प्रत्येक घर स्वतंत्र असतं, पण अनेक गोष्टी बहुसंख्य लोकांच्या घरात सारख्याच असतात. आयुष्यातल्या प्रतिकूलतेमुळे अपयश, निराशा त्यातून वाद, विसंवाद होतच असतात. भावनिक प्रगल्भता असेल, विवेकी सामंजस्य असेल, तर अनेक घरं त्याही परिस्थितीत समाधानाने जगण्याचे मार्ग शोधतात; पण काही घरं मात्र सतत धुसफुसत, खदखदत, अस्वस्थच असतात आणि मग या घरांची कुजलेली, साचलेली, स्वतंत्र बेटं होतात.. त्यांना जोडण्यासाठी पुलाची गरज असते.. ज्यांची आज कमतरता भासू लागली आहे. सिद्धांत गणोरे या तरुणाच्या हातून झालेली आईची हत्या याच कमतरतेचं कारण असू शकेल का?

‘‘माझ्या आई-वडिलांनी खूप गरिबीत आणि कष्टात दिवस काढून मला शिकवलं.. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे, पण मुलांना त्याचं काही नाही.’’ एखादा प्रौढ पुरुष सांगतो.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

‘‘मी नापास झाल्यावर ‘पोरगा बिघडेल का?’ ही आईच्या डोळ्यातली शंका आणि ‘पास होईल का?’ हा अविश्वास टोचत राहतो. त्यांचं दोघांचं मला आलटून पालटून टोकणं असह्य़ होतंय. सध्या तरी मी त्यांच्या घरात तिथल्या कम्फर्टसाठी राहतोय.’’ काही कारणानं एक वर्ष नापास झालेला, पण गुणी, हुशार मुलगा म्हणतो. स्वत:ची आयडेंटिटी येईपर्यंत त्याची ही ‘फेज’ राहते.

‘‘आयुष्यभर मी पहाटे स्वयंपाक करून, अप-डाऊन करत नोकरी केली. त्या वेळी गरज होती. एकुलता एक मुलगा आजीकडे आणि  कामवालीकडेच वाढला. नवऱ्याची फिरती, घरातली आजारपणं यात वर्षे गेलेली कळलंच नाही. आता घरात संवादच उरला नाही, कसलंच बाँडिंग नाही. मुलाला बाहेरचंच खाणं आवडतं, नेटवर चॅटिंग करतो, भटकतो. अभ्यास जेमतेम. घरचं बरं आहे हे त्याला माहितीय. ‘स्वत:ची जिम काढेन’ म्हणतो, पण त्याचं वागणं पाहता तो काहीही धड करूशकेल असं वाटत नाही.’’ नोकरीवाली कोणी आई हताशपणे सांगते.

‘‘माझी मुलगी लहान असताना नवऱ्याचं बरीच वर्षे एक अफेअर होतं. ध्यानीमनी तेवढंच ठेवून मी रात्रंदिवस रागात, दु:खात, नवऱ्याच्या मागावर किंवा भांडत असायचे. माझं मुलीकडे तसं दुर्लक्षच झालं. तेव्हापासून माझी मुलगी घरात गप्पगप्पच असते. पुढे ते प्रकरण संपलं, पण तिच्या आमच्यातला संवाद हरवला तो कायमचाच.’’

‘‘आमच्या वर्गातल्या खूप मुला-मुलींना कधी ना कधी जीव द्यावासा वाटलेला आहे, निदान पळून जावंसं तर नक्कीच वाटलेलं आहे.’’ एका दहावीतल्या मुलीचा अनुभव.

‘‘माझी आई सतत कटकट करते. माझ्यावर पहाराच असतो तिचा. माझी चूक जगजाहीर करून मला बोलणी बसल्यावर तिला जिंकल्याचा आनंद मिळतो.’’ एखादा मुलगा चवताळून सांगतो.

पालक-मुलांमधल्या विसंवादाच्या या काही जागा. समस्या तशा जुन्याच, पण हल्ली त्यांनी एवढं उग्र रूप का घेतलंय? सगळीच नाही, पण अनेक घरं नाराज का आहेत? मुलांचे विचार कोणत्या दिशेनं चाललेत हे पालकांना कळत नाही आणि पालकांना काय हवंय ते मुलांना कळत नाही. मुलांचा हेतू पालकांना त्रास देण्याचा नसतो आणि पालकांची सगळी धावपळ, अपेक्षा मुलांच्या भल्यासाठीच असते. तरीही घरं कमी-अधिक प्रमाणात धुमसत का असतात? अडेलपणा, आक्रस्ताळेपणा, घर नकोसं होणं यापासून क्वचित प्रसंगी मूल किंवा पालकच नकोसं होणं यामागची कारणं काय असू शकतात?

बदलती समाजव्यवस्था, एकत्र कुटुंबाकडून एकल कुटुंबाकडे झालेला प्रवास, शहरीकरण, वाढती स्पर्धा, पिढीतलं अंतर अशी याची ढोबळ कारणं आहेतच; पण मानसिक पातळीवर व्यक्ती म्हणून मुलांचं किंवा पालकांचं काय घडलं? घडतं? मुलांच्या आणि पालकांच्या मनातली गृहीतकं आणि परस्परांकडूनच्या अपेक्षा डाटा म्हणून वस्तुनिष्ठपणे तपासून पाहता आल्या तर या वाढत्या विसंवादाच्या कारणांच्या मुळाशी नेमकं पोहोचता येईल. आपापल्या घरापुरतं समस्येचं मूळ सापडू शकेल.

दोन पिढय़ांपूर्वी माणसं पोटासाठी शहरात येऊ लागली तेव्हापासून कुटुंबपद्धती बदलायला सुरुवात झाली. तरीही लहानपणी एकत्र कुटुंबात आयुष्य गेल्यामुळे माणसांत ओढ होती. गावातल्या कुटुंबाचं ‘एक्स्टेन्शन’ असंच शहरातल्या घराचं स्वरूप असायचं. कुटुंबप्रधान, पुरुषप्रधान व्यवस्था व्यक्तिप्रधान होत गेली तेव्हाच्या संक्रमणकाळातल्या समस्या पालकांसाठीही नवीन होत्या. त्यामुळे आई-वडील त्या चक्रात अडकले. त्या धावपळीत काळाच्या वेगाचा अंदाज कुणालाच आला नाही. येत्या काही वर्षांत पिढीतलं अंतर तीस वर्षांवरून पाच-सात वर्षांइतकं कमी होईल हे कुणाच्या स्वप्नातही नव्हतं. बदलत्या परिस्थितीवर लोक टीका करत राहिले. ‘तुमची पिढी एकलकोंडी, स्वत:पुरतं पाहता, तुम्हाला आमच्यासारखी नात्यांची ओढ नाही’ वगैरे टीका करताना भावंडं-नातलग नसण्यात मुलांचा दोष नाही, तो आपला निर्णय होता. नातीच नाहीशी होत चाललीत तर त्याचा अनुभवच न घेतलेल्यांना ती कळतील कशी? हे लक्षातच आलं नाही.

छोटय़ा कुटुंबातलं मुलांचं एकटं पडणं समजत असलं, तरी भावनिक पातळीवर त्याच्या परिणामांसह पालकांपर्यंत पोचलं नसावं, कारण भावंडं, नातलगांच्या गोतावळ्यात वाढलेल्या पालकांच्या अनुभवातला, आठवणीतला ‘कम्फर्ट झोन’ मनात तसाच होता. आहे. एकत्र कुटुंबात भावनिक आधाराचा भार फक्त आई-वडिलांवर नसायचाच. गोतावळ्यातलं कुणी तरी मुलांच्या जवळ असायचं. नात्यांच्या मनातल्या प्रतिमा तशाच राहिल्याने पालक आपल्या मुलांकडून तशाच अपेक्षा करत राहिले. सध्याच्या पालकांना येणाऱ्या गोंधळलेपणाचं मूळ बदलत्या भूमिकांचा, गरजांचा आयाम लक्षात न येणं आणि नंतर आपला ‘कम्फर्ट झोन’ सोडता न येणं यात आहे असं वाटतं. कम्फर्ट झोन तोडायला नेहमीच अंतर्विरोध असतो, कारण इतकी र्वष जपलेलं सोडायचं तर ती पोकळी भरायला नवं काहीच सिद्ध झालेलं नसतं. त्यात उत्तरासाठी नेहमीच पूर्वसुरींवर अवलंबून असलेल्या समाजाला या अधांतरी भांबावलेपणाची भीती वाटते. ‘आपण कमी पडतोय’च्या भावनेतून पालकांची अगतिक चिडचिड होते. त्यातून ‘तुमच्यामुळे/तुमच्या पिढीत’ असे मुलांवरच दोषारोप होऊन परिस्थितीवरची नाराजी निघते. मुलांना हे आरोप झेपत नाहीत, आपलं काय चुकलं? याची संगतीच लागत नाही. तीही गोंधळतात, आक्रमक होतात, घरातला ताण वाढतो.

मोकळा संवाद

पालक-मुलांतल्या मोकळ्या संवादाची आपल्याकडे पूर्वापार सवय नव्हती. नवरा-बायको-मुलं यांचे परस्परांशी बोलण्याचे विषय ठरलेले असत. आईशी संवाद जेवण-खाण, मुलांची काळजी आणि एखाद्या वस्तूची मागणी एवढाच आणि वडिलांच्या तर वाऱ्यालाही मुलं उभी राहात नसत. पाढे-स्तोत्र-स्पेलिंग्ज-अभ्यासाची चौकशी आणि रागावणे, शिस्त, शिक्षा एवढेच वडील-मुलांच्या संवादाचे प्रसंग आणि विषय. यात पालकांची भूमिका ‘सांगणं’ ही आहे, ‘ऐकणं’ ही नाहीच. पिढय़ान्पिढय़ा रुजलेली ही चौकट आधुनिक पालकांच्या मनातही नक्कीच छुपेपणानं शिल्लक असते.

आजची वस्तुस्थिती तपासायची तर ‘कशा संवादाची अपेक्षा आहे?’ हे सहसा पालकांना ‘नेमकं’ सांगता येत नाही. मैत्रिपूर्ण गप्पा मारायला हव्या असतील, तर मैत्रीचं नातं दोघांत असतं का? बहुतेकदा पालकांना मोकळा संवादही अभ्यासाकडेच न्यायचा असतो. (अभ्यास, शिस्त, अपेक्षा याशिवाय इतर कुठल्या विषयावर आपण मुलांशी काय व किती बोलतो ते पालकांनी आठवून पाहावं.) खरं तर बहुतेक मुलं असंही सगळ्या गोष्टी आई-वडिलांना सांगत नाहीत. बोलण्याची गरज सामान्यत: स्त्रियांना जास्त असल्यामुळे मोकळेपणा असलेल्या आई-मुलीत मैत्रीचा संवाद असू शकतो; पण बाप-लेकातला असंवाद किती बदलला आहे, हे शोधावं लागेल. त्यातही बहुसंख्य मुलग्यांना लहान वयात काय बोलायचं ते कळतही नाही अनेकदा. मोठी झाल्यावरचे विषय आई-वडिलांशी बोलणं आपल्याकडे कठीण. त्यातून काही मुलं थोडंफार बोललीच तर पालक ताबडतोब त्या छुप्या चौकटीत शिरून सल्ले, काळजी किंवा तुमचं कसं चुकतंय ते ‘सांगणं’ सुरू करतात, मुलांना मनातलं बोलण्याची अनिच्छा किंवा धास्ती वाटते. सहजसंवाद खुंटला की बोलण्यातून ताण वाढतो.

सोबत

कुठल्याही काळातल्या मुलांना एका वयापर्यंत  घरात कोणाची तरी ‘सोबत’ हवी असते. पूर्वी मुलं मुलांमध्ये खेळत, भटकत असायची, मोठी भावंडं काळजी घ्यायची. मुलांना हवा तो अवकाश मिळायचा, तरीही असुरक्षित वाटायचं नाही. आई-वडिलांचं दुरून थोडं लक्ष असायचं. त्या मोकळेपण आणि सुरक्षित भावनेची परिस्थिती आज आहे काय?

आई-वडील दोघंही नोकरी करत असतील तर मुलांना आठवडाभर घरात एकटं वा आजी-आजोबा वा सांभाळणाऱ्यांसोबत राहण्याची सवय असते. नेमका सुट्टीच्या दिवशी आई-बाबांकडे थोडासा वेळ असतो. मुलांना वेळ देत नसल्याच्या अपराधी कर्तव्यभावातून ते अभ्यास घेतात, अभ्यासाला बसवतात. त्यासोबत मुलांची अभ्यासाची पद्धत, कम्फर्ट लक्षात न घेता ‘लिहूनच लक्षात राहतं, सलग दोन तासांची बैठक हवीच’ अशा गोष्टींना अवास्तव महत्त्व देत लेक्चर, शिस्त, अपेक्षा, कुणाशी तरी तुलना अशा सगळ्या गोष्टी ओघानं येतात. त्यामुळे मुलांना शनिवार-रविवारची भीती वा ते नकोसं वाटण्याचीच शक्यता. ‘होममेकर’ आईला ‘मुलाला वळण लावण्यात कमी पडलो तर आपल्याला बोल लागण्याची भीती. नोकरी सोडून घरात बसलेलीचं ‘मुलाला वळण लावणे’ हे ‘टार्गेट’. यांच्या जोडीला वर्तमानपत्रातल्या बातम्या, दूरचित्रवाणीवरच्या मालिकांच्या माऱ्यामुळे बाहेरच्या ‘वाईट जगाची’ विलक्षण धास्ती, आयांच्या ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुपमुळे आपल्या मुलाची कुणाशी ना कुणाशी तुलना, यामुळे मुलासोबत असताना ‘असं वाग, तसं वागू नको, हे कर, ते करू नको, आमच्या अपेक्षा..’ वगैरे वगैरे सांगत, बोलत राहणे आणि मुलांना ‘चांगले’ बनवणे हाच पालकांचा एककलमी कार्यक्रम असतो. या सगळ्यातून मुलं, ‘तुझ्यात काही तरी कमी आहे, तू आम्हाला आवडत नाहीस’ असा संदेश घेतात. त्यांच्या परीनं बदलण्याचा थोडाफार प्रयत्न करतात, पण पालकांच्या अपेक्षा संपत नाहीत. सतत टीकाच पदरात पडल्यावर मुलं आधी नाराज होतात, मग आक्रमक, त्यातून आणखी विसंवाद अशा दुष्टचक्रात घर सापडतं. छोटेसेही प्रसंग पुन:पुन्हा घडल्यावर त्यांचे ‘ट्रिगर’ बनतात. मुलं-पालक दोघांनाही आपापल्या अपेक्षाभंगातून आलेली असहाय्य भावना राग, चीड, संताप, द्वेष अशा दुष्टचक्रातून टोकाच्या सूडभावनेपर्यंतही जाऊ  शकते.

मनातली भीती आणि सर्वोत्तम मूल घडवण्याचा  ध्यास त्यामुळे मुलांना किंवा पालकांना कुणालाच स्वत:ची अशी थोडीही ‘स्पेस’ मिळत नाही. मुलांची शाळा, विविध क्लासेस, होमवर्क, खेळाचा वेळ, मोबाइल वापरावर बंधनं अशा पद्धतीनं मुलांचं दिवसातलं जवळजवळ प्रत्येक मिनिट कुणी तरी ‘प्लॅन करून एक्झिक्युट’ करत असतं, या बांधलं गेल्याच्या भावनेमुळे पौगंडावस्थेतील टप्प्यावर स्वतंत्र वृत्तीची मुलं खूप आक्रमक बनतात, तर पालकांचं नियंत्रण स्वीकारणारी मुलं मनातल्या मनात चरफडत राहतात.

बारावीनंतर मुलाची इच्छा डावलून पालकांच्या इच्छेच्या अभ्यासक्रमाची सक्ती हा एक सर्वव्यापी विषय. पालकांचा निर्णय काही मिनिटांत होतो, पण तो अभ्यासक्रम मुलाला आवडला/झेपला नाही, तर पुढे तीन-चार र्वष रोज प्रत्येक मिनिटाला त्या सक्तीबद्दलचा संताप साठत राहून कधी तरी अनपेक्षित उद्रेक होऊ शकतो. अनेकदा यातून पालक आणि मुलांचा ‘पॉवर गेम’ चालू होतो. पालकांकडून मुलांच्या चुकांना अवास्तव, मोठं करून टार्गेट केलं जातं. पौगंडावस्थेतील मुलं विरोधात गेली तर पालकांची ‘आपण कमी पडू आणि मुलं वरचढ होतील, हाताबाहेर जातील’ ही भीती/असुरक्षिततेची भावना प्रबळ होते. तिला इंटरनेट मोबाइलचं विश्व खतपाणी घालतं. खरं तर आज वही-पुस्तकाचं काम मोबाइल करतोय. सहावी-सातवीपासून मुलांना संगणक, मोबाइल-इंटरनेटमुळे ज्या वेगानं जगाशी एक्सपोजर मिळतं, तिथे पालक पोहोचूपण शकत नाहीत (आयटीवाले अपवाद). तरीही मुलं या गॅजेट्सचा ‘गैरवापर’ करतील या भीतीतून पहारा/चौकशा चालूच राहतात. (स्त्री-पुरुष मैत्रीबद्दलच्या पालकांच्या कालबाह्य़ कल्पना हीदेखील अविश्वासाची एक जागा.) यातून, आपण काहीही केलं तरी अविश्वासच आहे, असं मुलांचं मत झाल्यावर काही मुलं बिनधास्त खोटं बोलतात, कोडगी बनतात. मग ‘मी तुला पकडू शकते/शकतो’ असं पालक दाखवून देत राहतात. असं शीतयुद्ध सतत चालू राहिल्यानंतर घरातलं वातावरण सुडाचं होऊन घरं आतल्या आत खदखदतच राहातात.

आई-वडिलांचं परस्परांशी नातं

आई-वडिलांमध्ये तीव्र मतभेद असतील आणि ते आटोक्यात ठेवण्याची भावनिक प्रगल्भता त्यांच्याकडे नसेल तर मुलांचा वापर हत्यार म्हणूनच केला जातो. कुठल्याही भांडणात ‘वरचढ कोण?’ हाच खरा मुद्दा असतो. त्यामुळे एकमेकांशी असलेल्या स्पर्धेत मुलांना आपल्या बाजूला ओढून घेण्याची आई-वडिलांत चुरस लागते. त्यासाठी योग्य-अयोग्यचं तारतम्य सोडून दोघंही आलटूनपालटून मुलाला पाठीशी घालत राहतात, परस्परांबद्दल मुलांच्या मनात विष कालवलं जातं. कालांतराने मुलं या वातावरणाचा फायदा घ्यायला शिकतात. मतभेदांचं कारण विवाहबाह्य़ संबंधांसारखं काही असेल तर मुलांना आई-वडिलांची लाज वाटते. ती गोंधळतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकतात, अर्थात एकटी पडतात. पुढे अनेकदा ‘माझ्याच नशिबात असं घर का?’ या न्यूनगंडात अडकून वर्षांनुर्वष गरगरत राहतात, मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ राहतात.

काही जोडप्यांत म्हणजेच घरांत, ‘समस्या सोडवायची म्हणजे प्रतिस्पध्र्याला गप्प करायचं’ असा समजुतीतला घोटाळा असतो. असे लोक भीती वा असुरक्षितता वाटली की संतापात शिरून भांडणं आणि आरडाओरडा करायला लागतात. अशा घरातली मुलंही पुढे तेच शिकतात, पण ते मात्र आईवडिलांना सहन होत नाही. या सगळ्यातून घरातलं वातावरण सतत बारूद भरल्यासारखं, कधीही भडका उडेल असं स्फोटक बनतं. घरातले सर्व जण सतत युद्धासाठी सज्ज असतील तर अर्थात युद्धात हरण्याची भीती आणि असुरक्षितता तिथे कायमची असते.

हे सगळं मांडताना, मुलं किंवा पालक कुणाचीच बाजू घेण्याचा उद्देश नाही. टोकाची परिस्थिती प्रत्येक घरात नक्कीच नसते. तसंच चुका प्रत्येकाकडून होतात आणि प्रत्येकाच्या बाजूत तथ्याचा अंश असतोच, पण आहेत त्या तीन-चार लोकांत दोन गट करून आरोपनिश्चिती करणं हा घरांचा उद्देश नसायला हवा ना? आपल्या घरात थोडय़ा बंदुका आहेत की ठासून दारूगोळा भरलाय याचं भान ज्यानं त्यानंच घ्यायला हवं. तो विखार कमी करायचा असेल तर आपल्या ठाम गृहीतकांच्या बाहेर येऊन दुसऱ्याही बाजूकडे त्रयस्थपणे पाहावं. थोडा विश्वास ठेवून पाहावा, परस्परांना वेळ द्यावा, थोडय़ा गाठी सुटतीलच.

यात पालकांची जबाबदारी जास्त, कारण मुलांनी पाहिलेलं नात्यांचं विश्व छोटं आहे. पालकांना तीन-चार पिढय़ांची स्थित्यंतरं माहीत आहेत. जुनी गृहीतकं, चौकटी जरा बाजूला ठेवल्या, तर ‘मुलांच्या जागी’ जाऊन त्यांची मानसिकता समजायला लागेल. मग त्यांच्यासोबत पुढे जाऊन जुन्यातलं जे शाश्वत आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. वागण्याचे, समस्यांचे तपशील बदलत गेले, तरी मूळ भावना बदलत नाहीत. ‘आपण कुणाला तरी हवं असणं, आपण महत्त्वाचे असणं’ या गरजा बदलत नाहीत. त्यामुळे जुनं-नवं, चूक-बरोबर याच्या अभिनिवेशात न अडकता भावनिक प्रगल्भतेपर्यंत पालक जाणीवपूर्वक पोहोचतील आणि मुलांना ते बाळकडू घरातून मिळेल. सध्याच्या व्यक्तिप्रधान, वेगवान जीवनशैलीत ‘नाती एकसंध असावीत, बेटंच नकोत’ अशी अपेक्षा अवघड आहे, पण पूल बांधण्याचं तंत्रज्ञान अंगवळणी पडेल. भावनिक प्रगल्भतेकडे जाणं हा समाज म्हणून बदलाचा पुढचा सकारात्मक टप्पा असेल का?

नीलिमा किराणे neelima.kirane1@gmail.com