच नगण्य होती तेव्हापासून आज अर्धशतक पार करणाऱ्या स्त्रियांच्या सहभागाचं कारण थेट समाजसुधारकांकडे जातं. अगदी अलीकडच्या काळातही स्त्रियाचं कर्तृत्व पुरुषार्थात मोजणाऱ्या, शॉर्ट्स घालणाऱ्या खेळाडूंना बघायलायेणाऱ्या पुरुषी मानसिकतेतून पुढे जाणारी ही स्त्रीशक्ती क्रीडाक्षेत्रात जे कर्तृत्व गाजवते आहे, त्यासाठी या समाजधुरिणांचे ऋण मानायला हवेत.

‘इंडिया इज इंदिरा- अन् इंदिरा इज इंडिया’, ही घोषणा आठवते? ही घोषणा पंचेचाळीस वर्षांपूर्वीची, इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाची! ती घोषणा एकाच वेळी बनली काँग्रेसजनांत परवलीचे वाक्य, पण विरोधकांत कुचेष्टेची बाब! १९७१ मधील शेख मुजीब उर रेहमान यांचा बांगलादेश स्वातंत्र्यसंग्राम निर्णायक टप्प्यावर आलेला, इंदिराजींनी त्यांच्या मदतीस उभी केली मुक्तीसेना आणि अमेरिकी नौदल, भारतविरोधी पवित्र्यात असले, तरी त्याकडे दुर्लक्ष केले. भारतीय सेना बांगलादेशामध्ये उतरवली. बांगलादेश स्वतंत्र करण्यास मोठाच हातभार लावला. त्या वेळी इंदिराजींचं ‘कौतुक’ करण्याची एकच चढाओढ सुरू झाली. जे अनेक अलंकारिक, गौरवार्थी पुरस्कार त्यांच्यावर ओवाळून टाकले गेले, त्यातला एक जहरी नजराणा असा, ‘‘इंदिराजी याच भारतीय मंत्रिमंडळातील एकमेव पुरुष!’’

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!

इंदिराजी म्हणे एकमेव पुरुष! म्हणजेच बहादुरी, धाडस, साहस, चाणक्यनीती यांची संपूर्ण मक्तेदारी जणू पुरुषवर्गाची?

पंतप्रधानकीच्या सुरुवातीच्या काळात इंदिराजी कोंडीत सापडल्यासारख्या बुजुर्गाच्या (सिंडिकेट आठवतं?) दबावाखाली होत्या. त्यांचं वर्णन तेव्हा ‘गुंगी गुडिया’ असं केलं जायचं. पण पाहता पाहता त्यांचे आंतरिक व्यक्तिमत्त्व उफाळून आले. अन् गुंगी गुडियेला, तेच काही लोक दुर्गामाता- कालीमाता असे संबोधू लागले, सिंहासनापुढे नतमस्तक होतच राहिले. तरीही त्यांच्या सनातनी नजरांत इंदिराजी होत्या, ‘मंत्रिमंडळातील एकमेव पुरुष!’ म्हणजे ‘पुरुष अन् पुरुषार्थ’ हाच सर्वोत्तम किताब, सर्वोत्तम सन्मान!

अशाच सन्मानाचा राजमुकुट चढवला गेला होता, धावपटू पी. टी. उषाच्या डोक्यावर! १९८६ च्या बँकॉक एशियाडमध्ये अ‍ॅथलीट उषाने कमालच केली. तेव्हा भारताने सुमारे पाचशे वा अधिक खेळाडूंचे जंबो पथक धाडलं होतं. पण या पथकाच्या कमाईतील एक सोडून बाकी सारीच्या सारी सुवर्ण पदकं उषाची! तेव्हा या पुरुषप्रधान समाजातील एका बुजुर्गानी उषाचा महिमा त्याच शब्दात वर्णिला, ‘‘एशियाड ८६ मधील भारतीय पथकात एकच एक पुरुष, पी. टी. उषा!’’

स्त्री ही जोडीदार, भागीदार, सहप्रवासी, सहचारिणी, जीवनसाथी, की अबला, दासी, प्रेक्षणीय,   उपयुक्त व उपभोग्य वस्तू?

तमाम महिलांना ‘पायातली वहाण पायातच ठेवणं योग्य’ असं जीणं लादणाऱ्या मनुष्याला व मनुस्मृतीला कडाडून विरोध करणारे जोतिबा फुले, स्त्री- शिक्षणाची मोहीम १८४८ मध्ये हाती घेताना म्हणाले होते, ‘आता तरी तुम्ही मागे येऊ नका।

झिडकारूनी टाका मनूमत

विद्या शिकतांच पावाल ते सुख।

घ्यावा माझा लेख जोती म्हणे॥’

पण जोतिबांनी स्त्री-समानतेचे, स्त्री-शिक्षणाचे रणशिंग फुंकल्यानंतरही सुमारे शंभर- एकशे दहा वर्षांनी, जोतिबांच्या आणि तुमच्या आमच्या देशातील क्रीडाक्षेत्रातील परिस्थिती कशी होती? पुरुष जमातीची मानसिकता कशी होती, स्त्रियांकडे कोणत्या नजरेतून पाहिलं जात होतं?

ही सत्यकथा सुमारे साठ वर्षांपूर्वीची. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या दशकातील अखेरीची. स्थळ : पाटणा. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या बिहारच्या राजधानीतली. सामना होता दक्षिण विभागीय विजेते मुंबई विद्यापीठ विरुद्ध उत्तर विभागीय जेत्या बॅडमिंटन संघाचा. मुंबई विद्यापीठाच्या संघात होते, रुईया कॉलेजचे नंदू नाटेकर, वसंत अध्ये, इरावती कुलकर्णी व व्यवस्थापिका छबा फडणीस, एलफिन्स्टन कॉलेजचे सुरेश फळणीकर, खालसा कॉलेजचे फारुक अँटिया, गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजच्या नलिनी उपळेकर आणि सेंट झेवियर्सच्या

सिलू वकील! मुंबई संघाचे स्वागत करण्यासाठी पंजाब विद्यापीठाची जसबीर कौर पुढे आली. पण स्वागतासह ती देत होती सावधानतेचा इशारा. ‘‘तुमच्या मुली कोर्टवर कोणते कपडे घालणार आहेत? कोणत्या गणवेषात उतरणार आहेत?’’ या तिच्या सवालांचा अर्थच मुंबईकरांना आधी लागेना. म्हणून लगेच जसबीरने स्पष्टीकरण दिलं, ‘‘इथे सामने पाहण्यासाठी रस्त्यावरच्या कोणीही सोम्यागोम्या शिरत होता. विद्यार्थी औषधापुरते थोडेफार! ते आंबटशौकीन या मुलींकडे बघून हिडीस हावभाव करत होते. आम्ही स्कर्ट घालून कोर्टवर उतरल्यावर पैसे फेकण्यात आले!’’

नौटंकीस साजेसा दौलतजादा- तोही बॅडमिंटन कोर्टवर!

मुंबईकरांना सावधानतेचा इशारा देण्यास जसबीर का पुढे धावली? तिला माहिती होतं की,

सिलू वकिलांच्या शॉर्ट पँट्स या शॉर्टपेक्षा शॉर्ट असत! पण ऐनवेळी तिच्यासाठी नवे कपडे, नवा गणवेष कुठून आणणार? जसबीरनं तोडगा सुचवला, आणि तिचा कुडता- सलवार सिलूसाठी देऊ केला. पण सिलूही काही कमी नव्हती. ती म्हणाली, ‘‘लोक मला माझ्या शॉर्ट्समध्ये पाहण्यासाठी येत असतील तर येऊ देत भले! व्हॉट्स राँग? त्यात काय बिघडतंय?’’

व्हॉट्स् राँग, किंवा काय बिघडतं, ते थोडय़ाच वेळात स्पष्ट झालं. बॅडमिंटन हॉल तुडुंब भरलेला. तोही ओसंडून जायला लागला. लुंगीतील रिक्षावाले, बॅडमिंटन क्षेत्रास अपरिचित असलेले अडाणी आंबटशौकीन कोर्टात चिकटून दाटीवाटीने बसलेले होते. सिलू कोर्टवर उतरली अन् एकच कल्लोळ झाला. सामना कसाबसा सुरू झाला. पंचांनी लोकांना शांत राहण्याच्या विनंत्या केल्या, पण लोक ऐकेनात. गोंधळ तर वाढूच लागला. खरोखरच लोक कोर्टवर पैसे फेकू लागले. ‘‘सारा प्रकार आमच्या आकलनाबाहेरचा,’’ अशी आठवण नंदू नाटेकर नोंदवतात. ‘‘परिस्थिती हाताबाहेर जाऊन, हे लोक सिलूला उचलून पळून जातील अशी भीती वाटू लागली व मी सामना थांबवला. लोक शांत होईपर्यंत सामना खेळवला जाणार नाही, असं माइकवरून सांगा, असंही मी पंचांना सांगितलं. सामना काही वेळ स्थगित झाला. अन् त्या वेळातच मुंबई विद्यापीठ संघातील आम्ही सारे जण मागील दारातून पसार झालो.’’

न्यायमूर्ती सिन्हा यांनी आपल्या गाडीतून मुंबईकरांना आपल्या प्रशस्त बंगल्यात नेलं. त्यांनी आदरातिथ्य केलं, जेवू घातलं. घराच्या पाठीमागे बॅडमिंटन कोर्ट होतं. त्यावर दिव्यांची सोय असल्याने खेळण्याची व्यवस्था होती. असभ्य पाटणा नगरीची ही दुसरी व सुसंस्कृत बाजू! पाटणा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईकरांची समजूत घातली. मग मध्यरात्री साडेबारानंतर सामना पुढे चालू केला गेला. लोकांनी काचांची तोडफोड केलेली होती. कचरा काढला जात होता. त्या दिवशीचे सामने रात्री संपल्यानंतर, न्यायमूर्ती सिन्हांनी त्यांच्याच आउटहाउसमध्ये राहण्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेले सामने खेळण्यासाठी मुंबईकर गेले कोर्टवर. तिथे पुन्हा एकच गर्दी! नंदू नाटेकरांना क्षणभर वाटून गेलं, की भारतातील अव्वल (नंदू नाटेकरांच्या) खेळांचा आस्वाद घेण्यासाठी रसिकजन एकत्र आले असावेत काय! पण तो गोड भ्रम क्षणार्धात दूर झाला. ती गर्दी होती सिलू वकील यांना पाहण्यासाठीच!

पुढच्या वर्षी दक्षिण विभागीय सामन्यासाठी, मुंबई विद्यापीठ संघ नागपूरला गेला. त्या संघात नाटेकरांसह रुईयाचेच दत्ता धोंगडे व एलफिन्स्टनचे विक्रम भट हे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू होते. ‘‘संघाला उत्तम आदरातिथ्य – पाहुणचार मिळाला.’’ त्याचा साभार उल्लेख करून नाटेकर मिश्कीलपणे सांगतात, ‘‘मी प्रथमच आलो होतो. हे त्याचं एक कारण असू शकेल. दुसरंही कारण असू शकतं की सुशीला रेगे नावाची देखणी खेळाडू आमच्या संघात होती!’’ त्यानंतर नाटेकर, अलाहाबादमधील सामन्याबाबत आवर्जून लिहितात की तिथेही रेटारेटीची गर्दी. मुंबई संघात सिलू वकील नसली, तरी सुशीला रेगे होती! पण ती गर्दी होती विद्यार्थीदशेतील प्रेक्षकांची. मुंबईचे नाटेकर विरुद्ध अलाहाबादचे त्रिलोकनाथ ऊर्फ टी. एन. सेठ सामने विलक्षण रंगत, (टेनिसमधील बोर्ग- मॅकेनरो, किंवा फेडरर- नदाल सामन्यांइतके उंचीचे नसले, तरी खडाजंगी चुरशीचे) सामने सर्वत्र गर्दी खेचत. अलाहाबादला आरडाओरडा वा दौलतजादा झाला नाही. अलाहाबाद हीच लखनऊपेक्षाही उत्तर प्रदेशची सांस्कृतिक राजधानी मानली जाते, ती उगाचच नव्हे!

पाटण्यातील बुभुक्षित, तर अलाहाबादमधील रसिकजनांच्या नजरांवरून आणि स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकाकडून वळू या, २०१२ कडे. लंडन ऑलिम्पिक निवडीच्या प्रक्रियेसोबत, टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कडवट अनुभवांकडे. जो प्रश्न समस्या बनला, तो होता दुहेरी जोडय़ा निवडण्याचा. पुरुष दुहेरी व मिश्र अशा दोन जोडय़ा निवडण्याचा! टेनिस फेडरेशनची पसंती होती लिएन्डर पेस- महेश भूपती जोडी जमवण्याची. पण भूपती व रोहन बोपन्ना हे दोघेही जाहीर करून मोकळे झाले की कोणत्याही परिस्थितीत ते पेसबरोबर जोडी जमवणार नाही. उलट ते दोघे जोडीने खेळतील. या दोघा पुरुष टेनिसपटूंपुढे राष्ट्रीय संघटनेतील खन्ना आणि खन्ना या सत्ताधीशांनी पडते घेतले. अशा परिस्थितीत विष्णू वर्धन या त्यामानाने दुय्यम श्रेणीतल्या खेळाडूसह ऑलिम्पिक दुहेरीत खेळणं पेसला भाग पडलं. अशा तडजोडीसाठी पेस राजी व्हावा यासाठी खन्ना आणि खन्ना यांनी आपल्याला आमिष म्हणून वापरलं, ही सानियाची व्यथा. लंडन ऑलिम्पिकआधीच्या गॅ्रन्ड स्लॅम स्पर्धेत सानिया- भूपती यांनी फ्रेंच स्पर्धा जेतेपद पटकवले होते. याआधीही भूपतीला जोडीदार घेऊन तिने एक ग्रॅन्ड स्लॅम मिश्र जेतेपदासह, जानेवारीतील ऑस्ट्रेलियन ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. टेनिस कोर्टमधील ‘अ‍ॅड- कोर्ट’ची बाजू संभाळण्यात भूपती वाकबगार. तर फोरहँडसाठी प्रसिद्ध असलेली सानिया डय़ूस- कोर्टच्या बाजूतील निष्णात. साहजिकच महेश भूपतीसह आपला चांगला ताळमेळ जमतो, हा सानियाचा दावा. तिलाही पेस नको होता. साथीदार म्हणून भूपतीच हवा होता.

पण भूपती-बोपन्ना या पुरुषांच्या आग्रहापुढे झुकणाऱ्या खन्ना आणि खन्ना या संघटकांना सानिया नामक स्त्रीच्या मताची पर्वा कुठे होती? त्यांनी पेसला सानियाची साथ मिळवून देण्याच्या अटीवर, पुरुष- दुहेरीत विष्णू वर्धनसह जोडी जमवण्याची अलिखित अट घातली. पेस, भूपती, बोपन्ना यांचे हट्ट पुरवले, त्यासाठी सानियाची पसंती धुडकावून लावली. तिच्या मनाविरुद्धची तडजोड तिच्यावर लादली. याविषयी सानियाने काढलेले निवेदन गाजले. लोकांपुढे आपले कर्तृत्व तिने साभिमान पण नम्रपणे पेश केलं. जागतिक एकेरी रँकिंगमध्ये आपण सत्ताविसाव्या (२७ व्या) क्रमांकापर्यंत मजल मारली होती, आणि केवळ विजय अमृतराज  (रँकिंग १६) व रमेश कृष्णन् (२३) हेच आपल्यापुढे होते. (म्हणजे पेस, भूपती, बोपन्ना, सोमदेव बर्मन नव्हते!) मिश्र दुहेरीत २०१२ पर्यंत जगात सातवे स्थान (अन् २०१५-१६ मध्ये शिखरावरचे अव्वल स्थान) अशी तिची झेप होती. लिएन्डर पेससारखा जोडीदार लाभणं ही बाब प्रतिष्ठेची व सन्मानाची खरीच. तरीही पसंतीचा जोडीदार फक्त आपल्यालाच नाकारला जाणे, ही बाब जाचकच. लंडन ऑलिम्पिकसाठी जोडय़ांची निवड व त्या निवडीची वेळ. ही आहे पुरुषी स्वामित्वाची लक्षणं. भारतीय स्त्रियांविषयीचा हा दृष्टिकोन, भारतीय स्त्रीवर्गाची अवहेलना करणारी ही प्रवृत्ती यांचा निषेधच केला पाहिजे. एकविसाव्या शतकात अशा गोष्टी राष्ट्रीय संघटनांनी बेदिक्कत कराव्यात, ही बाब घृणास्पदच!

सानियाच्या जमान्यातील एक ताजी घटना अधिकच निंदनीय. भारतीय जनता पक्षामधल्या उत्तर प्रदेशीय उपाध्यक्ष दयाशंकर सिंग यांची आपल्या स्त्री मुख्यमंत्र्यांविषयीची मुक्ताफळे! पुरुषी वर्चस्वाचे, स्त्रियांना हलके लेखण्याचे, पक्षातील पंथाचे अंतरंग फारसे बदललेले नाही. अशी मंडळी चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी, इंदिरा गांधी विधवा असल्याचा उल्लेख गलिच्छपणे करत असत. दयाशंकरही त्याच पंथातले.

पुन्हा सानियाच्या निवेदनाकडे – स्त्रीचा वापर एखाद्या प्याद्यासारखा करणाऱ्या पुरुषी वर्चस्वाच्या प्रवृत्तीकडे वळू या आणि १९५५च्या जमान्यातील स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघणाऱ्या पाटणानगरीत झुंडीपासूनची, सुधारत्या पुरुषी मानसिकतेचीही दखल घेऊ या. आणि मुख्यत: बघू या, हा बदल घडवून आणण्यात कुणी व केव्हा पुढाकार घेतला आणि परिवर्तनाच्या चळवळीची मशाल कुणी कुणी पुढे नेली!

५ ऑगस्टपासून ब्राझील येथील रिओ द जनेरो येथे सुरू होणाऱ्या २६ व्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या १२१ जणांच्या भारतीय पथकात ६७ पुरुषांसह ५४ स्त्रिया आहेत. भारतीय पथकात, १९७६ च्या माँट्रियाल-ऑलिम्पिकपर्यंत महिला शून्यवत वा नगण्य असत. (तेव्हापासून समाजवादी नेते राम मनोहर लोहिया हे हिंदू-मुस्लीम स्त्रियांनी पडदा-गोषा-बुरखा यांच्या संस्कृतीतून बाहेर येण्याचे, अन् ख्रिश्चन स्त्रियांप्रमाणे पुरुषाच्या खांद्यास खांदा लावून वावरण्याचे आवाहन करत) एकविसाव्या शतकातील पहिल्या तीन ऑलिम्पिकमध्ये स्त्रियांचे प्रमाण २५, २५ व २३ (पथकापैकी ३४, ४४ व २९ टक्के) होते. ते आता प्रथमच अर्धशतक पार करत पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत उंचावत गेले आहे.

ओंगळवाण्या मानसिकतेपासून मागे खेचणारे पारंपरिक विचारांचे शंभर अडथळे महिलांनी पार केले- पण या प्रगतीतील पहिली पावलं कुणी केव्हा टाकली? केवळ या ऑलिम्पिक पथकातील ४५ टक्के असलेल्या स्त्रियांनीच नव्हे, तर पी. टी. उषा, वलसम्मा, शायनी अब्राहम यांच्यापासून, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, अनिसा सय्यद, आयोनिका पॉल, सुमा शिरुर, तसेच डायना एडुलजीपासून वैशाली फडतरे, अर्निका गुजर, सविता मराठे, ललिता बाबर, कविता राऊत यांनीही या गोष्टी समजून घ्याव्यात. त्यांना या गोष्टी सांगणारा शिक्षकवर्ग आज विरळाच. म्हणून त्यांनी आपणहून समजून घ्याव्यात असे सांगण्यास पर्याय उरत नाही.

२००४, २००८ व २०१२ च्या ऑलिम्पिकसाठी सुमारे २५ अन् आता २०१६ मध्ये ५४ स्त्रिया तिरंगी झेंडय़ाखाली ऑलिम्पिकमध्ये उतरतील, पण १९०० ते १९७६ दरम्यानच्या १४ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिलांची गणना करण्यास दोन हातांची बोटं पुरेशी ठरतील. हा बदल घडवून आणण्याची सुरुवात झाली १८४८ मध्ये. हो, १८४८ मध्ये. महात्मा जोतिबा फुले यांनी पुण्यात भिडय़ांच्या वाडय़ात त्या वेळी अस्पृश्य मानल्या गेलेल्या मुलींसाठी शाळा सुरू केली. सखाराम परांजपे, सदाशिव हाटे, सदाशिव गोखले हे त्यांचे निष्ठावान मदतनीस. वाचन, अंकगणित व व्याकरणाची मूलतत्त्वे तिथे शिकवली जात. १८५१ मध्ये बुधवार पेठेत, मग रास्ता पेठेत, पुढच्या वर्षी वेताळ पेठेत अशा पुण्यातच मुलींसाठी तीन शाळा त्यांनी सुरू केल्या. त्या शाळांत शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले जात, तेव्हा त्यांना सनातन्यांच्या अक्षरश: चिखलफेकीस तोंड द्यावे लागायचे. दरम्यान मुंबईतही ८ शाळा सुरू झाल्या. ब्रिटिश सरकारने त्याआधी १८२१ मध्ये सतीची चाल बंद केली होती. स्त्रियांना वारसा हक्क देणारा कायदाही लागू केला. विधवा महिलांचे सौंेदर्य नष्ट करण्यासाठी त्यांचं मुंडन केलं जायचं. त्यास विरोध करणाऱ्या जोतिबांनी बालहत्या-प्रतिबंधक गृह चालवलं. धोंडो विठ्ठल कर्वे यांनी स्त्री-शिक्षण व रघुनाथ धोंडो कर्वे यांनी कुटुंब नियोजन चळवळ हाती घेतली. न्या. रानडे यांच्या पत्नी रमाबाई यांनी स्त्री-शिक्षणासाठी किमान २० वर्षे सेवासदन संस्था चालवली.

आजचा खेळाडूवर्ग स्वत:ला या साऱ्या सामाजिक चळवळींपासून दूर ठेवत आला आहे. विशेषत: गेल्या ५० वर्षांत, खेळाडूवर्ग एका कोषात गुरफटत गेला आहे. क्रीडाक्षेत्रातील तारे-सितारे यांच्याविषयी मंत्रालयातील अधिकारी सांगतात : या थोरामोठय़ांचे पाय मंत्रालयाला लागले की, समजावं यांना स्वत:साठी आणखी काही व आणखी काही व आणखी काही तरी हवंय! मुख्यमंत्र्यांपुढे ते फाइल ठेवतात, त्यात क्वचितच सामाजिक बांधिलकीचा उपक्रम असतो. मात्र गेल्या पावणेदोनशे वर्षांत समाजातील सत्ताधारी वर्गाच्या विरोधात ठामपणे उभे राहून अतिशय चिकाटीने फुले, कर्वे, रानडे, शाहू महाराज, भाऊराव पाटील, साने गुरुजी, डॉ. आंबेडकर प्रभृतींनी जे कार्य केलं त्यातूनच क्रीडा क्षेत्रातील स्त्रीशक्तीचाही उदय होत गेलाय. समाज वातावरणच चंगळवादी, म्हणून या आद्य समाजसुधारकांची स्मृती जागवणं अधिकाधिक महत्त्वाचं.

आता मात्र क्रीडा क्षेत्रात स्त्रियांची संख्या वाढते आहे एवढं मात्र नक्की. नाशिकच्या आदिवासी परिवारातील धावपटू कविता राऊत, साताऱ्यातील कष्टकरी कुटुंबातील धावपटू ललिता बाबर ऑलिंम्पिक पदकाचे नव्हे, तरी ऑलिम्पिक सहभागाचे स्वप्न साकारण्याच्या मार्गावर आहेत. झारखंडची राजधानी रांची येथील रिक्षाचालकाची तिरंदाज मुलगी दीपिका कुमारी, पुन्हा एकदा भारताला पदकाचं स्वप्न दाखवत आहे. हॉकी संघनायिका चानूसह किमान तीन मणिपुरी मुली, बॉक्सर मेरी कोमच्या ब्रॉन्झ पदकाची पुनरावृत्ती रिओत करण्यास उत्सुक आहेत. टेनिस, टेबल बॅडमिंटन असे महागडे खेळ व शूटिंग-जलतरण यातील भावी ऑलिम्पियन सुस्थितीतल्या आहेत; पण अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक (अर्थातच एकमेवाद्वितीय दीप कोर्मकार) तिरंदाजी, हॉकी येथील भावी ऑलिंम्पियन गरीब वा गरीब मध्यमवर्गीय आहेत. हरियाणातील मुलींनी खाप-पंचायतला दिलेली यशस्वी झुंज तर विलक्षण स्फूर्तिदायकच.

समाजसुधारकांच्या पावणेदोनशे वर्षांच्या संघर्षांतूनच पुरुष व महिला यांना समसमान रोख इनाम, प्राइझ मनी देण्याची प्रथा पाश्चात्त्य समाजातून भारतात येतेय. स्क्वॉशमध्ये दीपिका पल्लीकोलला त्यासाठी राष्ट्रीय स्पर्धावर बहिष्कार टाकावा लागला. अखेर यंदा समसमान इनामाची घोषणा झाल्यावरच ती राष्ट्रीय स्पर्धात परतली आणि पुरुष-विजेत्यांच्या बरोबरीचा सव्वा लाख रुपयांचा चेक पटकावत, सम्राज्ञीसारखी वावरली.

या परिवर्तनाच्या ओघात, महिला सुपरस्टार्सना पुरुषांच्या पाठोपाठ एका वेगळ्याच फेऱ्यातून जावं लागत आहे. त्याला मी अग्निदिव्य म्हणणार नाही वा चक्रव्यूहही संबोधणार नाही. हा फेरा एकविसाव्या शतकाचं झगमगतं वास्तव असलेल्या सर्वशक्तिमान टेलिव्हिजनच्या माध्यमाचा. सानिया मिर्झाभोवती मोठं वलय. पंचविशी ओलांडलेल्या सानियाला टीव्हीवर प्रश्न विचारले गेले विवाहपूर्व लैंगिक संबंधांबाबत! मग तिच्या आत्मचरित्रावरून, राजदीप सरदेसाईंसारख्या कसलेल्या, तसेच समजूतदार मुलाखतकाराबाबत अशाच एका प्रसंगातून जावं लागलं. सानियाला राजदीप सरदेसाईने छेडलं. ‘तू माता केव्हा होणार, सेटल डाऊन केव्हा होणार?’ कौतुक केलं पाहिजे सानियाचं, की तिनं प्रश्नाचं उत्तर प्रतिप्रश्नानं दिलं. ‘मी सेटल डाऊन झालेली नाही, असं तुम्हाला वाटतंच कसं? जागतिक एकेरीतील २७ वे रँकिंग, महिला दुहेरीतील अव्वल रँकिंग, महिला दुहेरी व मिश्र स्पर्धातील ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे. मी ‘सेटल डाऊन’ झालेली आहे, असं मानण्यास ही कामगिरी का पुरेशी मानली जाऊ नये?’ राजदीपही समजूतदार. त्यानं लगेच दिलगिरी व्यक्त केली. असा सवाल आपण पुरुष खेळाडूला केला नसता, असंही त्यानं प्रांजळपणे आपणहून मान्य केलं.

मातृत्व, चूल आणि मूल याविना कर्तबगार स्त्रियांचं यश अपुरं मानणारी सामाजिक मानसिकता. तिलाच सानियानं आव्हान दिलं. महिला सुपरस्टारवर (धोनी, कोहली व सुशील कुमार) यांच्याप्रमाणेच टीव्ही व प्रसारमाध्यमांना सामोरं जाण्याचं आव्हान एकविसाव्या शतकात आलंय. त्या फेऱ्यातून सन्मानाने बाहेर पडण्याचा रस्ता सानिया या चकमकीतून दाखवत आहे.

क्रीडाक्षेत्रापुरतं बोलायचं तर पुरुषांप्रमाणे स्त्रियांही चीन, जपान, दक्षिण कोरिया, क्युबा, कझाकिस्तान आदी देशांच्या तुलनेत खूप खूप मागे आहेत. स्त्रीशक्तीला भारतात आस्ते आस्ते मान्यता मिळत्येय, तिची कदर होत्येय. पण ही आहे केवळ सुरुवात. भारतीय नारीला अजून भरपूर वाटचाल करायचीय..

 

-वि. वि. करमरकर